थोडं माझ्या विषयी

Thursday 18 June 2015

मागील पिढी आणि आजची पिढी

सदा सर्वदा, शुभंकरोती इ. पण आजकाल आईवडील दोघेही नोकरी करतात ते सकाळी घरातून निघाले कि पुन्हा रात्री घरी परततात, त्यामुळे मुलांकडून हे म्हणून घ्यायला वेळच मिळत नाही. कोणी नातेवाईक घरी आले किंवा आपण एखाद्या नातेवाईकाकडे गेलो कि मला ते कविता, गाणी, नाच  वगैरे येतं का विचारायचे, त्यावेळी बडबडगीते म्हणत होतो, नाच रे मोरा सारख्या गाण्यावर नाच करून दाखवत होतो, पण आता तीच परिस्थिती बदलली आहे...



मागील पिढी आणि आजची पिढी

नमस्कार, मी प्रजोत कुलकर्णी. आज मी मागील पिढी आणि सध्याची पिढी यावर लेख लिहित आहे, बरेच दिवस हा लेख लिहायचा विचार होता पण वेळेअभावी जमले नाही असो पण लेख लिहायचे कारण म्हणजे सध्याची पिढी आणि मागील पिढी यामध्ये भरपूर तफावत जाणवत आहे. माझ्या २६ वर्षाच्या आयुष्यात बरेच बदल मला जाणवले. मी माझ्या आयुष्यावरून हा लेख लिहित आहे. पण ही तफावत जी आहे ती सर्वांच्याच बाबतीत दिसून येईल तसेच सर्वांच्या जुन्या आठवणी जाग्या होतील. मी लहानपणापासून सुरवात करत कसे बदल घडत गेले ते मांडायचा प्रयत्न करतो आणि मग सगळ्यात शेवटी एक सारांश लिहितो.

मी लहान असताना सकाळ संध्याकाळ घरात माझ्याकडून श्लोक, स्तोत्रे म्हणून घेतली जात होती. उदा. सदा सर्वदा, शुभंकरोती इ. पण आजकाल आईवडील दोघेही नोकरी करतात ते सकाळी घरातून निघाले कि पुन्हा रात्री घरी परततात, त्यामुळे मुलांकडून हे म्हणून घ्यायला वेळच मिळत नाही. कोणी नातेवाईक घरी आले किंवा आपण एखाद्या नातेवाईकाकडे गेलो कि मला ते कविता, गाणी, नाच  वगैरे येतं का विचारायचे, त्यावेळी बडबडगीते म्हणत होतो, नाच रे मोरा सारख्या गाण्यावर नाच करून दाखवत होतो, पण आता तीच परिस्थिती बदलली आहे. मुले गाणी म्हण किंवा नाच कर असे म्हणाल्यावर मुन्नी आणि शीला यासारख्या गाण्याशिवाय त्यांना काही आठवतच नाही, आणि आपण किती सुंदर नाच केला किंवा गाणे झाले म्हणून टाळ्या वाजवतो. थोडे मोठे झाल्यावर अंगणात किंवा मैदानात जे खेळ खेळायचो त्यातील काही खेळ जे परदेशातून भारतात आले ते आताची मुले कॉम्पुटर, लॅपटॉप, आयपॅड वर खेळतात. लपंडाव, सूरपारंब्या, तळ्यात-मळ्यात, लगोरी, गोट्या, विष अमृत हे खेळ तसेच मैदानी खेळाबरोबरच बैठे खेळ उदा. सापशिडी, ल्युडो, काचा कवड्या आणि बरेच बारीकसारीक खेळ हे आजच्या मुलांना माहित देखील नाहीत. तसेच या प्रकारच्या खेळातून व्यायामही चांगला होत असे आणि बुध्दी हि तल्लख होत होती. त्या काळी व्यायाम हा प्रकार वेगळाच होता जोर, उठाबाश्या, दोरीउड्या, सूर्यनमस्कार, धावणे असे व्यायाम आम्ही करत होतो आता व्यायाम म्हटले कि डम्बेल्स घ्यायचे, मशीन वर धावायचे,  वजन उचलायचे म्हणजे झाले.
त्यावेळी आहार हा हि खूप पौष्टिक असत होते,

आजकाल ची मुले फक्त जाहिरात बघून नुडल्स खा कुठे पास्ता खा, अजून बाकीचे फास्टफूड खा असे करतात, त्यावेळी नाश्ता केला तरी तो शरीराला चांगला असा असे उदा. पोहे, शिरा, उपमा आणि हे शक्यतो रोज नसायचे रोज सकाळी सकाळी गरमागरम भाकरी त्यावर मस्त तूप मीठ लावून खायचो. तसेच रोजचा आहार पण सकस असत होता. डावा उजवा सगळा रोजच्या रोज पानात असत असे उदा. चटण्या, कोशिंबीर, लोणचे इ. त्यामुळे शरीराला लागणारी जीवनसत्व व्यवस्थितरीत्या मिळत होती याचा परिणाम म्हणजे शरीराचीही वाढ खूप चांगली होत असे.

त्यावेळेची शिक्षणपध्दती पण वेगळी होती, रोज सकाळी प्रार्थना, मग तास सुरु होत असत, शाळा सुटताना परत शेवटी प्रार्थना, वंदे मातरम असायचे यातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती, मोठ्यालोकांचा आदर यासारख्या गोष्टी शिकायला मिळायच्या, यातील बऱ्याच गोष्टी सध्या लुप्त झाल्या आहेत. त्यावेळेचे शिक्षकही खूप काटेकोर होते, मला शिक्षकाने मारले ती तक्रार घेवून जर घरी गेलो तर घरात दोन रट्टे मिळायचे, मग का मारले हे विचारले जायचे. आजकाल मुलेच शिक्षकांना मारतात वर त्याचे पालक त्यांना काहीच बोलत नाहीत. मुलांवर अभ्यासाचा प्रचंड ताण टाकला जातो, त्यात पालकांचा दोष नाही आहे हि यंत्रणा चुकीच्या पध्दतीने काम करत आहे. जर या स्पर्धेच्या युगात मुलांना टिकायचे असेल तर हे सर्व करावे लागते, मुलांच्या दप्तराचे ओझे हे त्यांच्या वजनापेक्षा जास्त आहे. पण हे सर्व करताना त्यांचे बालपण कुठेतरी हरवले जात आहे हे कुणाच्या लक्षात येत नाही. पालकांना आपण घेतलेले कष्ट फक्त दिसतात पण जे बालपण आपण जगलो (कठीण प्रसंग नाही तर खेळणे बागडणे इ.) ते आजकाल च्या मुलांना जगायला मिळत कि नाही हे कोण पाहत नाही. आज शाळा सुरु झाली कि सकाळी क्लास नंतर शाळा, मग पुन्हा संध्याकाळी क्लास, ज्या दिवशी सुट्टी असेल तेव्हा सुट्टीचे क्लास वेगळे, काय चाललाय हे ?. बरं शाळेला सुट्टी पडेल तेव्हा ते क्लास वेगळे, वेगळी वेगळी शिबिरे यात मुलांना बालपण काय असते हेच कळत नाही, त्यांना बालपण म्हणजे एक शिक्षा वाटू लागली आहे. एवढे करून जेवढे व्यवहार ज्ञान त्यांना मिळाले पाहिजे ते मिळताच नाही आहे उदा. माझ्या आधीची पिढी अजूनही आकडेमोड करताना तोंडी करते आणि मी कागद पेन किंवा कॅल्क्युलेटर चा वापर करतो, पण हे हि तेवढेच खरे कि मी जितकी आकडेमोड तोंडी करू शकतो तेवढी आज काल ची मुले करू शकतील कि नाही ती शंका आहे. मला पहिला मोबाईल मी एम. एस.सी ला असताना घरच्यांनी दिला होता, आणि गाडी मी नोकरीला लागल्यावर घेतली पण आजकालच्या शाळेत जाणाऱ्या लहान लहान मुलांकडे महागडे मोबाईल, गाड्या दिसून येतात.

लिहायचे झाले तर बरेच काही लिहिण्या सारखे आहे पण जे मला ४ मुद्दे (वरील ४ भागात मांडलेले) महत्वाचे वाटतात त्यावर मी सारांश लिहित आहे.

संस्कार : मुलांना चांगल्या संस्काराची गरज खूप आहे, जर का लहानपणीच चांगले संस्कार मुलांवर झाले तर ते त्यांना भविष्यात हि उपयोगी पडतात. ८-१५ दिवस वर्षातून किंवा सहा महिन्यातून मुलांना संस्कार शिबिरात पाठवले म्हणजे त्यांच्यावर संस्कार होत नाहीत, ते रोजच्या जीवनात आचरणात आणावे लागतात. त्यामुळे आपल्या मुलांना योग्य संस्कार होत आहेत कि नाही याची काळजी प्रत्येक पालकाने घेणे जरुरीचे आहे.

खेळ/व्यायाम : खेळ आणि व्यायाम यामुळे आपले शरीर घडते ते जर का योग्य नियोजन करून मुलांना त्याचे फायदे सांगितले तर ते त्यांच्यासाठी उत्तम होते. प्रत्येक खेळातून काहीतरी शिकण्यासारखे आहे. तसेच जो व्यायाम केला जातो तो जन्मभर त्यांना उपयोगी पडेल याचा विचार केला गेला पाहिजे. यामुळे आपले जे पारंपारिक खेळ आहेत हेही जतन केले जातील आणि याचा उपयोग मुलांच्या आयुष्यात नक्की होईल.

आहार : जो आहार मुलांना (आपल्यालाही) मिळाला पाहिजे तो आजकाल मिळत नाही आहे त्यामुळे आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती कमी होत चालली आहे. जर का सकस आणि चौरस आहार  आपल्याला मिळाला तर आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.

शिक्षण : जे आज शिक्षण दिले जात आहे त्यामुळे मुलांच्यावर मानसिक ताण वाढत आहे. त्याच्या वयाच्या मानाने ते ओझे त्यांना पेलणे अवघड जात आहे, याचाही कुठेतरी विचार झाला पाहिजे. त्यांच्या अभ्यासाचे योग्य ते नियोजन करता आले पाहिजे. त्यांना व्यवहार ज्ञान शिकवायचा प्रयत्न केला गेला पाहिजे. सोप्या शब्दात शिकविण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. जे करून त्यांना ते अवघड जाणार नाही व लगेच समजेल.

श्री गणेश चतुर्थी

श्री गणेश हे आपले आराध्य दैवत आहे. प्रत्येक कार्यास आरंभ करताना आपण प्रथम ‘श्री गणेशाचे’ स्मरण करतो. प. पू. श्री. रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामीं यांनी श्री गणेश यांचे स्वरूप, प्रतिष्ठापना, आराधना याविषयी मार्गदर्शन केले आहे. 
 


श्री गणेश चतुर्थी

श्री गणेश हे आपले आराध्य दैवत आहे. प्रत्येक कार्यास आरंभ करताना आपण प्रथम ‘श्री गणेशाचे’ स्मरण करतो. प. पू. श्री. रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामीं यांनी श्री गणेश यांचे स्वरूप, प्रतिष्ठापना, आराधना याविषयी मार्गदर्शन केले आहे. 

"वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ॥
निर्विघ्नम्कुरूमेदेव सर्वकार्येषुसर्वदा”॥ 

" श्री गणेश स्वरूप " 

आपल्याकडे श्री गणेशाला फार मोठा मान आहे. प्रत्येक कार्यात त्याची स्थापना प्रथम करीत असतो. भाद्रपद महिन्यात श्री महाविष्णूंनी गणपतीचे रूप धारण करून सिंदुरासूर दैत्याचा वध केला. त्यामुळे गणपतीला विष्णूरूपही मानलेले आहे. गणेश उपासना ही विष्णूउपासना आहे. गणपती हा देव, मनुष्य व राक्षसगणांचा अधिपती आहे. 

हत्ती हा हुषार प्राणी आहे म्हणून गणपतीला त्याचे मुख बसवलेले आहे. घ्राणेंद्रिये अतिशय तीक्ष्ण असतात. गजमुख हे शक्तीचे स्वरूप दाखवते, सोंड हे शक्तीचे इंद्रिय असल्याने सूक्ष्म अथवा अवजड वस् तूउचलणे व कोणते कार्य केव्हा करायचे ह्याचा विवेकही त्याला असतो. कर्ण सुपासारखे मोठे असतात, त्यांना शूर्पकर्ण म्हणतात. शूर्पकर्ण व बारीक डोळे हे बुद्धिमत्तेचे लक्षण आहे. 
पुराणात असे सांगितले आहे, की सिंदुरवदन राक्षसाने पार्वतीच्या गर्भात जाऊन बाळाचे छेदन केले. प्रसूतीनंतर बिनडोक्याचे बाळ अतिशय विद्रूप दिसू लागले. श्री शंकरांने हत्तीचे डोके कापून या बाळाला चिकटवले म्हणून त्याला गजवदन म्हणतात. बुद्धिमत्ता, शांतताप्रियता, एकाग्रता, त्रीव्र ग्रहणशक्ती व सामर्थ्य असलेले हे गणपतीचे गजस्वरूप आहे. 

गणेशाच्या प्रत्येक हातातील निरनिराळ्या वस्तूधारण करण्यामागे निरनिराळा उद्देश आहे. हातातील मोदक स्वतः खाण्यासाठी नसून दुसऱ्याला देण्यासाठी आहे, अकुंश धर्माविरूद्ध वागणाऱ्याला शिक्षा करण्यासाठी आहे, परशूधर्माला अनुसरून वागणाऱ्याचे रक्षणार्थ आहे तर एक हात आशीर्वाद देणारा आहे. त्याचे उदर मोठे असते कारण शरणागतांचे अपराध तो पोटात घालतो. क्षमा करण्याची, दया दाखवण्याची, मायाममता करण्याची वृत्ती उदरातून जन्म घेते. म्हणून श्री गणेशाला सुखकर्ता, दुःखहर्ता व विघ्नहर्ता संबोधले जाते. 

" श्री गणेश मूर्ती " 

श्री गणेशाची मूर्ती बहुतेक सर्वांच्या देवघरात असते परंतु भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला पूजावयाची मूर्ती पार्थिव असावी व तिचे विसर्जन करावे. श्री गणेश ही मंगलमूर्ती आहे. ती प्रसन्न चेहऱ्याची असावी. गणपतीचे रूप दर्शनीय असावे, त्यात कोणताही ओंगळपणा नसावा. तिचेरूप खाणारी मूर्ती असे दाखवले जाते ते योग्य नाही. मूर्ती उभी नसून नेहमी पद्मासन घातलेली असावी. मूर्तीचा आकार खाली बसून पूजा करता येईल एवढाच असावा. मणी, मोती, साबुदाणा, शेंगदाणे, रूद्राक्ष यापासून बनवलेली मूर्ती घरात ठेवू नये. नर्तन करणारी, खाली पाय सोडलेली, पशुपक्ष्यांवर बसलेली मूर्ती असूनये. मूर्तीच्या हातात आयुधेकमी असावी, म्हणजे ती 'विघ्नहर्ता' मूर्ती असते. मूर्तीच्या एका उजव्या हातात परशूतर दुसरा उजवा हात आशीर्वाद देणारा असावा, एका डाव्या हातात पाशांकुश तर दुसऱ्या हातात मोदक असावा. मूर्ती डाव्या सोंडेची असुन दृष्टी नासिग्राकडेअसावी. मस्तकावर टोप असावा व गळ्यात जानवे असावे. रोज सकाळ, संध्याकाळ आरती म्हणावी व देवाला गोडाचा नैवेद्य दाखवावा. घरातील वातावरण मंगलमय असावे. 

कुटुंब विभक्त झाल्यावर प्रत्येकाच्या घरी पूजेत गणपतीची वेगळी मूर्ती नित्य पूजेकरीता असावी. मूर्तीमध् येचैतन्य आपल्या शुद्ध संस्कारांनी निर्माण होते व ती मूर्ती प्रभावी होऊ शकते. मूर्ती स्थापन केल्यानंतर आपण आपले आचरण किती शुद्ध ठेवतो व किती एकाग्रतेने देवाची सेवा करतो यालाही महत्त्व आहे. 

"प्रतिष्ठापना श्रीगणेशाची" 

गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना जमिनीपासून वर करावी. मूर्ती कधीही खोलगट भागात ठेऊ नये. गणपतीचे आसन उच्च असुन आसनावर ठेवण्यापूर्वी खाली तांदूळ पसरावेत. 

मुर्तीची प्रतिष्ठापना दहा वर्षाच्या आतील लहान मुलाकडून करून घ्यावी; कारण त्यांचे मन निरागस व निर्विकार असुन मनाला विषयाचा स्पर्श झालेला नसतो. मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करताना त्या व्यक्तीचे विचार त्यात सामावले जातात. मोठ्या माणसाने प्राणप्रतिष्ठापना केली तर त्याचे मन आनंदी ठेवावे. मनात चांगले विचार ठेवावेत. विचार चांगले असतील तर घरात मांगल्य निर्माण होते. सेवा फलदायी होते. ब्राह्मणांना बोलावून मंत्रोच्चाराद्वारेच व्यवस्थित प्राणप्रतिष्ठापना करावी. ध्वनिफित लावूनये; कारण त्यात फक्त आवाज असतो मंत्रसामर्थ्य नसते. 

गणपती आपला अतिथी असल्याने त्यांना "यथा देहेतथा देवे" हे जाणून उत्तम प्रकारची फळे, सुवासिक व लाल फुले, दुर्वा अर्पण कराव्या. दुर्वांची जुडी डोक्यावर न ठेवता एक एक दुर्वा चरणांजवळ वाहताना 'ॐ गंगणपतयेनमः' असे म्हणावे. दुर्वा थंड असुन पित्तहरण करण्याऱ्या आहेत. ह्या उत्सवाच्या दिवसांत एकदा तरी एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा. मोदक हे आनंदाचे प्रतिक मानले आहे. मोद म्हणजे आनंद. मोदकात भरलेले सारण गुळ-खोबरयाचे असते; हे दोन्हीही पदार्थ गुणकारी आहेत. जे जे आपल्याला लागते, ते त्याला अर्पण करावे. 

अशा रीतीने योग्य प्रतिष्ठापना, पूजा, प्रार्थना, उपासना केल्याने त्यांचे चांगले फळ मिळते. 

"श्री गणेशाची आराधना " 

पंचायतन पूजेत गणपती ही प्रधान देवता मानलेली आहे. ही देवता संकट निवारणार्थ व ज्ञान देण्याकरीता उत्पन्न झालेली आहे. ज्ञानाद्वारे मनात धैर्य व आत्मविश्वास निर्माण करणे म्हणजे संकट निवारण होय. कित्येक कुटुंबाची गणपती हेकुलदैवत आहे, त्यांनी तर त्याची उपासना करावीच पण इतरांनी ही गणेशाची उपासना करून त्यांना प्रसन्न करून घ्यावे. 

गणपती ही बूद्धीची देवता आहे. तिच्या उपासनेचे नियम फार कडक आहेत व ते पाळणे आवश्यकही आहे. आहारावर नियंत्रण असावे; मद्य, मांस वगैरे संपूर्ण वर्ज करावे. आपले आचरण शुद्ध असावे. 

आपल्या देवघरात नर्मदेतील स्वयंभू गणपती पूजेत असल्यास त्यावर शक्य असेल तर रोज व शक्य नसल्यास संकष्टीला दुधाचा अभिषेक व्हायला पाहिजे. गणपतीची आराधना केल्याने वाणीला वक्तृत्व येते. गणपतीच्या आराधनेसाठी अथर्वशीर्षाची आवर्तने करतात. अथर्वशीर्ष म्हणताना देवाच्या मूर्तीचवरच अभिषेक व्हायला पाहिजे. अथर्व म्हणजेशांत व शीर्ष म्हणजे डोके. अथर्वशीर्ष हा वेदमंत्र आहे. त्याचे उच्चारण व्यवस्थित झाले पाहिजे. कित्येक लोकांना पूजेसाठी व अथर्वशीर्ष म्हणण्यास वेळ नसतो म्हणून ते स्वतः स्नान करताना अंगावर पाणी घेत अथर्वशीर्ष म्हणतात; म्हणजे स्वतःच स्वतःला अभिषेक घेतल्यासारखेव गणपतीची मूर्ती राहते बाजूला, हे काही योग्य नाही. तसेच ओलेत्याने अथर्वशीर्ष म्हणू नये. आजकाल घरोघरी सहस्त्रावर्तने करण्यात येतात पण उच्चारण व आचरण याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे संकटे ओढवली जातात. ईप्सित फळ मिळण्यासाठी आचरण महत्वाचे असते; म्हणून योग्य ब्राह्मणांकडून त्यांचे उच्चारण करून घ्यावे. 

गणपती राहूची देवता आहे. ज्यांना राहूची पीडा आहेत्यांनी गणेश उपासना अवश्य करावी. राहूचा दोष पिढ्यांनपिढ्या चालूराहातो, तो लवकर संपत नाही. हा घराण्याचादोष असतो व तो कुडंली पाहिल्यावर लगेच लक्षात येतो. अपत्य न होणे, विकलांग होणे, अपत्य न जगणे, स्त्री गरोदर असतानाच गर्भ गळून पडणे हे सर्व राहूचे दोष आहेत. यासाठी गणपतीची उपासना अवश्य करावी. 

"श्री गणेश मूर्तीचे विसर्जन" 

गणेशोत्सवात गणपतीचे आवाहन दहा दिवसापुरतेच मर्यादित असावे. दहा दिवस तिला व्यवस्थित सांभाळून गणरायांना निरोप देणे आवश्यक असते. 

म मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करते वेळी पूजेचा ठराविक कालावधी सांगितला जातो; त्यामुळे त्या कालावधीनंतर प्राणप्रतिष्ठा आपोआपच तेथून निघून जाते. म्हणूनच आपण अशा मूर्तींचे पाण्यात विसर्जन करीत असतो. 

काही घराण्यांत मागच्या वर्षीचा गणपती या वर्षी तर या वर्षीचा पुढील वर्षी विसर्जित करतात. ही प्रथा चूकीची आहे. दहा दिवसांनंतर पार्थिव गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करावे. घरात गणेशोत्सव चालू असताना एखादी स्त्री गरोदर असेल तो प्रसूत होईपर्यंत गणेशाचे विसर्जन करू नये. प्रसूतीनंतर वृद्धी संपली की लगेच विसर्जन करावे. 

मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी, त्यांच्याजवळ त्यांनी जी सेवा आपल्याकडून करून घेतली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी, तसेच आपल्याकडून कळत नकळत काही चुका झाल्या असल्यास त्यांची मनःपूर्वक क्षमा मागावी. त्यांच्या बरोबर शिदोरी देऊन त्यांना 'पुनरागमनायच' अशी विनंती करून धीरगंभीर वातावरणात निरोप द्यावा. गणरायांचे आगमन होताना आपण आनंदाने गुलाल उधळणे, नाचणे हे योग्य आहेपण विसर्जनाच्या वेळी आपले नाचणे याचा अर्थ जर गणरायांनी 'बरं झालं ब्याद गेली, असंया लोकांना वाटतंय', असा घेतला तर केवढा अनर्थ होईल. 

विसर्जनाआधी आरती करून खिरापत (खारीक, खडीसाखर, खिसमिस, खोबरेव खसखस) वाटतात. तसेच अनंतचतुर्थीच्या दिवशी गणेश विसर्जनाच्या वेळी मोदकांचा व पंचखाद्याच्या (डाळ, चुरमुरे, खारीक, खोबरे, साखर) नैवेद्य दाखवून प्रार्थना करावी. त्यानंतर मूर्तीचे विसर्जन करावे. नदीत किंवा विहीरीत मूर्ती तशीच न सोडता एखाद्या खोक्यात घालून हळूच पाण्यात सोडावी. अशा रीतीने योग्य आचरणाने गणेशाचे पूजन व विसर्जन करावेतरच मनाला आनंद मिळेल. 

मुलांच्या सुटीला वेगळी दिशा

उन्हाळी सुटीत बरेच काही करण्यासारखे आहे; फक्त अतिरेकी उत्साहाने मुलांचे चोवीस तास "बुक' करू नका. मुलांबरोबर सहज संवाद ठेवा. अनेक गोष्टी करण्याची संधी त्यांना द्या, पर्याय सुचवा. बघा मुले कशी आनंदाने उड्या मारतात ते!


मुलांच्या सुटीला वेगळी दिशा..

उन्हाळी सुटीत बरेच काही करण्यासारखे आहे; फक्त अतिरेकी उत्साहाने मुलांचे चोवीस तास "बुक' करू नका. मुलांबरोबर सहज संवाद ठेवा. अनेक गोष्टी करण्याची संधी त्यांना द्या, पर्याय सुचवा. बघा मुले कशी आनंदाने उड्या मारतात ते!

मुलांची सुटी तुम्हा पालकांना संधी वाटते की संकट? आणि का? सुटीसंबंधीचा हा लेख वाचण्यापूर्वी या प्रश्‍नाचं उत्तर प्रत्येकानं आपल्या मनात प्रामाणिकपणे द्यावं. शक्‍य झाल्यास कारणांसह ते लिहून काढावं. पुढच्याही दोन-तीन प्रश्‍नांची उत्तरं लिहावीत. 

1) तुमच्या लहानपणी (तुम्ही तुमच्या मुलामुलींच्या वयाचे होतात, तेव्हा) तुम्ही सुटी कशी घालवायचा?
2) तुमच्या मुलामुलीची गेल्या वर्षीची सुटी कशी गेली, त्यात त्यांनी काय काय केलं, काय करायला नको होतं, काय करायला हवं होतं असं तुम्हाला वाटतं.
3) या वर्षीच्या सुटीत तुमच्या मुलांनी काय नक्की करावं/ काय नक्की करू नये, असं तुम्हाला वाटतं?
4) सुटीत काय काय करायचं याबाबत तुमच्या मुलांशी तुम्ही बोलता का, सुटीत त्यांना काय करायला हवं असतं,
5) मुलांच्या सुटीचं नियोजन करताना तुम्हाला कोणत्या अडचणी, अडथळे जाणवतात, सुटीबद्दल असा विचार करायला सुरवात केलीत, तर हा लेख तुम्हाला अधिक उपयोगी होईल.

पंचवीस-तीस वर्षांपूर्वीी आपली सुटी कशी जायची? भरपूर मैदानी खेळ खेळणं, पोहायला शिकणं, गावाकडे जाणं, रानमेवा, आंबे खाणं, सायकलवर भटकणं, गडांवर जाणं, घरातली कामं करणं, नातेवाइकांकडे जाणं, वाचन करणं, काही कलाकौशल्य शिकणं, पर्यटनस्थळांना भेटी, मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला जाणं, अर्थार्जन करणं इत्यादी. आपल्या आई-वडिलांना आपल्या सुटीचं "टेन्शन' नव्हतं. आपल्या बहुतेकांची सुट्टी खूप मजेत गेली; मग आपल्यालाच मुलांची सुटी संकट का बरं वाटतं?

"सुटी म्हणजे अख्खा दिवस मोकळा! बापरे! मुलं घरात राहिली, तर नुसत्या झोपा तरी काढतील, तास न्‌ तास टीव्ही, केबल तरी बघत बसतील, नाही तर कॉम्प्युटर गेम्स, इंटरनेट, फेसबुक, ऑर्कुट यांमुळे संगणकाला चिकटून तरी बसतील, नाही तर मोबाईल, फोनवर तास न्‌ तास गप्पा, एसएमएस करत बसतील. धिंगाणा तरी घालतील आणि बाहेर गेली, तर नुसत्या उनाडक्‍या करत हिंडतील. वायफळ गप्पांना तर ऊत येईल. गल्लीबोळातलं क्रिकेट आहेच. भांडणं, दंगा, वेळेवर न जेवणं, उन्हातान्हात भटकणं किंवा सतत "बोअर झालंय' असा घोषा! त्यापेक्षा दोन-चार शिबिरांतअडकवून टाकावं, म्हणजे काही शिकतील तरी! वेळही "सत्कारणी' लागेल आणि आपल्यालाही थोडी शांतता मिळेल!' ...हे तुमचं स्वगत तर नाही ना!

मार्कांच्या जीवघेण्या स्पर्धांमुळे (जी आपणच निर्माण केलीय!) विविध स्पर्धांची अन्‌ परीक्षांची तयारी आणि त्यांना सामोरं जाण्याच्या नादात शालेय वर्ष संपून जातं आणि मग आपल्या मुलाचं, मुलीचं व्यक्तिमत्त्वविकसन राहूनच गेलं, याची जाणीव होते. आपण मुलामुलींसाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाही, आणि वेळ असला तरी त्याचा मुलामुलींची सुटी आनंददायी अर्थपूर्ण होण्यासाठी काय काय करायचं हे कळत नाही, म्हणून मग सुटीचा ताण येतो. वेळ नुसता वाया घालवणं योग्य नाही, हेही तीव्रतेनं जाणवतं. सुटीत मुलं-मुली जे करतात ते अन्‌ आपल्याला त्यांनी जे करावंसं वाटतं, त्यात अंतर पडतं. मग वाद, भांडणं, चिडचिड यांनी रोजचा दिवस कटकटीचा होतो. सुटी संपताना कुणालाच फारसं समाधान, निराळा आनंद मिळालेला नाहीच याची कडू जाणीव होते.

सगळ्याच पालकांची अशी स्थिती असते असं नाही. काही जण विचारपूर्वक सुटीचं नियोजन करतात, तर त्यातले काही जण दुसरं टोकही गाठतात. अन्‌ मग शाळेपेक्षा सुटी अधिक गच्च बांधून टाकतात. सुटीतल्या प्रत्येक दिवसाचा अन्‌ तासाचा जास्तीत जास्त "चांगला' वापर आपली मुलं-मुली कशी करतील आणि त्यामुळे एकूण स्पर्धेत, "सर्वांगीण' विकासात ती कशी सतत पुढे राहतील, यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतात; पण त्यामुळे "शाळा परवडली पण सुट्टी नको' अशी मुलांची स्थिती होते. त्यामुळे सुटी आनंददायी आणि तरीही अर्थपूर्ण करणं, ही मोठीच कसरत आहे; पण ती करायलाच हवी; कारण प्रत्येक जण आपली सुट्टी, आपला मोकळा वेळ कसा वापरतो, यावरच त्याचं "समृद्ध' होणं, आतून फुलत जाणं जास्त अवलंबून आहे, असं मला वाटतं.

कशी सुरवात कराल? प्रथम हे लक्षात घेऊ या, की सुट्टी म्हणजे मनोरंजन हवंच! मुलांना जे हवं ते करण्याची थोडी तरी मोकळीक हवीच. जरा मोकळा श्‍वास घ्यायला, थोडासा आळस करायला, "टाईम पास' करायला, नुसतं निवांत बसायला, निरुद्देश भटकायला, गप्पा मारायला, मनसोक्त खेळायला वाव हा द्यायलाच हवा. म्हणून सुट्टीच्या प्रारंभी आपल्या मुलामुलींना सुट्टीत काय काय करायला आवडेल, काय शिकायला आवडेल, कोणते अनुभव घ्यायला आवडतील, याची यादी करायला सांगता येईल का? किमान वीस गोष्टींची यादी व्हायला पाहिजे, असा आग्रह धरा. यादी करताना चिकित्सा करू नका. सूचना करू नका. तुमची मतं, तुमच्या कल्पना मांडू नका. त्यांना काही सुचतच नाही, असं वाटलं तर मदत करा; पण यादीत काय लिहायचं, याचं स्वातंत्र्य मुलामुलींना द्या. शक्‍य झाल्यास यादीतील वीसही गोष्टींचे तीन-चार गट करायला सांगा. त्यातल्या पाचच गोष्टी करायला मिळणार आहेत, असं असेल तर कोणत्या पाच गोष्टी करायला आवडतील, ते नोंदवायला सांगा. तुम्ही पण तशीच एक यादी करताय, हे तुमच्या मुलामुलींना तुम्ही सांगा अन्‌ तशी यादी करा. मग एखाद्या निवांत वेळी (शक्‍यतो सुटी सुरू झाल्यानंतरच्या आठवडाभरातच) दोघांच्याही याद्या घेऊन गप्पा मारायला बसा. आपली मुलंमुली सुट्टीचा कसा विचार करतात व आपण त्यांच्या सुट्टीचा कसा विचार करतो, हे एकमेकांना कळेल. त्यातून सगळ्याच बाबतीत एकमत होईल असं नाही. कौटुंबिक परिस्थिती, व्यावहारिकता यांचा विचार करून काही किमान कार्यक्रम तरी पक्का करता येईल का? अचानक काही नवीन सुचलं, तर ते करण्याची लवचिकता त्यात जरूर असायला हवी, हे लक्षात घेऊ या.

आता आपल्या "वीस'च्या यादीत काय काय लिहाल, ज्यातून आपल्या मुलांचं अनुभवविश्‍व समृद्ध होईल, त्यांच्यातील उणिवा, मर्यादा कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न होतील, त्यांच्या क्षमता, गुणसंपदा वापरण्याची, वाढविण्याची अन्‌ ताणण्याची संधी मिळेल, नातेसंबंधांमध्ये संवादांमध्ये अधिक मोकळेपणा, जिव्हाळा वाढेल, नवीन कौशल्यं शिकता येतील, व्यावहारिक कौशल्यं वाढतील, बुद्धीच्या विविध पैलूंना खतपाणी मिळेल, स्वावलंबनाचे धडे गिरवता येतील. नुसती ही यादी वाचली तरी तुम्हाला पंधरा-वीस कल्पना सुचायला लागतील. आपला मुलगा-मुलगी डोळ्यांसमोर ठेवून जशा सुचतील तशा कल्पना नोंदवायला सुरवात करा.

1) शिबिराची पूर्वतयारी पाठपुरावा :

हे सगळं करायला आपल्याकडे वेळही नसतो, अन्‌ अनुभवही नसतो. म्हणून मग आपण शिबिरांच्या शोधात असतो. बहुतेक पालक आपल्या मुलामुलीला न विचारताच भराभर शिबिरांचं शुल्क भरून मोकळे होतात. आपल्या मुलामुलींच्या "सर्वागीण' विकासामध्ये काही कमी राहू नये म्हणून एकाच सुट्टीत मार्शल आर्टचं शिबिर, निसर्गशिबिर, नाट्यशिबिर, ट्रेकिंग आणि जोडीला एखादं व्यक्तिमत्त्वविकसन शिबिरही हवंच! असं म्हणत म्हणत भली मोठी रक्कम खर्ची घालून आपल्या मुलामुलींच्या विकासाचं सगळं "कॉन्ट्रॅक्‍ट' या वेगवेगळ्या शिबिरांच्या संयोजकांकडे देऊन पालक मोकळे होतात. पालकांच्या या मनोवृत्तीमुळे शिबिरांचाही सुळसुळाट झालाय. त्यांना बाजारू दिखाऊ स्वरूप येऊ लागलंय. आकर्षक जाहिराती, रंगीत माहितिपत्रकं अन्‌ भरमसाट शुल्क घेणारी ही शिबिरं चटकदारच अधिक असतात.

खरं तर सुटीत आपल्या मुलामुलीला एखाद्या शिबिराला जरूर पाठवावं; कारण मुलंमुली एकट्यानं काही अनुभव घेण्यापेक्षा गटात अधिक चांगल्या रीतीनं शिकतात. वरील मित्र-मैत्रिणी, भरगच्च कार्यक्रम यामुळे अल्पावधीत अनेक गोष्टी शिकतात. अनुभवतात; पण शिबिराची नावनोंदणी करण्यापूर्वी आपल्या मुलामुलीशी त्याबाबत आवर्जून बोलावं, शिबिरं पारखून घ्यावीत. पूर्वानुभव, शिबिर संयोजकांशी होणारा संवाद, शिबिराची कार्यक्रम पत्रिका इत्यादींचा चिकित्सकपणे अंदाज घ्यावा. त्यात निव्वळ निवास, भोजन, प्रवास व्यवस्था सुरक्षितता इ. बाबतच माहिती न घेता, शिबिरांतल्या वेळापत्रकाबद्दल आशयाबद्दल आवर्जून माहिती घ्यावी. ज्या शिबिरांमध्ये मुलामुलींच्या सुप्त गुणांना वाव आहे, जिथं नवीन अनुभव, आव्हानं घ्यायला मिळतील, गटात काम करायला, स्वत:च्या क्षमता ओळखायची, वापरायची जिथं अधिक संधी असेल, अडीअडचणींना, अनपेक्षित प्रसंगांना सामोरं जायला वाव असेल, व्याख्यानं कमी अन्‌ कृती, अनुभव, चर्चा, पाहणं, अभिव्यक्ती यांवर भर असेल, निव्वळ व्यक्तिमत्त्वाच्या बाह्य गोष्टींच्या विकासाऐवजी विचार, वृत्ती, सवयी, प्रेरणा यांच्या घडणीबाबतच्या कार्यक्रमांवर ज्यांचा भर असेल, अशा एखाद्या शिबिरात आपल्या मुलामुलीचं नाव जरूर नोंदवावं- अर्थात मुला-मुलीशी बोलूनच. शक्‍य झाल्यास चौकशीच्या वेळी त्यांनाही बरोबर घेऊन जा.

अशा शिबिरात सहभागी होण्याची काही पूर्वतयारी करायला सांगता येईल का? शिबिर प्रकारानुसार काही पूर्वानुभव घ्यायला सांगता येतील का? क वाचन, काही बाबतीत माहिती मिळवणं शिबिराच्य पूर्वतयारीमध्ये संयोजकांच्या मदतीला पाठवणं, असं काही करता येईल. यामधून शिबिराला जायची उत्सुकता वाढेल. शिबिरातील अनुभव अधिक डोळसपणे घेता येतील. शिबिराहून परत आल्यावर पुढचे आठ-पंधरा दिवसतरी टप्प्याटप्प्यानं तिथल्या अनुभवांबाबत गप्पा माराव्यात, फोटोग्राफ्सच्या साह्यानं संगणकावर काही सादरीकरण करायला सांगावं, अनुभवांचं "रेकॉर्डिंग' करायला सांगावं. चित्र, कविता, लेखन इ. माध्यमांतून त्या अनुभवांची नोंद करायला सांगावी. शिबिर संयोजकांना आठ-पंधरा दिवसांनी लेखी, दूरभाषवर वा ई-मेलवर शिबिरात काय काय भावलं, काय आवडलं नाही, हे कळवायला सांगावं. या सगळ्यांमधून शिबिरात घेतलेले अनुभव पुन:पुन्हा आठवणं, त्या अनुभवांवर रवंथ करणं व्हायला हवं. आठ-पंधरा दिवसांपेक्षा जास्त दिवसांची शिबिरं शक्‍यतो टाळावीत; दोनपेक्षा जास्त शिबिरांमध्ये घालू नये. तीही अंतराअंतरानं असायला हवीत, एवढी खबरदारी मात्र अवश्‍य घ्यावी. म्हणजे शिबिरांशिवाय सुटीत इतर अनेक गोष्टी करण्यासाठी आपल्या मुलांना वेळ काढता येईल.

2) समृद्ध सहप्रवास :

शिबिरांपलीकडे सुटीत एक दिवसापासून आठ-दहा दिवसांपर्यंत एकत्र प्रवासाला जाता येईल का, पर्यटनाच्या सहली असल्या तर त्याच्या चौकशीपासून पूर्वतयारीपर्यंत सर्व गोष्टी मुलांना करायला सांगता येतील का, पर्यटन स्थळांची माहिती मिळवणं, नकाशा, वैशिष्ट्यं इ. बरोबरच तेथील भाषेतील काही शब्द शिकणं वगैरे वगैरे. त्यातही टुरिस्ट कंपन्यांऐवजी स्वत:च सगळं नियोजन करून छोट्या-मोठ्या सहली योजल्या, तर त्या अधिक अंगी लागतात. अनेक अनपेक्षित प्रसंगांना, अडचणींना सामोरं जाण्याची संधी त्यात दडलेली असते. त्याचा त्रागा, त्रास न वाटून घेता, आनंदानं त्यातून काढलेला मार्ग दीर्घ काळ लक्षात राहतो.

मोठ्या सहलीमध्ये मुलामुलींशी संवाद वाढविण्यासाठी, प्रवास आनंददायी अन्‌ अर्थपूर्ण होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवा. त्यासाठी अशा प्रवासात मुद्दामहून काही छानसे लेख, कात्रणं, कविता, पुस्तकं घेऊन अधेमधे वाचता येतील. त्यावर चर्चाही करता येईल. एरवी इतका निवांत अन्‌ सलग वेळ मिळत नसल्यामुळे अनेक विषयांवरच्या राहून गेलेल्या, अर्धवट राहिलेल्या गप्पा पूर्ण करता येतील. आपल्या लहानपणीच्या आठवणी, कुटुंबातल्या आधीच्या पिढ्यांचा इतिहास सांगता येईल. अनेक कोडी, बौद्धिक खेळ, बैठे खेळ मुद्दाम मिळवून ते बरोबर ठेवता येतील. आपल्या मुलांच्या शाळेतील शिक्षक-मित्र-मैत्रिणींबाबत त्यांना बोलतं करता येईल. अनेक विषयांवरची त्यांची मतं जाणून घेता येतील. हे सर्व आपल्या मनाशी ठरवून प्रवासात अधूनमधून वेळ प्रसंग, मूड पाहून खुबीनं पेरता यायला हवं. त्याचबरोबर आसपासच्या माणसांची, ठिकाणांची निरीक्षणं नोंदवणं त्यांच्याशी गप्पागोष्टी करणं, अनोळखी माणसांबरोबर संवाद वाढवणं, असंही आवर्जून करायला सांगता येईल.

दर सुटीत लांबच्या प्रवासाला जाणं जमतंच असं नाही. अशा वेळी जवळपासच्या एक-दोन दिवसांच्या सहलींसाठी मात्र आवर्जून वेळ काढावा. त्यात गड-किल्ले असावेत. खेडेगावात जाणं असेल, आसपासचे विकासाचे प्रकल्प पाहायला जाणं असेल, निव्वळ डोंगरदऱ्यात- निसर्गात भटकंणं असेल. अशा ठिकाणी चुलीवरचा सर्वांनी एकत्र मिळून केलेला स्वयंपाक असेल. स्थानिक गावकऱ्यांबरोबरच्या गप्पा असतील, रानमेव्याचा आस्वाद घेणं असेल. नातेवाईक, मित्र, मैत्रिणींचा गट जमवून अशा छोट्या सहली काढल्या, तर त्यातली रंगत अजूनच वाढेल; मग गमतीच्या स्पर्धा, विविध कला-गुणांचं सादरीकरण, प्रकट मुलाखती वाद-विवाद अशा गोष्टींनी सहलीचा आनंद अनेक पटींनी वाढेल. या सहलींच्या नियोजनात, पूर्वतयारीत, प्रासंगिक निर्णयात मुलामुलींचा सहभाग त्यांना हलकेच मोठं करून जाईल.

3) नात्यांची श्रीमंती :

वर्षभराच्या धकाधकीच्या वेळापत्रकात नातेवाइकांकडे, परिचितांकडे फारसं जाणं होत नाही. सण, समारंभांनाही वेळेपुरतंच जाणं होत असल्यानं नात्यामधला विसविशीतपणा वाढताना जाणवतो. रोजच्या अभ्यासाच्या ओझ्यामुळे घरातल्या मंडळींबद्दलही खूप कमी माहिती आपल्या मुलामुलींना असते. संवाद कमी पडतो. तो वाढावा यासाठी सुटीत काय करता येईल. सुटी नात्यातली वीण घट्ट करण्यासाठी वापरता येईल का?

आजी-आजोबांची मुलाखत घेऊन त्यांचे छोटेखानी चरित्र मुलांना लिहायला सांगता येईल. त्यांचे फोटो ठिकठिकाणाहून मिळवून त्याआधारे संगणकावर पॉवर पॉईंट शो करता येईल. मुलाखती, व्हिडिओ शूटिंग करायला सांगता येईल. कुटुंबाच्या मागच्या तीन पिढ्यांचा वंशवृक्ष लिहायला सांगता येईल. त्यातील प्रत्येक व्यक्तीबद्दल थोडक्‍यात माहिती गोळा करायला सांगता येईल. त्यातल्या न भेटलेल्या व्यक्तींना भेटायला सांगता येईल. त्यांच्याशी दूरभाषवर बोलायला सांगता येईल. त्यांना आपल्या घरी बोलावता येईल. समवयस्क भावंडांना घरी राहायला बोलवता येईल. नातेवाइकांकडे आपल्या मुलामुलींना राहायला पाठवता येईल. एकमेकांच्या घरी "कार्य' असल्यास त्यांच्या मदतीला आवर्जून पाठवता येईल. एकत्र काम केल्यामुळे परस्परांची ओळख आणि मग त्यातल्या काही जणांची घट्ट मैत्री व्हायला नक्कीच मदत होईल. रक्ताची नाती केवळ रक्ताची आहेत म्हणून दृढ होतील, या भ्रमात तुम्ही नक्कीच नसाल. या नात्यांना दृढ करण्यासाठी जाणीवपूर्वक, पण हळुवारपणे प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी सुटीचा चांगला उपयोग करता येईल.
रक्ताच्याही पलीकडे अनेक नाती आपण बांधलेली असतात; पण बहुतांश वेळा ती आपल्यापुरतीच, व्यक्तीपुरतीच मर्यादित राहतात. ती नाती कुटुंबापर्यंत विस्तारता येतील का? आपल्या मित्र-मैत्रिणींची कुटुंबं ही आपल्या मुला-मुलींचीही "आपली' कुटुंब कशी होतील आणि आपल्या मुलामुलींच्या मित्र-मैत्रिणींची कुटुंबं "आपली' कशी होतील, यासाठीही ठरवून प्रयत्न व्हायला हवेत; मग ती भेळ पार्टी-आइस्क्रीम (घरी तयार करून हं!) पार्टी (घरी, बागेत; हॉटेलात नव्हे बरं का!) असेल, एकामेकांकडे राहायला जाणं, बोलावणं असेल. छोट्या-छोट्या सहलींना एकत्र जाणं असेल, गाण्यांच्या मैफलीचा घरगुती कार्यक्रम असेल. एखादी कलाकृती गटानं मिळून तयार करणं असेल. या सगळ्यांतून मिळणारं प्रेम, होणारी भांडणं, रुसवे-फुगवे, एकमेकांसाठी थांबणं, एखादा पदार्थ सगळ्यांमध्ये वाटून खाणं, एकमेकांची काळजी घेणं हे सगळं आयुष्याचा पोत भक्कम अन तलम करत असतो. भावनिक विकासाला पोषक अशी ही नात्यांची श्रीमंती वाढविण्यासाठी ही सुटी वापरता येईल का?

4) उत्तुंगतेच्या सहवासात :

कुमारवय हे आदर्शांच्या शोधात अन्‌ प्रेमात पडणारं वय आहे. "हिरोवर्शिप' हे या वयाचं विशेष लक्षण! मोठ्या व्यक्तींचं दर्शन त्यांच्याबरोबरच्या गप्पागोष्टी, त्यांच्या स्वाक्षऱ्या गोळा करणं, हे सर्व त्यांना प्रचंड उत्तेजित करत असतं. दीर्घ काळ ठसा उमटवत असतं. अशा काही व्यक्तींचा सहवास आपल्या मुलांना घडवून आणता येईल का? मुलांची आवडती क्षेत्रं किंवा विविध क्षेत्रांतील स्थानिक पातळीपासून राज्य-राष्ट्रीय स्तरावरील व्यक्तींपर्यंत दोन-तीन जणांच्या भेटी सुटीची उंची वाढवणाऱ्या ठरतील. आरोग्यसेवा, साहित्य, चित्रकला, संगीत, नृत्य, नाट्य, खेळ राजकीय, उद्योग-व्यवसाय, प्रशासन सेवा. सामाजिक कार्य, आर्थिक क्षेत्र अशी कितीतरी क्षेत्रांमधील मुलांच्या वयाची त्यांच्यापेक्षा पाच-सहा वर्षांनी मोठ्या असलेल्या धडपडणाऱ्या, जिद्दी व्यक्ती, त्या क्षेत्रातील ज्येष्ठ, अनुभवी, नावाजलेल्या व्यक्ती अशांची यादी आपल्याला करून ठेवता येईल.

कदाचित वर्षभर हे काम चालू ठेवावं लागेल. त्यांपैकी तीन-चार जणांची वेळ घेऊन त्यांना भेटायला जाणं, त्यांच्याशी गप्पा-गोष्टी, मुलाखतीद्वारा त्यांचा जीवनप्रवास समजून घेणं, त्यांची ग्रंथसंपदा, कलादालन, पुरस्कार पाहणं मुलांच्या अंगावर रोमांच उभे करतील. हे सगळं करताना प्रत्येक वेळी ही माणसं नावाजलेलीच हवीत असं नाही. आपल्या आसपास जिद्दीनं धडपडणारी अनेक माणसं असतात. त्यांचाही सहवास मुलांना निश्‍चित प्रेरणादायक होईल. प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही, तरी त्यांच्यावरची आत्मकथनपर वा चरित्रात्मक पुस्तकं, लेख वाचणं, त्यावर चर्चा करणं, त्यांना पत्र लिहिणं, त्यांची प्रदर्शनं, कार्यक्रम, मैफली आवर्जून बघायला जाणं, असं तर नक्कीच करता येईल.

आपण अशी कर्तृत्ववान उदाहरणं समोर आलेली नाहीत, तर वृत्तपत्र अन्‌ दूरदर्शनच्या माध्यमातून निव्वळ झगमगाटातली माणसं "आयडॉल्स' म्हणून प्रक्षेपित करण्याचं काम अत्यंत प्रभावीपणे चालूच असतं आणि त्याचाच प्रभाव आपल्या मुलांवर अधिक पडतो. त्यातून सुरू होतं निव्वळ त्यांच्या बाह्य लकबी उचलणं, त्यांच्यासारखी वेशभूषा, केशभूषा करणं आणि त्यातच धन्यता मानणं; पण त्यातून तत्त्व तयार होताना फारसं आढळत नाही. याचं कारण तो प्रभाव फक्‌ त्या झगमगाटाचा असतो. त्या व्यक्तींच्या धडपडीचा क्वचितच असतो.

कर्तृत्ववान व्यक्तींच्या सहवासाबरोबरच पराक्रमाचे मानदंड निर्माण करणाऱ्या विविध संस्था, प्रकल्प पाहणं, हेही या वयात मोठा ठसा उमटवत असतं. संशोधन संस्था, शासकीय संस्था, हॉस्पिटल, छोटे-मोठे कारखाने, सामाजिक, शैक्षणिक संस्था, कलाकारांचे स्टुडिओ, क्रीडा संस्था, ग्रंथालयं, संग्रहालयं या यादीत बरीच भर घालता येईल. जिथं जिथं कर्तृत्व झिरपतं, पाझरतं, घडतं त्या सर्वांशी जवळीक साधणं, त्यातून ऊर्जा मिळवणं खूप महत्त्वाचं वाटतं. कुमारवय हे असं ठसा उमटवून घेणारं, तो ठसा जपून ठेवणारं आणि आपणही असा ठसा उमटवला पाहिजे, अशी ऊर्मी बाळगणारं वय आहे. तेव्हा या सुट्टीत अशा दोन-चार तरी व्यक्ती, संस्थांच्या सहवासात आपल्या मुलामुलींना आपण आवर्जून न्यावं, असं सुचवावंसं वाटतं.

5) समाजदर्शनातून "सह'संवेदनेचा विकास :

पुष्कळ वेळा आपण कष्टांतून आपल्या मुलांसाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या असतात; पण मुलांना खरंच त्याची जाण असते का? छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करणं, कोणतीही गोष्ट आत्ता म्हणजे आत्ताच पाहिजे असा हट्ट करणं, छोटासाही त्रास सहन न करणं, सतत धुसफूस, असमाधान असं आपल्या मुलांच्या बाबतीत वारंवार होतं का? किंवा "इतक्‍या सुविधा उपलब्ध असूनही जिद्द कशी नाहीच त्यांच्यामध्ये' असं जाणवतं का? अशा वेळी निव्वळ आपली उदाहरणं देऊन पुरत नाहीत. आयुष्याची खडतर वाटचाल करणाऱ्या समाजगटांचं दर्शन आपल्या मुलामुलींना घडवणं मला महत्त्वाचं वाटतं.

सुटीत आपल्या मुलामुलींना घेऊन एक-दोन दिवस दुष्काळी भागातल्या गावामध्ये जाता येईल. दुष्काळ आणि बेरोजगार यामुळे अनेक कुटुंबं जगण्यासाठी तीन-चार महिने शहराकडे धाव घेत असतात, कुठं तरी रस्त्याच्या कडेला माळरानावर त्यांची पालं पडतात. अशा एखाद्या वस्तीत मुलांना घेऊन जाता येईल. त्यांच्याशी होणाऱ्या संवादातून त्यांच्या व्यथा मुलांना समजतील. कधी एखाद्या आदिवासी, दुर्गम भागातल्या वस्तीत जाता येईल, कधी रिमांड होम, अनाथाश्रमातल्या मुलांकडे जाता येईल. कधी अंध, अपंग, मतिमंद संस्थांमध्ये जाऊन तेथील मुलामुलींना भेटता येईल. त्यांच्या अडचणी समजून घेत असतानाच आपण किती भाग्यवान आहोत, याची जाणीव मुलांना होईल. त्याचबरोबर अशा बिकट परिस्थितीतही ही मुलं-माणसं कुरकूर न करता कशी झगडतात, हे पाहिलं की आपली दु:खं त्यांना खूप छोटी वाटायला लागतील. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी किरकिर न करण्याचा संस्कारच जणू त्यांच्यावर होत जाईल. त्यातही अशा ठिकाणी जाताना तिथल्या मुलामुलींसाठी थोडा खाऊ, थोडी पुस्तकं, खेळणी इ. काही घेऊन गेलात, तिथल्या मुलामुलींबरोबर आपल्याही मुलामुलींना खेळायला सांगितलं, तर त्यातून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्या मुलामुलींच्या दीर्घ काळ स्मरणात राहील. आपणही त्यांच्यासाठी काही तरी केलं पाहिजे, उपकाराच्या भावनेतून नव्हे, तर माणुसकीच्या, मैत्रीच्या भावनेतून, याची जाणीव त्यातून होईल.

अशा समाजगटाच्या विकासासाठी काम करणाऱ्या एखाद्या कार्यकर्त्यास घरी जेवायला बोलावता येईल, त्यांचे अनुभव मुलांना ऐकवता येतील. अशा समाजगटांचं चित्रण केलेली पुस्तकं या सुट्टीत मुलांसोबत वाचता येतील. त्यावर चर्चा करता येईल. या सगळ्यातून मुलांमधील "सह'संवेदना जागी होईल. माणुसकी जागी होईल. आणि आत्मकेंद्रित वृत्ती बदलायला मदत होईल, असं मला वाटतं.

6) व्यावहारिक अनुभवांतून आत्मविश्‍वास :

माणूस जसजसा शिकत जातो, तसतसा तो व्यावहारिक जगात नापासाच्या पायऱ्या चढत जातो, असं म्हणतात. शालेय शिक्षणातून व्यावहारिक कौशल्यांचा विकास अभावानंच होताना आढळतो. सुटी त्यासाठी वापरता येईल. दहा रुपयांचा डिमांड ड्राफ्ट काढणं, खिचडी, शिरा तयार करता येणं, बिलं भरता येणं, फ्यूज बदलता येणं, सायकलचं पंक्‍चर काढता येणं, विविध डाळी अन्‌ पालेभाज्या ओळखता येणं, विविध वस्तू कुठं मिळतात, हे समजणं, त्यांच्या किमतीत घासाघीस करता येणं एखादा पत्ता शोधणं इ. त्यात पुष्कळ गोष्टींची भर तुम्हीही घालू शकाल. अशा सर्व गोष्टींच्या चिठ्ठ्या तयार केल्या तर...!

आठवड्यातून एकदा-दोनदा यंतली एक चिठ्ठी आपल्या मुलांनी उचलायची अन्‌ त्यात जे लिहिलेलं असेल ते काम पुढच्या दोन-तीन दिवसांत पूर्ण करायचं. आवश्‍यक तिथं इतरांची मदत जरूर घ्यायला परवानगी द्या; पण काम त्यानंच पूर्ण करायचं. इयत्तेनुसार कामांच्या सोपेपणा, अवघडपणा आपल्याला ठरवता येईल; पण नुसती कामं सांगण्यापेक्षा अशा चिठ्ठ्यांमुळं उत्सुकता निर्माण होऊन काम पूर्ण करण्याची, त्यातून शिकण्याची शक्‍यता वाढेल. काम करताना सूचनांचा भडिमार करू नका, चुकण्याची संधी मुलांना मिळू दे. फजितीला हसू नका, टोमणे मारू नका; तर प्रोत्साहकाची भूमिका ठेवा. शक्‍य झाल्यास आपल्या परिचितांपैकी कोणाकडे त्यांच्या कार्यालयात, व्यवसायात, गॅरेजमध्ये, कारखान्यात चार-आठ दिवस रोज चार-सहा तास कामाला, मदतीला पाठवता आलं, तर प्रत्यक्ष कामातून कितीतरी छोट्या-मोठ्या व्यावहारिक कौशल्यांची ओळख व जाण मुलांमध्ये निर्माण होईल. त्यातून त्यांच्यामध्ये हरहुन्नरीपणा, आत्मविश्‍वास वाढलेला तुम्हाला नक्कीच जाणवेल.

7) स्वकष्टांतून अर्थार्जन :

पैसे स्वत: कमावण्याशिवाय पैशाची खरी किंमत कळत नाही. मग या सुटीत आपल्या मुलांना अर्थार्जन करण्यासाठी प्रोत्साहन देता येईल. पुढच्या वर्षीच्या वह्यांचा खर्च त्यानं स्वकमाईतून करावा, असं उद्दिष्ट ठेवलं तर... बाजारातून कच्चा माल आणून त्यावर प्रक्रिया करून ते विकायला सांगता येईल. मग फुलं आणून गजरे विकता येतील, दुधाचं दही लावून त्याचं ताक करून विकता येईल. कच्चे शेंगदाणे आणून ते भाजून त्याच्या पुड्या करून विकता येतील. सुंदर भेटकार्डं, फोटोफ्रेम, पाकिटं तयार करून विकता येतील. विविध कलाकृती तयार करून विकता येतील. किती तरी गोष्टी तुम्हाला पण सुचतील. प्रत्यक्ष घाऊक बाजारात जाऊन मालाची चौकशी करत घासाघीस करून खरेदी करणं, त्यावर चांगली प्रक्रिया करणं, आणि मग त्याची योग्य किंमत ठरवून ते घरोघरी किंवा सार्वजनिक ठिकाणी जाऊन विकणं (शक्‍य झाल्यास अनोळखी घरांमध्ये, अनोळखी भागामध्ये) यासाठी आपल्या मुलांना प्रोत्साहन देता येईल. त्यातून संभाषणचातुर्य, चौकसपणा, श्रमप्रतिष्ठा, विक्रीकौशल्यं, पैसे सांभाळण्याचं कौशल्य अशा कितीतरी गोष्टी मुलं शिकतील. एक वेगळा आत्मविश्‍वास त्यातून निर्माण होईल. आणि खरं म्हणजे पैशाची किंमत कळायला लागेल. त्यातून स्वकमाईतून स्वत:साठी व इतरांसाठी घेतलेल्या वस्तूंचं मोल अन्‌ ती वापरण्यातला आनंद काही वेगळाच असेल.

8) कलास्वाद आणि अभिव्यक्ती :

नेहमीच्या धकाधकीत विविध कलांचा आस्वाद घ्यायला वेळ कुठं असतो. पण सुटी त्यासाठी वापरता आली तर! चित्रकला, हस्तकला, शिल्पकला, फोटोग्राफी यांची अनेक प्रदर्शनं या काळात ठिकठिकाणी लागलेली असतात. अशा एखाद-दुसऱ्या प्रदर्शनांना आपल्या मुलामुलींना घेऊन जाता येईल. ती नुसती पाहण्यापेक्षा त्यातलं काय आवडलं, याबाबत चर्चा करता येईल. एखादा आपल्यापेक्षा अधिक जाणकार व्यक्तीबरोबर अशा कलाकृती पाहता येतील. त्यातून त्यातली सौंदर्यस्थळं अधिक नेमकेपणानं लक्षात येतील. तीच गोष्ट मग एखाद्या संगीत, नृत्यमैफलीची असेल, नाटक आणि चित्रपटसुद्धा निव्वळ मनोरंजनापुरते न पाहता त्यावर काय आवडलं, काय नाही आवडलं, का, याबाबत गप्पा होऊ शकतील. या सुट्टीत एक-दोन ओळखी अन्‌ एक-दोन अनोळखी कलाविष्कार आपल्या मुलांना आवर्जून दाखवा. त्याचबरोबर एखाद दुसरी कला शिकणं, दोन-चार हस्तकौशल्यं शिकणं, येत असलेल्या कलांचा रियाझ, सराव करणं, शक्‍य झाल्यास घरात त्याचं छोटं प्रदर्शन मांडणं, त्यात नवनवीन प्रयोग करायला वाव देणं, यातून मिळणारा आनंद खरंच शब्दांत मांडता येणार नाही.

9) कल्पकतेला वाव :

प्रत्येक प्रश्‍नाला एक आणि एकच उत्तर बरोबर असू शकतं, याचा इतका खोल संस्कार आमच्या शिक्षण पद्धतीनं आपल्या मुलांवर केलाय, की नवीन सुचणं- वेगळं सुचणं म्हणजे त्यांना अशक्‍यच वाटतं. घरातूनही पुष्कळ वेळेला नवीन काही प्रयोग केले अन्‌ ते फसले तर गेला ना वेळ पैसा वाया, अशीच प्रतिक्रिया अधिक. मला असं वाटतं, की ही मनोवृत्ती बदलायला सुटीची नक्कीच मदत होईल. आपल्या मुलांना खूप सुचतं, हे त्यातून तुमच्याही लक्षात येईल. आपल्या आजूबाजूला काय काय नवीन गोष्टी दिसताहेत, ज्यात काही तरी नवी कल्पना वापरली आहे, त्यांची यादी करायला सांगता येईल. रोजच्या वापरातल्या गोष्टींचे नेहमीपेक्षा वेगळे काय काय उपयोग करता येतील, त्यात काय काय सुधारणा करता येतील, यावर भन्नाट कल्पनांची मैफल रंगवता येईल. एकच पथ्य पाळायचं- कोणीही नवीन कल्पना सांगितली तर त्याची चिकित्सा करायची नाही, त्याला नावं ठेवायची नाहीत, त्या कल्पनेला हसायचं नाही, वा टाळी देऊन कौतुकही करायचं नाही. कल्पनेचा विस्तारही करायचा नाही. प्रारंभी नवीन सुचण्याचा वेग कमी असेल; पण मग हळूहळू खरोखरीच भन्नाट कल्पना सुचायला लागतील. मग स्वयंपाकघरात एखादा नवीन पदार्थ तयार करणं, पत्त्यामध्ये एखादा नवीन खेळ शोधून काढणं, सगळ्यांनी मिळून एखादी गोष्ट वा कविता तयार करणं, विताना चाली लणं, कागदाच्या तुकड्यांमधून विविध भावना दर्शविणारी चित्रं तयार करणं, नवीन विषयांवरच्या जाहिराती तयार करणं, चार भन्नाट शब्द घेऊन त्यातून एखादा प्रसंग फुलवणं अशा कितीतरी गोष्टी तुम्हाला करता येतील; मात्र हे फक्त मुलांना करायला सांगून चालणार नाही, त्यात तुम्हीही सहभागी व्हायला हवं. घरातल्या सगळ्यांनी मिळून (शक्‍य झाल्यास शेजारच्यांनाही सहभागी करून घेऊन) आठवड्यातून दोन दिवस अर्धा-पाऊण तास यासाठी काढला तर! रोज काहीतरी भन्नाट कल्पना सुचली पाहिजे. रात्री जेवताना प्रत्येकानं ही सांगायची, असंही करता येईल. पुढचा काळ हा कल्पक व्यक्तींचा काळ आहे. आपल्या मुलांनी त्यावर आपला ठसा उमटवायलाच हवा. त्यासाठी ही सुटी कल्पनेला खतपाणी घालणारी व्हायला हवी.

10) याशिवाय :

आपल्या मुलांनी सुटीत अजून काय काय करावं? भरपूर खेळावं. संध्याकाळी मैदानी खेळ तर रोज व्हायलाच हवा. जमेल तसं आपणही अधूनमधून त्यांच्याबरोबर खेळावं. पत्ते, कॅरम, बुद्धिबळ याबरोबरच पूर्वीचे सागरगोटे, काचकवड्या, काचापाणी असे बेठे खेळ खेळता खेळता हार-जित कशी स्वीकारायची, डोकं वापरून कसं खेळायचं, हे समजावून सांगता आलं तर खेळता खेळता ते सहज स्वीकारलं जातं. पुस्तक प्रदर्शनं, ग्रंथालयांना भेटी देऊन काही चांगल्या पुस्तकांच्या ओळखी मुलाना करून देणं, चांगल्या पुस्तकांचं कथानक, परिचय मुलांना करून देऊन मग ती पुस्तकं त्यांना उपलब्ध करून देणं. वाचलेल्या पुस्तकावर गप्पा मारणं. त्यातला एखादा आवडलेला भाग सर्वांना मोठ्यानं वाचून दाखवायला लावणं, यातून वाचनाची गोडी वाढवता येईल. काही गोष्टी शिकण्यासाठी आवर्जून योजना करता येईल. पोहणं, नृत्य, फोटोग्राफी, संगणक, इंग्रजी संभाषण, एखादं वाद्य, एखादा खेळ, कला-छंद, योगासनं, संगीत इत्यादीपैकी एखादी गोष्ट आपल्या मुलांनी सुटीत जरूर शिकावी. पण महिन्यापेक्षा जास्त दिवस यासाठी वापरू नये. नाहीतर दोन-तीन महिन्यांचा रोज एका तासाचा क्‍लास सगळी सुटी बांधून टाकतं. असं होणार नाही याची काळजी अभ्यासाबाबत करण्याविषयीचा पाया पक्का करणं, नवीन शैक्षणिक वर्षातील पुस्तकांचं सर्वेक्षण, पूर्ववाचन करणं, टिपणं काढणं, नवीन तक्ते करणं इत्यादी स्वयंअध्यापन, कौशल्यांचा सराव करणं यासाठी दिवसातून एक तास वा आठवड्यातला एखादा दिवस यापेक्षा न देणं चांगलं. त्याचबरोबर विविध विषयांमधील एखादा तरी प्रकल्प मुलांनी या सुटीत केला तर स्वतःचं स्वत: खूप शिकतील. मग तो प्रकल्प संग्रह असेल वा सर्वेक्षणात्मक वा प्रयोगात्मक. मुलामुलीच्या क्षमता ताणल्या जातील यासाठी काही अनुभव देता येतील. पंचवीस-तीस किलोमीटरची सायकल सहल असेल किंवा दहा-पंधरा किलोमीटर पायी चालणं असेल. रात्रभर जागून एखादी कलाकृती पूर्ण करणं असेल वा दिवसभर उपावास करणं असेल. यातला एखादातरी अनुभव मुलांना त्यांच्या अंगभूत क्षमतांची ओळख करून द्यायला नक्कीच उपयोगी पडेल. कष्टांतही सोसण्यातला आनंद कसा मिळवता येतो, याची अनुभूती देईल.

पाच-सात मित्रांना गोळा करून सार्वजनिक स्वच्छता करायला सुचवणं, सार्वजनिक बाग फुलवणं, रोपवाटिका तयार करून रोपं लावणं, टेकडीवरील सार्वजनिक झाडांना पाणी घालणं, अशीही कामं करता येतील. घरातली आवराआवर, रंगकाम, सजावट, स्वयंपाकात मदत, रोजची खरेदी इ. मध्येही जबाबदारी टाकून मुलामुलींचा खुबीनं सहभाग मिळवावा.

मला कल्पना आहे, या लेखात सुचविलेल्या गोष्टी या एका सुटीत पूर्ण करण्याच्या नाहीयत; पण म्हणतात ना "आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार? निदान कल्पनांच्या बाबतीत तरी आपला आड भरलेला असावा. आपला वेळ, आपल्या मुलांची वयं आणि इतर अनेक घटकांचा विचार करून आपला पोहरा किती मोठा करता येईल ते ठरवा. अन्‌ मग पोहऱ्यातून आलेलं पाणी ओंजळीत भरभरून घ्यावं अन्‌ तृप्त व्हावं, तशी तुम्ही मुलामुलींची सुटी समृद्ध व्हावी. अनेक गोष्टींचं दर्शन घडविणं, अनेक गोष्टींचे प्रत्यक्ष अनुभव देणं, विविध जबाबदाऱ्या सोपवणं, विविध धडपडणाऱ्या व्यक्तींचा सहवास घडवणं, आव्हानात्मक प्रसंगांना सामोरं जाण्याची संधी निर्माण करणं, या सगळ्यातून आपली मुलंमुली अधिक समृद्ध अन्‌ उमद्या मनाची होतील, या सुटीत सुरू झालला हा कृतिशीलतेचा, सर्जनशीलतेचा प्रवास पुढे अनेक छोट्या-मोठ्या सुट्ट्यांमध्येही चालू राहील, असा विश्‍वास वाटतो. या वर्षीच्या आनंददायी अन अर्थपूर्ण सुटीसाठी तुम्हाला व तुमच्या मुलामुलींना भरभरून शुभेच्छा! तुमचे अनुभव, तुमच्या कल्पना, तुमची मनं, अन्‌ यामध्ये सुचवलेल्या कल्पनांपेक्षा वेगळं काही तुम्ही-तुमच्या मुलांनी केलं असेल, तर तेही समजून घ्यायला नक्कीच आवडेल.