थोडं माझ्या विषयी

Saturday 3 October 2015

मेंदीच्या पानावर

ज्या ज्या वेळेस आयुष्याबद्दलची निराशा मनात डोकवेल तेव्हा... उगाचच उदास वाटेल तेव्हा... काही रागाच्या प्रसंगात मन उद्विग्न होईल तेव्हा... पुन्हा पुन्हा आयुष्यातील हळूवार क्षण आठवा - पाऊस पडून गेल्यानंतर रस्ते स्वच्छ धुतल्यासारखे वाटतात, तसे सर्व काही छान वाटू लागेल. मनावरच मळभ निघून जाईल. सहजीवनातील असे आनंदाचे क्षण जगण्याचा उत्साह वाढवतात, सुख-दु:खाची परिमाण बदलत नेतात आणि आपण एकमेकांसाठी आहोत हा दृढभाव आणखीनच दृढ करतात.


मेंदीच्या पानावर

स्मिता प्रकाश जोशी (समुपदेशक)


आज मंगलाताईंकडे भिशी होती. सर्व जणी दुपारी त्यांच्या घरी जमल्या होत्या. प्रत्येक भिशीच्या वेळी एकमेकींची उणी-दुणी काढून गॉसिपिंग करणं या ग्रुपला मान्य नव्हतं. कोणाच्या घरी काय चाललंय, कुणी काय नवीन घेतलं, कुणाच्या नातेसंबंधांना ग्राहण लागलं, असे टिपीकल बायकी विषय बोलायचेच नाहीत, असा या ग्रुपचा दंडकच होता. प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी विषय घ्यायचा आणि प्रत्येकाने आपले अनुभव, आपली मते शेअर करायची, असं हलकं-फुलकं वातावरण आणि चहा-बिस्कीट फार तरं हलकसं स्नॅक्‍स या व्यतिरिक्‍त मेनूही ठेवायचा नाही असंच ठरलेलं होतं. नवीन कोणत्या तरी विषयावर आज चर्चा होणार या उत्साहानेच सर्वजणी आल्या होत्या. 

""अय्या... मंगला अगं किती छान मेंदी काढलीस तू... काय विशेष?'' 
""अगं काल भाचीचा साखरपुडा झाला ना, तेव्हाच मेंदी काढली आहे आणि आजच्या चर्चेचा विषय ठरवायचा म्हणूनही मेंदी काढली आहे.'' 
""अगं मेंदीचा आणि चर्चेच्या विषयाचा काय संबंध?'' 

""बरं का मेघना... मेंदी या विषयावरच आपण चर्चा करायची म्हणजे बघ, या मेंदीच्या मागे आपल्या अनेक आठवणी दडलेल्या असतात. लग्नाच्या वेळेस प्रत्येक नववधूच्या हातावर मेंदी रेखाटलेली असते आणि या मेंदीच्या साक्षीनेच ती आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करीत असते. ते प्रसंग, त्या आठवणी प्रत्येकीच्या मनात एका वेगळ्या कप्प्यात जपून ठेवलेल्या असतात. त्या नुसत्या आठवणीनेही मनावर मोरपीस फिरवल्यासारखं वाटतं... आपण पुन्हा पुन्हा त्या विश्‍वात जात असतो... आज प्रत्येकीनं आपल्या याच आठवणी सांगायच्या.'' ""वा... वा अगदीच आवडीचा विषय. थांब, आता मी माझ्यापासूनच सुरुवात करते.'' 

मेघनाला तर विषय ऐकूनच किती बोलू आणि किती नको असं झालं होतं. ""माझ्या लग्नाला पंचवीस वर्षे उलटून गेली; परंतु अजूनही तो प्रसंग आता घडल्यासारखा माझ्या नजरेसमोर तरळतो. लग्नाच्या आदल्या दिवशी सहा ते सात तास बसून मेंदीचा कार्यक्रम झाला होता. माझ्या दोन मैत्रिणी हातावर आणि पायावर मेंदी काढत होत्या. मला तहान लागली, भूक लागली की माझ्या आईने समोर आणून ठेवलेले वेगवेगळे पदार्थ माझ्या इतर मैत्रिणी मला भरवायच्या. मेंदी जेवढी जास्त रंगेल तेवढे जोडीदाराचे प्रेम अधिक, असे आजीने सांगितले होते. रात्रभर हात आणि पायांवरील मेंदी मला सांभाळायची होती आणि ती अधिक रंगावी म्हणून मधून मधून साखर पाण्यातील कापसाचा बोळा फिरवनंही चालू होतं. सकाळी तेलाचा हात लावून नंतर पाणी लावून मेंदी धुवायची असं आजीनं सांगितलं होतं. माझी मेंदी जास्त रंगावी म्हणून मी सगळ्यांचं म्हणणं तंतोतंत ऐकत होते. सकाळी उठून मेंदीचा हात धुतला. मात्र मी फारच घाबरून गेले. कारण माझी मेंदी रंगलेलीच नव्हती. अंधुकसा केशरी रंग त्याला आला होता. मेंदीचे मी सिलेक्‍ट केलेले डिझाइन तर आजिबात दिसत नव्हते. मी रडायलाच लागले. सर्वांनी माझी समजूत घालण्याचा प्रयत्न केला; पण मला आजिबात रडू आवरेना. "अगं वेडाबाई... मेंदी रंगली नाही, तर त्यात एवढं काय रडायचयं?' असे आई म्हणत होती; पण "मेंदी जेवढी जास्त रंगेल तेवढे जोडीदाराचे प्रेम अधिक' हे आजीचे शब्द माझ्या कानात घुमत होते. ज्याचे आपल्यावर प्रेम नाही त्याच्याशी लग्न कसं करायचं, आयुष्य त्याच्यासोबत कसं काढायचं, तो जबरदस्तीने तर आपल्याशी लग्न करीत नाही ना, अशा विचारांनी मी निराश झाले होते. "मला हे लग्नच करायचं नाही' या विचारापर्यंत आले. शेवटी माझ्या बाबांनी प्रकाशला बोलावून आणलं. सर्व प्रकार त्याला सांगितला. आम्हाला त्या ठिकाणी एकटे सोडून सर्व जण बाजूला निघून गेले. मी हातांच्या ओंजळीत तोंड लपवून बसले होते. त्यांनी माझे दोन्ही हात बाजूला केले. माझ्या हनुवटीला धरून म्हणाले, ""मेघा... मेंदीच्या रंगण्यावरच प्रेम अवलंबून असतं, तर लग्नसंस्थेला अर्थच राहिला नसता. तू जशी आहेस, तशी मला आवडली आहेस. तुझ्या न रंगलेल्या मेंदीतच मला प्रेमाचे रंग भरायचे आहेत.'' त्यांच्या त्या गोड आणि लाघवी बोलण्यानं माझी भीती कुठल्या कुठे पळून गेली आणि काय आश्‍चर्य नंतरच्या दोन-तीन तासांत मेंदी हळूहळू रंगू लागली आणि त्या लालचुटूक मेंदीच्या डिझाईन्सचे आम्ही छान फोटो काढले. अजूनही मला आठवलं तरी हसू येतं आणि प्रत्येक वेळेस हातावर मेंदी काढताना प्रकाश मला चिडवत असतात. मला वाटतं मेंदी रंगण्यासाठी काही काळ जावा लागतो आणि ती हळूहळू रंग घेत असते. आपल्या संसाराचेही तसेच आहे, एकमेकांच्या सहजीवनात हळूहळू एकमेकांचे स्वभाव कळू लागतात आणि काही कालावधीनंतरच संसारात खरे रंग भरले जातात.'' 

मेघना भरभरून बोलत होती कसे तरी सुप्रियाने तिला थांबवले. "अगं थांब जरा... आता जरा माझ्या मेंदीची कहाणी ऐक. माझा आणि सुधीरचा प्रेमविवाह आमच्या दोघांच्याही घरी ते मान्य नव्हतं. शेवटी दोघांनी घरात न सांगता लग्न करायचं ठरवलं. दोघांचे मित्र-मैत्रिणी लग्नाला होते; परंतु लग्न करताना विधी व्हायलाच हवेत आणि हातावर मेंदी हवीच ही माझी अट होती. आमच्या मित्र-मैत्रिणींनी एका मंदिरात सर्व व्यवस्था केली होती. सुधीर डॉक्‍टर असला, तरी त्याचे ड्रॉइंग अतिशय उत्तम होते. लग्नाच्या दिवशी सकाळी माझी हौस पूर्ण करण्यासाठी त्याने स्वत: मेंदीचे कोन आणले आणि स्वत:च्या हाताने माझ्या हातावर मेंदी काढली. सहजीवनात प्रत्येक क्षणी माझी साथ-सोबत तुला असेल, असेच या मेंदीतून त्याने मला सांगितले आणि खरोखरच माझ्या आयुष्यातील प्रत्येक चढ-उतारात त्याने मला साथ दिली. नंतर दोघांच्याही नातेवाइकांनी लग्न मान्य केले. "सुप्रियासारखी सून मिळायला भाग्य लागतं,' असे सासूबाई माझं कौतुक करीत असतात, तर "पूर्वजन्मीची पुण्याई म्हणून गुणी जावई मिळाला,' असे माझे आई-वडील सर्वांना सांगत असतात. त्या मेंदीमुळे आमच्या दोघातलं नातं अधिक दृढ झालं आणि आम्ही खऱ्या अर्थाने एकमेकांचे झालो.' 

सुशिलालाही आता गप्प बसवेना, तीही बोलू लागली, ""अगं, या मेंदीने मला माझ्या जोडीदाराची खरी ओळख पटवून दिली. आमचं एकत्र कुटुंब. सासू-सासरे, दीर, जाऊ, नणंद सर्व जण आम्ही तेव्हा एकत्र राहात असू. माझ्या नवऱ्याला घरातील जबाबदारीची कधीही जाणीव नव्हती. दर महिन्याचा पगार आईच्या हाती टेकवला, की याचं कर्तव्य संपलं. दुधाचे भाव काय, भाजीचे भाव काय, किराणा माल केव्हा आणावा लागतो आणि बिलं केव्हा भरायची असतात, याबाबतीत तो अगदीच अनभिज्ञ होता आणि त्याची बदली नाशिकला झाली. आम्हाला दोघांनाच तेथे जावे लागले. घरात तो कधीच लक्ष घालायचा नाही आणि हा कधीच मदत करत नाही, याला काहीच येत नाही, यामुळं माझी चिडचिड व्हायची. माझ्या मंगळागौरीचा कार्यक्रम पुण्याला ठेवला होता आणि त्याला सुटी नसल्यामुळे आम्ही अगदी ऐनवेळेस जाणार होतो. "हातावर छान मेंदी काढून ये,' असे जावेने आणि नणंदेने मला सांगितले होते. मीही अगदी उत्साहाने ब्युटीपार्लरमधून मेंदी काढणाऱ्या मुलीला बोलावले आणि दोन्ही हातांवर छान वेलबुट्टी काढून घेतली. मेंदी काढेपर्यंत संध्याकाळ झाली. सकाळशिवाय मेंदी धुवायची नाही, पाण्यात हात घालायचा नाही, असे त्या ब्युटीशियनने सांगितले होते. रात्रीच्या स्वयंपाकाची आणि दुसऱ्या दिवशी जायचे म्हणून बॅग भरणे ही तयारी खरंतर आधीच करून ठेवायला हवी होती; पण हे माझ्या लक्षातच आले नाही. तो ऑफिसमधून घरी आला आणि त्याने माझी ही अवस्था पाहिली. माझ्या दोन्ही हातांवर कोपऱ्यापर्यंत मेंदी मी काढून घेतली होती. त्या दिवशी त्याने स्वत: चहा केला. विशेष म्हणजे मलाही हातात बशी धरून लहान मुलांना देतात तसा चहा पाजला. मुगाच्या डाळीची खिचडी केली, पापड भाजले. एकाच ताटात आम्ही जेवलो. एकेक घास तो मला भरवत होता आणि माझ्या डोळ्यांतून पाणी वाहात होते. त्याच्या हातच्या त्या खिचडीची चव अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळते आहे. याला काहीच कसं येत नाही, असा विचार मी करत होते; पण त्या दिवशीच्या मेंदीने त्याच्यातील छुपे गुण मला समजले. तुझ्यावर येणाऱ्या प्रत्येक प्रसंगात मी तुला साथ करेन... वेळ आली तर मी काहीही करू शकतो आणि तेवढी ताकद माझ्यात आहे, हेच त्याने मला दाखवून दिले. त्यानंतर "तो काहीच करीत नाही' यावरून आमची चिडचिड कधीही झाली नाही. ती मेंदी आणि ती खिचडी मी कधीच विसरू शकत नाही.' 

प्रत्येक जणी स्वत:च्या आयुष्यात मेंदीशी निगडित असलेल्या मनाच्या हळूवार कप्प्यात जपलेल्या आठवणी सांगत होत्या. या मेंदीच्या साक्षीनेच ""डोन्ट वरी! आय विल ऑलवेज बी देअर फॉर यू!'' असं म्हणून परस्परांना साथ देण्याच्या वचनाबरोबरच आपल्या सहजीवनाला, नवीन आयुष्याला सुरवात प्रत्येकाने लग्नात केलेली असते. जोडीदाराच्या या शब्दांनीच एक सुरक्षितता, विश्‍वास निर्माण होत असतो. आयुष्यात कोणतेही प्रसंग आले तरी "मैं हूँ ना!' असे म्हणणारा जोडीदार सोबत असेल तर कोणत्याही संकटांना, कोणत्याही प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद वाढते. काहीही न सांगता आपल्याला ओळखून घेणारा, सांभाळणारा जोडीदार आपल्यासोबत आहे ही भावनाच खूप सुखावह असते. दिवसभर ऑफिसमध्ये काम करून येऊन संध्याकाळी स्वत: स्वयंपाक करून जेऊ घालणाऱ्या पत्नीला फक्‍त तिच्या जोडीदाराने "आज खूप दमलीस. नको एवढी दगदग करत जाऊ,' एवढं जरी म्हटलं तरी ती सुखावते. दुपटीनं काम करण्याचं बळ तिच्याकडे येते. "आपल्याला समजावून घेणारा जोडीदार मिळाला आहे,' या विचारात ती कुटुंबासाठी कितीही राबायला तयार होते. परस्परांच्या विश्‍वासावर, आधारावर उभं असलेलं सहजीवन एकमेकांना फुलवत जातं आणि असे सहजीवन केवळ सहवासाच्या पातळीवर न राहता आत्मिक मिलनापर्यंत पोचते. एकमेकांच्या स्वभावाचे टोकदार कंगोरे काही काळ टोचत राहिले, तरी या विश्‍वासाने ते गुळगुळीत होतात. एकमेकांना समजावून घेण्यासाठी आनंद मिळवता येतो. 

एकूण काय तर आज भिशीतल्या सगळ्याच जणी आपापली आठवणींची शिदोरी काढून हळूवार तो क्षण पुन्हा जगत होत्या. प्रत्येकाच्या आयुष्यातले असे आनंदाचे क्षण आपण पुन्हा पुन्हा आठवत गेलो तर मन हळूवार होतं. ज्या ज्या वेळेस आयुष्याबद्दलची निराशा मनात डोकावेल तेव्हा... उगाचच उदास वाटेल तेव्हा... काही रागाच्या प्रसंगात मन उद्विग्न होईल तेव्हा पुन्हा पुन्हा हे हळूवार क्षण आठवा - पाऊस पडून गेल्यानंतर रस्ते स्वच्छ धुतल्यासारखे वाटतात, तसे सर्व काही छान वाटू लागेल. मनावरच मळभ निघून जाईल. सहजीवनातील असे आनंदाचे क्षण जगण्याचा उत्साह वाढवतात, सुख-दु:खाची परिमाण बदलत नेतात आणि आपण एकमेकांसाठी आहोत हा दृढभाव आणखीनच दृढ करतात. अशा आठवणी मनाच्या हिंदोळ्यात झुलत राहतात आणि गुणगुणत राहतात. 
""मेंदीच्या पानावर मन अजून झुलतय गं...'' 

लक्षात ठेवा:

१ . एकमेकांच्या सहवासातील आनंदाचे, मजेचे क्षण नेहमी आठवत राहा. 
२ . कधीतरी दोघेच जण जुन्या गोष्टी आठवा. फोटोंचे अल्बम बघा, व्हिडिओ क्‍लिप्स बघा आणि ते क्षण पुन्हा अनुभवण्याचा प्रयत्न करा. 
३ . प्रत्येक प्रसंगात मी तुझ्यासोबत आहे. ""मैं हूँ ना!' हा विश्‍वास दोघांनीही एकमेकांना द्या. 
४ . एकमेकांचे मूड ओळखायला शिका. एकमेकांमधील अबोल देवाण-घेवाणही महत्त्वाची असते हे लक्षात ठेवा. 

No comments:

Post a Comment