थोडं माझ्या विषयी

Wednesday 7 October 2015

फुलांचा स्वर्ग - कास पठार

निसर्गाची देणगी लाभलेल्या कास पुष्प पठाराला डोळयांचे पारणे फिटाव्या अशा फुलांची आणि पुष्प वनस्पतींची निसर्गदत्त देणगी लाभली आहे. लाल माती आणि खडकाळ भागात पण विस्तीर्ण पठारावर माणसाची नजर पोहोचत नाही तिथंपर्यंत हे पठार विविधरंगी फुलांच्या गालिच्यांनी बहरले आहे.

रंगबिरंगी फुलांचे लेणे ल्यायलेले कास पठार

फुलांचा स्वर्ग - कास पठार


कास पुष्प पठाराने पर्यटनाच्या क्षेत्रात देशातच नव्हे तर जागतिक नकाशावर सातारा जिल्हयाचा लौकीक नोंदविला आहे. सौंदर्याची अनोखी खाण असणारे कास पुष्पपठार हे पश्चिम घाटासह वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजेच जागतिक वारसा स्थळामध्ये युनेस्कोकडून नुकतेच समाविष्ट करण्यात आले आहे. आज साताऱ्याच्या पर्यटनाची ओळख खऱ्या अर्थाने सातासमुद्रापार झाली आहे. सातारा शहरापासून अवघ्या २३ कि.मी. वर धरतीवरच्या स्वर्गरूपाने साक्षात कास पुष्प पठार वसले आहे. सध्या कास पठार हे विविध जातींच्या फुलांनी बहरत असून पर्यटकांची रिघ कास पठाराच्या दिशेने सुरु झाली आहे. या पठाराची माहिती देणारे www.kas.ind.in हे संकेतस्थळ आहे.

कास पठार हे वर्ड हेरिटेज कमिटीने जुलै २०१२ मध्ये मान्य केलेलया पश्चिम घाटातील ३९ ठिकाणापैकी एक आहे. २१ देशांच्या सभासदासमोर पश्चिम घाटाला जागतीक वारसा स्थळाचे नामांकन मिळाले आहे. त्यातील कास पठार हे फुलांसाठी एकमेव नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून नामांकन प्राप्त झालेले ठिकाण आहे. कास पुष्प पठाराचे नैसर्गिक आणि निसर्गदत्त देणगीची जोपासना करून या पठाराचा विकास करण्यात वन विभागाने पुढाकार घेतला आहे. कास पुष्प पठाराची जैव विविधता जोपासून ती वाढविण्यासाठी शासनाबरोबरच पर्यावरणप्रेमी आणि संस्थाचा मोठा वाटा आहे. कास पठाराची समुद्रसपाटी पासूनच उंची १२१३ मिटर असून पर्जन्यमान अंदाजे अडीच ते तीन हजार मि.मी. इतके आहे. कास पठार हे १७९२ हेक्टरवर पसरले असून यामध्ये वनखात्याची ११४२ हेक्टर तर खाजगी ६५० हेक्टर जमीनीचा समावेश आहे.

कास पुष्प पठारावर पश्चिम घाटातील अत्यंत दुर्मिळ असलेल्या सुमारे ८५० पेक्षा अधिक पुष्प वनस्पतींचे प्रकार आढळून आले आहेत. यामध्ये औषधी वनस्पतींचा अधिक समावेश आहे. तसेच किटक व विविध प्रकारच्या फुलपाखरांच्या ३२ प्रजाती आढळतात. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 19 प्रजाती, सस्तन प्राण्याच्या १० प्रजाती आणि पक्षांच्या ३० प्रजाती येथे आढळून येतात. कास पठार व परिसरात प्रदेशनिष्ठ, दुर्मिळ व अतिदुर्मिळ वनस्पती आहेत. रेड डाटा बुकमध्ये जवळपास ४० फुले असणाऱ्या प्रजाती कास पठारावर आढळतात. कास पठरावरुन सुक्ष्म हवामान हे जैविक घडामोंडीना उत्क्रांतीला पोषक आहे. कास पठारावर जाणारा प्रत्येकजण येथील विविधांगी फुले आणि वनस्पतीकडे आपोआपच आकर्षिला जातो. कास पुष्प पठारावर पुष्प आणि वनस्पतीमुळे येथील वातावरण रंगीबेरंगी असून कधी पांढरा शुभ्र, कधी लाल, निळा, जांभळा, अबोली अशा कितीतरी रंगांच्या छटांचे फुले पर्यटकांच्या डोळयांचे पारणे फेडतात. या फुलांवर पसरणा-या इंद्रधनुष्यीछटा पाहण्यास मिळत असून हा परिसर जणु स्वप्नसृष्टीत पोहोचविणाराच ठरतो. 

कास पठाराला जाताना नागमोडी वळणे आणि घाट संपताच विस्तीर्ण असे पठार डोळयात भरते, हेच ते ऐतिहासिक प्रसिध्द कास पठार आहे. निसर्गाची देणगी लाभलेल्या कास पुष्प पठाराला डोळयांचे पारणे फिटाव्या अशा फुलांची आणि पुष्प वनस्पतींची निसर्गदत्त देणगी लाभली आहे. लाल माती आणि खडकाळ भागात पण विस्तीर्ण पठारावर माणसाची नजर पोहोचत नाही तिथंपर्यंत हे पठार विविधरंगी फुलांच्या गालिच्यांनी बहरले आहे. या पठारावर बोचरा वारा पर्यटकांच्या स्वागताला सज्ज असलेल्या हलक्या सरी, गर्द धुके आणि हिरव्यागार विविध रंगाच्या वनस्पतीमुळे आणि नयनरम्य फुलांमुळे कास पुष्प पठार परिसर जणु धरतीवरचाच स्वर्ग असल्याचा भास येथे येणा-या प्रत्येकालाच होतो. या पुष्प पठारावरील क्षणात सुर्यकिरणांतील इंद्रधनुष्यीछटा तर क्षणात बोचरा वारा, क्षणार्धात दाट धुके, रिमझिम पावसाच्या सरी अशा वातावरणातील बदलांचाही हवे-हवेसेपणा प्रत्येकालाच मोहात पाडत असून जणू धुक्यात न्हाऊन जावे अशीच मनोमन इच्छा या परिसराच्या आकर्षणाने होत आहे.

महाराष्ट्रातील उत्तर पश्चिम डोंगर रांगा म्हणजे सह्याद्री, सहयाद्रीच्या या रांगात निसर्गाने भरभरुन दिलेला नैसगिर्क खजिनाच महाराष्ट्राला बहाल केला आहे. सह्याद्री म्हणजे जैवविधता असलेले ठिकाण म्हणून ओळखले जाते. जगातील महत्वाच्या अठरा ठिकाणांमध्ये सह्याद्रीचा समावेश होतो. कास पठार हा त्याचाच एक भाग असून त्यास कास पुष्प पठार असेही म्हणतात. कास पठाराला सडाही संबोधिले जाते. या सड्याची उंची समुद्र सपाटीपासून साधारणपणे १२१३ मीटर एवढी आहे. कास पठार हे कातळ खडकाचे कमी प्रमाणात माती व अन्य द्रव्य असलेले पठार आहे. या ठिकाणी झाडे उगवत नाहीत. मात्र पावसाळ्यात रानफुले व पुष्पवैभव सर्वांनाच जादूमय भुरळ घालतात. कास पठारावरील लक्षावधी फुले विविध रंगांनी विविध ढंगांनी उगवतात. निसर्गाचे हे देखणं रुप आता सर्वांनाच मोहात पाडते. 

कास पठारावर पावसाळा संपता संपता ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यात रानफुले येतात. ही रानफुले विविध प्रकारची असतात. हिरव्यागार गालीच्यावर नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली, वा-याची झुळुक आली की डोलणारी पांढरी अशी नानाविध रंगाची फुले अक्षरश: मनमोहून टाकतात. यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे दर पंधरा दिवसांनी त्यांचे रंग बदलत असतात. काही फुले दरवर्षी येतात तर काही फुले दर सात वर्षांनी येतात. तर दर नऊ वर्षानी फुलणारी टोपली कार्वी हे तर कास पठाराचे वेगळे वैशिष्ट आहे. हा दैवदुर्लभ योग पाहणारा तसा भाग्यवंत म्हणावा लागेल. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते या पठारावर सुमारे ८५० पेक्षा जास्त वनस्पतींचे प्रकार आढळून येतात. यामध्ये फॅमिली, जिनेरा जाती आणि औषधी वनस्पती नोंदविल्या आहेत.

जून महिना संपताच कास पठारावर सड्यावरचा चमत्कार दिसू लागतो. बालकवींच्या शब्दात सांगायचे झाल्यास हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे असं हे देखणं रुप म्हणजे कास पठारावरील पुष्पवैभवच आहे. या पठारावर हिरव्यागार मखमली गालिच्याचा रंग मात्र आठ-पंधरा दिवसांनी बदलतो. पांढरा शुभ्र, लाल, निळा, जांभळा, पिवळा, अबोली अशा कितीतरी रंगांच्या छटांचे हे पुष्पवैभव डोळ्यांचे पारणे फेडते. या पठारावर जून महिना संपतानाच पांढरे हबे आमरीचे कोंब उगवतात. तसेच दोन तु-याची वायतुरा ही वनस्पती दिसते. हीच ती ऍ़पोनोजेटोन सातारन्सीस म्हणजे सातारा कास स्पेशल फूल. लगेचच पिवळी सोनकी आणि कवळयाची मिकीमाऊस सारखी स्मिथियाची फुले उगवतात. मिकीमाऊस फुले ही पिवळया रंगाची असून ही फुले मिकीमाऊससारखी सतत हातात घेऊन मिरवण्याचा मोह येथे येणा-या प्रत्येकालाच आवरता येत नाही. पण पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनीच मोह टाळून या निसर्गदत्त पुष्प पठाराचे नजरेत संकलन करावे.

श्रावणात निळी सीतेची आसवे आणि लाल रंगाची तेरड्याची फुले, मध्ये-मध्ये पांढऱ्या गेंदांच्या फुलांचे ताटवेच्या ताटवे फुललेले दिसतात. हे नयनरम्य दृष्य पाहताना प्रत्येकाचे मन हेलावून जाते. या फुलांचा बहर कमी होईपर्यंत पांढरे तुरेवाली आमरी वर येते. मोठ्या तळ्यामध्ये पांढरी छोटी-छोटी कुमुदिनीची कमळे संपूर्ण तलाव झाकून टाकतात. तळयामध्ये जणू साठा करून ठेवल्यासारखी कमळांची फुले असून अलगद एखादा स्नॅप घेऊन तो संग्रही ठेवण्याचा मोह प्रत्येकालाच पडतो. या पठारावर कंदी पुष्पांचे विविध प्रकार निचुर्डी, अबोलिमा, ब्युगोनिया, दीपकांडी, चवर, गौरीहार, रानहळद, आभाळी, नभाळी, हत्तीची सोंड, सापकांदा, नागफणी, शेषगिरी, ड्रॉसेरा इत्यादी नाना प्रकारची फुले उगवतात.

कास पुष्प पठारातील जैव विविधा जोपासण्यासाठी पयर्टकांबरोबरच सर्वांनीच स्वत:वर बंधने घालून घेणे गरजेचे आहे. कास पठारावरील विविध जैव विविधतेचे रक्षण करण्यासाठी या परिसरात तार कुंपन उभारण्यात आले असून या पुष्प पठारावर प्रवेश शुल्कही आकारलाही जात आहे. कास संरक्ष्ण समितीच्या वतीने प्रति माणसी १० रुपये प्रमाणे प्रवेश शुल्क (१२ वर्षावरील) आकारले जाते. प्रवेश शुल्क आता ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून यासाठी www.kas.ind.in या संकेतस्थळावर माहिती मिळेल तसेच forst.satara68@gmail.com या ई-मेल आरक्षणाबाबत संपर्क साधावा. याबरोबरच वाहनांमुळे वाहुक व्यवस्था कोलमोडूनये म्हणून ऑगस्ट ते ऑक्टोंबर या कालावधीत सातारा ते बामणोली रस्त्यावरील कास पठार १५ ते २१ किलोमिटर व राजमार्ग फाटा ०  ते ६ किलो मिटर अंतरात सकाळी ७ ते सायंकाळी ७ या कालावधीत वाहनांना थांबण्यास रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या परिसरात सर्व वाहनांना बंदी केली आहे. 

काविर्च्या फुलांची झुडपे कास पठारावर मोठ्या प्रमाणावर दर सात वर्षांनी येतात. या फुलांपासून काविर्चा मध मिळतो. काविर्चा मध आयुर्वेदिक म्हणून वापरण्यात येतो. लहान मुले तसेच वयोवृध्द व्यक्ती यांच्यामध्ये कॅल्शियम वाढण्यासाठी काविर्चा मध अत्यंत उपयुक्त आहे. येथील काही वनस्पती दुमिर्ळ असून काही कीटक भक्षी तर काही वनौैषधी आहेत. दरवर्षी येथे देशी - विदेशी शास्त्रज्ञ दुर्मिळ फुलांचा अभ्यास करण्यासाठी तर अलीकडील काही वर्षात मोठया प्रमाणावर पर्यटक नियमितपणे कास पठारला भेट देतात. एकंदरीत सौंदर्याची अनोखी खाण असणारे कास पुष्प पठाराचा महिमा सातासमुद्रापार पोहोचला असून आज देशवासियाबरोबरच परदेशी पर्यटकांना भुरळ घालणाने पुष्पसौदर्य नजरेत साठवून ठेवण्यासारखे आहे. त्यामुळेच कास पुष्प पठार हे प्रत्येकाच्याच जीवनातील एक अपूर्व पर्वणीच ठरत आहे.

Saturday 3 October 2015

मेंदीच्या पानावर

ज्या ज्या वेळेस आयुष्याबद्दलची निराशा मनात डोकवेल तेव्हा... उगाचच उदास वाटेल तेव्हा... काही रागाच्या प्रसंगात मन उद्विग्न होईल तेव्हा... पुन्हा पुन्हा आयुष्यातील हळूवार क्षण आठवा - पाऊस पडून गेल्यानंतर रस्ते स्वच्छ धुतल्यासारखे वाटतात, तसे सर्व काही छान वाटू लागेल. मनावरच मळभ निघून जाईल. सहजीवनातील असे आनंदाचे क्षण जगण्याचा उत्साह वाढवतात, सुख-दु:खाची परिमाण बदलत नेतात आणि आपण एकमेकांसाठी आहोत हा दृढभाव आणखीनच दृढ करतात.


मेंदीच्या पानावर

स्मिता प्रकाश जोशी (समुपदेशक)


आज मंगलाताईंकडे भिशी होती. सर्व जणी दुपारी त्यांच्या घरी जमल्या होत्या. प्रत्येक भिशीच्या वेळी एकमेकींची उणी-दुणी काढून गॉसिपिंग करणं या ग्रुपला मान्य नव्हतं. कोणाच्या घरी काय चाललंय, कुणी काय नवीन घेतलं, कुणाच्या नातेसंबंधांना ग्राहण लागलं, असे टिपीकल बायकी विषय बोलायचेच नाहीत, असा या ग्रुपचा दंडकच होता. प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी विषय घ्यायचा आणि प्रत्येकाने आपले अनुभव, आपली मते शेअर करायची, असं हलकं-फुलकं वातावरण आणि चहा-बिस्कीट फार तरं हलकसं स्नॅक्‍स या व्यतिरिक्‍त मेनूही ठेवायचा नाही असंच ठरलेलं होतं. नवीन कोणत्या तरी विषयावर आज चर्चा होणार या उत्साहानेच सर्वजणी आल्या होत्या. 

""अय्या... मंगला अगं किती छान मेंदी काढलीस तू... काय विशेष?'' 
""अगं काल भाचीचा साखरपुडा झाला ना, तेव्हाच मेंदी काढली आहे आणि आजच्या चर्चेचा विषय ठरवायचा म्हणूनही मेंदी काढली आहे.'' 
""अगं मेंदीचा आणि चर्चेच्या विषयाचा काय संबंध?'' 

""बरं का मेघना... मेंदी या विषयावरच आपण चर्चा करायची म्हणजे बघ, या मेंदीच्या मागे आपल्या अनेक आठवणी दडलेल्या असतात. लग्नाच्या वेळेस प्रत्येक नववधूच्या हातावर मेंदी रेखाटलेली असते आणि या मेंदीच्या साक्षीनेच ती आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करीत असते. ते प्रसंग, त्या आठवणी प्रत्येकीच्या मनात एका वेगळ्या कप्प्यात जपून ठेवलेल्या असतात. त्या नुसत्या आठवणीनेही मनावर मोरपीस फिरवल्यासारखं वाटतं... आपण पुन्हा पुन्हा त्या विश्‍वात जात असतो... आज प्रत्येकीनं आपल्या याच आठवणी सांगायच्या.'' ""वा... वा अगदीच आवडीचा विषय. थांब, आता मी माझ्यापासूनच सुरुवात करते.'' 

मेघनाला तर विषय ऐकूनच किती बोलू आणि किती नको असं झालं होतं. ""माझ्या लग्नाला पंचवीस वर्षे उलटून गेली; परंतु अजूनही तो प्रसंग आता घडल्यासारखा माझ्या नजरेसमोर तरळतो. लग्नाच्या आदल्या दिवशी सहा ते सात तास बसून मेंदीचा कार्यक्रम झाला होता. माझ्या दोन मैत्रिणी हातावर आणि पायावर मेंदी काढत होत्या. मला तहान लागली, भूक लागली की माझ्या आईने समोर आणून ठेवलेले वेगवेगळे पदार्थ माझ्या इतर मैत्रिणी मला भरवायच्या. मेंदी जेवढी जास्त रंगेल तेवढे जोडीदाराचे प्रेम अधिक, असे आजीने सांगितले होते. रात्रभर हात आणि पायांवरील मेंदी मला सांभाळायची होती आणि ती अधिक रंगावी म्हणून मधून मधून साखर पाण्यातील कापसाचा बोळा फिरवनंही चालू होतं. सकाळी तेलाचा हात लावून नंतर पाणी लावून मेंदी धुवायची असं आजीनं सांगितलं होतं. माझी मेंदी जास्त रंगावी म्हणून मी सगळ्यांचं म्हणणं तंतोतंत ऐकत होते. सकाळी उठून मेंदीचा हात धुतला. मात्र मी फारच घाबरून गेले. कारण माझी मेंदी रंगलेलीच नव्हती. अंधुकसा केशरी रंग त्याला आला होता. मेंदीचे मी सिलेक्‍ट केलेले डिझाइन तर आजिबात दिसत नव्हते. मी रडायलाच लागले. सर्वांनी माझी समजूत घालण्याचा प्रयत्न केला; पण मला आजिबात रडू आवरेना. "अगं वेडाबाई... मेंदी रंगली नाही, तर त्यात एवढं काय रडायचयं?' असे आई म्हणत होती; पण "मेंदी जेवढी जास्त रंगेल तेवढे जोडीदाराचे प्रेम अधिक' हे आजीचे शब्द माझ्या कानात घुमत होते. ज्याचे आपल्यावर प्रेम नाही त्याच्याशी लग्न कसं करायचं, आयुष्य त्याच्यासोबत कसं काढायचं, तो जबरदस्तीने तर आपल्याशी लग्न करीत नाही ना, अशा विचारांनी मी निराश झाले होते. "मला हे लग्नच करायचं नाही' या विचारापर्यंत आले. शेवटी माझ्या बाबांनी प्रकाशला बोलावून आणलं. सर्व प्रकार त्याला सांगितला. आम्हाला त्या ठिकाणी एकटे सोडून सर्व जण बाजूला निघून गेले. मी हातांच्या ओंजळीत तोंड लपवून बसले होते. त्यांनी माझे दोन्ही हात बाजूला केले. माझ्या हनुवटीला धरून म्हणाले, ""मेघा... मेंदीच्या रंगण्यावरच प्रेम अवलंबून असतं, तर लग्नसंस्थेला अर्थच राहिला नसता. तू जशी आहेस, तशी मला आवडली आहेस. तुझ्या न रंगलेल्या मेंदीतच मला प्रेमाचे रंग भरायचे आहेत.'' त्यांच्या त्या गोड आणि लाघवी बोलण्यानं माझी भीती कुठल्या कुठे पळून गेली आणि काय आश्‍चर्य नंतरच्या दोन-तीन तासांत मेंदी हळूहळू रंगू लागली आणि त्या लालचुटूक मेंदीच्या डिझाईन्सचे आम्ही छान फोटो काढले. अजूनही मला आठवलं तरी हसू येतं आणि प्रत्येक वेळेस हातावर मेंदी काढताना प्रकाश मला चिडवत असतात. मला वाटतं मेंदी रंगण्यासाठी काही काळ जावा लागतो आणि ती हळूहळू रंग घेत असते. आपल्या संसाराचेही तसेच आहे, एकमेकांच्या सहजीवनात हळूहळू एकमेकांचे स्वभाव कळू लागतात आणि काही कालावधीनंतरच संसारात खरे रंग भरले जातात.'' 

मेघना भरभरून बोलत होती कसे तरी सुप्रियाने तिला थांबवले. "अगं थांब जरा... आता जरा माझ्या मेंदीची कहाणी ऐक. माझा आणि सुधीरचा प्रेमविवाह आमच्या दोघांच्याही घरी ते मान्य नव्हतं. शेवटी दोघांनी घरात न सांगता लग्न करायचं ठरवलं. दोघांचे मित्र-मैत्रिणी लग्नाला होते; परंतु लग्न करताना विधी व्हायलाच हवेत आणि हातावर मेंदी हवीच ही माझी अट होती. आमच्या मित्र-मैत्रिणींनी एका मंदिरात सर्व व्यवस्था केली होती. सुधीर डॉक्‍टर असला, तरी त्याचे ड्रॉइंग अतिशय उत्तम होते. लग्नाच्या दिवशी सकाळी माझी हौस पूर्ण करण्यासाठी त्याने स्वत: मेंदीचे कोन आणले आणि स्वत:च्या हाताने माझ्या हातावर मेंदी काढली. सहजीवनात प्रत्येक क्षणी माझी साथ-सोबत तुला असेल, असेच या मेंदीतून त्याने मला सांगितले आणि खरोखरच माझ्या आयुष्यातील प्रत्येक चढ-उतारात त्याने मला साथ दिली. नंतर दोघांच्याही नातेवाइकांनी लग्न मान्य केले. "सुप्रियासारखी सून मिळायला भाग्य लागतं,' असे सासूबाई माझं कौतुक करीत असतात, तर "पूर्वजन्मीची पुण्याई म्हणून गुणी जावई मिळाला,' असे माझे आई-वडील सर्वांना सांगत असतात. त्या मेंदीमुळे आमच्या दोघातलं नातं अधिक दृढ झालं आणि आम्ही खऱ्या अर्थाने एकमेकांचे झालो.' 

सुशिलालाही आता गप्प बसवेना, तीही बोलू लागली, ""अगं, या मेंदीने मला माझ्या जोडीदाराची खरी ओळख पटवून दिली. आमचं एकत्र कुटुंब. सासू-सासरे, दीर, जाऊ, नणंद सर्व जण आम्ही तेव्हा एकत्र राहात असू. माझ्या नवऱ्याला घरातील जबाबदारीची कधीही जाणीव नव्हती. दर महिन्याचा पगार आईच्या हाती टेकवला, की याचं कर्तव्य संपलं. दुधाचे भाव काय, भाजीचे भाव काय, किराणा माल केव्हा आणावा लागतो आणि बिलं केव्हा भरायची असतात, याबाबतीत तो अगदीच अनभिज्ञ होता आणि त्याची बदली नाशिकला झाली. आम्हाला दोघांनाच तेथे जावे लागले. घरात तो कधीच लक्ष घालायचा नाही आणि हा कधीच मदत करत नाही, याला काहीच येत नाही, यामुळं माझी चिडचिड व्हायची. माझ्या मंगळागौरीचा कार्यक्रम पुण्याला ठेवला होता आणि त्याला सुटी नसल्यामुळे आम्ही अगदी ऐनवेळेस जाणार होतो. "हातावर छान मेंदी काढून ये,' असे जावेने आणि नणंदेने मला सांगितले होते. मीही अगदी उत्साहाने ब्युटीपार्लरमधून मेंदी काढणाऱ्या मुलीला बोलावले आणि दोन्ही हातांवर छान वेलबुट्टी काढून घेतली. मेंदी काढेपर्यंत संध्याकाळ झाली. सकाळशिवाय मेंदी धुवायची नाही, पाण्यात हात घालायचा नाही, असे त्या ब्युटीशियनने सांगितले होते. रात्रीच्या स्वयंपाकाची आणि दुसऱ्या दिवशी जायचे म्हणून बॅग भरणे ही तयारी खरंतर आधीच करून ठेवायला हवी होती; पण हे माझ्या लक्षातच आले नाही. तो ऑफिसमधून घरी आला आणि त्याने माझी ही अवस्था पाहिली. माझ्या दोन्ही हातांवर कोपऱ्यापर्यंत मेंदी मी काढून घेतली होती. त्या दिवशी त्याने स्वत: चहा केला. विशेष म्हणजे मलाही हातात बशी धरून लहान मुलांना देतात तसा चहा पाजला. मुगाच्या डाळीची खिचडी केली, पापड भाजले. एकाच ताटात आम्ही जेवलो. एकेक घास तो मला भरवत होता आणि माझ्या डोळ्यांतून पाणी वाहात होते. त्याच्या हातच्या त्या खिचडीची चव अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळते आहे. याला काहीच कसं येत नाही, असा विचार मी करत होते; पण त्या दिवशीच्या मेंदीने त्याच्यातील छुपे गुण मला समजले. तुझ्यावर येणाऱ्या प्रत्येक प्रसंगात मी तुला साथ करेन... वेळ आली तर मी काहीही करू शकतो आणि तेवढी ताकद माझ्यात आहे, हेच त्याने मला दाखवून दिले. त्यानंतर "तो काहीच करीत नाही' यावरून आमची चिडचिड कधीही झाली नाही. ती मेंदी आणि ती खिचडी मी कधीच विसरू शकत नाही.' 

प्रत्येक जणी स्वत:च्या आयुष्यात मेंदीशी निगडित असलेल्या मनाच्या हळूवार कप्प्यात जपलेल्या आठवणी सांगत होत्या. या मेंदीच्या साक्षीनेच ""डोन्ट वरी! आय विल ऑलवेज बी देअर फॉर यू!'' असं म्हणून परस्परांना साथ देण्याच्या वचनाबरोबरच आपल्या सहजीवनाला, नवीन आयुष्याला सुरवात प्रत्येकाने लग्नात केलेली असते. जोडीदाराच्या या शब्दांनीच एक सुरक्षितता, विश्‍वास निर्माण होत असतो. आयुष्यात कोणतेही प्रसंग आले तरी "मैं हूँ ना!' असे म्हणणारा जोडीदार सोबत असेल तर कोणत्याही संकटांना, कोणत्याही प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद वाढते. काहीही न सांगता आपल्याला ओळखून घेणारा, सांभाळणारा जोडीदार आपल्यासोबत आहे ही भावनाच खूप सुखावह असते. दिवसभर ऑफिसमध्ये काम करून येऊन संध्याकाळी स्वत: स्वयंपाक करून जेऊ घालणाऱ्या पत्नीला फक्‍त तिच्या जोडीदाराने "आज खूप दमलीस. नको एवढी दगदग करत जाऊ,' एवढं जरी म्हटलं तरी ती सुखावते. दुपटीनं काम करण्याचं बळ तिच्याकडे येते. "आपल्याला समजावून घेणारा जोडीदार मिळाला आहे,' या विचारात ती कुटुंबासाठी कितीही राबायला तयार होते. परस्परांच्या विश्‍वासावर, आधारावर उभं असलेलं सहजीवन एकमेकांना फुलवत जातं आणि असे सहजीवन केवळ सहवासाच्या पातळीवर न राहता आत्मिक मिलनापर्यंत पोचते. एकमेकांच्या स्वभावाचे टोकदार कंगोरे काही काळ टोचत राहिले, तरी या विश्‍वासाने ते गुळगुळीत होतात. एकमेकांना समजावून घेण्यासाठी आनंद मिळवता येतो. 

एकूण काय तर आज भिशीतल्या सगळ्याच जणी आपापली आठवणींची शिदोरी काढून हळूवार तो क्षण पुन्हा जगत होत्या. प्रत्येकाच्या आयुष्यातले असे आनंदाचे क्षण आपण पुन्हा पुन्हा आठवत गेलो तर मन हळूवार होतं. ज्या ज्या वेळेस आयुष्याबद्दलची निराशा मनात डोकावेल तेव्हा... उगाचच उदास वाटेल तेव्हा... काही रागाच्या प्रसंगात मन उद्विग्न होईल तेव्हा पुन्हा पुन्हा हे हळूवार क्षण आठवा - पाऊस पडून गेल्यानंतर रस्ते स्वच्छ धुतल्यासारखे वाटतात, तसे सर्व काही छान वाटू लागेल. मनावरच मळभ निघून जाईल. सहजीवनातील असे आनंदाचे क्षण जगण्याचा उत्साह वाढवतात, सुख-दु:खाची परिमाण बदलत नेतात आणि आपण एकमेकांसाठी आहोत हा दृढभाव आणखीनच दृढ करतात. अशा आठवणी मनाच्या हिंदोळ्यात झुलत राहतात आणि गुणगुणत राहतात. 
""मेंदीच्या पानावर मन अजून झुलतय गं...'' 

लक्षात ठेवा:

१ . एकमेकांच्या सहवासातील आनंदाचे, मजेचे क्षण नेहमी आठवत राहा. 
२ . कधीतरी दोघेच जण जुन्या गोष्टी आठवा. फोटोंचे अल्बम बघा, व्हिडिओ क्‍लिप्स बघा आणि ते क्षण पुन्हा अनुभवण्याचा प्रयत्न करा. 
३ . प्रत्येक प्रसंगात मी तुझ्यासोबत आहे. ""मैं हूँ ना!' हा विश्‍वास दोघांनीही एकमेकांना द्या. 
४ . एकमेकांचे मूड ओळखायला शिका. एकमेकांमधील अबोल देवाण-घेवाणही महत्त्वाची असते हे लक्षात ठेवा. 

फिरुनी नवी जन्मेन मी

व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करा. बदलत्या परिस्थितीशी समायोजन करायला आपण शिकायला हवं. आपल्यामध्ये आपण बदल घडवून आणले नाहीत, तर या नवीन पिढीसोबत आपण जुळवून घेऊ शकणार नाही. कॉम्प्युटर शिकून घ्या. नेटवरून कशी माहिती मिळवायची हे शिकून घ्या. मुलांकडूनही काही गोष्टी शिकून घ्या. त्यामुळे मुलांचे आणि तुमचेही संवाद चांगले होतील आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे वाटतंय ते बोलून मोकळे व्हा. आतल्या आत घुसमटत राहून नका. पती-पत्नीच्या नात्यात भक्‍कमपणा आणण्यासाठी एकमेकांशी शेअरिंग करणं, संवाद साधणं खूप महत्त्वाचं असतं.


फिरुनी नवी जन्मेन मी

-स्मिता प्रकाश जोशी (समुपदेशक)


""संसारासाठी मी एकटीनं किती राबायचं? बरं एवढं करून माझी काही किंमत आहे का कोणाला? मोलकरणीला तरी दर महिन्याचा पगार मिळतो; मला तर एवढं काम करून पैशाचं राहू दे बाजूला, पण कौतुकाचा साधा एक शब्दही मला कधी ऐकायला मिळत नाही. काही म्हणायला गेलं तर माझा नवरा म्हणतो, "प्रत्येक बाईचं जे कर्तव्य असतं तेच तू करतीयस; त्यात वेगळं ते काय? मॅडम..... खरं सांगू का, माझी जगण्याची उमेदच नाहीशी झाली आहे.'' 

""अलकाताई, असं काय म्हणता? आत्ताशी तुम्ही चाळीशी ओलांडलीय; अजून आयुष्यात खूप काही करणं बाकी आहे. तुम्ही आत्ताच असं निराशाजनक बोलायला लागलात, तर पुढं कसं होणार? थोडासा स्वत:चाही विचार करा.'' 

""मी स्वत:चा विचार केला असता तर मला जगणं अवघड झालं असतं. आत्तापर्यंत उमेदीच्या काळात मन मारून मी सर्वांचा विचार करत आले आणि आता या वयात मी काय स्वत:चा विचार करणार? आमच्या घरात माझी अजिबात सत्ता नाही. सर्व लहान-मोठे निर्णय माझा नवराच घेत असतो. मुलांना कोणत्या माध्यमात शिकवायचं, कोणत्या ज्ञानशाखेत घालायचं, गुंतवणूक कुठं करायची, कोणती वस्तू केव्हा खरेदी करायची, मुलांच्या मोठ्या सुट्टीत फिरायला कुठं जायचं, इथपर्यंत ठीक आहे; पण एखाद्या वेळेस बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जायचं ठरलं तरी तिथंही कधी माझ्या मनासारखं होत नाही. घरात एक पैसा माझ्या हातात नसतो. मी कधी पैसे मागितलेच, तर "तुला काय हवंय सांग; मी आणून देतो, नाहीतर मी तुझ्या सोबत येतो, तुला हव्या असणाऱ्या गोष्टी घे,'' असं म्हटलं जातं. लग्नानंतर सुरवातीच्या काळात माझ्या मैत्रिणी मला म्हणायच्या, "तुझं बरंय बाई.... तुझा नवरा सगळं काही आणून देतो. सगळे निर्णय घेतो, तुला कशाची काळजी नाही.' मलाही परस्पर निर्णय घेतले जातात, हे सुरवातीला छान वाटायचं. नवऱ्याचं माझ्यावर किती प्रेम आहे आणि म्हणूनच तो मला काहीही त्रास देत नाही, असं वाटायचं. मी नोकरी करायची नाही. घरात लक्ष द्यायचं. माझ्या आवडी-निवडी, छंद बाजूला ठेवायचे, हेही मी सगळं ऐकलं; कारण कुटुंबासाठीचा त्याग, संस्कार, रूढी आदीचा पगडा माझ्यावर अधिक होता; पण सततची तडजोड आता मला सहन होत नाही. सतत मला गृहित धरलं जातं, याचं मला वाईट वाटतं. माझा नवराच असं वागत असल्यामुळे घरात मला काहीच किंमत नाही. सासू-सासरे दीर-नणंदा यांनी तर माझा कचराच केला आहे; पण माझी मुलंही मला विचारत नाहीत. मुलांचं कधी काही चुकलं आणि मी त्यांना काही जाब विचारायला लागले, तर ती माझं कधीही ऐकून घेत नाहीत. मला उत्तरंच देत नाहीत. उलट माझ्यावरच जास्त चिडचिड होते आणि "आईचं हे असंच असतं' असा सूर निघतो. इतके दिवस फक्‍त नवऱ्याच्याच तालावर नाचत होते; पण आता मुलांच्या तालावरही मला नाचावं लागतं. घरात माझ्या म्हणण्याप्रमाणे काहीच होत नाही. लग्न होऊन 22 वर्षं झाली; पण अजूनही माझ्या घरी मी पाहुणी आहे, याचाच मला त्रास होतो. घर सोडून निघून जावं असं वाटतं.'' 

""अलकाताई, अहो घर सोडून जाण्यानं किंवा जगण्याची उमेदच संपली असा विचार करून काही होणार नाही. तुम्ही सुरवातीपासूनच तुम्हाला नक्की काय हवंय, याचा विचारच केलेला नाही. बऱ्याच स्त्रियांच्या बाबतीत असंच घडतं, त्याचं कारण मुलीच्या जातीनं समजूतदारपणा दाखवायला हवा, असं बाळकडू मुलींना लहानपणापासूनच कळत-नकळत मिळतं आणि त्यामुळेच हळूहळू आपले निर्णय दुसऱ्यांनी घ्यायची एक सवयच होऊन जाते. सामाजिक परिस्थिती एवढी बदलली आहे, तरी अजूनही सर्व ठिकाणी मुलींना जे करिअर हवं आहे, ते निवडण्याचं स्वातंत्र्य आहेच असं नाही आणि तुमच्या तरुण वयात तर ते आजिबात नव्हतं. मुलीनं पुढे काय करायचं हे आई-वडील आणि लग्न झाल्यानंतर नवरा ठरवणार, अशीच पद्धत होती. घरचे नाही म्हणतायत तर राहू दे; वाद कशाला, असं म्हणून घरच्यांनी निवडलेला पर्याय स्वीकारावा लागायचा. घरातील मुलगी किंवा लग्न झाल्यानंतर नवीन सून स्वत:चं म्हणणं मांडू लागली, तर ती संस्कार नसलेली आहे, असं म्हटलं जायचं. अशा वातावरणात तुम्ही वाढलेल्या आहात त्यामुळे आपलं म्हणणं ठामपणे तुम्ही कधी मांडलच नाहीत. तडजोड करणं, परिस्थितीशी जुळवून घेणं म्हणजे प्रत्येक वेळी पडतं घेणं, असं होत नाही. दुसऱ्यानं घेतलेले निर्णय तडजोडीच्या नावाखाली स्वीकारले जातात; पण त्याचा असंतोष मनात कुठंतरी खोल दडून राहतो आणि तो नंतर असा उफाळून बाहेर येतो. मानसिक दौर्बल्य वाढतं आणि नकारात्मक विचार मनात येत राहतात.'' 

""मॅडम... तुम्ही म्हणताय ते खरं आहे. लहानपणापासूनच मन मारत तडजोडी करतच मी जगले. भावंडांमध्ये मी मोठी असल्यामुळे मला नेहमीच पडतं घ्यायला लागायचं. लग्न करून सासरी आले तर तिथं जावा-भावांत मी सर्वांत लहान म्हणून मला सर्वांचं ऐकावं लागायचं. मला काय हवंय हे मी कधी मनमोकळेपणानं सांगितलंच नाही. आपलं मत मांडलं तर भांडणं होतील, आपला उर्मटपणा दिसेल, या विचारानं मी गप्प बसायचे. पण हे मनात साठत राहिलं आणि आता गत आयुष्यात घडलेल्या अपमानास्पद घटनांचं स्मरण सतत होत राहतं आणि त्या घटनांमध्ये मी अडकून राहते. त्यामुळेच औदासीन्य आणि नैराश्‍येच्या भावनेत नाही ते विचार मनात येऊ लागतात. पण यातून बाहेर पडण्यासाठी आता मी काय करायला हवं, ते मला सांगा.'' 

""अलकाताई... नक्‍की तुम्हाला काय होतंय, आणि असे विचार का मनात येतात हे तुम्हाला समजलं. त्यामुळे यापुढे तुमच्यात बदल घडवून आणणं तुम्हालाच सोपं जाणार आहे. तडजोड, समजूतदारपणा, जुळवून घेणं हे सारं बोलायला सोपं असतं; पण त्याचा अतिरेक अगदी जवळच्या माणसांसाठी झाला तरी मनात नकारात्मक भावना तयार होतात. वाद नको म्हणून मन मारलं तरी त्याचा उद्रेक कधी ना कधी होणारच, हे लक्षात ठेवायला हवं. तडजोड ही सहज व्हायला हवी, त्याचं ओझं होता कामा नये. तसंच आपलं मत मांडणं म्हणजे उर्मटपणा होत नाही. आपल्या इच्छा-आकांक्षा, मत, विचार मांडता यायला हवेत. ते ग्राह्य धरले जावो वा न जावो, पण स्वत:च्या मनात ते साठून राहू नयेत, दबून राहू नयेत म्हणून मोकळं होणं आवश्‍यक असतं. तुम्ही आता चाळीशी ओलांडली म्हणजे तुमच्या मेनॉपॉजच्या काळाकडे तुम्ही चालल्या आहात आणि याच वयात ही नैराश्‍याच्या भावना, कमीपणाची भावना प्रखरतेनं जाणवायला लागते. म्हणूनच आता आपल्याला नक्‍की काय हवंय, याचा विचार करून आपलं मत मांडता यायला हवं. आता तुमच्यावर पूर्वीएवढी जबाबदारी राहिलेली नाही. मुलं मोठी झाली आहेत. म्हणून तुम्ही आता स्वत:साठी वेळ काढायला हवा. रांधा, वाढा, उष्टी काढा यापेक्षा वेगळं काहीतरी करायला हवं. समवयस्क मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये सामील होऊन नवीन मैत्रिणी करा.. ज्यांच्याशी तुम्हाला मनमोकळं बोलता येईल. भूतकाळातील घटनांवर पडदा टाकून वर्तमान काळात जगणं, आनंद मिळवणं आणि सुखा-समाधानाचे क्षण जपणं, अशी वृत्ती आत्मसात करायला हवी.'' 

""मॅडम, तुम्ही सांगताय ते कळतंय हो मला; पण मनातले विचार जात नाहीत. जे कळतंय ते वळवता येत नाही.'' 
अहो... आत्तापर्यंत मी या गोष्टींचा कधीच विचार केला नाही; पण मला हे जमेल का? घरातून एकटी मी कधीच बाहेर पडले नाही.'' 

""ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याच आता करायच्या आणि मला जमेल का, असा विचार करा... दुसरं असं, आपल्याला जमणारच, असा सकारात्मक विचार करा. दुसरं असं, तुम्हाला बोलले तर वाईट वाटून घेऊ नका; परंतु तुम्ही तुमच्या वयापेक्षा १० वर्षं अधिक प्रौढ दिसता. तुमच्या तब्येतीकडे तुमचं लक्ष नाही. वजन वाढतंय म्हणूनच तुमच्या कामकाजातून वेळ काढून थोडा व्यायाम सुरू करा. जिम सुरू करा आणि ते जमलं नाही तर किमान रोज चालण्याचा तरी व्यायाम करा. पार्लरमध्ये जा... मधून अधून फेशियल करणं, केस सेट करून घेणं या गोष्टीही करा. तुमचं व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करा. बदलत्या परिस्थितीशी समायोजन करायला आपण शिकायला हवं. आपल्यामध्ये आपण बदल घडवून आणले नाहीत, तर या नवीन पिढीसोबत आपण जुळवून घेऊ शकणार नाही. कॉम्प्युटर शिकून घ्या. नेटवरून कशी माहिती मिळवायची, हे शिकून घ्या. मुलांकडूनही काही गोष्टी शिकून घ्या. त्यामुळे मुलांचा आणि तुमचाही संवाद चांगला होईल आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे वाटतंय ते बोलून मोकळे व्हा. आतल्या आत घुसमटत राहू नका. पती-पत्नीच्या नात्यात भक्‍कमपणा आणण्यासाठी एकमेकांशी शेअरिंग करणं... संवाद साधणं खूप महत्त्वाचं असतं. इतके दिवस तुम्ही स्वत:चं मत मांडत नव्हतात त्यामुळे सुरवातीला घरातील सर्वांनाच अवघड वाटेल, वेगळेपणा वाटेल. कदाचित तुमचा अपमान होईल. तुम्ही मांडलेलं मत विचारात घेतलं जाणार नाही; पण तुम्ही लगेच निराश व्हायचं नाही. तुम्ही ठरवलेल्या गोष्टी करत राहायच्या. तुमचं आत्मभान जागृत करा आणि स्वत:मध्ये डोकावून पाहायला शिका, बास... मग तुम्हाला सगळाच बदल जाणवेल.'' 

""धन्यवाद मॅडम... तुमच्याशी नुसतं बोलूनही बरं वाटलं आणि तुम्ही मला भानावरही आणलंत... आता मी नव्यानं आयुष्याला सुरवात करेन. जुन्या विचारांची जळमटं झटकून टाकून नवीन बदल आत्मसात करण्याचा नक्‍की प्रयत्न करेन. काही अडचण आली तर तुम्ही आहातच.'' 

""हो नक्‍कीच. चला... तुमच्या नवीन आयुष्याला माझ्या शुभेच्छा!'' 

सुख अनुभवायला हवं

पती-पत्नीच्या नात्यात भांडणं तर होतातच. याचा मुलांवर काय परिणाम होईल, आपलं नातं अजून "कम्फर्ट झोन'मध्ये आलं नाही, असा विचार करून मूल होऊ न देणं हे चुकीचंच असतं. अपत्यजन्मानंतर नवरा-बायकोच्या भूमिका बदलतात. त्यांच्या नात्यांचे कंगोरे उलगडत जाऊन, ते नातं अधिक दृढ व्हायला मदत होते. 


सुख अनुभवायला हवं

-स्मिता प्रकाश जोशी (समुपदेशक) 


सहजीवनाची सुरवात करताना प्रत्येक नवपरिणीत जोडप्यांसारखं मीही स्वप्न पाहिलं होतं... एकमेकांच्या साथीनं संसार करायचा, आयुष्य फुलवायचं. प्रत्येक क्षण एकमेकांसोबत आनंदानं घालवायचा. मोठ्या उमदीनं संसार थाटला; पण माझी जोडीदार असा विचार करणारी नाही. ती अतिशय स्वार्थी आहे. स्वतःमध्ये रमणारी, फक्त स्वतःचा आणि स्वतःचाच विचार करणारी. स्वतःपुढे कोणाचीच किंमत नाही... दुसऱ्याच्या विचारांचा आदर नाही. स्वतःचा अहंकार जपण्याव्यतिरिक्त तिनं आतापर्यंत काहीच केलं नाही. माझी आता घुसमट होते आहे. मला हे नातं नकोच आहे. मोकळं व्हायचंय मला या बंधनातून. मला लवकरात लवकर कसा घटस्फोट मिळेल ते सांगा.'' 

"अनुराग... अरे,, लगेच अशी घटस्फोटाची भाषा का करतोस? तुमचा प्रेमविवाह आहे. घरच्यांची संमती नसतानाही तुम्ही दोघांनी जीवनभर एकमेकांना अखंड सोबत करण्याची वचनं देऊन एकमेकांसोबत लग्न केलंत आणि तुम्हाला हवंहवंसं वाटणारं नातं आता शिळं का झालं? तिच्यासाठी काहीही करायला तयार असणारा तू आता नातं संपवण्याची भाषा करतोस? तुझ्या आई-वडिलांनी या लग्नापूर्वीच तुला माझ्याकडे मार्गदर्शन घेण्यास पाठवलं होतं. लग्नापूर्वी पूर्ण विचार कर, हे मीच तुला सांगितलं होतं. तेव्हा तर तू तिच्या प्रेमात स्वतःला झोकून दिलं होतंस... मग आता ही वेळ का आली?''

"मॅडम... तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. रमणी मला अतिशय आवडली होती आणि आमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. त्यामुळेच घरच्यांचा विरोध असूनही आम्ही लग्न केलं.''

"मग आता ते प्रेम कुठं गेलं? काय रे तुम्ही मुलं!... तुम्हाला लग्न करण्याचीही घाई आणि जमलं नाही तर मोडण्याची घाईच. सगळं इतकं सहज सोपं वाटतं का तुम्हाला? थोडंसं मनाविरुद्ध झालं, की चालवून घेता येत नाही. तुम्हाला लग्नामध्ये "तडजोड' अपेक्षित असतेच.'' 
"मॅडम... तडजोड करायलाही काही मर्यादा असतातच ना. रमणीसाठी मी माझ्या आई-वडिलांचा वाईटपणा घेतला... स्वतंत्र संसार मांडला. तिचं शिक्षण, तिचं करिअर याला नेहमीच साथ देत आलो. तिला तिच्या आई-वडिलांना आर्थिक मदत करायची असल्यानं तिच्या उत्पन्नातील एकही पैसा घरात घेतला नाही. तिच्या वागण्या-बोलण्याचे कटू घोट तर मी नेहमीच गिळत आलो आहे. तडजोड ही एकाच बाजूनं झाली तर त्याचा उपयोग काय? मी स्वतःला पार संपवून प्रत्येक वेळी तिचंच ऐकत आलो; पण किमान काही गोष्टी तरी तिनं माझ्यासाठी करायला हव्यात.''

"अनुराग... अशा कोणत्या गोष्टी आहेत, की ज्या बाबतीत तू तडजोड करू शकत नाहीस? आणि तिच्याकडून तुझ्या अपेक्षा तरी काय आहेत?''

"मॅडम... मी एका सर्वसामान्य कुटुंबात वाढलेला. कष्टांतून वर आलेला. कुटुंबातील अनेक चढउतार पाहिलेला मुलगा आहे. लग्न झाल्यानंतर मी माझ्या पत्नीकडून अगदी सर्वसाधारण अपेक्षा ठेवलेल्या आहेत. मागील तीन वर्षं माझ्या अपेक्षा रमणीकडून पूर्ण व्हाव्यात, याचा मी प्रयत्न करतो आहे. इतर पती-पत्नी जगतात तसं छान आयुष्य जगावं, संसार फुलवावा आणि किमान एक तरी मूल असावं, असं मला वाटतं. लग्न झाल्यानंतर पत्नीकडून ही अपेक्षा ठेवणं काहीच चुकीचं नाही, अशी माझी धारणा आहे. आम्ही दोघांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर, करिअरमध्ये सक्षम झाल्यानंतर लग्न केलं. माझं वय आता 35 वर्षं आणि रमणीचं 33 वर्षं. आता मूल होण्यासाठी अजून वाट बघायला नको, एवढंच माझं म्हणणं आहे.''

"अरे बरोबर आहे तुझं म्हणणं. काही गोष्टी वेळेतच होणं अपेक्षित असतं. लेट मॅरेजमुळे तसा आता उशीरच झाला आहे, या गोष्टींचा दोघांनी मिळून विचार करा. त्यात भांडण्यासारखं आणि घटस्फोटापर्यंत येण्यासारखं काय आहे?

"माझं हे म्हणणं तिला मान्य नाही. मुळात "तिला मूल होऊ देणं' हेच मान्य नाही. मी तिला पुष्कळ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकायला तयार होत नाही. मी इतर कोणत्याही गोष्टीत तडजोड करायला तयार आहे; पण मला मूल हवंय. तिची मी तीन वर्षं वाट पाहिली. सुरवातीला मी ही गोष्ट गंभीरपणे घेतली नाही. तिच्या विचारात बदल होईल असं वाटलं; पण आता ती ठामपणे स्वतःचे विचार मांडते आणि "मूल' या विषयावर बोलायचंच नाही असं म्हणते. मी आता वैतागलो आहे. म्हणूनच मला लवकरात लवकर घटस्फोट हवा आहे.''

"अनुराग, मी एकदा रमणीशी बोलते. तिच्या काय अडचणी आहेत आणि त्या बाबतीत काय विचार आहे, हे समजावून घेते आणि त्यानंतरच तुझ्याशी बोलेन.''

"ठीक आहे मॅडम... पण तुम्ही लवकरात लवकर रमणीला तुमच्याकडे बोलावून घ्या.''

अनुरागला मी तात्पुरतं शांत करून पाठवलं; पण रमणीचे काय विचार आहेत, हे समजावून घेण्याची माझी उत्सुकता होती. रमणीला मी बोलावून घेतलं.

"रमणी, अगं हे काय ऐकते आहे मी? तुमच्यातील वाद एवढ्या टोकाला कसे गेले?''

"मॅडम, अनुराग एवढा शिकलेला असला तरीही तो सुशिक्षित नाही, कारण त्याचे विचार मागासलेलेच आहेत. जग कुठं चाललंय...? आपण त्याच डबक्‍यात राहून चालणार आहे का? मी मूल होऊ देण्यास नकार देते म्हणून हा घटस्फोट घ्यायला निघाला आहे. तुम्हीच सांगा, या कारणामुळे घटस्फोट मिळतो का?''

"अगं, पण मूल होऊ देण्यास तुझा का नकार आहे? तुला कसली भीती वाटते का?''

"मॅडम... तसं नाही. या बाबतीत माझे विचार वेगळे आहेत. आमच्या दोघांमध्ये पूर्ण सामंजस्य असेल, दोघांना एकमेकांबद्दल पूर्ण विश्‍वास आणि खात्री वाटली, एकमेकांबाबतचा "कम्फर्ट झोन' तयार झाला तरच मुलाचा विचार करावा, अशा मताची मी आहे. 
"रमणी, तुमचा प्रेमविवाह. लग्नाअगोदर दोन वर्षं तुम्ही एकमेकांना ओळखत होतात... लग्न होऊन आता तीन वर्षं झाली. अजूनही तुमच्या दोघांमध्ये "कम्फर्ट झोन' नाही?''

"अजूनही आमच्यात वादविवाद होत असतात. खटके उडत असतातच. लग्नाअगोदरची ओळख वेगळी असते, तेव्हा दोघं एकत्र राहत नसतो. लग्न झाल्यानंतर इतर नात्यांशीही आम्हाला बरंच स्ट्रगल करावं लागलं. एकमेकांना समजावून घेणं अजूनही अपूर्णच आहे, असं वाटतं. मूल जन्माला घातल्यानंतर त्याच्यासमोर वाद करणं... अगदीच दोघांचं जमलं नाही तर कोर्टासारख्या नको त्या ठिकाणी मुलांना घेऊन येणं... त्याच्याही मनात द्विधा अवस्था निर्माण करणं योग्य होणार नाही, असं माझं म्हणणं आहे. त्यामुळेच एकमेकांना आपण कधीच सोडू शकणार नाही, एकमेकांचे कधीही वाद होणार नाहीत, याची पूर्ण खात्री झाल्यानंतरच मुलाचा विचार व्हावा असं माझं म्हणणं होतं.''

"रमणी, कोणत्याही पती-पत्नीला आमच्यात वाद होणारच नाहीत, ही खात्री कधीच देता येत नाही. दोन भिन्न व्यक्तिमत्त्वं लग्न या संस्थेत एकत्र येत असतात. त्यांचे विचार, जीवनशैली यांच्यात फरक असतोच, त्यामुळे वादविवाद होणं हे साहजिक आहे आणि ते नैसर्गिक आहे; पण त्याची भीती बाळगून मूलच होऊ द्यायचं नाही हा विचार योग्य नाही. किती दिवस वाट बघणार तुम्ही? तुमच्या वयाचाही विचार करायला हवा. याच वयात मूल होणं नैसर्गिकदृष्ट्या, वैज्ञानिकदृष्ट्या योग्य आहे. तुम्ही निवृत्त होण्यापूर्वी मुलानं आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं गरजेचं असतं.''

"मॅडम, मूल कशासाठी होऊ द्यायचं? उतारवयात आपल्याला कोणाचा तरी आधार असावा म्हणूनच ना? मुलं उतारवयात खरंच आधार देतात? आता माझाच भाऊ बघा... परदेशात शिक्षणासाठी म्हणून गेला. तिथंच नोकरी लागली. लग्न तिथंच केलं. आता आई-वडिलांना भेटायला यायलाही त्याला वेळ नाही. त्यांच्या गरजेपुरते पैसेसुद्धा तो पाठवत नाही. वडिलांनी स्वतःची सगळी कमाई त्याच्या शिक्षणासाठी खर्च केली; पण याची जाणीवसुद्धा त्यानं ठेवली नाही. म्हणूनच हे सगळे अनुभव लक्षात घेता वय जास्त झालं, मुलाचा विचार करता येणार नाही, असं वाटलं तर सरळ मूल दत्तक घेऊ. एखाद्या अनाथ मुलाला वाढवण्याचं पुण्य तरी मिळेल, असं मी अनुरागला म्हटलं आहे; पण त्याचं आपलं एकच, "आपल्याला स्वतःचंच मूल हवं.' शेवटी मी आता "मूल होऊच देणार नाही,' असाच निर्णय घेतला. रोज उठून "केव्हा विचार करायचा?' ही चर्चाच नको.''

"रमणी, तुझ्या भावाचे तुझ्या आई-वडिलांना आलेले अनुभव कटू असले तरीही तू त्यांना किती आधार देतेस! एक मुलगा करणार नाही एवढी जबाबदारी तू घेतली आहेस. आज तू आहेस म्हणून त्यांना केवढा आधार आहे! सगळी मुलं तशीच वागतात असं नाही. आणि फक्त उतारवयात आधार हवा म्हणूनच मुलांचा विचार करतात असं नाही गं. मानवाच्या जीवनात प्रत्येक आश्रमातील काही कर्तव्यं एक नियम म्हणून ठरवली गेली आहेत. प्रजोत्पादन करणं हे मानवी जीवनातील एक कर्तव्यच आहे. या सगळ्यांचाही तू विचार करू नकोस; पण एका स्त्रीची नैसर्गिक ऊर्मी म्हणून तुला आई व्हावंसं वाटत नाही? बाळंतपणाच्या कितीही वेदना सोसाव्या लागल्या तरी आईला मुलाचा जन्म हवा असतो. त्यातून मिळणारा आनंद वेगळा असतो. स्वतःच्या शरीरातील बदल अनुभवण्यातही मजा असते. बाळाच्या जन्मानंतर त्याच्याशी खेळणं, त्याचं बालपण अनुभवणं, त्याला वाढताना पाहणं यातलं सुख अवर्णनीय आहे. आपल्यातलेच गुण आपल्या मुलात आहेत, हे अनुभवताना मनात येणाऱ्या हळुवार भावना, आपलं बालपण पुन्हा एकदा अनुभवताना, त्याच्याशी बोबड्या बोलात बोलताना मिळणारं सौख्य याची तुलना कशाशीच करता येणार नाही. या सुखापासून वंचित राहण्याचा विचार तू का करतेस?

मूल दत्तक घेण्याबाबतीतले तुझे विचार योग्य असले तरीही ज्या कारणासाठी तू स्वतःचं मूल नको असं म्हणतेस ते दत्तक मुलाच्या बाबतीतही लागू होणार नाही का? उलट त्या बाबतीत अधिक जबाबदाऱ्या असतात. मूल दत्तक घेऊन त्याला वाढवणं वाटतं तितकं सोपं नाही. संस्थेकडून मूल दत्तक घेतल्यानंतर कागदपत्रांची पूर्तता, मुलाची वाढ योग्य रीतीनं होते आहे की नाही या बाबतीत संस्थेला वेळोवेळी अहवाल सादर करणं इत्यादी बाबतीत स्वतःच्या मुलापेक्षा अधिक जागरूकपणे लक्ष घालावं लागतं.

"रमणी,, अनुराग हा मागासलेल्या विचारांचा आहे, बदलत्या जीवनशैलीप्रमाणे तो बदलत नाही, असं तुझं म्हणणं आहे. आता नवीन येऊ घातलेल्या डिन्क (Double income no kids) संस्कृतीचा तो निश्‍चितच नाही. तो एक टिपीकल गृहस्थाश्रमी पुरुष आहे आणि "स्वतःचं मूल असावं' असा त्याचा सर्वसामान्य विचार आहे; परंतु स्वतःचा विचार करण्याचं स्वातंत्र्य त्याला आहेच ना? "त्याचे विचार मागासलेलेच आहेत' असं सारखं हिणवण्यापेक्षा कधीतरी त्याच्याही विचारांचा आदर कर. दोघांचीही प्रामाणिक इच्छा असल्याशिवाय मुलाचा जन्म होऊ देऊ नये, हे तुझं म्हणणं खरं असलं तरीही त्याला टाकून बोलण्यापेक्षा तुझे असे विचार का आहेत, हे त्याला पटवून देणं, त्याच्याशी शेअर करणं अधिक महत्त्वाचं आहे.

""रमणी, तू फार पुढचा आणि नकारात्मक विचार करतेस. पती-पत्नीच्या नात्यात भांडणं, रुसवेफुगवे, अबोले हे होत राहणारच आहेत. ते कधीच संपत नाहीत. पण याचा विचार करून "मुलावर परिणाम होऊ नये म्हणून मूलच नको,' हा विचार अतिटोकाचा आहे. पती-पत्नीच्या नात्यात हे होत असलं तरीही ते पुन्हा नव्या उमेदीनं एकत्र येतात... यातून नात्याची वीण अधिक घट्ट होत जाते. मूल झाल्यानंतर ते फक्त पती-पत्नी राहत नाहीत, तर त्यांच्या भूमिकाही बदलतात, मुलाचे ते आई-बाबा होतात. त्यामुळेही दोघांना एकमेकांची वेगळी ओळख होते. दोघं या नात्यानंही अधिक जवळ येतात. एकमेकांना अधिक सांभाळून घेतात. आपोआपच जबाबदारीची जाणीव होते... शहाणपण येतं. जगण्यासाठी, पुढं जाण्यासाठी काहीतरी उद्दिष्ट मिळतं. आपल्यावर पूर्ण विश्‍वास टाकून आपल्या कुशीत झोपणारं, लटके हट्ट करणारं, गळ्यात मिठी घालणारं आणि "आई' म्हणून हाक मारणारं मूल तुझ्या कल्पनेत आणून बघ... सगळ्याचा विसर पडेल तुला. आणि या सुखापासून तू वंचित राहू नयेस असं मला वाटतं. अर्थात मी फक्त सांगण्याचं काम करणार आहे. ते आचरणात आणायचं की नाही हा निर्णय संपूर्णपणे तुझाच असणार आहे.''

"मॅडम, तुम्ही सांगताय ते पटतंय मला. ही सगळी स्वप्नं अनुरागनं पाहिली आहेत; पण त्याच्या मनाचा विचार न करता मी माझेच विचार त्याच्यावर लादत राहिले. तो किती दुखावला जात असेल, याचा विचार मी केला नाही. उलट तो घटस्फोटाची भाषा करायला लागला म्हणून मला त्याचा भयंकर राग आला होता. त्याने माझ्यासाठी खूप समर्पण केलं आहे, हेही मी विसरून गेले होते. त्यालाच दोष देत राहिले. पण तुम्ही सांगितलेल्या गोष्टींचा मी नक्की विचार करेन. अनुरागचे विचारही समजून घेईन. आई होण्यातला आनंद मलाही अनुभवायचा आहे. पण मी चुकीच्या दिशेनं विचार करीत होते. काही कटू अनुभव, जवळच्या नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्यावर आलेले प्रसंग इत्यादीचा संबंध माझ्याही आयुष्याशी लावून मी नकारात्मक विचार करीत होते; पण तुम्ही मला योग्य मार्गदर्शन केलंत, मला माझा संसार वाचवायचा आहे. अनुरागसोबत अखेरच्या श्‍वासापर्यंत साथ निभवायची आहे. त्यामुळे त्याच्या स्वप्नांचा आणि त्याच्या विचारांचा मी नक्कीच विचार करेन.''

"रमणी, ईश्‍वर तुला सुबुद्धी देवो हीच प्रार्थना. आता पुढच्या वेळी गोड बातमी घेऊन भेट.''

"यस मॅम. आय विल मीट यू अगेन विथ अ गुड न्यूज.'' 

मुलांची समस्या सोडवताना घाई नको

नाजूक वयाच्या निसरड्या टप्प्यावर मुलांना संभाळून घेणं... त्यांच्यावर विश्‍वास टाकणं, हे महत्त्वाचं ठरतं. मुलांच्या प्रत्येक वागण्याचा वेगळा अर्थ काढून त्यांना टोकत राहिलं, तर मुलं तुमच्याशी कधीही खरं बोलणार नाहीत. त्यासाठी मुलांना त्यांची पुरेशी स्पेस आणि स्वातंत्र्य हवं असतं. ते द्यावं लागतं. प्रत्येक वेळी संशय घेऊन त्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवण्यापेक्षा त्या काळातील धोक्‍याच्या कंदिलाची त्यांना जाणीव करून द्यायला हवी.



मुलांची समस्या सोडवताना घाई नको

-स्मिता जोशी (समुपदेशक)


"अस्मिता, अगं आज अचानक कशी आलीस? तुझा चेहरा का उतरलाय? काही घडलंय का? अमित भेटला का पुन्हा तुला?''  
"नाही मॅडम... अमित मला वर्षभरात भेटलेलाच नाही, मुलींच्या संदर्भात काही बोलायचं असेल तर आम्ही फोनवरच बोलतो.''
"ठीक आहे... म्हणजे तुमच्या दोघांत वाद नाहीत. घटस्फोट होऊन पती-पत्नींमधले वाद मिटले, तरी मुलांच्या भेटी आणि त्यांचे प्रश्‍न यावरून वाद चालूच राहतात.'' 

"मॅडम... तसे कोणतेच वाद आता आमच्यात राहिले नाहीत. अमितशी घटस्फोट झाल्यानंतर एकटं राहणं आणि मुलींना एकट्यानं वाढवणं मी आता स्वीकारलं आहे. मुलींना काहीही कमी पडू द्यायचं नाही... मग त्यासाठी कितीही कष्ट करायला लागले तरी चालेल, हे मी ठरवलेलंच आहे. आज मी वेगळ्याच कारणासाठी तुमच्याकडे आलेली आहे.'' 

"काही गंभीर नाही ना?'' 

"माझी समस्या गंभीर आहे की नाही हे मलाच समजत नाही. मॅडम... माझी मोठी मुलगी अर्पिता १६ वर्षांची आणि छोटी आनंदिता १२ वर्षांची आहे. अर्पिताला १५  पूर्ण होऊन सोळावं सुरू झालं आहे. ती सध्या दहावीत आहे. अर्पिताला मी खासगी शिकवणीही लावली आहे. दहावीला तिनं चांगले मार्क मिळवावेत आणि पुढच्या करिअरच्या दृष्टीनं आत्तापासून प्रयत्न करावेत, असं मला वाटतं.'' 
"अस्मिता, अगं चांगला विचार करते आहेस तू. मग काळजी कसली करतीयस?''

""मॅडम... माझी समस्या पुढेच आहे. अर्पिता जिथं शिकवणीला जाते, तिथं एक मुलगा आहे. तो तिच्या शाळेतला नाही; पण शिकवणीच्या वर्गात ते एकत्र आहेत. तो मुलगा तिच्याकडे नेहमी पाहत राहतो आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत असतो. मला दोन-तीन वेळा तिनं ही गोष्ट सांगितली; परंतु तू दुर्लक्ष कर... तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे, असं मी तिला सांगितलं होतं. त्यानंतर पुन्हा मागील तीन-चार महिने हा विषय निघाला नाही; पण काल मी ऑफीसमधून आले तेव्हा तिच्या सायकलच्या कॅरिअरला एक पाकीट लावलेलं दिसलं. ती अभ्यासाचं काहीतरी विसरली असेल असं समजून मी ते काढून घेतलं आणि सहज पाहिलं तर त्यामध्ये एक पत्र मला सापडलं. ते पत्र वाचून मला खूपच टेन्शन आलं आहे. आता मी कोणती भूमिका घ्यावी, तेच मला समजत नाही. ते पत्र मी तुम्हाला दाखवण्यासाठी आणलं आहे.'' 

"प्रिय... प्रिय... प्रिय... अर्पिता... 

तुझ्याशी बोलण्याचा किती प्रयत्न करतोय; पण तू माझ्याशी बोलत नाहीस म्हणून माझ्या भावना तुझ्यापर्यंत पोचवण्यासाठी मी तुला हे पत्र लिहीत आहे. जानू... नववीपासून आपण दोघं एका क्‍लासमध्ये आहोत. तेव्हापासून मी तुला पाहतो आहे. तुला पाहताक्षणीच तू मला खूप आवडलीस. तुझ्या जवळच्या बेंचवर बसायला मिळावं म्हणून मी खूप धडपड करायचो. तू नववीला आपल्या क्‍लासमध्ये टॉपर होतीस म्हणून तुझा सत्कार केला, त्या दिवशी तर तू इतकी छान दिसत होतीस, की मी तुझ्या प्रेमात पडलो. तू तो पर्पल कलरचा अनारकली ड्रेस घातलास की तुझ्याकडे बघतच राहावंसं वाटतं. तुझ्या डोळ्यांवर येणारी केसांची बट तू हलकेच बाजूला करतेस, तेव्हा तर तू खूपच छान दिसतेस. मी सारखा तुला न्याहाळत राहतो. त्या दिवशी टिचर काय शिकवतात याकडे माझं लक्षच नसतं. एखाद दिवशी क्‍लासमध्ये तू आली नाहीस तर मलाही क्‍लासमध्ये बसावं असं वाटत नाही. मला तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही. मी घरी गेलो तरी तू माझ्या नजरेसमोरून जात नाहीस. तुला काय सांगू, प्रत्येक क्षणी तू माझ्यासोबत आहेस असं सध्या मला वाटतं. "तुझे कैसे समझावू, तू मेरी धडकन में रहती हो' आणि मला माहिती आहे... तूही माझ्यावर तेवढंच प्रेम करतेस; पण तब बोलत नाहीस. तुझी अबोल नजर मला सारं काही सांगत असते. वर्गातून बाहेर पडताना तू माझ्याकडे बघत असतेस. तुझे काही संकेत मला कळतात. मग माझ्याशी बोलत का नाहीस? जानू... मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. तुझ्याशिवाय मला काही सुचतच नाही. मी माझ्या मनाला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो; पण काय करू, "बतमीज दील माने ना' असं मला म्हणावं लागतं. प्लीज मला भेट. मला तुझ्याशी खूप खूप बोलायचं आहे. क्‍लास संपल्यानंतर सगळी मुलं निघून गेली की सायकल स्टॅन्डजवळ मी थांबेन. प्लीज, प्लीज, प्लीज... माझ्याशी बोलायला थांब. तू माझ्याशी आता बोलली नाहीस तर मी काय करेन ते मी सांगू शकत नाही. मी वाट पाहीन... तुझ्या येण्याची तुझाच... सागर!'' 

ते पत्र वाचून मी बंद करून ठेवलं आणि अस्मिताकडे बघितलं. ती खूपच तणावात आहे हे दिसत होतं. खूप मोठं ओझं डोक्‍यावर घेऊन चालली आहे, असं तिच्याकडे बघून वाटत होतं. 

""मॅडम... वाचलं ना तुम्ही पत्र! मला खूप टेन्शन आलंय... काय करावं तेच कळत नाही.'' 

""अस्मिता... तुला नक्‍की कशाचं टेन्शन आलंय? त्या मुलानं असं पत्र का लिहिलं? आपल्या मुलीचं कुठं चुकतं आहे का? तिच्या शिक्षणाचं काय होणार? तिला कसं समजवायचं? मुलीला वाढवण्यात आपण कुठं कमी पडतोय का? या समस्येला कसं सामोरं जायचं?.............. हेच, की यापेक्षा वेगळं काही?'' 

""खरं सांगू का? तुम्ही मनकवड्या आहात. समोर बसलेल्या माणसाच्या चेहऱ्याकडे बघूनच तुम्ही सारं काही ओळखता... मी वेगळं काय सांगू?'' 

"अगं, असं काही नाही माझ्याकडं येणाऱ्या मंडळींच्या आजपर्यंतच्या समस्या ऐकून त्या अनुभवातून मी हे बोलतेय. बरं ठीक आहे आपण त्या प्रत्येक प्रश्‍नाचाच विचार करू. आता मला एक सांग- हे पत्र तू तुझ्या मुलीला वाचायला दिलंस का?'' 

""नाही... मी अजून तरी तिला ते दिलेलं नाही. काल संध्याकाळी मला ते मिळालं आणि आज लगेचंच तुमच्याकडे ते घेऊन आले.''
""अस्मिता... तुझा तुझ्या मुलीवर विश्‍वास आहे?'' 

""अर्पितावर माझ्या विश्‍वास नाही असं नाही, पण तिच्या वागण्यातला बदल सध्या मला असह्य करतोय. तिच्या प्रत्येक निर्णयासाठी माझ्यावर अवलंबून असलेली अर्पिता स्वत:चे निर्णय आता स्वत: घेऊ लागली आहे. तिच्या मैत्रिणी वाढल्या आहेत. मोबाईल, नेट, व्हॉटस्‌ अप या तिच्या जगात तिला माझ्याशी बोलायलाच वेळ नसतो. आमचे संवाद कमी झाले आहेत. मी ऑफिसमधून आले की मी स्वयंपाकाच्या कामात मग्न असते; ती तिचा अभ्यास आणि मोबाईल यामध्ये बिझी असते. कारणापुरतंच आमचं बोलणं होतं आणि बोलणं झालंच तर तिचा अभ्यास, तिचं मला न आवडणारं वागणं यावर माझी लेक्‍चरबाजी सुरू असते. तिला ते पटत नाही आणि मग आमचे वादच होतात. वाढत्या वयाबरोबर तिला तिच्या स्वतंत्र मतांची, हट्टी आणि आग्रही शिंगं फुटू लागली आहेत. आई म्हणजे जुन्या विचारांची... तिला नवीन जगाची काहीच माहिती नाही, असं तिला वाटायला लागतं. तिच्या काही गोष्टींमध्ये मी लक्ष घालायला लागले की तिला आजिबात आवडत नाही. या वयात मुलांना त्यांची स्पेस हवी असते, असं मलाच सुनावते म्हणूनच मला कधी कधी भीती वाटते. माझा जीव धास्तावतो. तिच्या इतर मैत्रिणींचे दोन्ही पालक (आई-बाबा) त्यांच्या घरी आहेत. एकानं रागावलं की एकानं जवळ घ्यायचं, या गोष्टी शिस्त लावण्यासाठी करता येतात; पण या मुलींची जबाबदारी माझ्या एकटीवरच आहे. त्यांनी काही चांगलं केलं तर आईचे कष्ट फळाला आले असं कोणीही म्हणणार नाही; पण जरा कुठं वाकडं पाऊल पडलं तर सगळे जण मलाच दोषी ठरवतील. आता या प्रकरणात तिला स्वत:ला त्या मुलाबद्दल खरंच काय वाटतंय, ते मला माहिती नाही; पण तिच्या मनात काहीही नसेल आणि तरीही तो मुलगा तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत असेल तर...? रिंकू पाटील सारखी अनेक प्रकरणं डोळ्यांसमोर येतात आणि भीती वाटायला लागते.'' 
"अस्मिता... एवढं घाबरण्याचं काहीच कारण नाही. हा एक असाच काळ असतो... इटस्‌ जस्ट फेझ! मुलं मोठी होत राहतात. त्यांना त्यांचं स्वतंत्र विश्‍व असतं आणि त्यात कोणीही लुडबूड केलेली चालत नाही. परंतु अत्यंत नाजूक वयाच्या निसरड्या टप्प्यावर मुलांना सांभाळून घेणं... त्यांच्यावर विश्‍वास टाकणं... हे महत्त्वाचं ठरतं. मुलांच्या प्रत्येक वागण्याचा वेगळा अर्थ काढून त्यांना टोकत राहिलं, तर मुलं तुमच्याशी कधीही खरं बोलणार नाहीत. मुलं आणि पालक यांच्यातील संबंधात प्रामाणिकपणा येण्यासाठी पालकांनीच कसोशीनं प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी मुलांना त्यांची पुरेशी स्पेस आणि स्वातंत्र्य हवं असतं. ते द्यावं लागतं. प्रत्येक वेळी संशय घेऊन त्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवण्यापेक्षा त्या काळातील धोक्‍याची त्यांना जाणीव करून द्यायला हवी. मुलांना समजावून घेताना आपला तोल सुटायला नको, याची काळजी घ्यायला हवी.'' 

"मॅडम... तुम्ही सांगताय ते सगळं पटतंय मला; तरीही मुलीच्या बाबतीत जरा जास्तच सजग असणाऱ्या माझ्यामधल्या "आई'ची समजूत मलाच घालता येत नाही. मुलीच्या आयुष्याची घडी थोडीसुद्धा विस्कटू नये यासाठी मी सतत प्रयत्न करीत राहते. म्हणूनच या पत्र प्रकरणामुळे मी अस्वस्थ झाले आहे. त्या मुलाला भेटून जाब विचारावा की अर्पिताशी बोलून तिच्या मनात काय आहे ते विचारू; ट्यूशन टिचरशी बोलू की सरळ त्या मुलाच्या आई-वडिलांना गाठून त्यांच्या कानावर ही गोष्ट घालू; का हे सगळं करत बसण्यापेक्षा अर्पिताचा क्‍लास बदलून टाकू, असे असंख्य विचार माझ्या मनात फेर धरून उभे राहतात. अशा प्रसंगात आता आपण एकटेच आहोत, कोणीही जोडीदार नाही. आपल्याला कोणाचाच आधार नाही, या विचाराने अधिकच निराश व्हायला होतं.'' 

"अस्मिता, अगं निराश होऊन कसं चालेल? तुझ्यातली "आई' मी समजू शकते; पण अर्पिता आणि आनंदिताची तू केवळ आई नाहीस तर आई आणि बाबा या दोन्हीही भूमिका तू पार पाडते आहेस. त्यामुळेच केवळ भावनाशील होऊन चालणार नाही. ही परिस्थिती तू स्वीकारायला हवीस आणि हा प्रश्‍न कौशल्यानं हाताळायला हवास. हे पत्र तू अर्पिताला लगेच दाखवलं नाहीस, हे चांगलंच केलंस. कारण या वयात आपलं कोणीतरी कौतुक करावं, आपल्याला चागंलं म्हणावं... आपल्यावर कुणीतरी प्रेम करावं अशा भावना मुलींच्या मनात नैसर्गिकरीत्या निर्माण होत असतात. त्यामुळे कदाचित त्या मुलाबद्दल तिच्या मनात तशा काही भावना नसतील तरीही त्या निर्माण होऊ शकतात. हा विषय वेगळ्या पद्धतीनं काढून तू तिच्या मनातलं सगळं जाणून घे. यातून मार्ग काढण्यासाठी अर्पिताचा क्‍लास बदलून, तिच्या टिचरच्या कानावर घालून, त्या मुलाच्या आई-वडिलांना बोलावून घेऊन त्यांच्याही कानावर या गोष्टी घालून कोणतेही वादविवाद न करता शांतपणे मार्ग काढ. मुलांना समजावून सांगून त्यांचं आत्ताचं वय हे प्रेमात पडण्याचं नसून अभ्यासाचं, पुढील करिअरचा विचार करण्याचं आहे, हे दोघांनाही समजावून सांगायला हवं. आयुष्यात सर्व गोष्टी मिळत असतात; पण घाईघाईनं त्या ओरबाडून घेऊ नका, या बाबतीत त्यांना समजावून सांगायला हवं. त्यांच्या मनातील वादळं समजून घ्यायला हवीत. काही निर्णय नाईलाजानं घ्यायला लागतात; पण ते शहाणपणाचे असतात. रुसवे-फुगवे धरून, आदळआपट करून कोणतेही प्रश्‍न सुटणार नाहीत; म्हणूनच आता ज्या गोष्टी बदलताच येणार नाहीत त्याचा शांत आणि समंजस स्वीकार करणं महत्त्वाचं आहे. या वयामध्ये न संपलेलं बालपण आणि येऊ घातलेलं तारुण्य यांचा मेळ घालणं आणि हा टप्पा सुरक्षितपणे पार पाडणं महत्त्वाचं आहे, एवढंच त्यांना समजावून सांगायलं हवंस. तुझी अर्पिता अतिशय सालस आणि गोड मुलगी आहे. तुमच्या दोघांच्या घटस्फोटामुळे ती प्रगल्भ आणि स्वतंत्र विचारांची झाली आहे. थोडंसं अकाली प्रौढपण तिला आलेलं आहे. तुझ्या आधाराला मुलींशिवाय कोणीही नाही याचीही तिला जाणीव आहे. ती चुकणार नाही. फक्‍त तिच्यावर विश्‍वास ठेव. जेव्हा तिला तुझ्या मदतीची, मार्गदर्शनाची गरज लागणार आहे तेव्हा आई आपल्यासोबत आहे, हा विश्‍वास तिलाही वाटायला हवा.'' 

"मॅडम... माझ्या अनेक प्रश्‍नांची आणि शंकांची उत्तरं मला मिळाली. मी ही परिस्थिती योग्य रीतीनं हाताळेनच; पण यापुढंही अर्पितावर उगाचच शंका न घेता तिला समजावून घेण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्यातली "आई' पुन्हा पुन्हा डोकावू लागली तरी तिला समजावेन.''
""जस्ट चिल' अस्मिता! ''आणि आम्ही दोघीही खळाळून हसलो... खरंच... जस्ट चिल! 

Thursday 1 October 2015

सहजीवनासाठी संवाद हवाच

बऱ्याच वेळा एकमेकांशी वाद नको म्हणून नवरा-बायको परस्परांशी बोलणंच टाळतात. पण असा राग, उद्वेग मनात साठत राहिला तर कोंडमारा होतो. नकारात्मक भावना वाढत राहते. त्यापेक्षा आपल्याला जे वाटतंय ते बोलून टाकावं. त्या क्षणी थोडं वाईट वाटेल; पण पुढचे मार्ग मोकळे होतील. वातावरण निवळेल... चांगले होईल... त्यासाठी संवाद हवाच!


सहजीवनासाठी संवाद हवाच!

-स्मिता प्रकाश जोशी (समुपदेशक)


दारावरची बेल वाजली आणि एका विशिष्ट पद्धतीने वाजली तेव्हाच लक्षात आले, नक्की वैशाली आली असणार. ती आली, की अशीच वादळासारखी यायची आणि धो धो बोलत राहायची. ही तिची अगदी लहानपणापासूनची सवय होती. अभ्यासाच्या वेळीही तिची बडबड चालूच असायची. कधी कधी तर माझी आई तिला म्हणायची, "किती बोलतेस वैशू... अग खापराचं तोंड असतं तर केव्हाच फुटून गेलं असतं.' 

लग्न झाल्यानंतरही तिचा स्वभाव बदलला नाही. पण जोडा परस्परविरोधीच असतो असे म्हणतात, त्याप्रमाणे वैशालीचा नवरा विवेक मात्र अगदी अबोल होता. मोजकेच बोलायचे, आणि हिची तोफ मात्र चालू राहायची. तिचा मुलगा तिच्यासारखाच बडबड्या आणि मुलगी मात्र वडिलांसारखी शांत, कमी बोलणारी होती. पुन्हा एकदा बेल वाजली आणि मी भानावर आले. 
"अगं हो... हो वैशू आले मी. जरा दम धर की!' 
मी दार उघडले. वैशाली आत आली आणि मला चक्क मिठीच मारली.  
"अगं अगं काय घडलंय? कसला आनंद झालाय तुला?' 
"तुला खूप खूप धन्यवाद... अगदी मनापासून धन्यवाद!' 
"अगं पण कशासाठी?' 
"तुझ्या आग्रहाखातर.... तू समजावून सांगितल्यामुळे, पण अगदी अनिच्छेनेच मी विवेकबरोबर पर्यटनासाठी गेले होते. पण आज मला कळतंय. मी तुझं ऐकलं नसतं, तर कदाचित या चांगल्या अनुभवाला मुकले असते. घरातील सर्व साफसफाई झाल्यानंतर जसं एखाद्या गृहिणीला छान वाटतं, तसंच मनातील जुन्या विचारांची सगळी जळमटं, राग-लोभांचा केरकचरा काढून टाकल्यामुळे मलाही स्वच्छ... छान मोकळं वाटलं, अँड क्रेडीट गोज टू यू..' 
"वैशाली, आता पुरे... तुझ्या ट्रिपचा सविस्तर वृत्तान्त मला सांगणार आहेस की नाही?' 
"हो, गं बाई... हो... ते सर्व तुला सांगण्यासाठीच तर मी आले आहे.'
"मग थांब जरा, आधी फक्कडसा चहा करते. मग गप्पा मारू या.'
"खरं तर तुझा चहा होईपर्यंतसुद्धा मला दम धरवणार नाही. तू चहा कर... मी तुझ्यासोबत किचनमध्ये येते. तुझं काम चालू ठेव... फक्त माझ्या बोलण्याकडे लक्ष दे....' 
"बर... बाई... तू म्हणशील तसं.' 

"अगं... तुला माहितीच आहे- विवेकनं एका हेल्थ रिसॉर्टमध्ये आमच्या दोघांचं १० दिवसांसाठी बुकिंग केलं. आणि आपल्याला जायचंय, एवढंच मला सांगितलं. मी एवढी रागावले त्याच्यावर. "मला विचारल्याशिवाय यानं बुकिंग का केलं' म्हणून मी भरपूर तोंडसुख घेतलं त्याच्यावर. प्रत्येक वेळेस हा मला गृहित का धरतो? मुलांची परीक्षा तोंडावर आलेली.... ऑफिसमधील कामाचा ताण... सुटी मिळणं अवघड आणि आत्ता कशाला यानं हे काढलं, या विचारांनीच माझं डोक भणभणलं. त्यानं त्याच्या परीनं मला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला; पण मी ऐकायला तयार होईन म्हणून त्यानं तुला सांगितलं आणि तुझा पेशा समुपदेशनाचा असल्यामुळं तू मला बरोबर समजावून सांगितलंस.'  

"वैशाली... हा टोमणा म्हणायचा की कौतुक?' 

"नाही गं... टोमणा नाही मारत... तुझं कौतुकच करतेय. खरंच.. माझ्या रुटीनमधून मी बाहेर पडायला हवं.... विवेकलाही समजावून घ्यायला हवं. त्याचा स्वभाव अबोल, घुमा असला तरी त्यालाही संवाद साधायला आवडतं. त्याला मोकळं करणं हेही गरजेचं आहे. मुलं मोठी झाली आहेत. त्यांची काळजी करण्याची गरज नाही. घरातील जबाबदाऱ्यांची त्यांनाही जाणीव व्हायला हवी आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे चाळीस- पंचेचाळीस वयानंतर प्रत्येकानं आपल्या आरोग्याकडं अधिक लक्ष द्यायला हवं... ऑफिसमधून सुटी काढून त्याच्याबरोबर जाण्यास तयार झाले.' 

"हो मला माहितीये... माझ्यावरही रागावलीस.... माझी मैत्रीण असून माझ्या बाजूनं कधी बोलत नाहीस, हेही मला ऐकवलं होतंस, बरं... ते जाऊ दे... पुढं काय झालं सांग?' 

"विवेकचा स्वभाव असा... मोजकंच बोलणं... स्वतःहून कोणाशीही ओळख करून घेणार नाही... बोलणार नाही. अशा घुम्या माणसाबरोबर मुलं सोबत नसताना दहा दिवस काढणं माझ्यासाठी अवघड होतं. लग्न झाल्यानंतर हनिमून ट्रिपचे आठ दिवस सोडले, तर आम्ही दोघंच असं कुठं कधी गेलो नव्हतो. लग्न झाल्यानंतर लगेचच दिवस राहिले आणि यशचा जन्म झाला... पुन्हा चार वर्षांत सलोनी... मग मुलांच्या शाळा... परीक्षा... दहावी... बारावी असं करता करता कुठं लांब ट्रिपसाठी बाहेर जाणं झालंच नाही. अगदीच कुठं गेलो तरी दोन ते तीन दिवस; तेही मुलांना घेऊनच... आता इतक्‍या वर्षांनी दोघांनीच जायचं, तेही आरोग्य पर्यटन... आयुर्वेद आणि निसर्गोपचार करून घ्यायचे... जिथं करमणुकीचं साधन म्हणजे टीव्ही नाही.. मोबाईलला रेंज नाही... कोणताही ओळखीचा ग्रुप नाही. अशा ठिकाणी आम्ही दोघंच... तिथं आम्ही दोघंच किती आणि काय गप्पा मारणार? सतत कामात असणारी मी... काहीही न करता दहा दिवस शांत कशी राहणार? अशा सगळ्या विचारांमध्ये मी अडकले होते. खरंतर मी स्वतःवरही वैतागले होते... का मी ऐकतेय त्याचं? तुझं तरी मी का ऐकलं?.. घरातील, ऑफिसमधील महत्त्वाची कामं सोडायची आणि तिथं जायचं...? असंख्य विचारांनी डोकं भणभणलं होतं.

अशाच विचारात मी तिथं पोचले. हेल्थ रिसॉर्ट असल्यामुळं सुरवातीलाच वैद्यकीय तपासण्या होत्या. अगदी अनिच्छेनंच साऱ्या तपासण्या केल्या. तिथल्या डॉक्‍टरांना तर मी "माझा आयुर्वेद आणि निसर्गोपचारावर अजिबात विश्‍वास नाही. माझ्या यजमानांसोबत इथं आले आहे; पण दहा दिवस इथं कसे काढणार? इतकं निवांत आयुष्य काढण्याएवढी वयस्कर मी आजिबात नाही, मला माझी खूप व्यवधानं आहेत. मला तर इथले कोणतेही उपचार घ्यायचे नाहीत,' असं स्पष्टच सांगून टाकलं. माझ्या अतिस्पष्टवक्तेपणाबद्दल विवेकला नेहमीच काळजी वाटायची. माझ्या या बोलण्यावर आता डॉक्‍टर काय म्हणताहेत आणि लगेचच परत जावं लागणार की काय, असे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते. आपण उगाचच एवढं बोलतोय, असं माझं एक मन मला सांगत होतं; पण दुसरं मन बंड करून उठलं होतं. पण तिथले डॉक्‍टर... पेशानं वैद्य असले तरी तुझ्यासारखं समुपदेशनाचं प्रशिक्षण त्यांनी घेतलं असावं... त्यांनी मला अतिशय शांतपणे सांगितलं, "मॅडम... तुम्ही कोणत्याही उपचारासाठी इथं आलेलाच नाहीत. तुमच्या दैनंदिन आयुष्यापेक्षा एक वेगळं जीवन अनुभवण्यासाठी तुम्ही इथं आलेला आहात... आणि हेच मनापासून स्वीकारा. शहरात... कॉंक्रीटच्या जंगलात तुम्हाला स्वच्छ मोकळा श्‍वास घेता येत नाही... निसर्गातील बदल अनुभवता येत नाही.... निसर्गाशी हितगुज करता येत नाही. ते तुम्ही इथं करू शकता. स्वतःच्या शरीराकडे आणि स्वतःच्या मनाकडे पाहणं म्हणजे काय, हे तुम्हाला इथं समजेल. इथं फक्त शरीराचंच नाही, तर मनाचंही आरोग्य चागलं राहील, असा प्रयत्न आम्ही करत असतो. गाडीला वेळोवेळी सर्व्हिसिंग केलं की गाडी जशी व्यवस्थित चालते... चांगलं ऍव्हरेज देते, तसंच शरीराचं आणि मनाचंही सर्व्हिसिंग या ठिकाणी केलं जातं. तुम्ही श्रद्धापूर्वक या गोष्टींकडं पाहा आणि या सर्व गोष्टींचा मनापासून आनंद घ्या.' त्यांच्या बोलण्यानं मी शांत झाले. 

"ठीक आहे.. मी प्रयत्न करेन,' असं मी त्यांना म्हणाले आणि विवेकला हायसं वाटलं.' 

"त्यानंतर आम्ही सिसॉर्टवरील आमच्या रूममध्ये गेलो. तेथील दिनचर्या समजावून घेतली. मीही मनानं ठरवलं.. सारं विसरून जायचं आणि हे आरोग्य पर्यटन मनापासून अनुभवायचं.' 

विवेकनं त्याच संध्याकाळी मला तेथील एका स्पॉटवर गेलं. डोगरावरील उंच भागावर आम्ही उभे होतो आणि समोर हिरवी शाल पांघरलेला टवटवीत निसर्ग.. दरीत लांबवर दिसणारं छोटंसं गाव... लांबूनच येणारा बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज... मधूनच येणारा मोरांचा आवाज... पक्ष्यांचा मधुर किलबिलाट... पावसाच्या पाण्यामुळं तयार झालेले छोटे धबधबे.. वाऱ्याच्या झुळकीनं होणारी पानांची सळसळ अहाहा....! निसर्गाचं ते रूप पाहून माझा वैताग, माझी चिडचिड पार पुसून गेली. वेळ मिळेल तेव्हा त्याच स्पॉटवर येऊन आम्ही निवांत बसत असू... तिथलं सर्व निरिक्षण करून मनात जेवढं साठवता येईल तेवढं साठवण्याचा मी प्रयत्न करू लागले.  

मला आणि विवेकला नुसत्या निखळ गप्पा मारायला कधी वेळच मिळाला नव्हता. सकाळी उठलं, की दिवसभरात काय करायचं, कोणती कामं पूर्ण करायची, कोणती बिलं भरायची, इएमआय किती राहिलेत, मुलांसाठी कोणती गुंतवणूक करायाची... यापलीकडं काहीही बोलणं नाही. दोघांनी घरातील गोष्टी सांभाळून आपापल्या दिशेनं कामाला जायचं. ऑफिसमधल्या मीटिंग्ज, कमिटमेन्टस, नवीन बदल आणि रोजचे नवीन ताण. संध्याकाळी घरी आल्यानंतर एकमेकांशी इतर काही बोलण्याइतका उत्साहही नसतो. केव्हा एकदा अंथरुणावर अंग टाकतो असं होऊन जातं. विवेकचं ऑफिस लांब असल्यामुळे प्रवासातच तो थकलेला असतो. अगदीच काही महत्त्वाचं काम असेल तर तेवढ्यापुरतं बोलायचं किंवा ऑफिसमध्ये काही आठवलं तर एसएमएस करायचा... मोजक्‍या शब्दांत. प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा आम्ही मोबाईलवरील एसएमएस आणि कॉम्प्युटरवर मेल चॅट यातच बोलतो, पण या ठिकाणी आल्यावर आम्ही मनसोक्त गप्पा मारल्या- अगदी कोणत्याही विषयावर. दोघांचं लहानपण... लग्नातील प्रसंग, हनिमूनच्या आठवणी, दोघांचं फ्रेंडसर्कल, मुलांना कसं वाढवलं... कसे दिवस काढले... इथपासून ऑफिसमधले कलीग्ज... त्यांचं राजकारण, पुढं काय करायचं आहे... मुलीचं लग्न... मुलांचं शिक्षण अगदी काहीही कधी कधी अगदी अर्थ नसलेल्या गप्पाही... निवांतपणा म्हणजे काय, निवांत गप्पा म्हणजे काय, हे आम्ही दोघांनीही अनुभवलं. एकमेकांच्या सुख-दुःखाचे क्षण, भावभावना समजून घ्यायला आम्हाला वेळ मिळाला. विवेकच्या लहानपणीचं वातावरण कसं होतं, लहानपणी स्वतःचं मत मांडण्याची संधी न मिळाल्यानं तो कसा अबोल झाला, या सर्व गोष्टी लग्नानंतर २३ वर्षांनी मला समजल्या.  
विवेकला खऱ्या अर्थानं मला समजून घेता आलं. त्याच्या भावभावना, त्याचे तणाव, त्याच्या आवडीनिवडी सारं काही समजलं. स्वतःच्या मनातलं कधी सांगायचं नाही आणि ऍडजस्ट करत राहायचं, हा त्याचा स्वभाव असल्यानं त्याच्या मनातील गोष्टी मला कधी कळल्याच नव्हत्या. कधीही मनमोकळं न बोलणारा विवेक किती गप्पा मारू शकतो, आवडती गाणीही म्हणू शकतो, हे मला तिथंच कळलं. केवळ विवेकलाच नाही, तर मी मलाही समजून घेऊ शकले. खूप गोष्टी आपल्याला करायच्या असतात; पण वेळ नाही, या कारणानं आपण त्या गोष्टी करत नाही. कधी कधी ज्या गोष्टी करायला आवडत नाही, त्याही करत असतो आणि स्वतःची ओळखच हरवून बसतो. तिथं खूप दिवसांनी मी चक्क कविताही केल्या. योगसाधना, प्राणायाम यामध्येही सहभागी झाले. मेडिटेशनमुळे मिळणारा मानसिक आनंद अनुभवला. स्वतःमध्येच डोकावून पाहिल्यामुळे स्वतःची नवीन ओळख झाली आणि अंतर्मनाची स्पंदनं ओळखण्याची कला आत्मसात केली. तेथील उपचारांमुळे शरीरशुद्धी झाली. शरीर हलकं झालं आणि मनही हलकं झालं. संपूर्ण दहा दिवस आम्ही एकमेकांशी गप्पा मारण्यात, मनसोक्त हसण्यात, परस्परांच्या सहवासात निसर्गाचा आनंद घेण्यात घालवले. रिसॉर्टमध्ये आमच्यासारखेच इतरही काही जण आले होते. तीही जोडपी होती. काही जण मित्रांबरोबर, भाऊ-बहिणींबरोबर, तर काही जण एकटेच आलेले होते. सर्वाच्या ओळखी झाल्या. त्यांची सुख-दुःखंही ऐकायला मिळाली. त्या सर्वांमध्ये आपण कुठं आहोत, हेही समजलं.' 

तिथला सकस आहार... गरमागरम आयतं जेवण... निवांतपणे घेतलेला सर्व गोष्टींचा आस्वाद आणि निसर्गाची स्वच्छ.. खोल श्‍वासात भरून घेतलेली मोकळी हवा... आणि मनमोकळ्या गप्पा मी कधीही विसरू शकणार नाही. मी येताना तेथील डॉक्‍टरांचे मनापासून आभार मानले. रोजच्या कामाच्या धबडग्यात अडकून मी माझे आनंदाचे क्षण हातचे घालवू पाहत होते, याबाबत मी त्यांच्याकडे दिलगिरीही व्यक्त केली. तुला सांगू, तिथून येतानाच आम्ही दोघांनीही काही गोष्टी ठरवल्या आहेत. आपली दिनचर्या थोडी बदलायची. कितीही धावपळीच्या, गडबडीचा, ताणाचा दिवस असला तरीही रोज थोडा वेळ तरी एकमेकांसाठी काढायचा. आणि एकमेकांशी मोकळं बोलायचंच.... एकमेकांशी संवाद साधायचा. खूप महत्त्वाचा असतो तो सहजीवनात. एकमेकांना खऱ्या अर्थानं समजून घेणं संवादामुळंच शक्‍य होतं. उशिरा का होईना, हे शहाणपण मला सुचलं. 

"वैशाली खरंय तुझं. एकमेकांशी संवाद साधणं, हे फार महत्त्वाचं आहे. पण तेच आता दुर्मिळ होत चाललंय. एकमेकांशी गप्पा मारणं हरवतच चाललंय. नात्यामध्ये खराखुरा संवाद घडतच नाही. आजकाल संवाद म्हणजे एकमेकांना माहिती सांगणं एवढंच होतं. तेही मोबाईलची बटणं दाबून, व्याकरण नसलेल्या तोकड्या शब्दांत. Thank you हा शब्दसुद्धा TY एवढाच टाइप करायचा. सुख-दुःख, भावभावना शेअर करण्यासाठी प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा इंटरनेट आणि व्हॉटस ऍपचाच आधार घेतला जातो. पती-पत्नीमधील संवादसुद्धा व्यावहारिक पातळीवरच होतो. म्हणूनच दोघांनी एकमेकांसाठी वेळ काढणं महत्त्वाचं असतं. दोघांचीही ती गरज असते. अनेक पती-पत्नीमध्ये खराखुरा संवाद घडतच नाही. पण याची जाणीव त्यांना नसते. परंतु त्याचे परिणाम मात्र दिसत असतात. शुल्लक गोष्टीवरून एकमेकांशी वाद होतात. "तुझी आई मला असंच का बोलली आणि तुझा भाऊ माझ्याशी तसंच का वागला' अशा वादालाही काही अर्थ नसतो. त्यासाठीच दोघांनीच घरातून कामातून वेळ काढून बाहेर जाणं.. रुटीनमधून बाहेर पडणं महत्त्वाचं असतं. पती-पत्नीच्या नात्यात दोघांनाही एकमेकांच्या सहवासाची- संवादाची ओढ असायला हवी. 

बऱ्याच वेळा एकमेकांशी वाद नको म्हणून नवरा-बायको एकमेकांशी बोलणंच टाळतात. पण एकमेकांबद्दलचा राग-उद्वेग मनात साठत राहिला, तर मनाचा कोंडमारा होतो. नकरात्मक भाव वाढत राहतात, आणि नाती कडवडट होतात. एकाच घरात राहूनही एकमेकांबद्दल अजिबात ओलावा नाही. ऑफिसमध्ये माझ्या काही मैत्रिणी मी अशा पाहिल्या आहेत. समाजाला दाखवण्यासाठी ते एकत्र राहतात. पण त्यांचा संसार होत नाही. त्यापेक्षा एकमेकांबद्दल जे वाटतंय ते मोकळेपणानं बोलणं झालं, तर त्या क्षणी थोडं वाईट वाटलं तरी मनात साठून राहणार नाही.' 

"वैशाली, खरंय तुझं म्हणणं; परंतु, बऱ्याच वेळेला स्त्रियांना कधी काय आणि किती बोलायचं याचं तारतम्य नसतं. ऑफिसमधून थकून भागून आलेल्या नवऱ्याला तो आल्याबरोबर त्याच्या आईच्या कागाळ्या करणं, नको त्या तक्रारी करणं सुरू होतं. पुरुषांच्या बाबतीतही जेवायला बसल्यावर स्वयंपाकावरून उणंदुणं बोलणं, कामाच्या वेळेतच काही तरी चिडचिड करणं चालू होतं. त्यातून वाद होतात. खरं तर आपले ताणतणाव आपल्याच माणसांवर आपण काढतो. पण थोडं तारतम्य ठेवलं, न आवडलेली गोष्ट केव्हा कधी बोलायची याचं भान ठेवलं, तर वादाची वेळ येणार नाही. दोघांमध्ये खऱ्या अर्थानं संवाद घडतील. त्यासाठीच अधूनमधून असं पर्यटनही काम करून जातं. खरंय की नाही?' 

"हो बाई, पटलं मला. सहजीवनासाठी संवाद हवाच आणि तो घडवून आणण्यासाठी प्रयत्नही करायला हवा...'

सासू-सुनांचं नातं स्नेहाचं होण्यासाठी...

लग्न झाल्यानंतर मुलाच्या वागण्यातील बदल आईला खटकतो. लहानपणापासून प्रत्येक गोष्टीत आपल्यावर अवलंबून असणारा मुलगा आता "आई आई' न करता प्रत्येक गोष्ट बायकोकडून मागून घेतो. काही हवं-नको असेल ते बायकोला सांगतो. हे आईला खटकतं. आपला मुलगा आपल्यापासून दूर जातोय, आपल्यापेक्षा बायकोकडे अधिक लक्ष देतोय, ही गोष्ट तिला पटत नाही.


सासू-सुनांचं नातं स्नेहाचं होण्यासाठी...

-स्मिता प्रकाश जोशी (समुपदेशक)


"अमिता, लक्षात ठेव... सासू-सासऱ्यांच्या फार पुढं पुढं करू नकोस. एखादं काम त्या करत असतील तर "राहू दे... मी करते,' असं अजिबात म्हणायचं नाही. ते सांगतील तेवढीच मदत करायची. सुरवातीपासून सगळी कामं अंगावर घेशील, तर त्यांना तशीच सवय लागेल आणि तुझा कामाचा उत्साह ओसरला, की नंतर तुला जड जाईल. चेहऱ्यावरून खाष्टच दिसते तुझी सासू. जरा ताळतंत्र बघून वाग. अतिआदर्श सून होण्याचा प्रयत्न करू नकोस. नंतर सगळं आपल्याच अंगाशी येतं. माझ्या लग्नाला दोन वर्षं झाली आहेत. मला अनुभव आहे म्हणून तुला सांगते. मी केलेल्या चुका तू करू नकोस.'' 

दोन दिवसांवर लग्न आलेलं असताना मैत्रिणीनं दिलेल्या सल्ल्यावर विचार करणारी अमिता... एकत्र कुटुंबात पुढं कसं वागायचं, या बाबतीत गोंधळलेली.

""यमुनाताई... तुमच्या घरचं पहिलंच कार्य... घरात नवीन सून येणार... पण लगेच तिच्या हातात सगळी सत्ता देऊ नका. हल्लीच्या मुलींना चैन हवी असते. नवऱ्याला मुठीत ठेवून घरात स्वतःची सत्ता संपादन करण्याचा त्या प्रयत्न करतात. तुम्ही पहिल्यापासून कडक राहिलात आणि तुमच्या रीतिरिवाजाप्रमाणेच सर्व व्हायला पाहिजे असा आग्रह धरला तरच तिला तुमच्या घरच्या पद्धती समजतील. उगाच मुलीचा दर्जा सुनेला देण्याचा लगेच प्रयत्न कराल, तर ती तुमच्या डोक्‍यावर बसेल. लग्नानंतर मुलगासुद्धा आपला राहत नाही हो... फार कौतुक करत बसू नका. नंतर माझ्यासारखं पश्‍चात्ताप करायची वेळ येईल आणि सूनवास' भोगावा लागेल.'' (मोठ्या मुलाचं लग्न दोन दिवसांवर आलेलं... यमुनाताईंना दोन्ही मुलंच. घरात सून येणार. मुलीची हौस सुनेला करायची. मुलगी असती तर जे जे केलं असतं ते सर्व सुनेला करायचं, असं त्यांनी ठरवलेलं आणि आता मंगलताईंचे अनुभवाचे बोल ऐकून त्या गोंधळून गेल्या.) 

सासू-सुनेचं नातं म्हणजे छत्तीसचा आकडा. दोघींचं कधीच जमणार नाही. हे नातं विळ्या-भोपळ्याचं. सासू म्हणजे कुणीतरी कजाग चेटकीण आणि खुनशी व्यक्ती. सदैव सुनेच्या वाईटावर टपलेली, अशी खलनायकी प्रतिमा; तर आजकालच्या काही दूरदर्शन मालिकांमध्ये रंगवली जाते ती घरभेदी... एकत्र कुटुंब तोडून नवऱ्याला घेऊन स्वतंत्र संसार करणारी, आई आणि मुलाला वेगळं करणारी, सासूकडे दुर्लक्ष करणारी... स्वतःचं वर्चस्व गाजवणारी सुनेची प्रतिमा. त्यामुळेच "सासू' या भूमिकेत प्रवेश करताना आणि "सून' या भूमिकेत पदार्पण करताना खरं तर दोघीही गोंधळलेल्याच असतात. सासूबाईंना कसं वागलेलं आवडेल, कशी वेशभूषा, केशभूषा केलेली आवडेल, या बाबतीत सून अनभिज्ञ असते. मनात विचारांचे कल्लोळ असतात आणि सुनेला नक्की काय आवडेल, किचनमध्ये काम केलं तर लुडबुड वाटेल, की तिला मदत केली नाही तर मी सासुरवास करते असं वाटेल? तिला हवं तसं वागण्याचं स्वातंत्र्य पूर्वीपासूनच द्यावं, की घरातल्या पूर्वापार पद्धतीनुसार प्रथा पाळण्याचं बंधन ठेवावं, या विचारांमध्ये सासूही गोंधळलेली असते. त्यामध्येच अनुभवी व्यक्ती स्वतःच्या अनुभवांचे पाढे वाचते. नक्की कुणाचं ऐकायचं हा प्रश्‍न दोघींनाही असतो. खरं तर नवीन सुनेला "लाडकी सून' व्हायचं असतं. सासूची मर्जी "सांभाळायची असते आणि सासूलाही सुनेचं लेकीप्रमाणे कौतुक करायचं असतं, "प्रेमळ आई' व्हायचं असतं. दोघींनाही नात्यातील सुसंवाद हवा असतोच; पण काही दिवसांतच असं काय होतं, की सासूचं वागणं सुनेला "जाच' वाटू लागतं आणि "आपल्या मुलाला आपल्यापासून वेगळं करणारी दुष्ट स्त्री म्हणजे "सून' असं सासूला वाटायला लागतं? दोघींच्या एकमेकींबद्दल अपेक्षा पूर्ण होत नाहीत, म्हणून ही वेळ येत असावी का? 

सासू-सुनांमध्ये का होतात वाद? 

पूर्वीच्या काळापासून सासू म्हणजे खाष्ट असं चित्र रंगवलं गेलं आहे, अगदी पूर्वीच्या, पारंपरिक भोंडल्याच्या गाण्यांतही कारल्याचा वेल लावण्यापासून त्याला कारली येऊन त्याची भाजी करून खाऊन स्वतःच उट्‌टं काढल्याशिवाय सासू सुनेला माहेरी धाडत नाही आणि सूनसुद्धा "अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया मिळतं. / आणि "अस्सं सासर द्वाड बाई कोंडुनी मारीतं' असं म्हणायची. अर्थात त्या वेळेस एकत्र कुटुंबपद्धती तर होतीच; पण लहान वयात मुलींची लग्नं केली जायची आणि खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराची जबाबदारी मुलींवर पडायची. त्यांच्याकडून सर्व सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडून घेण्याची भूमिका सासूची असायची. मुलींच्या स्वातंत्र्यावर गदा यायची, त्यामुळं सासू "दुष्ट' होऊन जायची. 

आता परिस्थिती बदलली आहे. मुलींच्या लग्नाचं वय २२  ते २५  च्या दरम्यान किंवा त्यापेक्षाही जास्त असतं. मुली प्रौढ, समंजस, शिकलेल्या आणि स्वतःच्या विचारांचा आग्रह धरणाऱ्या असतात. त्यामुळे सुनेला सासूचे विचार पटतातच असं नाही. आपल्या आचार-विचारांवर सासू अतिक्रमण करते, असं सुनांना वाटू लागतं. पिढीतलं अंतर असतंच, त्यामुळे सुनेचे विचार सासूला पटत नाहीत आणि सासूचे विचार सुनेला रुचत नाहीत. नव्याने घरी आलेल्या सुनेने आपल्या पद्धती माहिती करून घ्याव्यात आणि त्याप्रमाणेच वागावे, अशी सासूची अपेक्षा असते; परंतु वयाची २३ -२४ वर्षे आई-बापाकडे राहिलेल्या मुली, शिकून स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या मुली स्वतःच्या विचारांवर ठाम असतात आणि स्वतःला न आवडणाऱ्या, न पटणाऱ्या गोष्टी करायला तयार होत नाहीत. गोष्टी मनाविरुद्ध करायला लागल्या की चिडचिड, धुसफूस सुरू होते. छोट्या छोट्या गोष्टींवरूनही खटके उडू लागतात. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलेल्या सुना सासूचं वर्चस्व मान्य करायला तयार होत नाहीत, त्यामुळे सारखं भांड्याला भांडं लागतं. 

लग्न झाल्यानंतर मुलाच्या वागण्यातील बदल आईला खटकतो. लहानपणापासून प्रत्येक गोष्टीत आपल्यावर अवलंबून असणारा मुलगा आता "आई आई' न करता प्रत्येक गोष्ट बायकोकडून मागून घेतो. काही हवं-नको असेल ते बायकोला सांगतो. हे आईला खटकतं. आपला मुलगा आपल्यापासून दूर जातोय, आपल्यापेक्षा बायकोकडे अधिक लक्ष देतोय, ही गोष्ट तिला पटत नाही. आपण नाकारले जातो आहोत, असं वाटायला लागतं आणि हे सर्व "सून' घरात आल्यामुळे होतंय, हे सासूला वाटल्यामुळं ती सुनेचा राग-राग करू लागते आणि मग सासू-सुनांची भांडणं सुरू होतात. काही घरांमध्ये अगदी उलटी परिस्थितीही असते. प्रत्येक गोष्ट आईला विचारून करण्याची काही मुलांना इतकी सवय लागलेली असते, की लग्न झालं तरी आईलाच सर्व गोष्टी सांगितल्या जातात. आईशी गुफ्तगूं कमी होत नाही. मग या "श्रावणबाळाचा' राग बायकोला येतो आणि लग्न झालं, तरी आम्हाला स्वातंत्र्य देत नाहीत. एवढं आईचंच ऐकायचं आहे, तर लग्नच कशाला केलं, असं म्हणून सर्व राग सासूवर काढला जातो आणि सासू-सुनांचे वाद होऊ लागतात. 

लग्नामध्ये व्यवस्थित मानपान झाला नाही, सुनेला आपल्या पद्धतीनं स्वयंपाक करता येत नाही, स्वच्छता आणि काटकसर जमत नाही, धोरणाने वागत नाही, यामुळे सासू सुनेवर बरसत राहते. जरा आम्हा नवरा-बायकोला एकांत देत नाहीत, आमच्या मनाप्रमाणे आम्हाला वागू देत नाही, सतत लुडबुड करतात, माहेरच्या लोकांबद्दल वाईट बोलतात, अशी कारणे सांगून सून सतत सासूवर नाराज राहते. 

दोघींनीही एकमेकींना समजावून घेऊन स्नेहाचं नातं निर्माण करायचं असेल, तर दोघींनीही आपल्या वागण्यात बदल करणे आवश्‍यक आहे. 

कसं वागावं सासूनं? 

नव्याने घरात येणारी सून ही भांबावलेली असते. या घरात कसं वागावं, हे तिला समजत नाही, अशा वेळी तिच्या मनाची अवस्था समजावून घेऊन तिला धीर देणे... विश्‍वास देणे, नव्या आयुष्यात नव्या संसारात रुळायला तिला मदत करणे, हे आवश्‍यक आहे. तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही. त्यासाठी काही काळ जावा लागतो, तसेच तुमच्या घरातील रीतिरिवाज, खाण्या-पिण्याच्या पद्धती, तुमचे संस्कार लगेच तिच्या पचनी पडणार नाहीत. हे सर्व समजून घ्यायला, आत्मसात करायला आणि त्याप्रमाणे वागायला तिला वेळ द्यावा लागणार आहे. कोण कुणापेक्षा वरचढ आहे, हे सतत दाखवायला जाण्यापेक्षा आणि स्वतःचे वर्चस्व कसे कायम राहील, हा आग्रह धरण्यापेक्षा आपल्यासारखं सुनेला कसं तयार करता येईल, याचा विचार करावा. एखाद्या वेळेस स्वयंपाक करताना तिच्याकडून चुका झाल्या तरी चिडचिड आदळआपट, राग राग करू नये. "मी असा स्वयंपाक करते म्हणून तिनं तसाच करावा,' हा आग्रह धरू नये. दूध उतू जाते, तेलच जास्त वापरते, कपडे धुवायला साबण जास्त वापरते, अशा किरकोळ गोष्टीवरून वाद घालू नये. घरातील पद्धती तिला जरूर समजावून सांगाव्यात, चुकल्यास नाराजी व्यक्त करावी, परंतु तोंडावर कौतुक करून मुलाकडे तिच्या तक्रारी करणे, अशा गोष्टी टाळाव्यात. 

नुकतंच नवीन लग्न झालेल्या जोडप्याला एकांत हवा असतो. ते शारीरिक आणि मानसिक पातळीवर एकमेकांच्या निकट येण्याचा प्रयत्न करत असतात. या गोष्टी समजावून घेऊन त्यांना त्यांचा वेळ मिळावा, या दृष्टीने प्रयत्न करावा. सुरवातीच्या काळात मुलगा पत्नीकडे अधिक ओढला जाणार, हे नैसर्गिक आहे. हे क्षण समजुतीने हाताळायला हवेत. मुलाचं तुमच्यावरील प्रेम कमी होणार नाही, तर यामुळे निश्‍चितच वाढेल. सुनेलाही सासूबद्दल विश्‍वास, प्रेम आणि कृतज्ञता वाटेल. आपले अनुभव सुनेशी अवश्‍य शेअर करावेत; त्यातून तिला मार्गदर्शन मिळेल. पण तुमच्या पद्धतीनेच तिने वागावं हा हट्ट धरू नये. तिनं असंच वागलं पाहिजे ही अपेक्षाही धरू नये. वेळेनुसार योग्य मार्गदर्शन करणं हे आपलं कर्तव्य आहे, हे लक्षात ठेवावं. सुनेशी जमवून घेण्याचं आणि नवीन पिढीनुसार आपले विचार बदलण्याचं कौशल्य आत्मसात करावं. 

कसं वागावं सुनेनं? 

लग्न होऊन सासरी गेल्यानंतर नव्या आयुष्याची सुरवात सुनेनं सकारात्मकरीत्या करावी. सासू कजागच असते असा पूर्वग्रह मनात ठेवू नये. कोणाच्या मार्गदर्शनाने त्यांच्या अनुभवानुसार वागण्याचा प्रयत्न करू नये. स्वतःचे अनुभव स्वतः घ्यावेत. आईचं आणि मुलीचं तरी सर्व गोष्टीत कुठं पटतं?... तिथं आपण स्वीकार करतोच, मग सासूचा स्वीकार करण्यात अडचणी का येतात? आपल्या कुटुंब व्यवस्थेत नात्यांची उतरंड संभाळली जातेच, त्यामुळं घरातील सासूबाईंचं स्थान सुनेनं मनापासून मान्य करावं. "आमच्याकडं असं होतं, आमच्याकडे तसं होतं,' याप्रमाणे वारंवार माहेरच्या गोष्टी सांगून माहेरचं कौतुक सारखंच सांगत बसू नये. सासूच्या अनुभवाचं शहाणपण खूप काही शिकवत असतं. ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. दोन्ही घरच्या पद्धतींत फरक असेल तर बऱ्याच वेळा वाद घडण्याची शक्‍यता असते. परंतु सासरच्या घरच्या पद्धतींची माहिती करून घेण्यासाठी, शिकण्यासाठी सासूबाईंचा सल्ला ऐकणं, त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागणं ठेवावं. सासूबाईंच्या वयाचा विचार करून त्यांच्यात आता बदल घडून येणार नाही, तर आपणच बदलायला हवं. हे सत्य समंजसपणे सुनेनं स्वीकारायला हवं. धुमसत राहून स्वतःचं आणि संपूर्ण घराचं मनःस्वास्थ्य बिघडवण्यापेक्षा स्वतःला नवीन घरात सामावून घेण्याचा प्रयत्न करावा. सासूबाईंनी आपल्या चांगल्या कामाचं कौतुक करायलाच हवं, ही अपेक्षा मनात धरू नये. 
सासूला आईप्रमाणे समजावं असं म्हटलं जातं, त्यामुळे बऱ्याच घरात सुना सासूला "अहो आई' म्हणूनच हाक मारतात; परंतु तरीही आईची आणि सासूची तुलना करत बसू नये. काम करताना, एखादी जबाबदारी सांभाळताना काही चुका झाल्या आणि त्यांनी रागावलं, काही बोललं तरी त्या गोष्टी मनाला साधून यापुढे चुका कशा होणार नाहीत या पद्धतीने विचार करावा. संवादातून अनेक गैरसमज दूर होतात, त्यामुळं दोघींमध्ये निकोप संवाद कसा साधता येईल, या दृष्टीनेही प्रयत्न करावा. वादाचे काही प्रसंग निर्माण झाले तरीही माहेरी जाऊन आई-वडिलांना अथवा समाजात मित्र-मैत्रिणींकडे सांगत बसू नये. यामुळे दोघींमधील मतभेद अधिक वाढण्याची शक्‍यता असते. आपले वाद चार भिंतींच्या आतच आपल्याला मिटवायचे आहेत, हे जाणीवपूर्वक ठरवावं. 

सासू-सून, दोघींनीही एकमेकींची उणी-दुणी काढत आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये एकमेकींची निंदा-नालस्ती करत बसण्यापेक्षा आपापल्या जबाबदाऱ्या, कर्तव्य यांच्या सीमारेषा स्वतःच ठरवून घ्याव्यात आणि एकमेकींच्या भूमिकांवर अतिक्रमण करू नये, यामुळं दोघींमधील नातं समंजस, स्नेहाचं आणि मैत्रीचं असेल व वाद होण्याची वेळच येणार नाही. 
सासू-सुनेच्या निकोप नात्यासाठी..

DO's 
१ ) सासू-सुनांनी एकमेकांशी रुचलेल्या आणि न रुचलेल्या गोष्टींबाबत वेळीच मोकळेपणाने संवाद साधावा.
२ ) दोघींनी एकमेकींबद्दलचा मत्सर, अहंकार दूर ठेवावा आणि मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करावा.
३ ) सणसमारंभासाठी, मनोरंजनासाठी, खरेदीसाठी एकत्र जाण्याचे ठरवावे.
४ ) एकमेकींच्या भावनांचा, विचारांचा आदर करावा आणि समंजसपणा दाखवावा.
५ ) सासू-सून, दोघींनीही एकमेकींचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस लक्षात ठेवून न विसरता एकमेकींना आवडीच्या भेटवस्तू द्याव्यात. 


DONT's 
१ ) सासू-सुनांनी दोघींमधील मतभेद चार भिंतींच्या आतच मिटवण्याचा प्रयत्न करावा. चारचौघांत एकमेकांची निंदानालस्ती करू नये.
२ ) एकमेकींचे मतभेद, तक्रारी पुरुषांपर्यंत आणि शक्‍यतो नवऱ्यापर्यंत नेऊ नयेत.
३ ) एकमेकींचे पटले नाही तर धुसफूस, राग, चिडचिड करू नये.
४ ) सासू-सुना, दोघींनीही एकमेकींच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करू नये.
५ ) मतभेद टोकाचे असतील, तर जबरदस्तीने एकत्र राहू नये. समंजसपणे स्वतंत्र राहण्याचा विचार करावा.