लग्न झाल्यानंतर मुलाच्या वागण्यातील बदल आईला खटकतो. लहानपणापासून प्रत्येक गोष्टीत आपल्यावर अवलंबून असणारा मुलगा आता "आई आई' न करता प्रत्येक गोष्ट बायकोकडून मागून घेतो. काही हवं-नको असेल ते बायकोला सांगतो. हे आईला खटकतं. आपला मुलगा आपल्यापासून दूर जातोय, आपल्यापेक्षा बायकोकडे अधिक लक्ष देतोय, ही गोष्ट तिला पटत नाही.
सासू-सुनांचं नातं स्नेहाचं होण्यासाठी...
-स्मिता प्रकाश जोशी (समुपदेशक)
"अमिता, लक्षात ठेव... सासू-सासऱ्यांच्या फार पुढं पुढं करू नकोस. एखादं काम त्या करत असतील तर "राहू दे... मी करते,' असं अजिबात म्हणायचं नाही. ते सांगतील तेवढीच मदत करायची. सुरवातीपासून सगळी कामं अंगावर घेशील, तर त्यांना तशीच सवय लागेल आणि तुझा कामाचा उत्साह ओसरला, की नंतर तुला जड जाईल. चेहऱ्यावरून खाष्टच दिसते तुझी सासू. जरा ताळतंत्र बघून वाग. अतिआदर्श सून होण्याचा प्रयत्न करू नकोस. नंतर सगळं आपल्याच अंगाशी येतं. माझ्या लग्नाला दोन वर्षं झाली आहेत. मला अनुभव आहे म्हणून तुला सांगते. मी केलेल्या चुका तू करू नकोस.''
दोन दिवसांवर लग्न आलेलं असताना मैत्रिणीनं दिलेल्या सल्ल्यावर विचार करणारी अमिता... एकत्र कुटुंबात पुढं कसं वागायचं, या बाबतीत गोंधळलेली.
""यमुनाताई... तुमच्या घरचं पहिलंच कार्य... घरात नवीन सून येणार... पण लगेच तिच्या हातात सगळी सत्ता देऊ नका. हल्लीच्या मुलींना चैन हवी असते. नवऱ्याला मुठीत ठेवून घरात स्वतःची सत्ता संपादन करण्याचा त्या प्रयत्न करतात. तुम्ही पहिल्यापासून कडक राहिलात आणि तुमच्या रीतिरिवाजाप्रमाणेच सर्व व्हायला पाहिजे असा आग्रह धरला तरच तिला तुमच्या घरच्या पद्धती समजतील. उगाच मुलीचा दर्जा सुनेला देण्याचा लगेच प्रयत्न कराल, तर ती तुमच्या डोक्यावर बसेल. लग्नानंतर मुलगासुद्धा आपला राहत नाही हो... फार कौतुक करत बसू नका. नंतर माझ्यासारखं पश्चात्ताप करायची वेळ येईल आणि सूनवास' भोगावा लागेल.'' (मोठ्या मुलाचं लग्न दोन दिवसांवर आलेलं... यमुनाताईंना दोन्ही मुलंच. घरात सून येणार. मुलीची हौस सुनेला करायची. मुलगी असती तर जे जे केलं असतं ते सर्व सुनेला करायचं, असं त्यांनी ठरवलेलं आणि आता मंगलताईंचे अनुभवाचे बोल ऐकून त्या गोंधळून गेल्या.)
सासू-सुनेचं नातं म्हणजे छत्तीसचा आकडा. दोघींचं कधीच जमणार नाही. हे नातं विळ्या-भोपळ्याचं. सासू म्हणजे कुणीतरी कजाग चेटकीण आणि खुनशी व्यक्ती. सदैव सुनेच्या वाईटावर टपलेली, अशी खलनायकी प्रतिमा; तर आजकालच्या काही दूरदर्शन मालिकांमध्ये रंगवली जाते ती घरभेदी... एकत्र कुटुंब तोडून नवऱ्याला घेऊन स्वतंत्र संसार करणारी, आई आणि मुलाला वेगळं करणारी, सासूकडे दुर्लक्ष करणारी... स्वतःचं वर्चस्व गाजवणारी सुनेची प्रतिमा. त्यामुळेच "सासू' या भूमिकेत प्रवेश करताना आणि "सून' या भूमिकेत पदार्पण करताना खरं तर दोघीही गोंधळलेल्याच असतात. सासूबाईंना कसं वागलेलं आवडेल, कशी वेशभूषा, केशभूषा केलेली आवडेल, या बाबतीत सून अनभिज्ञ असते. मनात विचारांचे कल्लोळ असतात आणि सुनेला नक्की काय आवडेल, किचनमध्ये काम केलं तर लुडबुड वाटेल, की तिला मदत केली नाही तर मी सासुरवास करते असं वाटेल? तिला हवं तसं वागण्याचं स्वातंत्र्य पूर्वीपासूनच द्यावं, की घरातल्या पूर्वापार पद्धतीनुसार प्रथा पाळण्याचं बंधन ठेवावं, या विचारांमध्ये सासूही गोंधळलेली असते. त्यामध्येच अनुभवी व्यक्ती स्वतःच्या अनुभवांचे पाढे वाचते. नक्की कुणाचं ऐकायचं हा प्रश्न दोघींनाही असतो. खरं तर नवीन सुनेला "लाडकी सून' व्हायचं असतं. सासूची मर्जी "सांभाळायची असते आणि सासूलाही सुनेचं लेकीप्रमाणे कौतुक करायचं असतं, "प्रेमळ आई' व्हायचं असतं. दोघींनाही नात्यातील सुसंवाद हवा असतोच; पण काही दिवसांतच असं काय होतं, की सासूचं वागणं सुनेला "जाच' वाटू लागतं आणि "आपल्या मुलाला आपल्यापासून वेगळं करणारी दुष्ट स्त्री म्हणजे "सून' असं सासूला वाटायला लागतं? दोघींच्या एकमेकींबद्दल अपेक्षा पूर्ण होत नाहीत, म्हणून ही वेळ येत असावी का?
सासू-सुनांमध्ये का होतात वाद?
पूर्वीच्या काळापासून सासू म्हणजे खाष्ट असं चित्र रंगवलं गेलं आहे, अगदी पूर्वीच्या, पारंपरिक भोंडल्याच्या गाण्यांतही कारल्याचा वेल लावण्यापासून त्याला कारली येऊन त्याची भाजी करून खाऊन स्वतःच उट्टं काढल्याशिवाय सासू सुनेला माहेरी धाडत नाही आणि सूनसुद्धा "अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया मिळतं. / आणि "अस्सं सासर द्वाड बाई कोंडुनी मारीतं' असं म्हणायची. अर्थात त्या वेळेस एकत्र कुटुंबपद्धती तर होतीच; पण लहान वयात मुलींची लग्नं केली जायची आणि खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराची जबाबदारी मुलींवर पडायची. त्यांच्याकडून सर्व सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडून घेण्याची भूमिका सासूची असायची. मुलींच्या स्वातंत्र्यावर गदा यायची, त्यामुळं सासू "दुष्ट' होऊन जायची.
आता परिस्थिती बदलली आहे. मुलींच्या लग्नाचं वय २२ ते २५ च्या दरम्यान किंवा त्यापेक्षाही जास्त असतं. मुली प्रौढ, समंजस, शिकलेल्या आणि स्वतःच्या विचारांचा आग्रह धरणाऱ्या असतात. त्यामुळे सुनेला सासूचे विचार पटतातच असं नाही. आपल्या आचार-विचारांवर सासू अतिक्रमण करते, असं सुनांना वाटू लागतं. पिढीतलं अंतर असतंच, त्यामुळे सुनेचे विचार सासूला पटत नाहीत आणि सासूचे विचार सुनेला रुचत नाहीत. नव्याने घरी आलेल्या सुनेने आपल्या पद्धती माहिती करून घ्याव्यात आणि त्याप्रमाणेच वागावे, अशी सासूची अपेक्षा असते; परंतु वयाची २३ -२४ वर्षे आई-बापाकडे राहिलेल्या मुली, शिकून स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या मुली स्वतःच्या विचारांवर ठाम असतात आणि स्वतःला न आवडणाऱ्या, न पटणाऱ्या गोष्टी करायला तयार होत नाहीत. गोष्टी मनाविरुद्ध करायला लागल्या की चिडचिड, धुसफूस सुरू होते. छोट्या छोट्या गोष्टींवरूनही खटके उडू लागतात. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलेल्या सुना सासूचं वर्चस्व मान्य करायला तयार होत नाहीत, त्यामुळे सारखं भांड्याला भांडं लागतं.
लग्न झाल्यानंतर मुलाच्या वागण्यातील बदल आईला खटकतो. लहानपणापासून प्रत्येक गोष्टीत आपल्यावर अवलंबून असणारा मुलगा आता "आई आई' न करता प्रत्येक गोष्ट बायकोकडून मागून घेतो. काही हवं-नको असेल ते बायकोला सांगतो. हे आईला खटकतं. आपला मुलगा आपल्यापासून दूर जातोय, आपल्यापेक्षा बायकोकडे अधिक लक्ष देतोय, ही गोष्ट तिला पटत नाही. आपण नाकारले जातो आहोत, असं वाटायला लागतं आणि हे सर्व "सून' घरात आल्यामुळे होतंय, हे सासूला वाटल्यामुळं ती सुनेचा राग-राग करू लागते आणि मग सासू-सुनांची भांडणं सुरू होतात. काही घरांमध्ये अगदी उलटी परिस्थितीही असते. प्रत्येक गोष्ट आईला विचारून करण्याची काही मुलांना इतकी सवय लागलेली असते, की लग्न झालं तरी आईलाच सर्व गोष्टी सांगितल्या जातात. आईशी गुफ्तगूं कमी होत नाही. मग या "श्रावणबाळाचा' राग बायकोला येतो आणि लग्न झालं, तरी आम्हाला स्वातंत्र्य देत नाहीत. एवढं आईचंच ऐकायचं आहे, तर लग्नच कशाला केलं, असं म्हणून सर्व राग सासूवर काढला जातो आणि सासू-सुनांचे वाद होऊ लागतात.
लग्नामध्ये व्यवस्थित मानपान झाला नाही, सुनेला आपल्या पद्धतीनं स्वयंपाक करता येत नाही, स्वच्छता आणि काटकसर जमत नाही, धोरणाने वागत नाही, यामुळे सासू सुनेवर बरसत राहते. जरा आम्हा नवरा-बायकोला एकांत देत नाहीत, आमच्या मनाप्रमाणे आम्हाला वागू देत नाही, सतत लुडबुड करतात, माहेरच्या लोकांबद्दल वाईट बोलतात, अशी कारणे सांगून सून सतत सासूवर नाराज राहते.
दोघींनीही एकमेकींना समजावून घेऊन स्नेहाचं नातं निर्माण करायचं असेल, तर दोघींनीही आपल्या वागण्यात बदल करणे आवश्यक आहे.
कसं वागावं सासूनं?
नव्याने घरात येणारी सून ही भांबावलेली असते. या घरात कसं वागावं, हे तिला समजत नाही, अशा वेळी तिच्या मनाची अवस्था समजावून घेऊन तिला धीर देणे... विश्वास देणे, नव्या आयुष्यात नव्या संसारात रुळायला तिला मदत करणे, हे आवश्यक आहे. तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही. त्यासाठी काही काळ जावा लागतो, तसेच तुमच्या घरातील रीतिरिवाज, खाण्या-पिण्याच्या पद्धती, तुमचे संस्कार लगेच तिच्या पचनी पडणार नाहीत. हे सर्व समजून घ्यायला, आत्मसात करायला आणि त्याप्रमाणे वागायला तिला वेळ द्यावा लागणार आहे. कोण कुणापेक्षा वरचढ आहे, हे सतत दाखवायला जाण्यापेक्षा आणि स्वतःचे वर्चस्व कसे कायम राहील, हा आग्रह धरण्यापेक्षा आपल्यासारखं सुनेला कसं तयार करता येईल, याचा विचार करावा. एखाद्या वेळेस स्वयंपाक करताना तिच्याकडून चुका झाल्या तरी चिडचिड आदळआपट, राग राग करू नये. "मी असा स्वयंपाक करते म्हणून तिनं तसाच करावा,' हा आग्रह धरू नये. दूध उतू जाते, तेलच जास्त वापरते, कपडे धुवायला साबण जास्त वापरते, अशा किरकोळ गोष्टीवरून वाद घालू नये. घरातील पद्धती तिला जरूर समजावून सांगाव्यात, चुकल्यास नाराजी व्यक्त करावी, परंतु तोंडावर कौतुक करून मुलाकडे तिच्या तक्रारी करणे, अशा गोष्टी टाळाव्यात.
नुकतंच नवीन लग्न झालेल्या जोडप्याला एकांत हवा असतो. ते शारीरिक आणि मानसिक पातळीवर एकमेकांच्या निकट येण्याचा प्रयत्न करत असतात. या गोष्टी समजावून घेऊन त्यांना त्यांचा वेळ मिळावा, या दृष्टीने प्रयत्न करावा. सुरवातीच्या काळात मुलगा पत्नीकडे अधिक ओढला जाणार, हे नैसर्गिक आहे. हे क्षण समजुतीने हाताळायला हवेत. मुलाचं तुमच्यावरील प्रेम कमी होणार नाही, तर यामुळे निश्चितच वाढेल. सुनेलाही सासूबद्दल विश्वास, प्रेम आणि कृतज्ञता वाटेल. आपले अनुभव सुनेशी अवश्य शेअर करावेत; त्यातून तिला मार्गदर्शन मिळेल. पण तुमच्या पद्धतीनेच तिने वागावं हा हट्ट धरू नये. तिनं असंच वागलं पाहिजे ही अपेक्षाही धरू नये. वेळेनुसार योग्य मार्गदर्शन करणं हे आपलं कर्तव्य आहे, हे लक्षात ठेवावं. सुनेशी जमवून घेण्याचं आणि नवीन पिढीनुसार आपले विचार बदलण्याचं कौशल्य आत्मसात करावं.
कसं वागावं सुनेनं?
लग्न होऊन सासरी गेल्यानंतर नव्या आयुष्याची सुरवात सुनेनं सकारात्मकरीत्या करावी. सासू कजागच असते असा पूर्वग्रह मनात ठेवू नये. कोणाच्या मार्गदर्शनाने त्यांच्या अनुभवानुसार वागण्याचा प्रयत्न करू नये. स्वतःचे अनुभव स्वतः घ्यावेत. आईचं आणि मुलीचं तरी सर्व गोष्टीत कुठं पटतं?... तिथं आपण स्वीकार करतोच, मग सासूचा स्वीकार करण्यात अडचणी का येतात? आपल्या कुटुंब व्यवस्थेत नात्यांची उतरंड संभाळली जातेच, त्यामुळं घरातील सासूबाईंचं स्थान सुनेनं मनापासून मान्य करावं. "आमच्याकडं असं होतं, आमच्याकडे तसं होतं,' याप्रमाणे वारंवार माहेरच्या गोष्टी सांगून माहेरचं कौतुक सारखंच सांगत बसू नये. सासूच्या अनुभवाचं शहाणपण खूप काही शिकवत असतं. ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. दोन्ही घरच्या पद्धतींत फरक असेल तर बऱ्याच वेळा वाद घडण्याची शक्यता असते. परंतु सासरच्या घरच्या पद्धतींची माहिती करून घेण्यासाठी, शिकण्यासाठी सासूबाईंचा सल्ला ऐकणं, त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागणं ठेवावं. सासूबाईंच्या वयाचा विचार करून त्यांच्यात आता बदल घडून येणार नाही, तर आपणच बदलायला हवं. हे सत्य समंजसपणे सुनेनं स्वीकारायला हवं. धुमसत राहून स्वतःचं आणि संपूर्ण घराचं मनःस्वास्थ्य बिघडवण्यापेक्षा स्वतःला नवीन घरात सामावून घेण्याचा प्रयत्न करावा. सासूबाईंनी आपल्या चांगल्या कामाचं कौतुक करायलाच हवं, ही अपेक्षा मनात धरू नये.
सासूला आईप्रमाणे समजावं असं म्हटलं जातं, त्यामुळे बऱ्याच घरात सुना सासूला "अहो आई' म्हणूनच हाक मारतात; परंतु तरीही आईची आणि सासूची तुलना करत बसू नये. काम करताना, एखादी जबाबदारी सांभाळताना काही चुका झाल्या आणि त्यांनी रागावलं, काही बोललं तरी त्या गोष्टी मनाला साधून यापुढे चुका कशा होणार नाहीत या पद्धतीने विचार करावा. संवादातून अनेक गैरसमज दूर होतात, त्यामुळं दोघींमध्ये निकोप संवाद कसा साधता येईल, या दृष्टीनेही प्रयत्न करावा. वादाचे काही प्रसंग निर्माण झाले तरीही माहेरी जाऊन आई-वडिलांना अथवा समाजात मित्र-मैत्रिणींकडे सांगत बसू नये. यामुळे दोघींमधील मतभेद अधिक वाढण्याची शक्यता असते. आपले वाद चार भिंतींच्या आतच आपल्याला मिटवायचे आहेत, हे जाणीवपूर्वक ठरवावं.
सासू-सून, दोघींनीही एकमेकींची उणी-दुणी काढत आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये एकमेकींची निंदा-नालस्ती करत बसण्यापेक्षा आपापल्या जबाबदाऱ्या, कर्तव्य यांच्या सीमारेषा स्वतःच ठरवून घ्याव्यात आणि एकमेकींच्या भूमिकांवर अतिक्रमण करू नये, यामुळं दोघींमधील नातं समंजस, स्नेहाचं आणि मैत्रीचं असेल व वाद होण्याची वेळच येणार नाही.
सासू-सुनेच्या निकोप नात्यासाठी..
DO's
१ ) सासू-सुनांनी एकमेकांशी रुचलेल्या आणि न रुचलेल्या गोष्टींबाबत वेळीच मोकळेपणाने संवाद साधावा.२ ) दोघींनी एकमेकींबद्दलचा मत्सर, अहंकार दूर ठेवावा आणि मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करावा.
३ ) सणसमारंभासाठी, मनोरंजनासाठी, खरेदीसाठी एकत्र जाण्याचे ठरवावे.
४ ) एकमेकींच्या भावनांचा, विचारांचा आदर करावा आणि समंजसपणा दाखवावा.
५ ) सासू-सून, दोघींनीही एकमेकींचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस लक्षात ठेवून न विसरता एकमेकींना आवडीच्या भेटवस्तू द्याव्यात.
DONT's
१ ) सासू-सुनांनी दोघींमधील मतभेद चार भिंतींच्या आतच मिटवण्याचा प्रयत्न करावा. चारचौघांत एकमेकांची निंदानालस्ती करू नये.२ ) एकमेकींचे मतभेद, तक्रारी पुरुषांपर्यंत आणि शक्यतो नवऱ्यापर्यंत नेऊ नयेत.
३ ) एकमेकींचे पटले नाही तर धुसफूस, राग, चिडचिड करू नये.
४ ) सासू-सुना, दोघींनीही एकमेकींच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करू नये.
५ ) मतभेद टोकाचे असतील, तर जबरदस्तीने एकत्र राहू नये. समंजसपणे स्वतंत्र राहण्याचा विचार करावा.
No comments:
Post a Comment