थोडं माझ्या विषयी

Wednesday 30 September 2015

ही मुलं असा का विचार करतात?

परीक्षेच्या अतिरिक्त ताणामुळे, अपरिपक्व विचारसरणीमुळे, नैराश्‍यामुळे, फुलणाऱ्या कळ्या, उमलणारी व्यक्तिमत्त्व कोमेजून जातात. वेळेवर काळजी घेतली, तर आपण असं घडणं टाळू शकतो. त्यांना पुन्हा एकदा सुंदर आयुष्य मिळायला मदत करू शकतो. 


ही मुलं असा का विचार करतात?

-डॉ. विद्याधर बापट

पंधरा दिवसापूर्वीची गोष्ट. संध्याकाळी, भांडारकर रोडवरून फिरायला चाललो होतो. अंधारून आलेलं. एका बीअर बार शेजारच्या कट्ट्यावर यश दिसला. वय १७,१८ . इंजिनियरिंगचा विद्यार्थी. मला पाहताच चेहरा लपवण्याचा त्याचा प्रयत्न माझ्या लक्षात आला. मीही लक्ष नसल्यासारखं दाखवलं. घरी पोचलो, तरी त्याचा घाबरलेला आणि भकास चेहरा समोर येत राहिला. काही महिन्यांपूर्वी त्याची आई भेटून गेली होती. यशविषयी बऱ्याच गोष्टी सांगत होती. त्याची काळजी वाटत होती. सतत घराबाहेर राहाणं, घरात चिडचिड करणं, उलट उत्तर देणं, सतत टीव्ही पाहात राहाणं, रात्री उशिरापर्यंत मोबाईल आणि इंटरनेटवर खेळत राहाणं, या आणि अशाच अनेक तक्रारी सांगत होती. मी म्हटलं कदाचित वयाचा दोष असेल. या वयात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल मुलांमध्ये घडत असतात. growing pains . काही काळ लक्ष ठेवा. आत्ताच घाबरून जाण्यात अर्थ नाही; पण आज काहीतरी बिघडल्याचं जाणवलं. मी यशच्या घरी फोन केला. चौकशी केली. आई म्हणाली "सर काय सांगू ? रोज उशिरा येतोय, अजिबात अभ्यास करत नाहीये. अभ्यास होतच नाही म्हणतो. परीक्षेत नापासच होईल बहुधा. काही विचारलं, की संतापतो. जेवणाखाण्यात लक्ष नाही. काय करू मी? तुम्हाला माझी परिस्थिती माहितीय. गेल्यावर्षी मेरिटमध्ये आलेला हा मुलगा. नियमित अभ्यास करणारा. काय झालं हे अचानक?'' 

दुसऱ्या दिवशी भांडारकर रोडवर मुद्दामच यशला गाठलं. खांद्यावर हात ठेवला. म्हटलं, चल जरा गप्पा मारू. थोडासा वेळ देशील माझ्यासाठी ? त्याला हे अनपेक्षित होतं; पण त्यालाही थोडसं मोकळं व्हायचं असावं. आला बरोबर. बीएमसी च्या ग्राउंडवर बसलो. त्याला म्हटलं, "तुझ्या आईनं कुठलीही तक्रार केली नाहीय. मलाच काल तुझी अस्वस्थता जाणवली. मदत करावीशी वाटली आणि क्‍लिनिकपेक्षा इथं बोलायला छान वाटेल. हो की नाही? सांग बरं कसं चाललंय तुझं? अभ्यास..परीक्षा !'' त्यानं हुंदके द्यायला सुरवात केली. म्हणाला, ""खूप अस्वस्थ वाटतं हल्ली. अभ्यासात लक्ष लागत नाही. एकाग्रताच होत नाही. अभ्यासाला बसलं, की दुसरेच विचार मनात येतात. आपल्या हातून काहीच घडणार नाही. आपण अपयशीच राहणार, असे सारखे विचार येत राहतात मनात. झोप येत नाही. आयुष्यात अर्थ नाही असं वाटतं. मरून जावसं वाटतं. सारखे लैंगिक विचार, घाणेरडे विचारसुद्धा मनात येत राहतात. मित्रांच्या नादानं कधी कधी बीअर, सिगरेट पिण्याची सवय लागलीय. खरं तर मला हे आवडत नाहीय; पण शांतच वाटत नाही. बाबा नाहीत. आई एकटी सगळा गाडा ओढतेय. मी नापास झालो, तर तिला काय वाटेल? मित्रमैत्रिणी हसतील. करियर कसं होईल. कलंक ठरीन. डाग लागेल कायमचा.'' माझ्या लक्षात आलं, ही लक्षणं नैराश्‍याच्या आजाराची आहेत. यशला यातून बाहेर काढायलाच हवं. त्याला म्हटलं, "यश तुला किती त्रास होत असेल मी समजू शकतो; पण आयुष्याचा शेवट करण्याचा विचार करणं किंवा व्यसनांच्या आहारी जाणं हा मार्ग असू शकत नाही. त्यापेक्षा समस्येच्या मुळापर्यंत जाणं आणि तिचं निराकरण करणं शक्‍य आहे. तुझी समस्या एकाग्रतेची आहेच, त्याचबरोबर एकूणच आयुष्यात आपल्याला नेमकं काय मिळालं, तर आपण सुखी होऊ याच्या उत्तराची आहे. दृष्टिकोन बदलाची आहे. 

यश तू यातून निश्‍चित बाहेर येशील. मी तुला मदत करीन. भले या वर्षी तुला मार्क्‍स कमी पडतील, विषय राहतील किंवा अगदी नापास होशील; पण हळूहळू पायरी पायरीने एकाग्रता व्हायला लागेल. आपली एकाग्रता कशामुळे गेलीय, ती कशी मिळवायची, आयुष्यात काय महत्त्वाचं आहे, हे सगळं तुझ्या लक्षात येईल. अंतिमत: तुझं ध्येय तू गाठशील. आयुष्यात आनंदी होशील आणि इतरांना आनंद देत राहशील; पण उद्यापासून काही गोष्टी करायच्या. आपण या परिस्थितीवर मात करू शकतो.' 

यशचे डोळे चमकले. त्याला सांगितलं उद्यापासून आपण काही गोष्टी शिकणार आहोत. भावनांवर ताबा कसा मिळवायचा, आनंद कसा मिळवायचा आणि कसा टिकवायचा, परिस्थितीशी जुळवून कसं घ्यायचं व समस्येतून मार्ग कसा काढायचा, तणावाचा उगम/स्रोत कसा शोधायचा, सकारात्मक दृष्टिकोनाची जोपासना कशी करायची, आयुष्यातील प्राथमिकता कशी ठरवायची/कशी बदलायची, योजनाबद्ध पद्धतीने, पायरी पायरीने विचार व कृती करण्याची सकारात्मक पद्धत शिकायची अर्थात नकारात्मक पद्धत बदलायची. एकाग्रता साधण्यासाठीची तंत्रे शिकायची. यश म्हणाला, ""हे सगळं मला जमेल?'' म्हटलं, ""का नाही ? अनेकांना हे जमलंय.'' 

तणाव नियोजनाच्या विविध पद्धती (Eastern व Western) आपण शिकूया. 

प्रत्येक क्षणात, वर्तमानात, स्वस्थ कसं राहावं, तसंच तटस्थपणे स्वतःकडे व परिस्थितीकडे कसं पाहावं हे शिकूया. काही ध्यानाच्या पद्धती शिकूया, ज्यायोगे चित्तशांत होईल आणि या बरोबरच रोज भरपूर व्यायाम करूया, ज्याने चांगली संप्रेरक शरीरात स्त्रवतील. आपलं औदासीन्य कमी व्हायला मदत मिळेल. अभ्यासात एकाग्रता व्हायला लागेल.

यश प्रथमच हसला. म्हणाला ""सर खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. उद्या भेटूया आपण. सुरू करू.'' ""आणि बीअर?'' मी विचारलं. ""आजपासून संपलं सगळं सर. सगळं ठीक होणार असेल तर कशाला हवीय ती?''
मी स्वस्थ झालो होतो, एक आयुष्य मार्गी लागण्याची शक्‍यता निर्माण झाली होती.
परीक्षेच्या अतिरिक्त ताणामुळे, अपरिपक्व विचारसरणीमुळे, नैराश्‍यामुळे, फुलणाऱ्या कळ्या, उमलणारी व्यक्तिमत्त्व कोमेजून जातात. वेळेवर काळजी घेतली, तर आपण असं घडणं टाळू शकतो. त्यांना पुन्हा एकदा सुंदर आयुष्य मिळायला मदत करू शकतो. 

विद्यार्थी आणि परीक्षेचा ताण 

परीक्षेचा चांगला ताण अभ्यास करायला प्रवृत्त करतो; परंतु अपरिमित ताण कदाचित सर्व भवितव्य विस्कटून टाकू शकतो. परीक्षेचा अतिरिक्त ताण येण्याची कारणे -
१. अभ्यासात मन एकाग्र न होणे आणि वेळेत अभ्यास पूर्ण न होण्याची भीती
२ . मेंदूतील रासायनिक असंतुलन
३ . अपयश येणारच हे गृहीत धरणे व ते पचविण्याची तयारी नसणे.
४ . नकारात्मक विचारसरणी व नकारात्मक स्व-संवाद
५ . स्वत:कडून अवास्तव अपेक्षा
६ . अभ्यासाची अपूर्ण तयारी
७ . आयुष्यात अचानक घडणारे न टाळता येणारे महत्त्वाचे बदल (पालकांची बदली, त्याच्यातील घटस्फोट, आर्थिक संकट इ ).
८ . प्रेमभंग
९ . अभ्यासात मन एकाग्र न होणे आणि वेळेत अभ्यास पूर्ण न होण्याची भीती 


एकाग्रता म्हणजे सोप्या शब्दात सर्व ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे. 

अभ्यास करताना ज्ञानेंद्रियांद्वारे माहिती स्वीकारली जाणे. ती मेंदूत साठवली जाणे आणि आवश्‍यक तेव्हा आठवून चांगल्या पद्धतीने सादर करता येणे. या क्रिया चांगल्या होणे व त्यांच्यात coordination असणे, फार महत्त्वाचे आहे. 

अभ्यासातील एकाग्रता का होत नाही तर मुख्यत: ध्येयासक्ती नसणे, योग्य ध्येयच डोळ्यांसमोर नसणे, भावनिक समस्या असणे, अभ्यास करायची मनापासून तयारी नसणे, विषयामधे रस नसणे, विषय अवघड वाटणे, शारीरिक व मानसिक थकवा असणे. मेंदूतील रासायनिक असंतुलन मुळात मन स्वस्थ, स्थिर नसेल तर एकाग्रता साधणं शक्‍य नाही. त्यासाठी मन अस्वस्थ असण्याची कारणे जी आपल्याला माहीत आहेत, त्यांची एक यादी करावी. विश्‍वासातील घरातली व्यक्ती किंवा तज्ज्ञ यांच्या मदतीने त्यांचे निराकरण करावे. जी कारणे सांगता येत नसतील, उमजत नसतील त्यांच्या निराकरणासाठी तज्ज्ञांचे साहाय्य घ्यावे. भावनिक समस्या (emotional disorder) किंवा अस्वस्थता असेल, तर त्यासाठीदेखील वेळ न दवडता तज्ज्ञांचे उपचार घ्यावेत. 

लेखक मानसोपचार तज्ज्ञ/ ताणतणाव नियोजन तज्ज्ञ आहेत
Email - vidyadharbapat2002@gmail.com 

टिकवा - कौटुंबिक नाती

पती-पत्नीच्या नात्यात, पालक-मुलांच्या नात्यात हे अंतर निर्माण होणं हे नैसर्गिकरीत्या घडत असतं. जाणूनबुजून हे होत नाही. त्यामुळे एकमेकांच्या बाबतीतलं प्रेम कमी होतं, असं मुळीच नाही. एकमेकांचा कंटाळा येऊ लागतो असंही नाही; पण तरीही एकमेकांच्या सहवासात तोच तो पणा आल्यामुळे त्याबद्दलचं आकर्षण कमी होत राहतं.


टिकवा - कौटुंबिक नाती

-स्मिता प्रकाश जोशी (समुपदेशक)


"हाय शलाका... कशी काय झाली ट्रिप? अगं फोटो काढलेस की नाही आम्हाला दाखवायला? केरळची ट्रिप म्हटल्यानंतर अल्लेप्पीच्या बोटहाऊसची मजा नक्‍कीच घेतली असणार. सांग ना, काय काय मजा केली तुम्ही?'' 

"अगं मंजूषा, हल्ली फोटो डेव्हलप कुठं करतात? फेसबुकवर टाकले आहेत काही फोटो, ते बघ आणि उद्या पेन ड्राइव्ह घेऊन येईन मी तेव्हा पाहता येतील.'' 

"फोटो बघू गं नंतर... पण मला सांग तू फ्रेश झालीस की नाही? अगं वर्षातून अशी एखादी लॉंग टूर हवी असते. त्याच त्याच रुटिनचा आपल्याला कंटाळा येतोच. जरा बदल झाला ना, की त्या आठवणी पुढचे काही दिवस मनात रेंगाळत राहतात आणि नेहमीच्या रुटिनमध्येही आनंद देऊन जातात. तुला काय वाटतं?'' 

"मंजूषा... तुला खरं सांगू का... माझी ट्रिप खूप बोअरिंग झाली. अगं, कधी एकदा आम्ही घरी येतोय आणि मी माझ्या रुटिनला सुरवात करतेय, असं मला झालं होतं.'' 

"शलाका... अगं काय बोलतेस तू? एनी प्रॉब्लेम?... तुझ्यामध्ये आणि शेखरमध्ये काही वाद झाले का? की अजून काही कारण...?'' 

"तसं विशेष काही नाही गं... पण मला नाही मजा आली! अगं त्यापेक्षा आपल्या सिंहगडच्या वन डे ट्रिपला आपण जास्त एन्जॉय केलं होतं. एकमेकींची टिंगल करणं... अंताक्षरी... खरंच आपलं लहानपण आपण पुन्हा अनुभवलं होतं. तशी मजा या ट्रिपमध्ये मला नाही वाटली.'' 

"शलाका... नक्‍की काय झालं? मला समजेल अशा भाषेत जरा सांगशील!''

"मंजूषा... शेखरने आम्हाला ट्रिपला नेलं ते एक कर्तव्य म्हणून... खर्चाचं म्हणशील तर त्याच्या ऑफिसमधून त्याला "एलटीसी' मिळाली होती. सर्व जण फॅमिली टूर करतात, म्हणून तो आम्हाला घेऊन गेला. पण स्वत:च्या रुटिनमध्ये काहीही बदल नाही. घरी ऑफिसला लवकर जावं लागतं म्हणून सहा वाजता उठतो; पण इथं निवांतपणा म्हणून सात वाजता उठायचा... स्वत:चे एक्‍सरसाईज... योगा... नंतर वर्तमानपत्राचं वाचन... ऑफिसला जाण्याऐवजी इथं साइट सीइंगला जायचं... ऑफिसची काम इथंही करत होताच. हातात लॅपटॉप किंवा मोबाईल! नवीन प्रोजेक्‍टस आणि टारगेट्‌स हेच संभाषण. आमचा इंद्रजित 21 वर्षांचा आणि स्वरा 18 वर्षांची. दोघांचे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी मोबाईलद्वारा सतत संपर्कात. हल्ली मोबाईलमध्येही नेटचा वापर मुलं करतात. त्यामुळे त्यांचं चॅटिंग सुरू आणि ते चालू नसेल त्या वेळेस ऑनलाइन गेम खेळत बसायचे. एखाद्या साइट सीइंगला गेल्यानंतर फोटो काढणं आणि जेवायला उतरल्यानंतर कोणती डिश मागवायची हे ठरवणं, एवढंच काय ते आमचं संभाषण. मुलांचं विश्‍वच वेगळं झालंय गं आता. 

शलाका बोलतच होती... तिच्या अंतर्मनातील वेदना ती व्यक्‍त करीत होती. मुलाचं आणि नवऱ्याचं विश्‍व वेगळं आहे आणि आपण एकटे पडलोय, असं तिला वाटत होतं... समवयस्क मैत्रिणींशी ती जेवढं मोकळेपणानं बोलते... त्यांच्या सहवासात जी मजा घेते, ती मजा तिला फॅमिलीसोबत घेता आली नाही, हे तिचं दुखणं होतं आणि आज समाजामध्ये अनेक घरांत हेच चित्र पाहायला मिळतं. आई-वडील आणि मुलं एन्जॉय करू शकत नाहीत? मित्रांचं एक्‍सटेन्शन हवंच असतं का? काय कारणं असतील याची? नात्यामध्ये अंतर का निर्माण होतं? 
जी नाती एकमेकांशी अगदी मिसळून गेलेली असतात, त्या नात्यामध्येही काही दिवसांनी अंतर निर्माण होतं... असं का होत असावं? लग्न झाल्यानंतर पती-पत्नी दोघांना सुरवातीच्या काळात एकांत हवा असतो. दोघांना एकमेकांच्या सहवासाची धुंदी असते. तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीची त्यांना अडचण होते. एकमेकांशी किती बोलू आणि किती नाही, असं त्यांना झालेलं असतं; परंतु काही दिवसांनी... कदाचित काही वर्षांनी दोघांनी एकमेकांसोबत बाहेर जाणं... दोघांनीच एकमेकांशी गप्पा मारणं... हॉटेलिंग करणं, ट्रिपला जाणं बोअर व्हायला होतं. घरातील गप्पाच बाहेर केल्या जातात... कदाचित घरातले वाद बाहेर गेल्यावरही होतात म्हणूनच मित्रकंपनी त्यांच्या परिवारासहित असेल तर थोडी मजा येते. वेगळ्या गोष्टींवर गप्पा रंगतात. एकमेकांकडून काही चुका झाल्या तरी मित्रकंपनीसमोर वाद होत नाहीत, म्हणूनच फक्‍त दोघांनीच बाहेर जाणं टाळलं जातं. 

मुलं लहान असताना सतत आई-वडिलांच्या भोवती घुटमळत असतात. कुणी मारलं, कोणी रागावलं... शाळेत काय घडलं, कोण मित्र कसा वागला, शिक्षक काय म्हणाले, हे सर्व मुलं आपल्या आई-वडिलांशी शेअर करतात; परंतु मुलं थोडी मोठी झाली, की त्यांचं फ्रेंड सर्कल वाढतं. टीनएजर्स मुलं सर्व गोष्टी आई-वडिलांशी शेअर करत नाहीत. काही गोष्टी फक्‍त फ्रेन्डस्‌मध्ये बोलल्या जातात. आई-वडिलांची शिस्त, धाक, घरच्या पद्धती या गोष्टींचं दडपण त्यांच्या मनावर असतं. आपण काही गोष्टी सांगितल्या तर त्याचा ते वेगळा अर्थ घेतील. आपल्यावर काही बंधनं येतील या गोष्टींची भीतीही त्यांना असते. त्यामुळे मुलं मोठी झाली, की त्यांचं विश्‍व वेगळं होत जातं. आई-वडील आणि मुलांमध्ये नकळत अंतर निर्माण होतं. पूर्वीसारखं प्रत्येक गोष्टीला त्यांना आई-वडील लागत नाहीत. काही गोष्टींसाठी मित्रांनाच अधिक पसंती दिली जाते. 

पती-पत्नीच्या नात्यात, पालक-मुलांच्या नात्यात हे अंतर निर्माण होणं हे नैसर्गिकरीत्या घडत असतं. जाणूनबुजून हे होत नाही. त्यामुळे एकमेकांच्या बाबतीतलं प्रेम कमी होतं, असं मुळीच नाही. एकमेकांचा कंटाळा येऊ लागतो असंही नाही; पण तरीही एकमेकांच्या सहवासात तोच तो पणा आल्यामुळे त्याबद्दलचं आकर्षण कमी होत राहतं. एखादी गोष्ट आपल्याला हवी असेल तर ती मिळविण्यासाठी आपण धडपड करतो. ती मिळाल्यानंतर काही दिवस त्या आनंदाच्या धुंदीत राहतो; परंतु हा आनंद, आकर्षण हळूहळू कमी होतं आणि ती गोष्ट आपण मिळवली आहे, याबद्दल फारसं काही वाटेनासं होतं. नातेसंबंधामध्येही असंच असतं. नव्या नवलाईचे दिवस संपले, की नात्यातील आकर्षण कमी होत राहतं. पती-पत्नीमध्ये तर एकमेकांच्या सवयी, आवडी-निवडी एकमेकांना बोचायला लागतात. लग्नाच्या बस्त्याच्या वेळेस नवऱ्या मुलानं दाखवलेला चोखंदळपणा तेव्हा कौतुकाचा वाटला असला, तरी लग्नानंतर तिच्या प्रत्येक खरेदीत त्यानं नाक खुपसणं- खरेदीबाबत सूचना देणं तिला नकोसं होऊन जातं. तिचा स्पष्टवक्‍तेपणा लग्नाअगोदर आवडलेला असला तरी लग्नानंतरच तिचं बोलणं त्याला खुपायला लागतं आणि मग नात्यामध्ये हळूहळू अंतर निर्माण होऊ लागतं. एकमेकांच्या सहवासात सुरवातीसारखी मजा येत नाही. 

काही वेळेस व्यवहार, कर्तव्य, जबाबदाऱ्या यांमध्ये अडकून राहिल्यामुळेही एकमेकांशी मोकळेपणानं वागणं... बोलणंही कमी होत जातं... त्यामुळंही नात्यातील अंतर वाढत जातं. 

कशी फुलवावीत नाती? 

प्रत्येक नात्यामध्ये एकमेकांना स्पेस देणं हे व्यक्तिस्वातंत्र्याच्या दृष्टीनं आवश्‍यक असतं. परंतु ही स्पेस मर्यादित प्रमाणात असणं गरजेचं आहे. घरातील प्रत्येकानं आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचं ठरवलं आणि त्यावर कुणाचही बंधन नसेल, तर घर हे "घर' न राहता लॉजिंग-बोर्डिंग होऊन जाईल. नात्यात दुरावा... अंतर निर्माण होईल. म्हणूनच ते टाळण्यासाठी घराचं घरपण टिकवण्यासाठी, नात्यातील ओलावा जपण्यासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक करणं महत्त्वाचं असतं. 

घरात प्रत्येकाचं रुटिन ठरलेलं असतं आणि ते अपरिहार्यही असतं. पण काही घरांमध्ये रोजच्या रुटिनमध्ये कधीच बदल होत नाहीत. प्रत्येक दिवस, प्रत्येक महिना, प्रत्येक वर्ष अगदी आखीव-रेखीव, अगदी ठोकून-ठाकून घडवलेलं. त्यामध्ये अजिबातच बदल नाही. सकाळी सहाच्या आत उठायचं, नऊच्या आत ब्रेकफास्ट, दुपारी १ च्या आत जेवण, संध्याकाळी सातच्या आत घरात, रात्री नऊच्या आत जेवण आणि रात्री १० च्या आत झोपणं. त्यामध्ये अजिबात बदल नाही. मुलांना करडी शिस्त. यामध्येही घुसमटून गेल्यासारखं होतं. दैनंदिन जीवनात कधीतरी बदलही आवश्‍यक असतो. एखाद्या रविवारी उशिरा उठणं... सकाळच्या चहासोबतच गप्पांची मैफल रंगवणं... वेगळ्या पद्धतीचा स्वयंपाक करणं... मुलांवर वेगळ्या जबाबदाऱ्या सोपवणं... अशा साध्या गोष्टींतही बदल केला तर हा वेगळेपणाही नात्यातील बोच कमी करतो. 

घरी येण्याची प्रत्येकाची वेळ वेगळी असली तरी शक्‍यतो रात्रीचं जेवण तरी सर्वांनी सोबत घ्यावं. या वेळेस दूरदर्शन मालिका पाहत जेवण्यापेक्षा दिवसभरातील आपल्या घटना एकमेकांशी शेअर कराव्यात. एखाद्या गोष्टीवर चर्चा घडवून आणावी. विषय कोणताही असो- राजकारण, समाजकारण, मित्रांतील गॉसिपिंग किंवा एखादा नवीन रिलीज होणारा सिनेमा.... पण त्यावर प्रत्येकानं बोलतं व्हायला हवं. चौकोनी कुटुंब असो किंवा एकत्र कुटुंब असो- घरात चर्चा घडायलाच हवी. "एकमेकांशी काय बोलायचं हेच कळत नाही' असं व्हायला नको. घरातील अगदी छोट्या मेंबरच्या शाळेतील गमतीजमती ऐकण्यातही सर्वांनी रस घ्यावा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या संघानं कोणता उपक्रम राबवला, हे सांगणाऱ्या आजोबांच्या उत्साहाला तेवढीच दाद दिली जावी. 

पालकांनीही मुलांच्या विश्‍वात डोकावून पाहताना आपले लहानपणाचे, तरुणपणाचे दिवस आठवावेत. त्या वेळी आपल्या पालकांच्या काही गोष्टी आपल्यालाही पटलेल्या नाहीत, काही वेळा पालकांच्या विरोधात जाऊनही आपण वागलेले होतो, हे लक्षात घ्यावं. त्यामुळे पिढीतील अंतर राहणारच आहे. आपल्या मुलांच्याही काही गोष्टी आपल्याला पटणार नाहीत; परंतु "आमच्या वेळी आम्ही असं केलं' हे त्यांना वारंवार सांगू नये. वेळ-काळ बघून मार्गदर्शन जरूर करावं; परंतु सतत स्वत:चे दाखले देत राहू नये. बदलत्या परिस्थितीत मुलांच्या गरजा वेगळ्या होत आहेत, प्रवाहाबरोबर त्यांना चालावं लागणार आहे, हे लक्षात घ्यावं. "कॉलेजमध्ये अजिबात मोबाईल न्यायचा नाही. तिथं तुम्ही शिकायला जाता, मोबाईल कशाला लागतो रे तुम्हांला?' असं मुलांना म्हणून चालणार नाही. मोबाईलच्या वापराबाबत मर्यादा जरूर सांगाव्यात; परंतु पूर्ण विरोध केला तर मुलं पालकांपासून दूर जातील आणि काळाच्या मागे राहतील. 

घरातील काही धार्मिक समारंभ, सण, वाढदिवस इ. साजरे करताना घरातील सर्व सदस्यांचा सहभाग असावा. नेहमीचीच गोष्ट नव्यानं कशी करता येईल, याबाबत सर्वांशी चर्चा केली जावी. "या घरात आपल्याला महत्त्व आहे' असं प्रत्येकाला वाटायला हवं. त्यामुळे एकटेपणाची, नाकारल्याची भावना कोणाच्याच मनात निर्माण होणार नाही. 

समवयस्क मित्र-मैत्रिणींत प्रत्येकालाच मोकळेपणा वाटतो. त्यांच्यासोबतची एन्जॉयमेंट हवीशी वाटते. हे नैसर्गिक असलं तरीही कुटुंबीयांसमवेतही सहवासाची मजा घेता यायला हवी. प्रवासात घरातील दैनंदिन व्यवहारातून फक्‍त शरीरानं नाही, तर मनानंही बाहेर यायला हवं. चौकटीतून बाहेर येऊन प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला हवा. यामुळं कौटुंबिक नाती अधिक घट्ट होतील व नात्यातील रुक्षपणा कमी होईल. एकमेकांच्या सहवासाची ओढ वाढत राहील. 

कौटुंबिक नाती सुंदर करण्यासाठी लक्षात ठेवा. 

१. आपल्या दैनंदिन व्यवहारातील तोच तो पणा टाळण्यासाठी काही बदल घडवून आणा. 
२ . साध्या, सोप्या गोष्टींतही आपण आनंद मिळवू शकतो. फक्‍त कधीतरी चौकटीच्या बाहेर जाण्याची तयारी ठेवा. 
३ . कौटुंबिक प्रवासात रुटिन कामं बाजूला ठेवा. एकमेकांना वेळ देण्याचा प्रयत्न करा. कुटुंबीयांसोबत असताना मोबाईलचा वापर कमीत कमी करा. 
४ . प्रत्येक नात्यात एकमेकांबद्दलच्या अपेक्षा असतात, त्या सर्व पूर्ण होणार नाहीतच; पण एकमेकांच्या समाधानासाठी "स्व' विसरणं "अहंकार' बाजूला ठेवणं आवश्‍यक आहे. 
५ . कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची आहे. त्यांचे विचार, त्यांच्या अपेक्षा विचारात घेणं आवश्‍यक आहे. त्यामुळे प्रत्येकाला व्यक्‍त होण्याची संधी मिळायला हवी.