थोडं माझ्या विषयी

Showing posts with label सुजाण पालकत्व. Show all posts
Showing posts with label सुजाण पालकत्व. Show all posts

Thursday, 18 June 2015

मागील पिढी आणि आजची पिढी

सदा सर्वदा, शुभंकरोती इ. पण आजकाल आईवडील दोघेही नोकरी करतात ते सकाळी घरातून निघाले कि पुन्हा रात्री घरी परततात, त्यामुळे मुलांकडून हे म्हणून घ्यायला वेळच मिळत नाही. कोणी नातेवाईक घरी आले किंवा आपण एखाद्या नातेवाईकाकडे गेलो कि मला ते कविता, गाणी, नाच  वगैरे येतं का विचारायचे, त्यावेळी बडबडगीते म्हणत होतो, नाच रे मोरा सारख्या गाण्यावर नाच करून दाखवत होतो, पण आता तीच परिस्थिती बदलली आहे...



मागील पिढी आणि आजची पिढी

नमस्कार, मी प्रजोत कुलकर्णी. आज मी मागील पिढी आणि सध्याची पिढी यावर लेख लिहित आहे, बरेच दिवस हा लेख लिहायचा विचार होता पण वेळेअभावी जमले नाही असो पण लेख लिहायचे कारण म्हणजे सध्याची पिढी आणि मागील पिढी यामध्ये भरपूर तफावत जाणवत आहे. माझ्या २६ वर्षाच्या आयुष्यात बरेच बदल मला जाणवले. मी माझ्या आयुष्यावरून हा लेख लिहित आहे. पण ही तफावत जी आहे ती सर्वांच्याच बाबतीत दिसून येईल तसेच सर्वांच्या जुन्या आठवणी जाग्या होतील. मी लहानपणापासून सुरवात करत कसे बदल घडत गेले ते मांडायचा प्रयत्न करतो आणि मग सगळ्यात शेवटी एक सारांश लिहितो.

मी लहान असताना सकाळ संध्याकाळ घरात माझ्याकडून श्लोक, स्तोत्रे म्हणून घेतली जात होती. उदा. सदा सर्वदा, शुभंकरोती इ. पण आजकाल आईवडील दोघेही नोकरी करतात ते सकाळी घरातून निघाले कि पुन्हा रात्री घरी परततात, त्यामुळे मुलांकडून हे म्हणून घ्यायला वेळच मिळत नाही. कोणी नातेवाईक घरी आले किंवा आपण एखाद्या नातेवाईकाकडे गेलो कि मला ते कविता, गाणी, नाच  वगैरे येतं का विचारायचे, त्यावेळी बडबडगीते म्हणत होतो, नाच रे मोरा सारख्या गाण्यावर नाच करून दाखवत होतो, पण आता तीच परिस्थिती बदलली आहे. मुले गाणी म्हण किंवा नाच कर असे म्हणाल्यावर मुन्नी आणि शीला यासारख्या गाण्याशिवाय त्यांना काही आठवतच नाही, आणि आपण किती सुंदर नाच केला किंवा गाणे झाले म्हणून टाळ्या वाजवतो. थोडे मोठे झाल्यावर अंगणात किंवा मैदानात जे खेळ खेळायचो त्यातील काही खेळ जे परदेशातून भारतात आले ते आताची मुले कॉम्पुटर, लॅपटॉप, आयपॅड वर खेळतात. लपंडाव, सूरपारंब्या, तळ्यात-मळ्यात, लगोरी, गोट्या, विष अमृत हे खेळ तसेच मैदानी खेळाबरोबरच बैठे खेळ उदा. सापशिडी, ल्युडो, काचा कवड्या आणि बरेच बारीकसारीक खेळ हे आजच्या मुलांना माहित देखील नाहीत. तसेच या प्रकारच्या खेळातून व्यायामही चांगला होत असे आणि बुध्दी हि तल्लख होत होती. त्या काळी व्यायाम हा प्रकार वेगळाच होता जोर, उठाबाश्या, दोरीउड्या, सूर्यनमस्कार, धावणे असे व्यायाम आम्ही करत होतो आता व्यायाम म्हटले कि डम्बेल्स घ्यायचे, मशीन वर धावायचे,  वजन उचलायचे म्हणजे झाले.
त्यावेळी आहार हा हि खूप पौष्टिक असत होते,

आजकाल ची मुले फक्त जाहिरात बघून नुडल्स खा कुठे पास्ता खा, अजून बाकीचे फास्टफूड खा असे करतात, त्यावेळी नाश्ता केला तरी तो शरीराला चांगला असा असे उदा. पोहे, शिरा, उपमा आणि हे शक्यतो रोज नसायचे रोज सकाळी सकाळी गरमागरम भाकरी त्यावर मस्त तूप मीठ लावून खायचो. तसेच रोजचा आहार पण सकस असत होता. डावा उजवा सगळा रोजच्या रोज पानात असत असे उदा. चटण्या, कोशिंबीर, लोणचे इ. त्यामुळे शरीराला लागणारी जीवनसत्व व्यवस्थितरीत्या मिळत होती याचा परिणाम म्हणजे शरीराचीही वाढ खूप चांगली होत असे.

त्यावेळेची शिक्षणपध्दती पण वेगळी होती, रोज सकाळी प्रार्थना, मग तास सुरु होत असत, शाळा सुटताना परत शेवटी प्रार्थना, वंदे मातरम असायचे यातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती, मोठ्यालोकांचा आदर यासारख्या गोष्टी शिकायला मिळायच्या, यातील बऱ्याच गोष्टी सध्या लुप्त झाल्या आहेत. त्यावेळेचे शिक्षकही खूप काटेकोर होते, मला शिक्षकाने मारले ती तक्रार घेवून जर घरी गेलो तर घरात दोन रट्टे मिळायचे, मग का मारले हे विचारले जायचे. आजकाल मुलेच शिक्षकांना मारतात वर त्याचे पालक त्यांना काहीच बोलत नाहीत. मुलांवर अभ्यासाचा प्रचंड ताण टाकला जातो, त्यात पालकांचा दोष नाही आहे हि यंत्रणा चुकीच्या पध्दतीने काम करत आहे. जर या स्पर्धेच्या युगात मुलांना टिकायचे असेल तर हे सर्व करावे लागते, मुलांच्या दप्तराचे ओझे हे त्यांच्या वजनापेक्षा जास्त आहे. पण हे सर्व करताना त्यांचे बालपण कुठेतरी हरवले जात आहे हे कुणाच्या लक्षात येत नाही. पालकांना आपण घेतलेले कष्ट फक्त दिसतात पण जे बालपण आपण जगलो (कठीण प्रसंग नाही तर खेळणे बागडणे इ.) ते आजकाल च्या मुलांना जगायला मिळत कि नाही हे कोण पाहत नाही. आज शाळा सुरु झाली कि सकाळी क्लास नंतर शाळा, मग पुन्हा संध्याकाळी क्लास, ज्या दिवशी सुट्टी असेल तेव्हा सुट्टीचे क्लास वेगळे, काय चाललाय हे ?. बरं शाळेला सुट्टी पडेल तेव्हा ते क्लास वेगळे, वेगळी वेगळी शिबिरे यात मुलांना बालपण काय असते हेच कळत नाही, त्यांना बालपण म्हणजे एक शिक्षा वाटू लागली आहे. एवढे करून जेवढे व्यवहार ज्ञान त्यांना मिळाले पाहिजे ते मिळताच नाही आहे उदा. माझ्या आधीची पिढी अजूनही आकडेमोड करताना तोंडी करते आणि मी कागद पेन किंवा कॅल्क्युलेटर चा वापर करतो, पण हे हि तेवढेच खरे कि मी जितकी आकडेमोड तोंडी करू शकतो तेवढी आज काल ची मुले करू शकतील कि नाही ती शंका आहे. मला पहिला मोबाईल मी एम. एस.सी ला असताना घरच्यांनी दिला होता, आणि गाडी मी नोकरीला लागल्यावर घेतली पण आजकालच्या शाळेत जाणाऱ्या लहान लहान मुलांकडे महागडे मोबाईल, गाड्या दिसून येतात.

लिहायचे झाले तर बरेच काही लिहिण्या सारखे आहे पण जे मला ४ मुद्दे (वरील ४ भागात मांडलेले) महत्वाचे वाटतात त्यावर मी सारांश लिहित आहे.

संस्कार : मुलांना चांगल्या संस्काराची गरज खूप आहे, जर का लहानपणीच चांगले संस्कार मुलांवर झाले तर ते त्यांना भविष्यात हि उपयोगी पडतात. ८-१५ दिवस वर्षातून किंवा सहा महिन्यातून मुलांना संस्कार शिबिरात पाठवले म्हणजे त्यांच्यावर संस्कार होत नाहीत, ते रोजच्या जीवनात आचरणात आणावे लागतात. त्यामुळे आपल्या मुलांना योग्य संस्कार होत आहेत कि नाही याची काळजी प्रत्येक पालकाने घेणे जरुरीचे आहे.

खेळ/व्यायाम : खेळ आणि व्यायाम यामुळे आपले शरीर घडते ते जर का योग्य नियोजन करून मुलांना त्याचे फायदे सांगितले तर ते त्यांच्यासाठी उत्तम होते. प्रत्येक खेळातून काहीतरी शिकण्यासारखे आहे. तसेच जो व्यायाम केला जातो तो जन्मभर त्यांना उपयोगी पडेल याचा विचार केला गेला पाहिजे. यामुळे आपले जे पारंपारिक खेळ आहेत हेही जतन केले जातील आणि याचा उपयोग मुलांच्या आयुष्यात नक्की होईल.

आहार : जो आहार मुलांना (आपल्यालाही) मिळाला पाहिजे तो आजकाल मिळत नाही आहे त्यामुळे आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती कमी होत चालली आहे. जर का सकस आणि चौरस आहार  आपल्याला मिळाला तर आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.

शिक्षण : जे आज शिक्षण दिले जात आहे त्यामुळे मुलांच्यावर मानसिक ताण वाढत आहे. त्याच्या वयाच्या मानाने ते ओझे त्यांना पेलणे अवघड जात आहे, याचाही कुठेतरी विचार झाला पाहिजे. त्यांच्या अभ्यासाचे योग्य ते नियोजन करता आले पाहिजे. त्यांना व्यवहार ज्ञान शिकवायचा प्रयत्न केला गेला पाहिजे. सोप्या शब्दात शिकविण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. जे करून त्यांना ते अवघड जाणार नाही व लगेच समजेल.

मुलांच्या सुटीला वेगळी दिशा

उन्हाळी सुटीत बरेच काही करण्यासारखे आहे; फक्त अतिरेकी उत्साहाने मुलांचे चोवीस तास "बुक' करू नका. मुलांबरोबर सहज संवाद ठेवा. अनेक गोष्टी करण्याची संधी त्यांना द्या, पर्याय सुचवा. बघा मुले कशी आनंदाने उड्या मारतात ते!


मुलांच्या सुटीला वेगळी दिशा..

उन्हाळी सुटीत बरेच काही करण्यासारखे आहे; फक्त अतिरेकी उत्साहाने मुलांचे चोवीस तास "बुक' करू नका. मुलांबरोबर सहज संवाद ठेवा. अनेक गोष्टी करण्याची संधी त्यांना द्या, पर्याय सुचवा. बघा मुले कशी आनंदाने उड्या मारतात ते!

मुलांची सुटी तुम्हा पालकांना संधी वाटते की संकट? आणि का? सुटीसंबंधीचा हा लेख वाचण्यापूर्वी या प्रश्‍नाचं उत्तर प्रत्येकानं आपल्या मनात प्रामाणिकपणे द्यावं. शक्‍य झाल्यास कारणांसह ते लिहून काढावं. पुढच्याही दोन-तीन प्रश्‍नांची उत्तरं लिहावीत. 

1) तुमच्या लहानपणी (तुम्ही तुमच्या मुलामुलींच्या वयाचे होतात, तेव्हा) तुम्ही सुटी कशी घालवायचा?
2) तुमच्या मुलामुलीची गेल्या वर्षीची सुटी कशी गेली, त्यात त्यांनी काय काय केलं, काय करायला नको होतं, काय करायला हवं होतं असं तुम्हाला वाटतं.
3) या वर्षीच्या सुटीत तुमच्या मुलांनी काय नक्की करावं/ काय नक्की करू नये, असं तुम्हाला वाटतं?
4) सुटीत काय काय करायचं याबाबत तुमच्या मुलांशी तुम्ही बोलता का, सुटीत त्यांना काय करायला हवं असतं,
5) मुलांच्या सुटीचं नियोजन करताना तुम्हाला कोणत्या अडचणी, अडथळे जाणवतात, सुटीबद्दल असा विचार करायला सुरवात केलीत, तर हा लेख तुम्हाला अधिक उपयोगी होईल.

पंचवीस-तीस वर्षांपूर्वीी आपली सुटी कशी जायची? भरपूर मैदानी खेळ खेळणं, पोहायला शिकणं, गावाकडे जाणं, रानमेवा, आंबे खाणं, सायकलवर भटकणं, गडांवर जाणं, घरातली कामं करणं, नातेवाइकांकडे जाणं, वाचन करणं, काही कलाकौशल्य शिकणं, पर्यटनस्थळांना भेटी, मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला जाणं, अर्थार्जन करणं इत्यादी. आपल्या आई-वडिलांना आपल्या सुटीचं "टेन्शन' नव्हतं. आपल्या बहुतेकांची सुट्टी खूप मजेत गेली; मग आपल्यालाच मुलांची सुटी संकट का बरं वाटतं?

"सुटी म्हणजे अख्खा दिवस मोकळा! बापरे! मुलं घरात राहिली, तर नुसत्या झोपा तरी काढतील, तास न्‌ तास टीव्ही, केबल तरी बघत बसतील, नाही तर कॉम्प्युटर गेम्स, इंटरनेट, फेसबुक, ऑर्कुट यांमुळे संगणकाला चिकटून तरी बसतील, नाही तर मोबाईल, फोनवर तास न्‌ तास गप्पा, एसएमएस करत बसतील. धिंगाणा तरी घालतील आणि बाहेर गेली, तर नुसत्या उनाडक्‍या करत हिंडतील. वायफळ गप्पांना तर ऊत येईल. गल्लीबोळातलं क्रिकेट आहेच. भांडणं, दंगा, वेळेवर न जेवणं, उन्हातान्हात भटकणं किंवा सतत "बोअर झालंय' असा घोषा! त्यापेक्षा दोन-चार शिबिरांतअडकवून टाकावं, म्हणजे काही शिकतील तरी! वेळही "सत्कारणी' लागेल आणि आपल्यालाही थोडी शांतता मिळेल!' ...हे तुमचं स्वगत तर नाही ना!

मार्कांच्या जीवघेण्या स्पर्धांमुळे (जी आपणच निर्माण केलीय!) विविध स्पर्धांची अन्‌ परीक्षांची तयारी आणि त्यांना सामोरं जाण्याच्या नादात शालेय वर्ष संपून जातं आणि मग आपल्या मुलाचं, मुलीचं व्यक्तिमत्त्वविकसन राहूनच गेलं, याची जाणीव होते. आपण मुलामुलींसाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाही, आणि वेळ असला तरी त्याचा मुलामुलींची सुटी आनंददायी अर्थपूर्ण होण्यासाठी काय काय करायचं हे कळत नाही, म्हणून मग सुटीचा ताण येतो. वेळ नुसता वाया घालवणं योग्य नाही, हेही तीव्रतेनं जाणवतं. सुटीत मुलं-मुली जे करतात ते अन्‌ आपल्याला त्यांनी जे करावंसं वाटतं, त्यात अंतर पडतं. मग वाद, भांडणं, चिडचिड यांनी रोजचा दिवस कटकटीचा होतो. सुटी संपताना कुणालाच फारसं समाधान, निराळा आनंद मिळालेला नाहीच याची कडू जाणीव होते.

सगळ्याच पालकांची अशी स्थिती असते असं नाही. काही जण विचारपूर्वक सुटीचं नियोजन करतात, तर त्यातले काही जण दुसरं टोकही गाठतात. अन्‌ मग शाळेपेक्षा सुटी अधिक गच्च बांधून टाकतात. सुटीतल्या प्रत्येक दिवसाचा अन्‌ तासाचा जास्तीत जास्त "चांगला' वापर आपली मुलं-मुली कशी करतील आणि त्यामुळे एकूण स्पर्धेत, "सर्वांगीण' विकासात ती कशी सतत पुढे राहतील, यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतात; पण त्यामुळे "शाळा परवडली पण सुट्टी नको' अशी मुलांची स्थिती होते. त्यामुळे सुटी आनंददायी आणि तरीही अर्थपूर्ण करणं, ही मोठीच कसरत आहे; पण ती करायलाच हवी; कारण प्रत्येक जण आपली सुट्टी, आपला मोकळा वेळ कसा वापरतो, यावरच त्याचं "समृद्ध' होणं, आतून फुलत जाणं जास्त अवलंबून आहे, असं मला वाटतं.

कशी सुरवात कराल? प्रथम हे लक्षात घेऊ या, की सुट्टी म्हणजे मनोरंजन हवंच! मुलांना जे हवं ते करण्याची थोडी तरी मोकळीक हवीच. जरा मोकळा श्‍वास घ्यायला, थोडासा आळस करायला, "टाईम पास' करायला, नुसतं निवांत बसायला, निरुद्देश भटकायला, गप्पा मारायला, मनसोक्त खेळायला वाव हा द्यायलाच हवा. म्हणून सुट्टीच्या प्रारंभी आपल्या मुलामुलींना सुट्टीत काय काय करायला आवडेल, काय शिकायला आवडेल, कोणते अनुभव घ्यायला आवडतील, याची यादी करायला सांगता येईल का? किमान वीस गोष्टींची यादी व्हायला पाहिजे, असा आग्रह धरा. यादी करताना चिकित्सा करू नका. सूचना करू नका. तुमची मतं, तुमच्या कल्पना मांडू नका. त्यांना काही सुचतच नाही, असं वाटलं तर मदत करा; पण यादीत काय लिहायचं, याचं स्वातंत्र्य मुलामुलींना द्या. शक्‍य झाल्यास यादीतील वीसही गोष्टींचे तीन-चार गट करायला सांगा. त्यातल्या पाचच गोष्टी करायला मिळणार आहेत, असं असेल तर कोणत्या पाच गोष्टी करायला आवडतील, ते नोंदवायला सांगा. तुम्ही पण तशीच एक यादी करताय, हे तुमच्या मुलामुलींना तुम्ही सांगा अन्‌ तशी यादी करा. मग एखाद्या निवांत वेळी (शक्‍यतो सुटी सुरू झाल्यानंतरच्या आठवडाभरातच) दोघांच्याही याद्या घेऊन गप्पा मारायला बसा. आपली मुलंमुली सुट्टीचा कसा विचार करतात व आपण त्यांच्या सुट्टीचा कसा विचार करतो, हे एकमेकांना कळेल. त्यातून सगळ्याच बाबतीत एकमत होईल असं नाही. कौटुंबिक परिस्थिती, व्यावहारिकता यांचा विचार करून काही किमान कार्यक्रम तरी पक्का करता येईल का? अचानक काही नवीन सुचलं, तर ते करण्याची लवचिकता त्यात जरूर असायला हवी, हे लक्षात घेऊ या.

आता आपल्या "वीस'च्या यादीत काय काय लिहाल, ज्यातून आपल्या मुलांचं अनुभवविश्‍व समृद्ध होईल, त्यांच्यातील उणिवा, मर्यादा कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न होतील, त्यांच्या क्षमता, गुणसंपदा वापरण्याची, वाढविण्याची अन्‌ ताणण्याची संधी मिळेल, नातेसंबंधांमध्ये संवादांमध्ये अधिक मोकळेपणा, जिव्हाळा वाढेल, नवीन कौशल्यं शिकता येतील, व्यावहारिक कौशल्यं वाढतील, बुद्धीच्या विविध पैलूंना खतपाणी मिळेल, स्वावलंबनाचे धडे गिरवता येतील. नुसती ही यादी वाचली तरी तुम्हाला पंधरा-वीस कल्पना सुचायला लागतील. आपला मुलगा-मुलगी डोळ्यांसमोर ठेवून जशा सुचतील तशा कल्पना नोंदवायला सुरवात करा.

1) शिबिराची पूर्वतयारी पाठपुरावा :

हे सगळं करायला आपल्याकडे वेळही नसतो, अन्‌ अनुभवही नसतो. म्हणून मग आपण शिबिरांच्या शोधात असतो. बहुतेक पालक आपल्या मुलामुलीला न विचारताच भराभर शिबिरांचं शुल्क भरून मोकळे होतात. आपल्या मुलामुलींच्या "सर्वागीण' विकासामध्ये काही कमी राहू नये म्हणून एकाच सुट्टीत मार्शल आर्टचं शिबिर, निसर्गशिबिर, नाट्यशिबिर, ट्रेकिंग आणि जोडीला एखादं व्यक्तिमत्त्वविकसन शिबिरही हवंच! असं म्हणत म्हणत भली मोठी रक्कम खर्ची घालून आपल्या मुलामुलींच्या विकासाचं सगळं "कॉन्ट्रॅक्‍ट' या वेगवेगळ्या शिबिरांच्या संयोजकांकडे देऊन पालक मोकळे होतात. पालकांच्या या मनोवृत्तीमुळे शिबिरांचाही सुळसुळाट झालाय. त्यांना बाजारू दिखाऊ स्वरूप येऊ लागलंय. आकर्षक जाहिराती, रंगीत माहितिपत्रकं अन्‌ भरमसाट शुल्क घेणारी ही शिबिरं चटकदारच अधिक असतात.

खरं तर सुटीत आपल्या मुलामुलीला एखाद्या शिबिराला जरूर पाठवावं; कारण मुलंमुली एकट्यानं काही अनुभव घेण्यापेक्षा गटात अधिक चांगल्या रीतीनं शिकतात. वरील मित्र-मैत्रिणी, भरगच्च कार्यक्रम यामुळे अल्पावधीत अनेक गोष्टी शिकतात. अनुभवतात; पण शिबिराची नावनोंदणी करण्यापूर्वी आपल्या मुलामुलीशी त्याबाबत आवर्जून बोलावं, शिबिरं पारखून घ्यावीत. पूर्वानुभव, शिबिर संयोजकांशी होणारा संवाद, शिबिराची कार्यक्रम पत्रिका इत्यादींचा चिकित्सकपणे अंदाज घ्यावा. त्यात निव्वळ निवास, भोजन, प्रवास व्यवस्था सुरक्षितता इ. बाबतच माहिती न घेता, शिबिरांतल्या वेळापत्रकाबद्दल आशयाबद्दल आवर्जून माहिती घ्यावी. ज्या शिबिरांमध्ये मुलामुलींच्या सुप्त गुणांना वाव आहे, जिथं नवीन अनुभव, आव्हानं घ्यायला मिळतील, गटात काम करायला, स्वत:च्या क्षमता ओळखायची, वापरायची जिथं अधिक संधी असेल, अडीअडचणींना, अनपेक्षित प्रसंगांना सामोरं जायला वाव असेल, व्याख्यानं कमी अन्‌ कृती, अनुभव, चर्चा, पाहणं, अभिव्यक्ती यांवर भर असेल, निव्वळ व्यक्तिमत्त्वाच्या बाह्य गोष्टींच्या विकासाऐवजी विचार, वृत्ती, सवयी, प्रेरणा यांच्या घडणीबाबतच्या कार्यक्रमांवर ज्यांचा भर असेल, अशा एखाद्या शिबिरात आपल्या मुलामुलीचं नाव जरूर नोंदवावं- अर्थात मुला-मुलीशी बोलूनच. शक्‍य झाल्यास चौकशीच्या वेळी त्यांनाही बरोबर घेऊन जा.

अशा शिबिरात सहभागी होण्याची काही पूर्वतयारी करायला सांगता येईल का? शिबिर प्रकारानुसार काही पूर्वानुभव घ्यायला सांगता येतील का? क वाचन, काही बाबतीत माहिती मिळवणं शिबिराच्य पूर्वतयारीमध्ये संयोजकांच्या मदतीला पाठवणं, असं काही करता येईल. यामधून शिबिराला जायची उत्सुकता वाढेल. शिबिरातील अनुभव अधिक डोळसपणे घेता येतील. शिबिराहून परत आल्यावर पुढचे आठ-पंधरा दिवसतरी टप्प्याटप्प्यानं तिथल्या अनुभवांबाबत गप्पा माराव्यात, फोटोग्राफ्सच्या साह्यानं संगणकावर काही सादरीकरण करायला सांगावं, अनुभवांचं "रेकॉर्डिंग' करायला सांगावं. चित्र, कविता, लेखन इ. माध्यमांतून त्या अनुभवांची नोंद करायला सांगावी. शिबिर संयोजकांना आठ-पंधरा दिवसांनी लेखी, दूरभाषवर वा ई-मेलवर शिबिरात काय काय भावलं, काय आवडलं नाही, हे कळवायला सांगावं. या सगळ्यांमधून शिबिरात घेतलेले अनुभव पुन:पुन्हा आठवणं, त्या अनुभवांवर रवंथ करणं व्हायला हवं. आठ-पंधरा दिवसांपेक्षा जास्त दिवसांची शिबिरं शक्‍यतो टाळावीत; दोनपेक्षा जास्त शिबिरांमध्ये घालू नये. तीही अंतराअंतरानं असायला हवीत, एवढी खबरदारी मात्र अवश्‍य घ्यावी. म्हणजे शिबिरांशिवाय सुटीत इतर अनेक गोष्टी करण्यासाठी आपल्या मुलांना वेळ काढता येईल.

2) समृद्ध सहप्रवास :

शिबिरांपलीकडे सुटीत एक दिवसापासून आठ-दहा दिवसांपर्यंत एकत्र प्रवासाला जाता येईल का, पर्यटनाच्या सहली असल्या तर त्याच्या चौकशीपासून पूर्वतयारीपर्यंत सर्व गोष्टी मुलांना करायला सांगता येतील का, पर्यटन स्थळांची माहिती मिळवणं, नकाशा, वैशिष्ट्यं इ. बरोबरच तेथील भाषेतील काही शब्द शिकणं वगैरे वगैरे. त्यातही टुरिस्ट कंपन्यांऐवजी स्वत:च सगळं नियोजन करून छोट्या-मोठ्या सहली योजल्या, तर त्या अधिक अंगी लागतात. अनेक अनपेक्षित प्रसंगांना, अडचणींना सामोरं जाण्याची संधी त्यात दडलेली असते. त्याचा त्रागा, त्रास न वाटून घेता, आनंदानं त्यातून काढलेला मार्ग दीर्घ काळ लक्षात राहतो.

मोठ्या सहलीमध्ये मुलामुलींशी संवाद वाढविण्यासाठी, प्रवास आनंददायी अन्‌ अर्थपूर्ण होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवा. त्यासाठी अशा प्रवासात मुद्दामहून काही छानसे लेख, कात्रणं, कविता, पुस्तकं घेऊन अधेमधे वाचता येतील. त्यावर चर्चाही करता येईल. एरवी इतका निवांत अन्‌ सलग वेळ मिळत नसल्यामुळे अनेक विषयांवरच्या राहून गेलेल्या, अर्धवट राहिलेल्या गप्पा पूर्ण करता येतील. आपल्या लहानपणीच्या आठवणी, कुटुंबातल्या आधीच्या पिढ्यांचा इतिहास सांगता येईल. अनेक कोडी, बौद्धिक खेळ, बैठे खेळ मुद्दाम मिळवून ते बरोबर ठेवता येतील. आपल्या मुलांच्या शाळेतील शिक्षक-मित्र-मैत्रिणींबाबत त्यांना बोलतं करता येईल. अनेक विषयांवरची त्यांची मतं जाणून घेता येतील. हे सर्व आपल्या मनाशी ठरवून प्रवासात अधूनमधून वेळ प्रसंग, मूड पाहून खुबीनं पेरता यायला हवं. त्याचबरोबर आसपासच्या माणसांची, ठिकाणांची निरीक्षणं नोंदवणं त्यांच्याशी गप्पागोष्टी करणं, अनोळखी माणसांबरोबर संवाद वाढवणं, असंही आवर्जून करायला सांगता येईल.

दर सुटीत लांबच्या प्रवासाला जाणं जमतंच असं नाही. अशा वेळी जवळपासच्या एक-दोन दिवसांच्या सहलींसाठी मात्र आवर्जून वेळ काढावा. त्यात गड-किल्ले असावेत. खेडेगावात जाणं असेल, आसपासचे विकासाचे प्रकल्प पाहायला जाणं असेल, निव्वळ डोंगरदऱ्यात- निसर्गात भटकंणं असेल. अशा ठिकाणी चुलीवरचा सर्वांनी एकत्र मिळून केलेला स्वयंपाक असेल. स्थानिक गावकऱ्यांबरोबरच्या गप्पा असतील, रानमेव्याचा आस्वाद घेणं असेल. नातेवाईक, मित्र, मैत्रिणींचा गट जमवून अशा छोट्या सहली काढल्या, तर त्यातली रंगत अजूनच वाढेल; मग गमतीच्या स्पर्धा, विविध कला-गुणांचं सादरीकरण, प्रकट मुलाखती वाद-विवाद अशा गोष्टींनी सहलीचा आनंद अनेक पटींनी वाढेल. या सहलींच्या नियोजनात, पूर्वतयारीत, प्रासंगिक निर्णयात मुलामुलींचा सहभाग त्यांना हलकेच मोठं करून जाईल.

3) नात्यांची श्रीमंती :

वर्षभराच्या धकाधकीच्या वेळापत्रकात नातेवाइकांकडे, परिचितांकडे फारसं जाणं होत नाही. सण, समारंभांनाही वेळेपुरतंच जाणं होत असल्यानं नात्यामधला विसविशीतपणा वाढताना जाणवतो. रोजच्या अभ्यासाच्या ओझ्यामुळे घरातल्या मंडळींबद्दलही खूप कमी माहिती आपल्या मुलामुलींना असते. संवाद कमी पडतो. तो वाढावा यासाठी सुटीत काय करता येईल. सुटी नात्यातली वीण घट्ट करण्यासाठी वापरता येईल का?

आजी-आजोबांची मुलाखत घेऊन त्यांचे छोटेखानी चरित्र मुलांना लिहायला सांगता येईल. त्यांचे फोटो ठिकठिकाणाहून मिळवून त्याआधारे संगणकावर पॉवर पॉईंट शो करता येईल. मुलाखती, व्हिडिओ शूटिंग करायला सांगता येईल. कुटुंबाच्या मागच्या तीन पिढ्यांचा वंशवृक्ष लिहायला सांगता येईल. त्यातील प्रत्येक व्यक्तीबद्दल थोडक्‍यात माहिती गोळा करायला सांगता येईल. त्यातल्या न भेटलेल्या व्यक्तींना भेटायला सांगता येईल. त्यांच्याशी दूरभाषवर बोलायला सांगता येईल. त्यांना आपल्या घरी बोलावता येईल. समवयस्क भावंडांना घरी राहायला बोलवता येईल. नातेवाइकांकडे आपल्या मुलामुलींना राहायला पाठवता येईल. एकमेकांच्या घरी "कार्य' असल्यास त्यांच्या मदतीला आवर्जून पाठवता येईल. एकत्र काम केल्यामुळे परस्परांची ओळख आणि मग त्यातल्या काही जणांची घट्ट मैत्री व्हायला नक्कीच मदत होईल. रक्ताची नाती केवळ रक्ताची आहेत म्हणून दृढ होतील, या भ्रमात तुम्ही नक्कीच नसाल. या नात्यांना दृढ करण्यासाठी जाणीवपूर्वक, पण हळुवारपणे प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी सुटीचा चांगला उपयोग करता येईल.
रक्ताच्याही पलीकडे अनेक नाती आपण बांधलेली असतात; पण बहुतांश वेळा ती आपल्यापुरतीच, व्यक्तीपुरतीच मर्यादित राहतात. ती नाती कुटुंबापर्यंत विस्तारता येतील का? आपल्या मित्र-मैत्रिणींची कुटुंबं ही आपल्या मुला-मुलींचीही "आपली' कुटुंब कशी होतील आणि आपल्या मुलामुलींच्या मित्र-मैत्रिणींची कुटुंबं "आपली' कशी होतील, यासाठीही ठरवून प्रयत्न व्हायला हवेत; मग ती भेळ पार्टी-आइस्क्रीम (घरी तयार करून हं!) पार्टी (घरी, बागेत; हॉटेलात नव्हे बरं का!) असेल, एकामेकांकडे राहायला जाणं, बोलावणं असेल. छोट्या-छोट्या सहलींना एकत्र जाणं असेल, गाण्यांच्या मैफलीचा घरगुती कार्यक्रम असेल. एखादी कलाकृती गटानं मिळून तयार करणं असेल. या सगळ्यांतून मिळणारं प्रेम, होणारी भांडणं, रुसवे-फुगवे, एकमेकांसाठी थांबणं, एखादा पदार्थ सगळ्यांमध्ये वाटून खाणं, एकमेकांची काळजी घेणं हे सगळं आयुष्याचा पोत भक्कम अन तलम करत असतो. भावनिक विकासाला पोषक अशी ही नात्यांची श्रीमंती वाढविण्यासाठी ही सुटी वापरता येईल का?

4) उत्तुंगतेच्या सहवासात :

कुमारवय हे आदर्शांच्या शोधात अन्‌ प्रेमात पडणारं वय आहे. "हिरोवर्शिप' हे या वयाचं विशेष लक्षण! मोठ्या व्यक्तींचं दर्शन त्यांच्याबरोबरच्या गप्पागोष्टी, त्यांच्या स्वाक्षऱ्या गोळा करणं, हे सर्व त्यांना प्रचंड उत्तेजित करत असतं. दीर्घ काळ ठसा उमटवत असतं. अशा काही व्यक्तींचा सहवास आपल्या मुलांना घडवून आणता येईल का? मुलांची आवडती क्षेत्रं किंवा विविध क्षेत्रांतील स्थानिक पातळीपासून राज्य-राष्ट्रीय स्तरावरील व्यक्तींपर्यंत दोन-तीन जणांच्या भेटी सुटीची उंची वाढवणाऱ्या ठरतील. आरोग्यसेवा, साहित्य, चित्रकला, संगीत, नृत्य, नाट्य, खेळ राजकीय, उद्योग-व्यवसाय, प्रशासन सेवा. सामाजिक कार्य, आर्थिक क्षेत्र अशी कितीतरी क्षेत्रांमधील मुलांच्या वयाची त्यांच्यापेक्षा पाच-सहा वर्षांनी मोठ्या असलेल्या धडपडणाऱ्या, जिद्दी व्यक्ती, त्या क्षेत्रातील ज्येष्ठ, अनुभवी, नावाजलेल्या व्यक्ती अशांची यादी आपल्याला करून ठेवता येईल.

कदाचित वर्षभर हे काम चालू ठेवावं लागेल. त्यांपैकी तीन-चार जणांची वेळ घेऊन त्यांना भेटायला जाणं, त्यांच्याशी गप्पा-गोष्टी, मुलाखतीद्वारा त्यांचा जीवनप्रवास समजून घेणं, त्यांची ग्रंथसंपदा, कलादालन, पुरस्कार पाहणं मुलांच्या अंगावर रोमांच उभे करतील. हे सगळं करताना प्रत्येक वेळी ही माणसं नावाजलेलीच हवीत असं नाही. आपल्या आसपास जिद्दीनं धडपडणारी अनेक माणसं असतात. त्यांचाही सहवास मुलांना निश्‍चित प्रेरणादायक होईल. प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही, तरी त्यांच्यावरची आत्मकथनपर वा चरित्रात्मक पुस्तकं, लेख वाचणं, त्यावर चर्चा करणं, त्यांना पत्र लिहिणं, त्यांची प्रदर्शनं, कार्यक्रम, मैफली आवर्जून बघायला जाणं, असं तर नक्कीच करता येईल.

आपण अशी कर्तृत्ववान उदाहरणं समोर आलेली नाहीत, तर वृत्तपत्र अन्‌ दूरदर्शनच्या माध्यमातून निव्वळ झगमगाटातली माणसं "आयडॉल्स' म्हणून प्रक्षेपित करण्याचं काम अत्यंत प्रभावीपणे चालूच असतं आणि त्याचाच प्रभाव आपल्या मुलांवर अधिक पडतो. त्यातून सुरू होतं निव्वळ त्यांच्या बाह्य लकबी उचलणं, त्यांच्यासारखी वेशभूषा, केशभूषा करणं आणि त्यातच धन्यता मानणं; पण त्यातून तत्त्व तयार होताना फारसं आढळत नाही. याचं कारण तो प्रभाव फक्‌ त्या झगमगाटाचा असतो. त्या व्यक्तींच्या धडपडीचा क्वचितच असतो.

कर्तृत्ववान व्यक्तींच्या सहवासाबरोबरच पराक्रमाचे मानदंड निर्माण करणाऱ्या विविध संस्था, प्रकल्प पाहणं, हेही या वयात मोठा ठसा उमटवत असतं. संशोधन संस्था, शासकीय संस्था, हॉस्पिटल, छोटे-मोठे कारखाने, सामाजिक, शैक्षणिक संस्था, कलाकारांचे स्टुडिओ, क्रीडा संस्था, ग्रंथालयं, संग्रहालयं या यादीत बरीच भर घालता येईल. जिथं जिथं कर्तृत्व झिरपतं, पाझरतं, घडतं त्या सर्वांशी जवळीक साधणं, त्यातून ऊर्जा मिळवणं खूप महत्त्वाचं वाटतं. कुमारवय हे असं ठसा उमटवून घेणारं, तो ठसा जपून ठेवणारं आणि आपणही असा ठसा उमटवला पाहिजे, अशी ऊर्मी बाळगणारं वय आहे. तेव्हा या सुट्टीत अशा दोन-चार तरी व्यक्ती, संस्थांच्या सहवासात आपल्या मुलामुलींना आपण आवर्जून न्यावं, असं सुचवावंसं वाटतं.

5) समाजदर्शनातून "सह'संवेदनेचा विकास :

पुष्कळ वेळा आपण कष्टांतून आपल्या मुलांसाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या असतात; पण मुलांना खरंच त्याची जाण असते का? छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करणं, कोणतीही गोष्ट आत्ता म्हणजे आत्ताच पाहिजे असा हट्ट करणं, छोटासाही त्रास सहन न करणं, सतत धुसफूस, असमाधान असं आपल्या मुलांच्या बाबतीत वारंवार होतं का? किंवा "इतक्‍या सुविधा उपलब्ध असूनही जिद्द कशी नाहीच त्यांच्यामध्ये' असं जाणवतं का? अशा वेळी निव्वळ आपली उदाहरणं देऊन पुरत नाहीत. आयुष्याची खडतर वाटचाल करणाऱ्या समाजगटांचं दर्शन आपल्या मुलामुलींना घडवणं मला महत्त्वाचं वाटतं.

सुटीत आपल्या मुलामुलींना घेऊन एक-दोन दिवस दुष्काळी भागातल्या गावामध्ये जाता येईल. दुष्काळ आणि बेरोजगार यामुळे अनेक कुटुंबं जगण्यासाठी तीन-चार महिने शहराकडे धाव घेत असतात, कुठं तरी रस्त्याच्या कडेला माळरानावर त्यांची पालं पडतात. अशा एखाद्या वस्तीत मुलांना घेऊन जाता येईल. त्यांच्याशी होणाऱ्या संवादातून त्यांच्या व्यथा मुलांना समजतील. कधी एखाद्या आदिवासी, दुर्गम भागातल्या वस्तीत जाता येईल, कधी रिमांड होम, अनाथाश्रमातल्या मुलांकडे जाता येईल. कधी अंध, अपंग, मतिमंद संस्थांमध्ये जाऊन तेथील मुलामुलींना भेटता येईल. त्यांच्या अडचणी समजून घेत असतानाच आपण किती भाग्यवान आहोत, याची जाणीव मुलांना होईल. त्याचबरोबर अशा बिकट परिस्थितीतही ही मुलं-माणसं कुरकूर न करता कशी झगडतात, हे पाहिलं की आपली दु:खं त्यांना खूप छोटी वाटायला लागतील. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी किरकिर न करण्याचा संस्कारच जणू त्यांच्यावर होत जाईल. त्यातही अशा ठिकाणी जाताना तिथल्या मुलामुलींसाठी थोडा खाऊ, थोडी पुस्तकं, खेळणी इ. काही घेऊन गेलात, तिथल्या मुलामुलींबरोबर आपल्याही मुलामुलींना खेळायला सांगितलं, तर त्यातून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्या मुलामुलींच्या दीर्घ काळ स्मरणात राहील. आपणही त्यांच्यासाठी काही तरी केलं पाहिजे, उपकाराच्या भावनेतून नव्हे, तर माणुसकीच्या, मैत्रीच्या भावनेतून, याची जाणीव त्यातून होईल.

अशा समाजगटाच्या विकासासाठी काम करणाऱ्या एखाद्या कार्यकर्त्यास घरी जेवायला बोलावता येईल, त्यांचे अनुभव मुलांना ऐकवता येतील. अशा समाजगटांचं चित्रण केलेली पुस्तकं या सुट्टीत मुलांसोबत वाचता येतील. त्यावर चर्चा करता येईल. या सगळ्यातून मुलांमधील "सह'संवेदना जागी होईल. माणुसकी जागी होईल. आणि आत्मकेंद्रित वृत्ती बदलायला मदत होईल, असं मला वाटतं.

6) व्यावहारिक अनुभवांतून आत्मविश्‍वास :

माणूस जसजसा शिकत जातो, तसतसा तो व्यावहारिक जगात नापासाच्या पायऱ्या चढत जातो, असं म्हणतात. शालेय शिक्षणातून व्यावहारिक कौशल्यांचा विकास अभावानंच होताना आढळतो. सुटी त्यासाठी वापरता येईल. दहा रुपयांचा डिमांड ड्राफ्ट काढणं, खिचडी, शिरा तयार करता येणं, बिलं भरता येणं, फ्यूज बदलता येणं, सायकलचं पंक्‍चर काढता येणं, विविध डाळी अन्‌ पालेभाज्या ओळखता येणं, विविध वस्तू कुठं मिळतात, हे समजणं, त्यांच्या किमतीत घासाघीस करता येणं एखादा पत्ता शोधणं इ. त्यात पुष्कळ गोष्टींची भर तुम्हीही घालू शकाल. अशा सर्व गोष्टींच्या चिठ्ठ्या तयार केल्या तर...!

आठवड्यातून एकदा-दोनदा यंतली एक चिठ्ठी आपल्या मुलांनी उचलायची अन्‌ त्यात जे लिहिलेलं असेल ते काम पुढच्या दोन-तीन दिवसांत पूर्ण करायचं. आवश्‍यक तिथं इतरांची मदत जरूर घ्यायला परवानगी द्या; पण काम त्यानंच पूर्ण करायचं. इयत्तेनुसार कामांच्या सोपेपणा, अवघडपणा आपल्याला ठरवता येईल; पण नुसती कामं सांगण्यापेक्षा अशा चिठ्ठ्यांमुळं उत्सुकता निर्माण होऊन काम पूर्ण करण्याची, त्यातून शिकण्याची शक्‍यता वाढेल. काम करताना सूचनांचा भडिमार करू नका, चुकण्याची संधी मुलांना मिळू दे. फजितीला हसू नका, टोमणे मारू नका; तर प्रोत्साहकाची भूमिका ठेवा. शक्‍य झाल्यास आपल्या परिचितांपैकी कोणाकडे त्यांच्या कार्यालयात, व्यवसायात, गॅरेजमध्ये, कारखान्यात चार-आठ दिवस रोज चार-सहा तास कामाला, मदतीला पाठवता आलं, तर प्रत्यक्ष कामातून कितीतरी छोट्या-मोठ्या व्यावहारिक कौशल्यांची ओळख व जाण मुलांमध्ये निर्माण होईल. त्यातून त्यांच्यामध्ये हरहुन्नरीपणा, आत्मविश्‍वास वाढलेला तुम्हाला नक्कीच जाणवेल.

7) स्वकष्टांतून अर्थार्जन :

पैसे स्वत: कमावण्याशिवाय पैशाची खरी किंमत कळत नाही. मग या सुटीत आपल्या मुलांना अर्थार्जन करण्यासाठी प्रोत्साहन देता येईल. पुढच्या वर्षीच्या वह्यांचा खर्च त्यानं स्वकमाईतून करावा, असं उद्दिष्ट ठेवलं तर... बाजारातून कच्चा माल आणून त्यावर प्रक्रिया करून ते विकायला सांगता येईल. मग फुलं आणून गजरे विकता येतील, दुधाचं दही लावून त्याचं ताक करून विकता येईल. कच्चे शेंगदाणे आणून ते भाजून त्याच्या पुड्या करून विकता येतील. सुंदर भेटकार्डं, फोटोफ्रेम, पाकिटं तयार करून विकता येतील. विविध कलाकृती तयार करून विकता येतील. किती तरी गोष्टी तुम्हाला पण सुचतील. प्रत्यक्ष घाऊक बाजारात जाऊन मालाची चौकशी करत घासाघीस करून खरेदी करणं, त्यावर चांगली प्रक्रिया करणं, आणि मग त्याची योग्य किंमत ठरवून ते घरोघरी किंवा सार्वजनिक ठिकाणी जाऊन विकणं (शक्‍य झाल्यास अनोळखी घरांमध्ये, अनोळखी भागामध्ये) यासाठी आपल्या मुलांना प्रोत्साहन देता येईल. त्यातून संभाषणचातुर्य, चौकसपणा, श्रमप्रतिष्ठा, विक्रीकौशल्यं, पैसे सांभाळण्याचं कौशल्य अशा कितीतरी गोष्टी मुलं शिकतील. एक वेगळा आत्मविश्‍वास त्यातून निर्माण होईल. आणि खरं म्हणजे पैशाची किंमत कळायला लागेल. त्यातून स्वकमाईतून स्वत:साठी व इतरांसाठी घेतलेल्या वस्तूंचं मोल अन्‌ ती वापरण्यातला आनंद काही वेगळाच असेल.

8) कलास्वाद आणि अभिव्यक्ती :

नेहमीच्या धकाधकीत विविध कलांचा आस्वाद घ्यायला वेळ कुठं असतो. पण सुटी त्यासाठी वापरता आली तर! चित्रकला, हस्तकला, शिल्पकला, फोटोग्राफी यांची अनेक प्रदर्शनं या काळात ठिकठिकाणी लागलेली असतात. अशा एखाद-दुसऱ्या प्रदर्शनांना आपल्या मुलामुलींना घेऊन जाता येईल. ती नुसती पाहण्यापेक्षा त्यातलं काय आवडलं, याबाबत चर्चा करता येईल. एखादा आपल्यापेक्षा अधिक जाणकार व्यक्तीबरोबर अशा कलाकृती पाहता येतील. त्यातून त्यातली सौंदर्यस्थळं अधिक नेमकेपणानं लक्षात येतील. तीच गोष्ट मग एखाद्या संगीत, नृत्यमैफलीची असेल, नाटक आणि चित्रपटसुद्धा निव्वळ मनोरंजनापुरते न पाहता त्यावर काय आवडलं, काय नाही आवडलं, का, याबाबत गप्पा होऊ शकतील. या सुट्टीत एक-दोन ओळखी अन्‌ एक-दोन अनोळखी कलाविष्कार आपल्या मुलांना आवर्जून दाखवा. त्याचबरोबर एखाद दुसरी कला शिकणं, दोन-चार हस्तकौशल्यं शिकणं, येत असलेल्या कलांचा रियाझ, सराव करणं, शक्‍य झाल्यास घरात त्याचं छोटं प्रदर्शन मांडणं, त्यात नवनवीन प्रयोग करायला वाव देणं, यातून मिळणारा आनंद खरंच शब्दांत मांडता येणार नाही.

9) कल्पकतेला वाव :

प्रत्येक प्रश्‍नाला एक आणि एकच उत्तर बरोबर असू शकतं, याचा इतका खोल संस्कार आमच्या शिक्षण पद्धतीनं आपल्या मुलांवर केलाय, की नवीन सुचणं- वेगळं सुचणं म्हणजे त्यांना अशक्‍यच वाटतं. घरातूनही पुष्कळ वेळेला नवीन काही प्रयोग केले अन्‌ ते फसले तर गेला ना वेळ पैसा वाया, अशीच प्रतिक्रिया अधिक. मला असं वाटतं, की ही मनोवृत्ती बदलायला सुटीची नक्कीच मदत होईल. आपल्या मुलांना खूप सुचतं, हे त्यातून तुमच्याही लक्षात येईल. आपल्या आजूबाजूला काय काय नवीन गोष्टी दिसताहेत, ज्यात काही तरी नवी कल्पना वापरली आहे, त्यांची यादी करायला सांगता येईल. रोजच्या वापरातल्या गोष्टींचे नेहमीपेक्षा वेगळे काय काय उपयोग करता येतील, त्यात काय काय सुधारणा करता येतील, यावर भन्नाट कल्पनांची मैफल रंगवता येईल. एकच पथ्य पाळायचं- कोणीही नवीन कल्पना सांगितली तर त्याची चिकित्सा करायची नाही, त्याला नावं ठेवायची नाहीत, त्या कल्पनेला हसायचं नाही, वा टाळी देऊन कौतुकही करायचं नाही. कल्पनेचा विस्तारही करायचा नाही. प्रारंभी नवीन सुचण्याचा वेग कमी असेल; पण मग हळूहळू खरोखरीच भन्नाट कल्पना सुचायला लागतील. मग स्वयंपाकघरात एखादा नवीन पदार्थ तयार करणं, पत्त्यामध्ये एखादा नवीन खेळ शोधून काढणं, सगळ्यांनी मिळून एखादी गोष्ट वा कविता तयार करणं, विताना चाली लणं, कागदाच्या तुकड्यांमधून विविध भावना दर्शविणारी चित्रं तयार करणं, नवीन विषयांवरच्या जाहिराती तयार करणं, चार भन्नाट शब्द घेऊन त्यातून एखादा प्रसंग फुलवणं अशा कितीतरी गोष्टी तुम्हाला करता येतील; मात्र हे फक्त मुलांना करायला सांगून चालणार नाही, त्यात तुम्हीही सहभागी व्हायला हवं. घरातल्या सगळ्यांनी मिळून (शक्‍य झाल्यास शेजारच्यांनाही सहभागी करून घेऊन) आठवड्यातून दोन दिवस अर्धा-पाऊण तास यासाठी काढला तर! रोज काहीतरी भन्नाट कल्पना सुचली पाहिजे. रात्री जेवताना प्रत्येकानं ही सांगायची, असंही करता येईल. पुढचा काळ हा कल्पक व्यक्तींचा काळ आहे. आपल्या मुलांनी त्यावर आपला ठसा उमटवायलाच हवा. त्यासाठी ही सुटी कल्पनेला खतपाणी घालणारी व्हायला हवी.

10) याशिवाय :

आपल्या मुलांनी सुटीत अजून काय काय करावं? भरपूर खेळावं. संध्याकाळी मैदानी खेळ तर रोज व्हायलाच हवा. जमेल तसं आपणही अधूनमधून त्यांच्याबरोबर खेळावं. पत्ते, कॅरम, बुद्धिबळ याबरोबरच पूर्वीचे सागरगोटे, काचकवड्या, काचापाणी असे बेठे खेळ खेळता खेळता हार-जित कशी स्वीकारायची, डोकं वापरून कसं खेळायचं, हे समजावून सांगता आलं तर खेळता खेळता ते सहज स्वीकारलं जातं. पुस्तक प्रदर्शनं, ग्रंथालयांना भेटी देऊन काही चांगल्या पुस्तकांच्या ओळखी मुलाना करून देणं, चांगल्या पुस्तकांचं कथानक, परिचय मुलांना करून देऊन मग ती पुस्तकं त्यांना उपलब्ध करून देणं. वाचलेल्या पुस्तकावर गप्पा मारणं. त्यातला एखादा आवडलेला भाग सर्वांना मोठ्यानं वाचून दाखवायला लावणं, यातून वाचनाची गोडी वाढवता येईल. काही गोष्टी शिकण्यासाठी आवर्जून योजना करता येईल. पोहणं, नृत्य, फोटोग्राफी, संगणक, इंग्रजी संभाषण, एखादं वाद्य, एखादा खेळ, कला-छंद, योगासनं, संगीत इत्यादीपैकी एखादी गोष्ट आपल्या मुलांनी सुटीत जरूर शिकावी. पण महिन्यापेक्षा जास्त दिवस यासाठी वापरू नये. नाहीतर दोन-तीन महिन्यांचा रोज एका तासाचा क्‍लास सगळी सुटी बांधून टाकतं. असं होणार नाही याची काळजी अभ्यासाबाबत करण्याविषयीचा पाया पक्का करणं, नवीन शैक्षणिक वर्षातील पुस्तकांचं सर्वेक्षण, पूर्ववाचन करणं, टिपणं काढणं, नवीन तक्ते करणं इत्यादी स्वयंअध्यापन, कौशल्यांचा सराव करणं यासाठी दिवसातून एक तास वा आठवड्यातला एखादा दिवस यापेक्षा न देणं चांगलं. त्याचबरोबर विविध विषयांमधील एखादा तरी प्रकल्प मुलांनी या सुटीत केला तर स्वतःचं स्वत: खूप शिकतील. मग तो प्रकल्प संग्रह असेल वा सर्वेक्षणात्मक वा प्रयोगात्मक. मुलामुलीच्या क्षमता ताणल्या जातील यासाठी काही अनुभव देता येतील. पंचवीस-तीस किलोमीटरची सायकल सहल असेल किंवा दहा-पंधरा किलोमीटर पायी चालणं असेल. रात्रभर जागून एखादी कलाकृती पूर्ण करणं असेल वा दिवसभर उपावास करणं असेल. यातला एखादातरी अनुभव मुलांना त्यांच्या अंगभूत क्षमतांची ओळख करून द्यायला नक्कीच उपयोगी पडेल. कष्टांतही सोसण्यातला आनंद कसा मिळवता येतो, याची अनुभूती देईल.

पाच-सात मित्रांना गोळा करून सार्वजनिक स्वच्छता करायला सुचवणं, सार्वजनिक बाग फुलवणं, रोपवाटिका तयार करून रोपं लावणं, टेकडीवरील सार्वजनिक झाडांना पाणी घालणं, अशीही कामं करता येतील. घरातली आवराआवर, रंगकाम, सजावट, स्वयंपाकात मदत, रोजची खरेदी इ. मध्येही जबाबदारी टाकून मुलामुलींचा खुबीनं सहभाग मिळवावा.

मला कल्पना आहे, या लेखात सुचविलेल्या गोष्टी या एका सुटीत पूर्ण करण्याच्या नाहीयत; पण म्हणतात ना "आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार? निदान कल्पनांच्या बाबतीत तरी आपला आड भरलेला असावा. आपला वेळ, आपल्या मुलांची वयं आणि इतर अनेक घटकांचा विचार करून आपला पोहरा किती मोठा करता येईल ते ठरवा. अन्‌ मग पोहऱ्यातून आलेलं पाणी ओंजळीत भरभरून घ्यावं अन्‌ तृप्त व्हावं, तशी तुम्ही मुलामुलींची सुटी समृद्ध व्हावी. अनेक गोष्टींचं दर्शन घडविणं, अनेक गोष्टींचे प्रत्यक्ष अनुभव देणं, विविध जबाबदाऱ्या सोपवणं, विविध धडपडणाऱ्या व्यक्तींचा सहवास घडवणं, आव्हानात्मक प्रसंगांना सामोरं जाण्याची संधी निर्माण करणं, या सगळ्यातून आपली मुलंमुली अधिक समृद्ध अन्‌ उमद्या मनाची होतील, या सुटीत सुरू झालला हा कृतिशीलतेचा, सर्जनशीलतेचा प्रवास पुढे अनेक छोट्या-मोठ्या सुट्ट्यांमध्येही चालू राहील, असा विश्‍वास वाटतो. या वर्षीच्या आनंददायी अन अर्थपूर्ण सुटीसाठी तुम्हाला व तुमच्या मुलामुलींना भरभरून शुभेच्छा! तुमचे अनुभव, तुमच्या कल्पना, तुमची मनं, अन्‌ यामध्ये सुचवलेल्या कल्पनांपेक्षा वेगळं काही तुम्ही-तुमच्या मुलांनी केलं असेल, तर तेही समजून घ्यायला नक्कीच आवडेल.

Tuesday, 24 March 2015

मुलांचा व्यक्तिमत्व विकास

आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या आणि अस्वस्थतेच्या युगात मुलांचा “व्यक्तिमत्व विकास” ह्या संज्ञेकडे खूप वेगळ्या अर्थाने पहायला हवे. व्यक्तिमत्व विकास म्हणजे केवळ भौतिक यश, भरपूर पैसा मिळवण्याची क्षमता, नावलौकिक मिळवण्यासाठीची क्षमता निश्चितच नव्हे. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेतच परंतु त्याचबरोबर चांगला, जबाबदार नागरिक होणं, समाजाप्रती संवेदनाशील बनणं त्याचबरोबर कुठल्याही परिस्थितीत शांत, स्वस्थ, आनंदी राहू शकणारं सकारात्मक आणि कणखर व्यक्तिमत्व बनणं हे जास्त महत्वाचं. 


मुलांचा व्यक्तिमत्व विकास

आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या आणि अस्वस्थतेच्या युगात मुलांचा “व्यक्तिमत्व विकास” ह्या संज्ञेकडे खूप वेगळ्या अर्थाने पहायला हवे. व्यक्तिमत्व विकास म्हणजे केवळ भौतिक यश, भरपूर पैसा मिळवण्याची क्षमता, नावलौकिक मिळवण्यासाठीची क्षमता निश्चितच नव्हे. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेतच परंतु त्याचबरोबर चांगला, जबाबदार नागरिक होणं, समाजाप्रती संवेदनाशील बनणं त्याचबरोबर कुठल्याही परिस्थितीत शांत, स्वस्थ, आनंदी राहू शकणारं सकारात्मक आणि कणखर व्यक्तिमत्व बनणं हे जास्त महत्वाचं. 

आयुष्यातील चढउतार, यश अपयश सहज स्वीकारता येण्याची क्षमता मिळवणं महत्वाचं. असं व्यक्तिमत्व विशिष्ठ प्रयत्नांनी मिळवता येतं. मनाच्या व्यायामशाळेसाठी (Brain Gym) निर्माण केलेल्या काही व्यायामांनी हे साध्य होऊ शकतं. अगदी कुणालाही. ह्या व्यायामाचं उद्दिष्ट काय असावं ? तर दोन दिशांनी व्यक्तिमत्व विकसित व्हावं. एक दिशा बाहेरच्या जगात यशस्वी होण्यासाठीची तंत्रे, व्यायाम शिकवणारी (Outer Journey) तर दुसरी आंतरिक स्वस्थतेसाठीची साधना शिकवणारी (Inner Journey). म्हणजेच आतलं विश्व शांत, स्वस्थ आणि आनंदी बनवणारी. हे जमलं की मग खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व विकास झाला असं म्हणता येईल.

सुरुवात महत्वाची – ह्या सगळ्याची सुरवात करावी लागते ती मुलांच्या व्यक्तिमत्वामधील, स्वभावामधील, विचार करण्याच्या पद्धतीतील दोष दूर करून. मुलांमधली काल्पनिक भीती, स्वत:विषयीच्या चुकीच्या, नकारात्मक कल्पना, जगाविषयीच्या आणि जगण्याविषयीच्या चुकीच्या कल्पना, व्हिडीओ गेम्स वा मोबाईलच्या अतिरिक्त आहारी जाणं, आसपास घडणाऱ्या, टी. व्ही. वर दिसणाऱ्या गोंधळून टाकणाऱ्या घटनांचा नकारात्मक प्रभाव ह्या आणि अशा सगळ्या गोष्टींचा प्रभाव नाहीसा करावा लागतो. तर आणि तरच नवीन चांगल्या गुणांची, सवयींची लागवड होऊ शकते. त्याच बरोबर मुलांमध्ये आधीपासून असलेल्या चांगल्या गोष्टींची मशागत करून व्यक्तिमत्व विकासात त्याचा उपयोग करून घ्यायचा असतो.

व्यक्तिमत्व विकासातील काही महत्वाची साध्ये – मुलांमध्ये रुजवायला हवं की – 

१. माझे परीक्षेतले गुण, खेळातील किंवा कुठल्याही बाबतीतील यश-अपयश ह्या पेक्षा माझ्या शंभर टक्के प्रयत्न करण्यातला आनंद, प्रक्रियेतला आनंद महत्वाचा आहे. मी प्रत्येकवेळी पूर्ण झोकून देऊन प्रयत्न करायला हवेत. त्याचं फळ बहुतेक वेळा चांगलंच मिळेल. चुकून अपयश आलंच तर मी दुख:करीत बसण्यापेक्षा आत्मपरीक्षण करेन. व निराश न होता पुन्हा सकारात्मक प्रयत्न करेन. हे तत्वं मी आयुष्यभर पाळेन. ते माझ्या विचारसरणीचा भाग बनून जाईल.
२. माझं “आतलं ” विश्व मी कायम शांत, स्वस्थ, आनंदी आणि कणखर ठेऊ शकतो. आयुष्यात घडणाऱ्या विपरीत घटना, अपयश हा आयुष्याच्या खेळातला एक भाग आहे. मी ते शांतपणे स्विकारीन. 
३. आयुष्य सुंदर आहे. प्रत्येक क्षण चांगल्या पद्धतीने आनंदाने व्यतीत करण्याची, उपभोगण्याची कौशल्ये मला मिळवता येतील. 
४. मी स्वत: आनंदी रहाण्याचा प्रयत्न करेन. तसेच माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आनंद देण्याचा प्रयत्न करेन. मी समाजाचा भाग आहे आणि त्याच्याप्रती माझी काही कर्तव्ये आहेत. मी चांगली मूल्ये जोपासीन व कुठल्याही प्रलोभनांना बळी पडणार नाही. 
५. प्रत्येक व्यक्तीला निसर्गाने काही बलस्थाने दिली आहेत. माझ्यातील बलस्थाने मी ओळखीन व त्यांचा उपयोग माझ्या विकासासाठी करेन.
६. ह्या जगातील प्रत्येक सजीव व निर्जीव गोष्ट महत्वाची आहे. मी आत्मसन्मान ठेवला पाहिजे तसाच इतरांचाही आदर राखला पाहिजे.
दोन्ही दिशांनी (Inner Journey व Outer Journey ) करावयाच्या प्रयत्नांमध्ये मध्ये काय येतं? – वरील साध्ये आत रुजवणे. स्वस्थतेची तंत्रे, साक्षीभाव ठेवण्याची तंत्रे, सकारात्मक विचारसरणी स्वभावाचा भाग बनवण्यासाठीचे मनाचे व्यायाम, भावनांचे सबलीकरण, बुद्धिमत्तेचा, कल्पनाशक्तीचा सृजनात्मक वापर, आत्मविश्वास, धैर्य, नेतृत्वगुण, संवादकौशल्यं, टाइम मॅनेजमेंट वगैरे गुणांबरोबरच दडपणा खाली काम करण्याची क्षमता विकसित करण्याची तंत्रे, मित्रमैत्रिणी सहकाऱ्यांबरोबर छान संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता विकसित करणे, , नकारात्मक वातावरणातही काम करण्याची क्षमता आणि मुख्य म्हणजे वैयक्तिक आयुष्य व शैक्षणिक, व्यावसायिक आयुष्य वेगवेगळे ठेवण्याची कला (Compartmentalization), ह्यासाठीची तंत्रे शिकून घेणे.

विकसित व्यक्तिमत्वाची मुले आयुष्यात काय करू शकतात – 

१. आयुष्यातल्या कुठल्याही प्रसंगाला सकारात्मक पद्धतीने सामोरे जाऊ शकतात. 
२. ताणतणाव चांगल्या रीतीने हाताळू शकतात. 
३. कठीण प्रसंगात न डगमगता योग्य निर्णय घेऊ शकतात. 
४. यश डोक्यात जाऊ देत नाहीत वा अपयश आल्यास खचून जात नाहीत. 
५. नवीन कौशल्ये खूप लवकर आत्मसात करतात 
६. संवादकौशल्ये, आत्मविश्वास व सकारात्मकतेने छाप पाडू शकतात.
७. आपल्या क्षमता शंभर टक्के वापरण्याचा प्रयत्न करणे व त्या प्रक्रियेचा आनंद घेणे त्यांना जमू शकते.
८. केवळ स्वत:पुरता विचार न करता इतर व्यक्तींच्या दृष्टीकोनातून विचार करू शकतात.
९. स्वत: च्या विकासाबरोबरच कुटुंब, समाज ह्यांच्या सृजनाचे भान त्यांना असते.

पालकांची जबाबदारी -

१. ह्या सगळ्या आवश्यक संकल्पना मनात रुजवण्यासाठी आईवडिलांनीही प्रयत्न करायला हवेत. आपलं मूल भावनात्मक दृष्ट्या सक्षम करण्यात त्यांचे स्वत:चे वर्तन आणि मुलांच्या विकासाला पाठींबा ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. मुलं नैसर्गिकपणे आईवडिलांच्या वागण्यातील गुणावगुण टिपत असतात.

२. मुलांमधील कुठलाही दोष, वैगुण्य, कमतरता ह्याकडे दुर्लक्ष्य करू नये. मोठा झाला की आपोआप सगळं ठीक होईल ह्या गैरसमजात राहू नये.

३. करियर संबंधातील आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा आकांक्षा, मुलांवर त्यांची इच्छा नसताना लादू नयेत. त्याने मुलांच्यावर दडपण येईल जे विकासाला मारक ठरेल. मुलांची नैसर्गिक क्षमता व इच्छा जे करण्याची असेल त्याला प्रोत्साहन द्यावे.

४. आपल्या पाल्याची इतर मुलामुलींबरोबर तुलना करीत राहणे टाळावे. प्रत्येक मूल वेगवेगळ्या नैसर्गिक क्षमतेचे असते.
समृद्ध व्यक्तीमत्वाचे सहा सोपान नेहमी लक्षात ठेवायला हवेत. उत्तम शारीरिक तब्ब्येत, उत्तम मानसिक आरोग्य, नात्यातील व ओळखीच्या व्यक्तींशी तसेच स्वत:शी छान नाते, निसर्गातील प्रत्येक सजीव, निर्जीव, पशु पक्षी वगैरे सर्वांशीच छान नाते, आवश्यक तितका पैसा व भौतिक सुखसोयी (लालसाविरहित), प्रत्येक क्षणी आनंदी राहण्याची कला आणि कुठल्याही परिस्थितीत असलो तरी समाधानी मन:स्थिती ह्या गोष्टी जीच्याजवळ आहेत ती व्यक्ती समृद्ध मानायला हवी.

आजच्या मुलांचा व्यक्तिमत्व विकास हा भौतिक यशाबरोबरच, मूल्य शिक्षण व आंतरिक स्वस्थता ह्या दोन्ही उद्दिष्टांच्या दिशेने हवा.

- डॉ. विद्याधर बापट
मानसोपचार तज्ञ

Thursday, 19 February 2015

मुलांशी वागताना

मुलांकडून घरचा अभ्यास करून घेणे, ही तर एक मोठीच डोकेदुखी असते. अनेक उच्चशिक्षित स्त्रियाही निव्वळ मुलांचा अभ्यास घेण्यासाठीच घरी राहतात. परंतु अभ्यास ही घेण्याची गोष्ट नसून, ज्याची त्याने करण्याची बाब आहे.  मानवी मेंदूला नित्यनवे अनुभव ताजेतवाने ठेवतात. नव्या गोष्टी शिकताना मुलांनाही आनंद वाटतो. परंतु हा आनंद आपण हिरावून घेतो. 


मुलांशी वागताना...
-डाॅ. अलका वाडकर 

क्षणोक्षणी विविध सूचना देऊन, लहान-लहान गोष्टींवर काटेकोरपणे लक्ष ठेऊन अभ्यास घेणारी आई बाळाच्या बोधात्मक विकासाला खिळ घालते.

उणापुरा पाच वर्षांचा आदित्य खाण्याचा खूप कंटाळा करतो. त्यामुळे त्याच्या आईचा तासन्तास वेळ त्याला भरवण्यात जातो. पण काय करावे हे तिला कळत नाही. घरोघरी स्त्रिया मुलांना भरवण्यात, त्यांना आंघोळ घालण्यात, त्यांचा अभ्यास करून घेण्यात बराच वेळ खर्च करतात. ही सारे कामे आईनेच करायची असतात, असे गृहीत धरले जाते. 

प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की, भूक लागणे आणि खाणे या नैसर्गिक क्रिया आहेत. घरच्या पाळीव प्राण्यांना जसे कुत्रा, मांजर, पोपट इतकेच नव्हे तर अगदी मुंगीसारख्या किटकांनी तहानभुकेची जाणीव असते. भूक भागविण्यासाठी आवश्यक ते कष्ट तेही करतात. जर असे असेल तर अगदी लहान म्हणजे वर्ष-दोन वर्षाची मुले देखिल स्वतःच्या हाताने  अगदी पोट भरेपर्यंत खाऊ शकतात. 

पोट भरल्यावर मात्र मुले खात नाहीत. मग आपण कितीही आग्रह केला तरी ती टाळाटाळ करतात. घास तोंडात ठेऊन अर्धा तास बसणारी मुले आपण अनेकदा बघतो. म्हणजेच मुलांनी इतके खाल्लेच पाहिजे, असा आग्रह धरणेही व्यर्थच आहे. शक्य तितक्या लवकर स्वतःच्या हाताने खाण्याची सवय मुलांना लावली पाहिजे. थोडफार सांडल तरी स्वतंत्रपणे खाण्याचा आनंद मुलांना मिळतो. शिवाय मुले स्वतःच्या आवडीने काय खातात हे ही कळते. आईचा वेळ वाचतो तो वेगळाच. डबा खायच्या सुट्टीत शाळेत जाऊन दहा वर्षाच्या मुलाला भरवणार्‍या स्त्रियाही आपण मुलाच्या भल्यासाठी हे करतो आहोत असे समजतात. मात्र त्याचा फेरविचार करणे गरजेचे आहे.


जी बाब खाण्याची तीच आंघोळीची असते. योग्य पद्धतीने शरीराची स्वच्छता कशी राखावी हे मुलांना समजावून सांगितले पाहिजे. जसे रोज मुलाचे तोंड धुऊन देऊन त्याला तोंड कसे धुवावे हे समजणार नाही. तर त्याला पुन्हा पुन्हा तोंड धुण्यासाठी योग्य त्या सूचना देणे व तशाच पद्धतीने तो करतो की नाही हे पाहणे आवश्यक ठरते.

मुलांकडून घरचा अभ्यास करून घेणे, ही तर एक मोठीच डोकेदुखी असते. अनेक उच्चशिक्षित स्त्रियाही निव्वळ मुलांचा अभ्यास घेण्यासाठीच घरी राहतात. परंतु अभ्यास ही घेण्याची गोष्ट नसून, ज्याची त्याने करण्याची बाब आहे.  मानवी मेंदूला नित्यनवे अनुभव ताजेतवाने ठेवतात. नव्या गोष्टी शिकताना मुलांनाही आनंद वाटतो. परंतु हा आनंद आपण हिरावून घेतो. 

अभ्यास करण्याचे वेळापत्रक, त्यासाठी घातलेल्या जाचक अटी, स्वतंत्रपणे लिहण्यावाचण्यावर आणि विचार करण्यावरही घातलेली बंधने यामुळे आनंददायी न रहाता एक ओझे वाटू लागते. कसे तरी करून उरकण्याचा, नाईलाजाने करण्याचा अभ्यास मुलांना आवडेनासा होतो. मुलांच्या प्रतिभेचा विकास होणे, अशा पद्धतीने दूरापस्त असते. साधे उदाहरण म्हणजे निबंध लेखनात स्वतंत्रपणे विचार करावा लागतो. पण निबंधही मोठ्या माणसांनी लिहून दिला तर तो पाठ केला जातो. अशाच पद्धतीने मुलांची नानाप्रकारे हानी होत जाते. अभ्यासाच्या चुकीच्या सवयी लागतात. विनाकारण ताण निर्माण होतो.

मुलांशी वागताना त्यांना शक्य तेवढे स्वतंत्र कामे करू द्यावी. फक्त अडेल तेथे मार्गदर्शन करावे. घरात अनुकूल परिस्थिती निर्माण करणे मात्र गरजेचे असते. वैयक्तीक स्वच्छता वा अभ्यास असो अतिशय कडक शिस्त लावण्याचा प्रयत्न व नाहक लक्ष घालणे टाळलेले उत्तम. 

एक पिढी शिक्षण घेवून गाढव बनली आणि आता नवी पिढी शिक्षण घेताना रेसचा घोडा बनत आहे

भारतीय शिक्षण पद्धत सर्वांगीण नाही हे शिक्षण तज्ञ सांगत होते तोवर शिक्षणाचा धंदा सुरु झाला. मोठे उद्योजग, पुढार्यांनी शाळांमधून गुंतवणूक करून शिक्षण संकल्पनेला धूळ चारली. एखादी स्त्री गरोदर राहिली तर जन्माला येणाऱ्या जीवाच्या admission ची तयारी सुरु होते. कृष्णाला जन्मण्याआधी मारायची तयारी मामाने केली होती. आता मुल जन्माला येण्याआधी त्याला रेसचा घोडा बनवायची तयारी सुरु होते.



एक पिढी शिक्षण घेवून गाढव बनली आणि आता नवी पिढी शिक्षण घेताना रेसचा घोडा बनत आहे..

परीक्षेत १००% गुण पाहिजेत, कराटे क्लासमध्ये black बेल्ट मिळवायचा आहे. त्यानंतर dance क्लास attend करायचा. भगवतगीता स्पर्धेत जायचं आहे. श्लोकांचा अर्थ कळला नाही तरी ते तोंडपाठ करायचेच. कारण first prize मिळालंच पाहिजे !! मग drawing competition असते. तिथून बाहेर निघाला की चालला तबला वाजवायला...संगीत विशारद बनायला.

Albert Einstein बनवून देणाऱ्या Multi -national school आल्या. पण Albert हा Einstein बनण्यासाठी शाळेत गेला नव्हता. एक अमिताभ बनला तर हजारो acting school उभ्या राहिल्या. पण अमिताभ अभिनेता बनण्यासाठी कोणत्याही school मध्ये गेला नव्हता. आता लवकरच मोदी तयार करणाऱ्या शाळा उभ्या राहतील. आणि पालक लाखो रुपये फी भरून त्यात मुलांना पाठवतील. आज मुलाच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च एका वर्षाला होतो, तितके रुपये त्याच्या पालकांना संपूर्ण शिक्षण घेण्यासाठी सुध्दा लागले नाहीत.

आता शाळा सुरु केल्या आहेत investors नी. मागणी तसा पुरवठा ह्या तत्वावर. पालकांना आपल्या मुला-मुलीला रेसचा घोडा बनवायचं आहे ही मागणी पाहून जास्तीत जास्त अभ्यास मुलांच्या डोक्यात कोंबायला सुरुवात केली. दप्तराचं आणि पालक-शिक्षकांचं अपेक्षांचं ओझं वाहणारी मुले म्हणजे चालती बोलती प्रेते बनत चालली आहेत. जरा शुद्धीवर आली की " what is square of 12 ? " असं विचारून त्यांचं बालपण चिरडून टाकतात. 

श्री मोदी ह्यांनी मुलांना एक प्रश्न विचारला होता-" तुमच्यापैकी किती जण घाम गळेपर्यंत खेळतात?"

तेव्हा एकाही मुलाने हात वर केला नाही. कारण आता मुले AC मध्ये जन्म घेतात, AC मध्ये वाढतात. चिप्स खातात, soft ड्रिंक पितात आणि mobile वर game खेळत बसतात. उन, पाऊस, वारा ह्याच्याशी संबंध येत नाही. पडणं-लागणं, खेळात हरणे माहीतच नाही. school bus आली नाही तर शाळेपर्यंत चालत जाण्याची ताकद मुलांमध्ये नाही. वय वर्ष ६ पार होत नाही तर डोळ्याला चष्मा लागतो. हात पायांच्या एकतर काड्या होतात नाहीतर लठ्ठपणा वाढतो. कारण शारीरिक कष्ट संपले आणि Modified food starch, maltodextrin, hydrolyzed corn gluten, disodium inosinate/ guanylate, yeast extract, hydrolyzed soy protein मिसळलेले पदार्थ खाणे सुरु झाले. ह्या ingredients ची खासियत म्हणजे ते मुलांच्या पोटात शिरून जास्त काळ टिकतात आणि पोटातील पोषके शोषून घेतात. मुलांची hormonal आणि जैविक वाढ रोखतात. ज्यामुळे मुले दुबळी होत जातात. हे घटक पिझ्झा-बर्गर मध्ये असतात. म्हणून भारत लवकरच diabetes चे सर्वाधिक रुग्ण असलेला देश बनणार आहे. सोबत इतरही विकार येत आहेत. 

शेंगदाणे, चणे, रवा, तांदूळ, बाजरी, सुका मेवा आणि फळे ह्यात घातक ingredients नसतात. लापशी, सातू, शिरा, पोहे किंवा अंड्याचे घरी बनवलेले पदार्थ मुलांना उत्तम पोषण पुरवतात. ते मिळत नसल्यामुळे मुलांची शारीरिक वाढ नीट होत नाही. प्रतिकार क्षमता संपते. मग vitamins , DHA , minerals देणारे product विकत आणून ते खायला देतात. वास्तविक, शरीर हा जगातील सर्वात मोठा कारखाना आहे. ह्याच शरीराला योग्य आहार, कष्ट मिळाले तर कुठेही तयार न होऊ शकणारं रक्त तयार होतं. साध्या भाज्या, अस्सल भारतीय जेवण मिळालं की शरीराची यंत्रणा स्वत काम करते. म्हणून ताज्या भाज्या, भाकरी खाणारी आणि मिनरल्स, calcium , proteins माहित नसलेली माणसे १०० वर्षे जगली आणि हे माहित झालेली माणसे फक्त ६० वर्षे जगतात…तेही अनेक रोग सोसत, औषधे घेवून !!

खेळ, व्यायाम, भटकंती आणि दर्जेदार वाचन न केल्यामुळे मुलांना मानसिक कमतरता जाणवते. संघर्ष माहित नसतो आणि team work कळत नाही. मित्र फक्त whats app , face बुक वर भेटतात. प्रत्यक्ष भेट नाही. सुख-दुखाची देवाणघेवाण नाही आणि मित्राचा-मैत्रिणीचा मानसिक आधार नाही. दिलखुलास हसणे आणि ओक्साबोक्शी रडणे मानसिक आरोग्यासाठी चांगले असते. ह्या दोन्ही क्रिया मुलांना करता येत नाहीत. आपोआपच, जरा मनाविरुद्ध घडलं की लहान मुले-मुली आत्महत्या करतात. बरीच एकुलती एक मुले दुसर्याशी जमवून घेण्याची सवय नसल्यामुळे पुढे लग्न झाल्यावर वर्षभरात घटस्फोट घेतात. ज्या मुलांना बहिण नसते, चांगली मैत्रीण नसते त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन संकुचित बनतो. ह्या उणीवांचा शिक्षणात विचार केलेलाच नाही.

भारतीय शिक्षण पद्धत सर्वांगीण नाही हे शिक्षण तज्ञ सांगत होते तोवर शिक्षणाचा धंदा सुरु झाला. मोठे उद्योजग, पुढार्यांनी शाळांमधून गुंतवणूक करून शिक्षण संकल्पनेला धूळ चारली. एखादी स्त्री गरोदर राहिली तर जन्माला येणाऱ्या जीवाच्या admission ची तयारी सुरु होते. कृष्णाला जन्मण्याआधी मारायची तयारी मामाने केली होती. आता मुल जन्माला येण्याआधी त्याला रेसचा घोडा बनवायची तयारी सुरु होते. आता मुलाने बोलायला सुरुवात केली की थेट E =Mc square म्हणायचं बाकी राहिलं आहे.

अशी मुले सर्व formula पटापट म्हणून दाखवतील पण स्वताचा formula कधीही शोधू शकणार नाहीत.

guitar शिकतील पण स्वताची संगीत रचना करू शकणार नाहीत.

लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर, मेरी कोम ह्यांचं अनुकरण अचूक करतील. पण स्वताची ओळख निर्माण करणार नाहीत.
कारण त्यांना फक्त अनुकरण करायला शिकवलं जातं.


जगायची कला, गीत-संगीतातील आनंद, निसर्गासंपदेची भव्यता, नव्या संकल्पनांची निर्मिती, जुन्या विचारांचा आधार, साहित्य ह्याला बाजारू किंमत नसल्यामुळे फक्त जे विकलं जातं तेच ज्ञान मुलांना मिळतंय, त्यात ते पारंगत होत आहेत. काही जणांना campus मध्ये दर महिना ४ लाखांपेक्षा जास्त पगार असणारी नोकरी मिळतेय....पण त्यात देशाचं नाही, भांडवलदारांच हित साधला जातंय. पुढची पिढी मोठी पदवी मिळवेल पण न स्वत जगण्याचा आनंद लुटू शकतील, न दुसर्याला जगण्याची मजा मिळू देतील...

अगदी हाच धोका ओळखून जपानमध्ये शाळेत AC लावत नाहीत. तिथे मुलांना घोकंपट्टी पेक्षा practical वर भर देतात. वृक्ष-वेली स्वताच अन्न स्वत तयार करतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात?...असे प्रश्न विद्यार्थ्यांना न विचारता शाळेत व बाहेर भाजी लावायला शिकवतात. त्या रोपांची-वेलींची जोपासना करायला लावतात. "निप्पोन technology " ने केलेल्या तपासणीत म्हटलं आहे की शाळेच्या आवारातील वेलींमुळे तापमान चार अंश कमी झाल आहे. आणि मुले पाना-फुलांसोबत भावनिक नात जोडू लागली आहेत. जर्मनी मुलांना Transference शिक्षण देते. तिथे लहान मुलांची बोटे नाजूक असतात हे लक्षात घेवून दुसरी पर्यंत लेखन करू देत नाहीत. पाचवीपर्यंत practical चालतं आणि त्यानंतर विद्यार्थी बँक कर्मचारी बनेल की हवाई सेविका, प्रशासन सांभाळेल की कुशल कामगार होईल ह्याची सतत तपासणी होते. दहावीनंतर फक्त त्याला आवडणाऱ्या क्षेत्रांच प्रशिक्षण देतात. सगळे एकदम science मध्ये भरत नाहीत. अनावश्यक विषय शिकवत नाहीत. चीन हा cycle प्रेमी देश ४ वर्षाच्या मुलांना cycle चालवण्याच शिक्षण देतो. त्यानंतर theory कमी आणि प्रत्यक्ष कृती शिकवतात.

प्रत्येक विद्यार्थी उद्या देश चालवणार ह्याचा विचार Netherlands सारखा देशही करतो. एकाच विद्यार्थ्यावर सगळ्या विषयांचा मारा करत नाहीत. चारी दिशांनी अनेक विषय आणि क्लासचा मारा सोसण्याच काम भारतीय विद्यार्थ्यांना करावे लागते.
शिक्षण काय असतं? 

रवींद्रनाथ टागोर काय म्हणतात पहा..

टागोरांची "शांतीनिकेतन" शाळा झाडांखाली भरत असे. पक्ष्यांची किलबिल ऐकू येई. एकदा टागोर झाडाखाली बसले होते. चार विद्यार्थी त्यांच्या समोर पुस्तकात डोक खुपसून बसली होती. आणि उरलेली बरीच मुले खेळत-बागडत होती. कोणी झाडावर चढला होता, कोणी फुलांचा सुगंध घेत फिरत होता. तेवड्यात एक पालक तिथे आले. पाहतात तर काय...गुरुदेव शांतपणे बसले होते आणि फक्त चार मुले पुस्तकात डोके खुपसून बसली होती व इतर मुले हसण्यात-नाचण्यात रमली होती. सुटा-बुटातील पालक महाशय टागोरांना म्हणाले- “या नाचणाऱ्या-बागडणार्या मुलांच्या भवितव्याची तुम्हाला चिंता वाटत नाही का?” 

टागोर म्हणाले- “चिंता वाटते, पण नाचणाऱ्या-बागडणार्या मुलांची नाही तर पुस्तकात तोंड खुपसून बसलेल्या मुलांची. ही मुले खेळण्या-बागडण्याच्या वयात मोठ्या माणसासारखी वागत आहेत. ही मुले लहान वयात प्रौढ झाली आहेत. प्रौढ तर मीसुद्धा अजून झालो नाही. खरं तर मलाही झाडावर चढाव असं वाटतं. पक्ष्यांशी बोलावसं वाटत. भरपूर खेळावस वाटतं. पण माझ शरीर आता साथ देत नाही. “

टागोर जगण्यासाठी शिकवत होते. आता शिकण्यासाठी जगावे लागते. 

जास्त ज्ञान, जास्त कला घेवून मुले धावत असतात.
आणि पालक त्यांच्यावर पैसे लावतात !
मग एक रेस सुरु होते आणि जगायचं राहून जातं !!



नाते मैत्रीचे, पालकांचे व मुलांचे

मुलांना समजून घेण्यासाठी त्यांना वेळ देणे, प्रसंगी त्यांच्या विश्वात आपणही रममाण होणे आवश्यक आहे. केवळ चुका दाखविणे, उपदेश करणे, स्वतःच्याच मतांचा आग्रह धरणे, असे न करता थोड्या वेगळ्या स्वरूपात (उदा. "हेच काम किंवा अभ्यास तू जर थोड्या वेगळ्या सोप्या पद्धतीने केलास तर तू ते अधिक चांगले करशील, असा मला विश्वास आहे) सांगायला हवे. 


नाते मैत्रीचे, पालकांचे व मुलांचे...

संवाद तेथेच शक्य असतो, जेथे निखळ, पारदर्शी, विश्वासपूर्ण मैत्रीचे नाते असते. मुलांबरोबर खऱ्या अर्थाने संवाद साधायचा असेल; तर पालकांनी व शिक्षकांनी प्रथम मुलांबरोबर मैत्रीचे नाते जोपासायला हवे. यासाठी कुटुंबाचा आपसातील सुसंवाद आवश्यक आहे; तसेच मुलांचे वय व त्या वयातील मानसिक व शारीरिक वाढीच्या आवश्यकतेनुसार तो अधिक निकोप व सुदृढ व्हायला हवा.

आज बऱ्याच घरांमध्ये जेथे उत्साही आजी-आजोबा असतात, तेथे घरात व घराच्या बाहेरसुद्धा मुलांची वृत्ती, वागणूक अधिक मनमोकळी व आनंददायी असते. यातील वेगळेपण बघितले, तर आईबाबांसारखेच आजी-आजोबासुद्धा प्रेमाने हवे-नको बघत असतात, इतरही काळजी घेत असतात. त्याहीपेक्षा स्वतःचे वय विसरून मुलांबरोबर लहान मूल होऊन निखळ मैत्रीच्या नात्याने संवाद साधतात. मुलांनी उत्साहाने, उत्सुकतेने सांगितलेल्या शाळा, अभ्यास, खेळ, मित्रमैत्रिणी, यश-अपयश याविषयीच्या गप्पा ऐकतात. त्याचबरोबर मुलांचे भावविश्व, असंख्य प्रश्न, कुतूहल, त्यांचे भन्नाट स्वप्नविश्व, आकलनशक्ती, अफाट कल्पनाशक्ती, निर्णयक्षमता, छोट्या-मोठ्या सर्व गोष्टींबद्दलचे मुलांचे निकष, भावभावना, स्वतःविषयी व घरातील सदस्यांविषयीचे विचार, अपेक्षा या सर्व गोष्टींमध्ये त्यांना रस असतो. आपली सर्व कामे बाजूला ठेवून केवळ मुलांसाठी ते हवा तेवढा वेळ देतात. त्यामुळेच मुलांनासुद्धा ते अधिक सुरक्षित, हक्काचे, प्रेमाचे, विश्वासाचे ठिकाण वाटते.


मुलांना समजून घेण्यासाठी त्यांना वेळ देणे, प्रसंगी त्यांच्या विश्वात आपणही रममाण होणे आवश्यक आहे. केवळ चुका दाखविणे, उपदेश करणे, स्वतःच्याच मतांचा आग्रह धरणे, असे न करता थोड्या वेगळ्या स्वरूपात (उदा. "हेच काम किंवा अभ्यास तू जर थोड्या वेगळ्या सोप्या पद्धतीने केलास तर तू ते अधिक चांगले करशील, असा मला विश्वास आहे) सांगायला हवे. यामुळे एका कार्यसिद्धीसाठी अनेक सोप्या वाटा, उपाय सहजतेने उलगडत गेल्याने चौफेर, व्यापक विचार करण्याची व त्यानुसार प्रत्येक काम अधिकाधिक नेटके व यशस्वी करण्याची अभ्यासूवृत्ती जोपासली जाते व पुढील आयुष्याच्या वाटचालीत कुठल्याही प्रसंगात आत्मविश्वास वाढवणारी ठरते. 

आजी-आजोबांकडून मुलांची कधीही कोणाबरोबर तुलना होत नाही. "तुझे-माझे' "आपले-परके' हा भेदभाव नसतो. तेथे फक्त प्रकर्षाने सहकार्याची, बरोबरीची व आपुलकीची भावना असते. आईबाबांनीसुद्धा आपल्या कार्यबाहुल्यातून रोज थोडा वेळ तरी मुलांसाठी जरूर द्यायला हवा. त्यासाठी त्यांनी आपले करिअर, पैसा, संधी व आव्हाने यामध्ये थोडी तडजोड करून मुलांचे उमलते भावविश्व, स्वप्न, अपेक्षा जाणून घेऊन मदतीच्या भावनेने नियमित व गुणात्मक संवाद साधायला हवा. 

घरातूनच ही सवय असेल तर घराबाहेरही मुले इतरांबरोबर मैत्री करू शकतील. वाहतुकीचे नियम पाळणे, खोटे न बोलणे, दिलेली वेळ व दिलेले काम यासाठी अधिक काटेकोर राहणे, स्वच्छता, वैयक्तिक कामांची जबाबदारी व त्याची सवय स्वतःला असणे, हे कुटुंबातील प्रत्येकाने लक्षात ठेवले तर साहजिकच असे योग्य संदेश घरातूनच मिळाल्याने मुले अधिक सक्षम होत जातात. आपल्या आनंदात; तसेच अडचणींमध्ये, यश-अपयश, संकटातही आपले पालक, कुटुंब सदैव आपल्याबरोबर आहे, ही आधाराची-स्थैर्याची भावना त्यांचे आयुष्य अधिक निकोप, सकारात्मक व प्रगल्भ बनविते.

टीव्ही नावाचा सैतान

मुलांबरोबर पालकांनी काही कार्यक्रम बघावेत आणि त्या कार्यक्रमांविषयी मुलांशी चर्चा करावी. यामुळे मुलं कार्यक्रमातून काय घेतात हे कळतं. सर्वांत महत्त्वाचं हेच की पालकांनी स्वत:च्या टीव्ही बघण्याकडे आत्मपरीक्षणात्मक भूमिकेतून बघावं आणि त्यात योग्य ते बदल घडवावेत. आपल्या मुलांबद्दल जाणीवपूर्वक विचार करणाऱ्या पालकांसाठी हे सर्व आचरायला कठीण आहे का, हे तुम्हीच ठरवा.


टीव्ही नावाचा सैतान (बालसंगोपनात पालकांसाठी मोठी समस्या)

प्रश्न : मुलगी सात वर्षांची आहे. सध्या सुट्टी सुरू झाल्यापासून तिचा एकच उद्योग असतो, टीव्ही बघणं. सकाळपासून रात्रीपर्यंत जवळजवळ सहा तास ती टीव्हीच बघते. टीव्ही बंद केला, की जोराजोराने आरडाओरडा करते... आदळआपट करते. नाइलाजाने तिला टीव्ही बघू द्यावाच लागतो. तिचं जेवणही तिथेच चालतं. आम्हाला असहाय्य वाटतं. तिचं टीव्ही पाहणं आम्ही कसं थांबवू? 

उत्तर : पहिली गोष्ट म्हणजे त्यातला 'नाइलाजाचा', 'असहाय्यतेचा' भाग तुम्हाला वजा करावा लागेल. स्वत:च्या असहाय्यतेकडे तुम्ही पाहिलंत, तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही तिच्या हट्टाला घाबरताय आणि त्यालाच 'नाइलाज' आणि 'असहाय्यता' म्हणताय. काही बाबतीत तुम्ही खंबीर असणं गरजेचं आहे. मुलांची ऊर्जा सक्रियतेने वापरली जाणं महत्त्वाचं असतं. नाहीतर ती आळसावतात आणि निष्क्रिय बनतात. पालकांनी मुलांना दिलेला वेळ ही मुलांसाठी पर्वणी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची गुंतवणूक असते. तुमच्या मुलीला तुमचा वेळ वेगळया तऱ्हेने मिळणं आवश्यक आहे. जर तुम्ही तिच्याशी खेळलात, तिच्याशी गप्पा मारल्यात, तिला ज्या गोष्टीत रस आहे त्या गोष्टी करायला तिला जास्त वाव दिलात, तर तिची ऊर्जा विधायक दिशेने वळेल. आपोआपच टीव्ही बघण्यासारख्या निष्क्रिय कामासाठी तिच्याकडे कमी ऊर्जा शिल्लक राहील. त्यातून तुमचं आणि तिचं नातंही निरोगी होईल. तुम्हाला तिचा टीव्ही 'थांबवायचा' नाही तर टीव्हीला चांगले पर्याय निर्माण करायचे आहेत, ज्यामुळे तिची टीव्हीची गरज कमी होईल. हे करण्यासाठी तुम्हाला प्रयत्नशील व्हावं लागेल. तिच्यात बदल होईपर्यंत धीर धरावा लागेल आणि मुख्य हणजे तिच्या आक्रस्ताळ्या तंत्रांना बळी पडणं थांबवावं लागेल.


प्रश्न : माझा मुलगा चार वर्षांचा आहे आणि मुलगी दोन वर्षांची आहे. त्यांना आम्ही शक्यतो टीव्हीपासून लांब ठेवतो. टीव्ही ही आम्हाला पुढे जाऊन त्यांच्यासाठी समस्या व्हायला नकोय. आम्ही काय खबरदारी घेऊ? 

उत्तर : तुम्ही या गोष्टीकडे जाणीवपूर्वक पाहिल्याबद्दल तुमचं अभिनंदन! तुम्हाला अभिप्रेत असलेल्या 'खबरदारी'बद्दल अमेरिकन बालरोगतज्ज्ञांच्या परिषदेने काही महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत. त्या सांगतो, टीव्हीला घराच्या सजावटीत सर्वात मध्यवतीर् स्थान नसावं. टीव्ही बेडरूममध्ये नसावा. टीव्हीवरचे कुठले कार्यक्रम मुलांनी बघावेत, हे पालकांनी ठरवावं. (सध्याचे आपल्याकडचे टीव्हीवरचे कार्यक्रम विचारात घेता ही निवड सुज्ञ पालकांसाठी फारच सोपी आहे. निदान ९० टक्के कार्यक्रम आपोआप बाद होतील!). मुलांनी टीव्ही किती वेळ बघावा, हेही महत्त्वाचं आहे. लहान मुलं जितका कमी बघतील तितकं चांगलं! मोठ्या मुलांसाठी शाळेच्या दिवशी जास्तीत जास्त एक तास आणि सुटीच्या दिवशी दोन तास (यात कम्प्युटर गेम्स, व्हिडीयो गेम्स हे सर्व आलं). टीव्हीवरच्या आवडत्या कार्यक्रमांनुसार वेळेचं नियोजन करावं, आपल्याला वेळ आहे म्हणून टीव्ही लावलाय असं होऊ नये. गृहपाठ, खेळ या महत्त्वाच्या कार्यक्रमांनंतरच मुलांनी टीव्ही बघावा. झोपाण्याआधी निदान दोन तास तरी टीव्ही बंद होणं आवश्यक आहे. नाहीतर झोपेवर विपरीत परिणाम होतो. जेवताना (किंवा जेवण्यासाठी लालूच म्हणून) टीव्ही लावून देऊ नये. मुलांबरोबर पालकांनी काही कार्यक्रम बघावेत आणि त्या कार्यक्रमांविषयी मुलांशी चर्चा करावी. यामुळे मुलं कार्यक्रमातून काय घेतात हे कळतं. सर्वांत महत्त्वाचं हेच की पालकांनी स्वत:च्या टीव्ही बघण्याकडे आत्मपरीक्षणात्मक भूमिकेतून बघावं आणि त्यात योग्य ते बदल घडवावेत. आपल्या मुलांबद्दल जाणीवपूर्वक विचार करणाऱ्या पालकांसाठी हे सर्व आचरायला कठीण आहे का, हे तुम्हीच ठरवा.

- डॉ. मनोज भाटवडेकर, मानसोपचारतज्ज्ञ

Tuesday, 17 February 2015

मुलं आणि पालक नातेसंबंध

आपल्याला काय वाटत! आपली मुले चांगली व्हावी, यशस्वी व्हावीत असे प्रत्येक पालकाला वाटत, पण आपण एक सुजाण पालक म्हणून त्यासाठी काय करतो? आज वयाची ३ वर्ष पूर्ण नाही झाली तर आपण नर्सरी /पाळणाघरात टाकून मोकळे.आपण आपला किती आणि कसा वेळ देतो आपल्या मुलांसाठी ह्याचा कधी विचार केला का? पोटच्या मुलांना प्रेम देण्याइतका वेळ जर आज पालकांकडे नसेल तर!! "पालक असणं वेगळ आणि सुजाण पालक होणे वेगळ" आजच्या काळात पालक होणे हे एक घडणे आहे




आपण पालक होतो हा एक प्रकारचा बहुमानच आपल्याला मुल झाल्यामुळे मिळालेला असतो. म्हणजे अप्रत्यक्षपणे आपण त्या मुलाचे आभार मानायला हवेत. त्याच्यामुळेच आपण आई किंवा बाबा झालेलो असतो. जसे “तुझ्यामुळे मी झाले आई, बाळा होऊ कशी उतराई” हे तर ऐकूण काय मुलं आणि पालक या नात्यातील अंतर कमीतकमी असायला हवं. हे नाते संबंध पाळताना काय-काय गोष्टी अपेक्षित आहेत ते पाहू...


मुलं आणि पालक नातेसंबंध

मुलांचा सर्वप्रथम पहिला शिक्षक “आई” हाच असतो. किंवा पालक जो कोणी असतो तो. आई असल्याचा विलक्षण अभिमान तिला असतो. नकळतच तिचं हे जगणे पण आनंदमयी होऊन गेलेले असते. त्याच्या “आई” ह्या संबोधनाने पुकारण्याचा त्या कोवळ्या जीवावरून ती आपला जीव ओवाळून टाकत असते. ह्याच उच्चारांसाठी तिचे कान आतुरलेले असतात. ती धन्य झालेली असते. भूक लागली कि रडायचे हे काय आई किंवा पालक शिकवत नाहीत. प्रेमाचा आणि मायेचा स्पर्श आपण मुलांना देतो. तो ओळखायला ती अंतःप्रेरणेने शिकतात. त्याच अंतःप्रेरणेतून ती इतरही गोष्टी शिकतात. मुख्य म्हणजे पालकांनी आपल्या पाल्याचा "आय क्यू" ओळखून मुलांच्याकडून त्या प्रमाणात अपेक्षा केली पाहिजे.


मुलांच्या मेंदूची वाढच मुले ३ वर्ष होईपर्यंत झालेली नसते हे ओळखून त्याच्या शरीरिक वाढीसाठी आणि मग मानसिक वाढीसाठी प्रयत्न करायला पाहिजे. ३ वर्षापर्यंत तरी मुलं डोक्यावरती पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत सतत पाठपुरावा, धाकदाखून शिकवू पाहणारे पालक, आणि प्रथम आपण कृती करून त्यातून चांगल्या गोष्टी उचलणारे मुलं ह्या दोन्ही परस्पर विरोधी गोष्टी आहेत. परंतु मुले आपल्या कृतीतूनच घडत असतात. उत्तम मुल, उत्तम विद्यार्थी, किंवा उत्तम नागरिक म्हणून कलागुण त्याचे जोपासायचे असतील तर आपल्या चांगल्या गोष्टीचे अनुकरण ती करत असतात. आपल्या सर्व गोष्टींचे मुलं निरीक्षण, बारकाईने आपल्या सर्व गोष्टी मुलं न्याहाळत असतात आणि त्यातूनच मुलं घडत असतात. त्या निरीक्षणातूनच त्यांच्यातला खरे-खोटेपणा सिद्ध होत असतो . म्हणजेच पर्यायाने आपली जबाबदारी फारच वाढलेली असते. आपली प्रत्येक कृती, मग ती अगदी छोटोशीच का असो . चांगल्याची, पवित्रपणाची, प्रामाणिकपणाची, प्रेमाची, स्नेहाची, त्यागाची, बुद्धीची असायला हवी .

मुख्य म्हणजे त्यांचा सदगुण वाढीस लावणे हे पालकांनी करायला हवे. खऱ्या अर्थाने सद्गुणांचा विकास म्हणजेच मानवतेचा विकास आहे. ह्या गुणामुळे तो मोठा होतोच पण सामाजासाठी आणि देशासाठी त्याच्याकडून चांगले कार्य घडते. त्या गुणामुळेच सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला तो हवाहवासा वाटतो. त्याच्या सहवासात आनंदच मिळतो. हे कशामुळे शक्य झालेले असते तर चांगल्या गुणांची जोपासना करायला हवी. पालकांनी मुलांचे बालपण हिरावून घेऊ नये. कारण त्यांचे हे दिवस परत येणारे नसतात. त्यांना फक्त प्रेमानेच जिंकायचे असते. कावळा दिसला कि हातातले बिस्कीट पुढे करणारे मुल हे उपजतच अंतःप्रेरणेने मायाळू होत असते. ही त्यांची भावना वाढीस लावण्याचे काम पालकांनी करावयाचे असते . एक तीळ सात जणांनी वाटून खायचा हे जपणारी आपली संस्कृती पालकांनी आपल्या मुलांकडून चालू ठेवायची, दिल्याने आनंद वाढतो हे पालकांनीच मुलांना शिकवायचे असते. अगदीच हटी् मुलं असेल तर रागवायचे पण ते कौशल्याने त्यांचा अहंकार दुखावणार नाही या बेताने.

खरं म्हणजे मन निरोगी असते. पण आधी शरीर निरोगी असायला हवे. तरच मन प्रसन्न ताजेतवाने रहाते. आणि ते शरीर निरोगी ठेवायची जबाबदारी पालकांची असते. मुलांचा सर्वांगीण विकास व्हायला हवा असेल तर शारीरिक सुदृढता हवी. सर्व प्रकारचे अन्न घटक शरीरात गेल्यामुळे मन व शरीर सुदृढ बनते. असे आयुर्वेदाचे म्हणणे आहे. त्यांना सगळ्या चवींची गोडी लावण्याचे काम आईचे आहे. ॠतुमानानुसार खाण्यात बदल करायला हवा. थंडीच्या दिवसात तेलाचे पदार्थ करायला हवेत. थंडीच्या ४ महिन्यात जर लक्षपूर्वक आहार विहार ठेवला तर पुढचे ८ महिने निर्धास्त राहायला हरकत नसते. अशी जुनी पिढी सांगत असते. त्यांच्या सांगण्याचं तथ्य तसेच “झोप” विश्रांती हि सुद्धा पूर्ण झालेली असेल तरच ते मुल तरतरीत दिसते. नाहीतर ते अथरुणातूनच रडत उठते. म्हणजे त्यांचे काहीतरी बिघडलेले असते हे पालकांनी ओळखायला हवे. निरोगी विचारच पुढच्या आयुष्यातील काम सोपे करतात. मुलांच्या मनात जिव्हाळा आणि कृतक्षता या दोन्ही भावना वाढीस लावायच्या त्या रुजवल्या कि आपोआप वाढीस लागतात. कारण या दोन भावनाच आपल्या संबंधात आलेल्या व्यक्तीशी, समाजाशी आणि पर्यायाने विश्वाशी नातेसंबंध जिवंत ठेवू शकतात. माणुसकीने वागल्यामुळे त्याचे थोरपण ठरत असते. आणि मग ते मुल कुणाचे आहे, याची विचारणा होते. पर्यायाने संस्कारातून या गोष्टी पुढे जाऊ शकतात . उत्तम संस्कार माणसाला मोठे करतात. शिक्षणाने जसा अज्ञानाचा अंधःकार दूर होतो. तसे माणसाने आपल्यातले माणूसपण टिकवायचे असते. माणुसकी हि खरी जात आहे. हे माणसाला कळले पाहिजे.

एकविसाव्या शतकातली गतिमानता नवीन नवीन रोगांना आमंत्रण देते. एवढेच नव्हे तर पूर्वी म्हातारपणी होणारे रोग तरुणपणात व्हायला लागलेत. तेव्हा चंगळवादामुळे हे घडते . आळसामुळे रोगाची मुळे शरीरात जोर धरू लागतात. आहार-विहार आणि विचाराला धरबंध नसेल तर पुढील पिढीत असेच चित्र दिसेल . म्हणूनच आताच्या शिशूंना शिस्तीचे स्वावलंबनाचे वेळापत्रक असणे आवश्यक आहे. आणि ते आपल्यापासूनच ॠढ व्हायला हवे. ताण-तणाव नको म्हणून आई वडिलांचे निकोप नाते हवे . कारण मुल जास्त वेळ घरात असते. तिथे ते निर्भय असते. त्यांचा कोणत्याही तऱ्हेचा कोंडमारा होता कामा नये. नंतर मोठे झाल्यावर त्यांची मित्र-मंडळी कशी आहेत, याच्यावर पालकांचे लक्ष हवे. ती सुद्धा चांगल्या संस्कारांच्या घरांतील मुले आहेत कि नाही हे पालकांनी तपासायला हवे. मुले खोटं बोलत नाही ना? कोणत्याही प्रकारची लबाडी मुले करत नाही ना? याकडे पालकांचे विशेष लक्ष पाहिजे. वडिलांचे मुलाशी मित्रासारखे नाते हवे. आईचे मुलीशी मैत्रीणीसारखे नाते हवे. पालकांचे वागणे पारदर्शी पाहिजे. / मुले आपोआप शहाणी होतात. आनंद देतात. त्यांच्यातला कलागुण ओळखून त्याला योग्य तऱ्हेने वाव देणे पालकांचे कर्तव्य आहे. त्यांच्या चुकांबद्दल योग्य समज देणे, चांगल्या कामगिरीबद्धल शाबासकी देणे. या दोन्हींचा मेळ घालता आला पाहिजे. मुलांना आई वडिलांचा अभिमान वाटला पाहिजे. आपले आदरयुक्त प्रेम असेल तर मुळे आपोआपच पालकांना आपले आदर्श मानतात.

दिवसभर नोकरी आणि संध्याकाळी मुलं यात गुरफटलेली स्त्री आपल्या मुलांकडे न थकता लक्ष देते. हे तिचे खरे कौशल्य आहे . त्यांच्या चौकसबुद्धीला खात-पाणी घालते. मुले फक्त अभ्यासात हुशार असली पाहिजे असे नव्हे, तर त्याच्यातला छंद मुलांना जोपासता आला पाहिजे. व्यवहार चतुर कशी होतील हे सुजान पालकांनी शिकवले पाहिजे. त्यांचा अपमान करू नये. त्यांना चांगल्या शब्दात समज द्यावी. मोठया माणसांशी कसे वागावे, दुसर्‍यांच्या घरी व समारंभाला गेल्यावर कसे वागावे हे त्यांना लहानपणीच शिकवावे.

आई ही सुसंस्कारांची जननी आहे. आईच्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक शब्दात, प्रत्येक सल्ला व उपदेशात सुसंस्कार व नैतिक मूल्य भरलेली असतात. आई, वडील, शाळा, गुरु हे संस्कारांचे अधिष्ठान आहे . गुरु, विद्या संभाषन नेतृत्व असे विविध पैलू शिष्यावर पाडत असतो . चांगल्या नेतृत्वाची समाजात गरज आहे . आणि चांगल्या नेतृत्वाची समाज कदर पण करतो समाज जर समृद्ध आणि सकस हवं असेल तर हे बाळकडू लहानपणीच मुलाना पाजावे लागेल. घरातील नात्यामधील जिव्हाळा, एकमेकांशी सुसंवाद, सुसंस्कार, आपलेपणा, एकमेकांसाठी करत राहण्याची वृत्ती यामधून मुलानमध्ये आनंदाचे झाड जागवण्याचा प्रयत्न प्रत्येक पालकांनी केला पाहिजे. मुलांनी खूप मोठ्मोटया पदव्या घेऊन खूप पैसे कमावण्यापेक्षा साधे राहून एकमेकांवर प्रेम करून दुसऱ्यांच्या गरजेला साहाय्य करून, धावून जाऊन अशा आशीर्वादात जगलं पाहिजे. अलीकडे एकमेकांशी सुसंवाद संपल्याची खंत वाटते, त्यामुळे स्वभावात तुटकता आल्याचे जाणवते, एकटेपणा आवडतो, त्यामुळे स्वार्थी दृष्टी बनते. हे पालकांनी सांभाळले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात “मना करा रे प्रसन्न सर्वसिद्धीचे कारण”, मन मुळात प्रसन्न पाहिजे मग जग जिंकल्याचा अनंद मिळेल. उत्साह, सकारात्मक जगण्याची वृत्तीच आनंदी ठेवते . उपासना कशासाठी आहे, मनाच्या स्वास्थासाठी कोणतीही उपासना करा. मन स्थिर आणि आनंदी राहण्यासाठी या गोष्टी आहेत. जसे योग आणि ध्यानधारणा यासुद्धा आनंदी जीवनासाठी उत्तम आहेत. मुलांमध्ये या आवडी लहानपणापासूनच लावल्या पाहिजेत. वाचनाची आवड रुजवली पाहिजे. शिस्त, काटकसर, वेळेचे नियोजन या गुणांमुळे मुले नक्कीच यशस्वी होतील. मुलांकडून मिळणाऱ्या आनंदापेक्षा पालकांना आणखी कशाचीच अपेक्षा नसते. आपली ऐपत असली तरी मुलांना मागितलली वस्तू की लगेच देऊ नये. त्यांना पैशाची, वस्तूची किंमत राहत नाही. आपण सारेच आपल्या मुलांवर प्रेम करत असतो. त्यांच्या सुखासाठी क्षण-क्षण वेचीत असतो. त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी आपला प्रत्येक आनंद सुख बलिदान करीत असतो. तेच आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी केलेले असते. याची जाणीव ठेऊन त्यांच्या आयुष्याच्या सायंकाळी त्यांना आपुलकी, प्रेम, सुरक्षा मिळणे हाच त्यांचा अधिकार असतो. तो देणे आपले कर्तव्य आहे.

आजी आजोबांचे प्रेम त्यांना मिळावे ही धडपड प्रत्येक आई वडिलांनी केली पाहिजे. ते सुध्दा आपल्याच कुटुंबाचा एक भाग असतात. सोईच्या दृष्टीने ते वेगळे राहत असले तरी त्यांच्याशिवाय आपले कुटुंब अर्धवट आहे. अपुरे आहे. याची जाणीव हवी. आपल्या मुलांना वाढवताना त्यांच्या गरजा पूर्ण करण्याकडे जसे लक्ष देता तसेच आपल्या आई वडिलांच्या मानसिक गरजा भागविणे त्यांची देखभाल करणे त्यांना सुखी व आनंदी ठेवणे हे आपले कर्तव्य आहे.

नाती वडिलांकडील किंवा आईकडील असो. सारीच मैत्रीची असावीत जीवनासाठी ती गरजेची आहे.उत्तम व्यक्तिमत्व निर्मितीसाठी योग्य मानसिक विकासासाठी सुख शांती, समाधानासाठी, सर्वांशी उत्तम संबंध असणे आवश्यक आहे. शेजारी-पाजारी तसेच इतर नातेवाईक सर्वांशी प्रेमाने असावे म्हणूनच मानपान विसरून सर्वांशी स्नेहसंबंध मजबूत करायला हवे. मुलांना हे नात्याचे मोल समजून द्यायला हवे . आणि सकारात्मक दृष्टीकोन हाच सुखी जीवनाचा आहार आहे. 

भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ आहे. ती वाढविणे आणि तिची जोपासना करणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे.