पती-पत्नीच्या नात्यात, पालक-मुलांच्या नात्यात हे अंतर निर्माण होणं हे नैसर्गिकरीत्या घडत असतं. जाणूनबुजून हे होत नाही. त्यामुळे एकमेकांच्या बाबतीतलं प्रेम कमी होतं, असं मुळीच नाही. एकमेकांचा कंटाळा येऊ लागतो असंही नाही; पण तरीही एकमेकांच्या सहवासात तोच तो पणा आल्यामुळे त्याबद्दलचं आकर्षण कमी होत राहतं.
टिकवा - कौटुंबिक नाती
-स्मिता प्रकाश जोशी (समुपदेशक)
"हाय शलाका... कशी काय झाली ट्रिप? अगं फोटो काढलेस की नाही आम्हाला दाखवायला? केरळची ट्रिप म्हटल्यानंतर अल्लेप्पीच्या बोटहाऊसची मजा नक्कीच घेतली असणार. सांग ना, काय काय मजा केली तुम्ही?''
"अगं मंजूषा, हल्ली फोटो डेव्हलप कुठं करतात? फेसबुकवर टाकले आहेत काही फोटो, ते बघ आणि उद्या पेन ड्राइव्ह घेऊन येईन मी तेव्हा पाहता येतील.''
"फोटो बघू गं नंतर... पण मला सांग तू फ्रेश झालीस की नाही? अगं वर्षातून अशी एखादी लॉंग टूर हवी असते. त्याच त्याच रुटिनचा आपल्याला कंटाळा येतोच. जरा बदल झाला ना, की त्या आठवणी पुढचे काही दिवस मनात रेंगाळत राहतात आणि नेहमीच्या रुटिनमध्येही आनंद देऊन जातात. तुला काय वाटतं?''
"मंजूषा... तुला खरं सांगू का... माझी ट्रिप खूप बोअरिंग झाली. अगं, कधी एकदा आम्ही घरी येतोय आणि मी माझ्या रुटिनला सुरवात करतेय, असं मला झालं होतं.''
"शलाका... अगं काय बोलतेस तू? एनी प्रॉब्लेम?... तुझ्यामध्ये आणि शेखरमध्ये काही वाद झाले का? की अजून काही कारण...?''
"तसं विशेष काही नाही गं... पण मला नाही मजा आली! अगं त्यापेक्षा आपल्या सिंहगडच्या वन डे ट्रिपला आपण जास्त एन्जॉय केलं होतं. एकमेकींची टिंगल करणं... अंताक्षरी... खरंच आपलं लहानपण आपण पुन्हा अनुभवलं होतं. तशी मजा या ट्रिपमध्ये मला नाही वाटली.''
"शलाका... नक्की काय झालं? मला समजेल अशा भाषेत जरा सांगशील!''
"मंजूषा... शेखरने आम्हाला ट्रिपला नेलं ते एक कर्तव्य म्हणून... खर्चाचं म्हणशील तर त्याच्या ऑफिसमधून त्याला "एलटीसी' मिळाली होती. सर्व जण फॅमिली टूर करतात, म्हणून तो आम्हाला घेऊन गेला. पण स्वत:च्या रुटिनमध्ये काहीही बदल नाही. घरी ऑफिसला लवकर जावं लागतं म्हणून सहा वाजता उठतो; पण इथं निवांतपणा म्हणून सात वाजता उठायचा... स्वत:चे एक्सरसाईज... योगा... नंतर वर्तमानपत्राचं वाचन... ऑफिसला जाण्याऐवजी इथं साइट सीइंगला जायचं... ऑफिसची काम इथंही करत होताच. हातात लॅपटॉप किंवा मोबाईल! नवीन प्रोजेक्टस आणि टारगेट्स हेच संभाषण. आमचा इंद्रजित 21 वर्षांचा आणि स्वरा 18 वर्षांची. दोघांचे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी मोबाईलद्वारा सतत संपर्कात. हल्ली मोबाईलमध्येही नेटचा वापर मुलं करतात. त्यामुळे त्यांचं चॅटिंग सुरू आणि ते चालू नसेल त्या वेळेस ऑनलाइन गेम खेळत बसायचे. एखाद्या साइट सीइंगला गेल्यानंतर फोटो काढणं आणि जेवायला उतरल्यानंतर कोणती डिश मागवायची हे ठरवणं, एवढंच काय ते आमचं संभाषण. मुलांचं विश्वच वेगळं झालंय गं आता.
शलाका बोलतच होती... तिच्या अंतर्मनातील वेदना ती व्यक्त करीत होती. मुलाचं आणि नवऱ्याचं विश्व वेगळं आहे आणि आपण एकटे पडलोय, असं तिला वाटत होतं... समवयस्क मैत्रिणींशी ती जेवढं मोकळेपणानं बोलते... त्यांच्या सहवासात जी मजा घेते, ती मजा तिला फॅमिलीसोबत घेता आली नाही, हे तिचं दुखणं होतं आणि आज समाजामध्ये अनेक घरांत हेच चित्र पाहायला मिळतं. आई-वडील आणि मुलं एन्जॉय करू शकत नाहीत? मित्रांचं एक्सटेन्शन हवंच असतं का? काय कारणं असतील याची? नात्यामध्ये अंतर का निर्माण होतं?
जी नाती एकमेकांशी अगदी मिसळून गेलेली असतात, त्या नात्यामध्येही काही दिवसांनी अंतर निर्माण होतं... असं का होत असावं? लग्न झाल्यानंतर पती-पत्नी दोघांना सुरवातीच्या काळात एकांत हवा असतो. दोघांना एकमेकांच्या सहवासाची धुंदी असते. तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीची त्यांना अडचण होते. एकमेकांशी किती बोलू आणि किती नाही, असं त्यांना झालेलं असतं; परंतु काही दिवसांनी... कदाचित काही वर्षांनी दोघांनी एकमेकांसोबत बाहेर जाणं... दोघांनीच एकमेकांशी गप्पा मारणं... हॉटेलिंग करणं, ट्रिपला जाणं बोअर व्हायला होतं. घरातील गप्पाच बाहेर केल्या जातात... कदाचित घरातले वाद बाहेर गेल्यावरही होतात म्हणूनच मित्रकंपनी त्यांच्या परिवारासहित असेल तर थोडी मजा येते. वेगळ्या गोष्टींवर गप्पा रंगतात. एकमेकांकडून काही चुका झाल्या तरी मित्रकंपनीसमोर वाद होत नाहीत, म्हणूनच फक्त दोघांनीच बाहेर जाणं टाळलं जातं.
मुलं लहान असताना सतत आई-वडिलांच्या भोवती घुटमळत असतात. कुणी मारलं, कोणी रागावलं... शाळेत काय घडलं, कोण मित्र कसा वागला, शिक्षक काय म्हणाले, हे सर्व मुलं आपल्या आई-वडिलांशी शेअर करतात; परंतु मुलं थोडी मोठी झाली, की त्यांचं फ्रेंड सर्कल वाढतं. टीनएजर्स मुलं सर्व गोष्टी आई-वडिलांशी शेअर करत नाहीत. काही गोष्टी फक्त फ्रेन्डस्मध्ये बोलल्या जातात. आई-वडिलांची शिस्त, धाक, घरच्या पद्धती या गोष्टींचं दडपण त्यांच्या मनावर असतं. आपण काही गोष्टी सांगितल्या तर त्याचा ते वेगळा अर्थ घेतील. आपल्यावर काही बंधनं येतील या गोष्टींची भीतीही त्यांना असते. त्यामुळे मुलं मोठी झाली, की त्यांचं विश्व वेगळं होत जातं. आई-वडील आणि मुलांमध्ये नकळत अंतर निर्माण होतं. पूर्वीसारखं प्रत्येक गोष्टीला त्यांना आई-वडील लागत नाहीत. काही गोष्टींसाठी मित्रांनाच अधिक पसंती दिली जाते.
पती-पत्नीच्या नात्यात, पालक-मुलांच्या नात्यात हे अंतर निर्माण होणं हे नैसर्गिकरीत्या घडत असतं. जाणूनबुजून हे होत नाही. त्यामुळे एकमेकांच्या बाबतीतलं प्रेम कमी होतं, असं मुळीच नाही. एकमेकांचा कंटाळा येऊ लागतो असंही नाही; पण तरीही एकमेकांच्या सहवासात तोच तो पणा आल्यामुळे त्याबद्दलचं आकर्षण कमी होत राहतं. एखादी गोष्ट आपल्याला हवी असेल तर ती मिळविण्यासाठी आपण धडपड करतो. ती मिळाल्यानंतर काही दिवस त्या आनंदाच्या धुंदीत राहतो; परंतु हा आनंद, आकर्षण हळूहळू कमी होतं आणि ती गोष्ट आपण मिळवली आहे, याबद्दल फारसं काही वाटेनासं होतं. नातेसंबंधामध्येही असंच असतं. नव्या नवलाईचे दिवस संपले, की नात्यातील आकर्षण कमी होत राहतं. पती-पत्नीमध्ये तर एकमेकांच्या सवयी, आवडी-निवडी एकमेकांना बोचायला लागतात. लग्नाच्या बस्त्याच्या वेळेस नवऱ्या मुलानं दाखवलेला चोखंदळपणा तेव्हा कौतुकाचा वाटला असला, तरी लग्नानंतर तिच्या प्रत्येक खरेदीत त्यानं नाक खुपसणं- खरेदीबाबत सूचना देणं तिला नकोसं होऊन जातं. तिचा स्पष्टवक्तेपणा लग्नाअगोदर आवडलेला असला तरी लग्नानंतरच तिचं बोलणं त्याला खुपायला लागतं आणि मग नात्यामध्ये हळूहळू अंतर निर्माण होऊ लागतं. एकमेकांच्या सहवासात सुरवातीसारखी मजा येत नाही.
काही वेळेस व्यवहार, कर्तव्य, जबाबदाऱ्या यांमध्ये अडकून राहिल्यामुळेही एकमेकांशी मोकळेपणानं वागणं... बोलणंही कमी होत जातं... त्यामुळंही नात्यातील अंतर वाढत जातं.
कशी फुलवावीत नाती?
प्रत्येक नात्यामध्ये एकमेकांना स्पेस देणं हे व्यक्तिस्वातंत्र्याच्या दृष्टीनं आवश्यक असतं. परंतु ही स्पेस मर्यादित प्रमाणात असणं गरजेचं आहे. घरातील प्रत्येकानं आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचं ठरवलं आणि त्यावर कुणाचही बंधन नसेल, तर घर हे "घर' न राहता लॉजिंग-बोर्डिंग होऊन जाईल. नात्यात दुरावा... अंतर निर्माण होईल. म्हणूनच ते टाळण्यासाठी घराचं घरपण टिकवण्यासाठी, नात्यातील ओलावा जपण्यासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक करणं महत्त्वाचं असतं.
घरात प्रत्येकाचं रुटिन ठरलेलं असतं आणि ते अपरिहार्यही असतं. पण काही घरांमध्ये रोजच्या रुटिनमध्ये कधीच बदल होत नाहीत. प्रत्येक दिवस, प्रत्येक महिना, प्रत्येक वर्ष अगदी आखीव-रेखीव, अगदी ठोकून-ठाकून घडवलेलं. त्यामध्ये अजिबातच बदल नाही. सकाळी सहाच्या आत उठायचं, नऊच्या आत ब्रेकफास्ट, दुपारी १ च्या आत जेवण, संध्याकाळी सातच्या आत घरात, रात्री नऊच्या आत जेवण आणि रात्री १० च्या आत झोपणं. त्यामध्ये अजिबात बदल नाही. मुलांना करडी शिस्त. यामध्येही घुसमटून गेल्यासारखं होतं. दैनंदिन जीवनात कधीतरी बदलही आवश्यक असतो. एखाद्या रविवारी उशिरा उठणं... सकाळच्या चहासोबतच गप्पांची मैफल रंगवणं... वेगळ्या पद्धतीचा स्वयंपाक करणं... मुलांवर वेगळ्या जबाबदाऱ्या सोपवणं... अशा साध्या गोष्टींतही बदल केला तर हा वेगळेपणाही नात्यातील बोच कमी करतो.
घरी येण्याची प्रत्येकाची वेळ वेगळी असली तरी शक्यतो रात्रीचं जेवण तरी सर्वांनी सोबत घ्यावं. या वेळेस दूरदर्शन मालिका पाहत जेवण्यापेक्षा दिवसभरातील आपल्या घटना एकमेकांशी शेअर कराव्यात. एखाद्या गोष्टीवर चर्चा घडवून आणावी. विषय कोणताही असो- राजकारण, समाजकारण, मित्रांतील गॉसिपिंग किंवा एखादा नवीन रिलीज होणारा सिनेमा.... पण त्यावर प्रत्येकानं बोलतं व्हायला हवं. चौकोनी कुटुंब असो किंवा एकत्र कुटुंब असो- घरात चर्चा घडायलाच हवी. "एकमेकांशी काय बोलायचं हेच कळत नाही' असं व्हायला नको. घरातील अगदी छोट्या मेंबरच्या शाळेतील गमतीजमती ऐकण्यातही सर्वांनी रस घ्यावा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या संघानं कोणता उपक्रम राबवला, हे सांगणाऱ्या आजोबांच्या उत्साहाला तेवढीच दाद दिली जावी.
पालकांनीही मुलांच्या विश्वात डोकावून पाहताना आपले लहानपणाचे, तरुणपणाचे दिवस आठवावेत. त्या वेळी आपल्या पालकांच्या काही गोष्टी आपल्यालाही पटलेल्या नाहीत, काही वेळा पालकांच्या विरोधात जाऊनही आपण वागलेले होतो, हे लक्षात घ्यावं. त्यामुळे पिढीतील अंतर राहणारच आहे. आपल्या मुलांच्याही काही गोष्टी आपल्याला पटणार नाहीत; परंतु "आमच्या वेळी आम्ही असं केलं' हे त्यांना वारंवार सांगू नये. वेळ-काळ बघून मार्गदर्शन जरूर करावं; परंतु सतत स्वत:चे दाखले देत राहू नये. बदलत्या परिस्थितीत मुलांच्या गरजा वेगळ्या होत आहेत, प्रवाहाबरोबर त्यांना चालावं लागणार आहे, हे लक्षात घ्यावं. "कॉलेजमध्ये अजिबात मोबाईल न्यायचा नाही. तिथं तुम्ही शिकायला जाता, मोबाईल कशाला लागतो रे तुम्हांला?' असं मुलांना म्हणून चालणार नाही. मोबाईलच्या वापराबाबत मर्यादा जरूर सांगाव्यात; परंतु पूर्ण विरोध केला तर मुलं पालकांपासून दूर जातील आणि काळाच्या मागे राहतील.
घरातील काही धार्मिक समारंभ, सण, वाढदिवस इ. साजरे करताना घरातील सर्व सदस्यांचा सहभाग असावा. नेहमीचीच गोष्ट नव्यानं कशी करता येईल, याबाबत सर्वांशी चर्चा केली जावी. "या घरात आपल्याला महत्त्व आहे' असं प्रत्येकाला वाटायला हवं. त्यामुळे एकटेपणाची, नाकारल्याची भावना कोणाच्याच मनात निर्माण होणार नाही.
समवयस्क मित्र-मैत्रिणींत प्रत्येकालाच मोकळेपणा वाटतो. त्यांच्यासोबतची एन्जॉयमेंट हवीशी वाटते. हे नैसर्गिक असलं तरीही कुटुंबीयांसमवेतही सहवासाची मजा घेता यायला हवी. प्रवासात घरातील दैनंदिन व्यवहारातून फक्त शरीरानं नाही, तर मनानंही बाहेर यायला हवं. चौकटीतून बाहेर येऊन प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला हवा. यामुळं कौटुंबिक नाती अधिक घट्ट होतील व नात्यातील रुक्षपणा कमी होईल. एकमेकांच्या सहवासाची ओढ वाढत राहील.
कौटुंबिक नाती सुंदर करण्यासाठी लक्षात ठेवा.
१. आपल्या दैनंदिन व्यवहारातील तोच तो पणा टाळण्यासाठी काही बदल घडवून आणा.
२ . साध्या, सोप्या गोष्टींतही आपण आनंद मिळवू शकतो. फक्त कधीतरी चौकटीच्या बाहेर जाण्याची तयारी ठेवा.
३ . कौटुंबिक प्रवासात रुटिन कामं बाजूला ठेवा. एकमेकांना वेळ देण्याचा प्रयत्न करा. कुटुंबीयांसोबत असताना मोबाईलचा वापर कमीत कमी करा.
४ . प्रत्येक नात्यात एकमेकांबद्दलच्या अपेक्षा असतात, त्या सर्व पूर्ण होणार नाहीतच; पण एकमेकांच्या समाधानासाठी "स्व' विसरणं "अहंकार' बाजूला ठेवणं आवश्यक आहे.
५ . कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची आहे. त्यांचे विचार, त्यांच्या अपेक्षा विचारात घेणं आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाला व्यक्त होण्याची संधी मिळायला हवी.
No comments:
Post a Comment