थोडं माझ्या विषयी

Thursday 1 October 2015

सहजीवनासाठी संवाद हवाच

बऱ्याच वेळा एकमेकांशी वाद नको म्हणून नवरा-बायको परस्परांशी बोलणंच टाळतात. पण असा राग, उद्वेग मनात साठत राहिला तर कोंडमारा होतो. नकारात्मक भावना वाढत राहते. त्यापेक्षा आपल्याला जे वाटतंय ते बोलून टाकावं. त्या क्षणी थोडं वाईट वाटेल; पण पुढचे मार्ग मोकळे होतील. वातावरण निवळेल... चांगले होईल... त्यासाठी संवाद हवाच!


सहजीवनासाठी संवाद हवाच!

-स्मिता प्रकाश जोशी (समुपदेशक)


दारावरची बेल वाजली आणि एका विशिष्ट पद्धतीने वाजली तेव्हाच लक्षात आले, नक्की वैशाली आली असणार. ती आली, की अशीच वादळासारखी यायची आणि धो धो बोलत राहायची. ही तिची अगदी लहानपणापासूनची सवय होती. अभ्यासाच्या वेळीही तिची बडबड चालूच असायची. कधी कधी तर माझी आई तिला म्हणायची, "किती बोलतेस वैशू... अग खापराचं तोंड असतं तर केव्हाच फुटून गेलं असतं.' 

लग्न झाल्यानंतरही तिचा स्वभाव बदलला नाही. पण जोडा परस्परविरोधीच असतो असे म्हणतात, त्याप्रमाणे वैशालीचा नवरा विवेक मात्र अगदी अबोल होता. मोजकेच बोलायचे, आणि हिची तोफ मात्र चालू राहायची. तिचा मुलगा तिच्यासारखाच बडबड्या आणि मुलगी मात्र वडिलांसारखी शांत, कमी बोलणारी होती. पुन्हा एकदा बेल वाजली आणि मी भानावर आले. 
"अगं हो... हो वैशू आले मी. जरा दम धर की!' 
मी दार उघडले. वैशाली आत आली आणि मला चक्क मिठीच मारली.  
"अगं अगं काय घडलंय? कसला आनंद झालाय तुला?' 
"तुला खूप खूप धन्यवाद... अगदी मनापासून धन्यवाद!' 
"अगं पण कशासाठी?' 
"तुझ्या आग्रहाखातर.... तू समजावून सांगितल्यामुळे, पण अगदी अनिच्छेनेच मी विवेकबरोबर पर्यटनासाठी गेले होते. पण आज मला कळतंय. मी तुझं ऐकलं नसतं, तर कदाचित या चांगल्या अनुभवाला मुकले असते. घरातील सर्व साफसफाई झाल्यानंतर जसं एखाद्या गृहिणीला छान वाटतं, तसंच मनातील जुन्या विचारांची सगळी जळमटं, राग-लोभांचा केरकचरा काढून टाकल्यामुळे मलाही स्वच्छ... छान मोकळं वाटलं, अँड क्रेडीट गोज टू यू..' 
"वैशाली, आता पुरे... तुझ्या ट्रिपचा सविस्तर वृत्तान्त मला सांगणार आहेस की नाही?' 
"हो, गं बाई... हो... ते सर्व तुला सांगण्यासाठीच तर मी आले आहे.'
"मग थांब जरा, आधी फक्कडसा चहा करते. मग गप्पा मारू या.'
"खरं तर तुझा चहा होईपर्यंतसुद्धा मला दम धरवणार नाही. तू चहा कर... मी तुझ्यासोबत किचनमध्ये येते. तुझं काम चालू ठेव... फक्त माझ्या बोलण्याकडे लक्ष दे....' 
"बर... बाई... तू म्हणशील तसं.' 

"अगं... तुला माहितीच आहे- विवेकनं एका हेल्थ रिसॉर्टमध्ये आमच्या दोघांचं १० दिवसांसाठी बुकिंग केलं. आणि आपल्याला जायचंय, एवढंच मला सांगितलं. मी एवढी रागावले त्याच्यावर. "मला विचारल्याशिवाय यानं बुकिंग का केलं' म्हणून मी भरपूर तोंडसुख घेतलं त्याच्यावर. प्रत्येक वेळेस हा मला गृहित का धरतो? मुलांची परीक्षा तोंडावर आलेली.... ऑफिसमधील कामाचा ताण... सुटी मिळणं अवघड आणि आत्ता कशाला यानं हे काढलं, या विचारांनीच माझं डोक भणभणलं. त्यानं त्याच्या परीनं मला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला; पण मी ऐकायला तयार होईन म्हणून त्यानं तुला सांगितलं आणि तुझा पेशा समुपदेशनाचा असल्यामुळं तू मला बरोबर समजावून सांगितलंस.'  

"वैशाली... हा टोमणा म्हणायचा की कौतुक?' 

"नाही गं... टोमणा नाही मारत... तुझं कौतुकच करतेय. खरंच.. माझ्या रुटीनमधून मी बाहेर पडायला हवं.... विवेकलाही समजावून घ्यायला हवं. त्याचा स्वभाव अबोल, घुमा असला तरी त्यालाही संवाद साधायला आवडतं. त्याला मोकळं करणं हेही गरजेचं आहे. मुलं मोठी झाली आहेत. त्यांची काळजी करण्याची गरज नाही. घरातील जबाबदाऱ्यांची त्यांनाही जाणीव व्हायला हवी आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे चाळीस- पंचेचाळीस वयानंतर प्रत्येकानं आपल्या आरोग्याकडं अधिक लक्ष द्यायला हवं... ऑफिसमधून सुटी काढून त्याच्याबरोबर जाण्यास तयार झाले.' 

"हो मला माहितीये... माझ्यावरही रागावलीस.... माझी मैत्रीण असून माझ्या बाजूनं कधी बोलत नाहीस, हेही मला ऐकवलं होतंस, बरं... ते जाऊ दे... पुढं काय झालं सांग?' 

"विवेकचा स्वभाव असा... मोजकंच बोलणं... स्वतःहून कोणाशीही ओळख करून घेणार नाही... बोलणार नाही. अशा घुम्या माणसाबरोबर मुलं सोबत नसताना दहा दिवस काढणं माझ्यासाठी अवघड होतं. लग्न झाल्यानंतर हनिमून ट्रिपचे आठ दिवस सोडले, तर आम्ही दोघंच असं कुठं कधी गेलो नव्हतो. लग्न झाल्यानंतर लगेचच दिवस राहिले आणि यशचा जन्म झाला... पुन्हा चार वर्षांत सलोनी... मग मुलांच्या शाळा... परीक्षा... दहावी... बारावी असं करता करता कुठं लांब ट्रिपसाठी बाहेर जाणं झालंच नाही. अगदीच कुठं गेलो तरी दोन ते तीन दिवस; तेही मुलांना घेऊनच... आता इतक्‍या वर्षांनी दोघांनीच जायचं, तेही आरोग्य पर्यटन... आयुर्वेद आणि निसर्गोपचार करून घ्यायचे... जिथं करमणुकीचं साधन म्हणजे टीव्ही नाही.. मोबाईलला रेंज नाही... कोणताही ओळखीचा ग्रुप नाही. अशा ठिकाणी आम्ही दोघंच... तिथं आम्ही दोघंच किती आणि काय गप्पा मारणार? सतत कामात असणारी मी... काहीही न करता दहा दिवस शांत कशी राहणार? अशा सगळ्या विचारांमध्ये मी अडकले होते. खरंतर मी स्वतःवरही वैतागले होते... का मी ऐकतेय त्याचं? तुझं तरी मी का ऐकलं?.. घरातील, ऑफिसमधील महत्त्वाची कामं सोडायची आणि तिथं जायचं...? असंख्य विचारांनी डोकं भणभणलं होतं.

अशाच विचारात मी तिथं पोचले. हेल्थ रिसॉर्ट असल्यामुळं सुरवातीलाच वैद्यकीय तपासण्या होत्या. अगदी अनिच्छेनंच साऱ्या तपासण्या केल्या. तिथल्या डॉक्‍टरांना तर मी "माझा आयुर्वेद आणि निसर्गोपचारावर अजिबात विश्‍वास नाही. माझ्या यजमानांसोबत इथं आले आहे; पण दहा दिवस इथं कसे काढणार? इतकं निवांत आयुष्य काढण्याएवढी वयस्कर मी आजिबात नाही, मला माझी खूप व्यवधानं आहेत. मला तर इथले कोणतेही उपचार घ्यायचे नाहीत,' असं स्पष्टच सांगून टाकलं. माझ्या अतिस्पष्टवक्तेपणाबद्दल विवेकला नेहमीच काळजी वाटायची. माझ्या या बोलण्यावर आता डॉक्‍टर काय म्हणताहेत आणि लगेचच परत जावं लागणार की काय, असे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते. आपण उगाचच एवढं बोलतोय, असं माझं एक मन मला सांगत होतं; पण दुसरं मन बंड करून उठलं होतं. पण तिथले डॉक्‍टर... पेशानं वैद्य असले तरी तुझ्यासारखं समुपदेशनाचं प्रशिक्षण त्यांनी घेतलं असावं... त्यांनी मला अतिशय शांतपणे सांगितलं, "मॅडम... तुम्ही कोणत्याही उपचारासाठी इथं आलेलाच नाहीत. तुमच्या दैनंदिन आयुष्यापेक्षा एक वेगळं जीवन अनुभवण्यासाठी तुम्ही इथं आलेला आहात... आणि हेच मनापासून स्वीकारा. शहरात... कॉंक्रीटच्या जंगलात तुम्हाला स्वच्छ मोकळा श्‍वास घेता येत नाही... निसर्गातील बदल अनुभवता येत नाही.... निसर्गाशी हितगुज करता येत नाही. ते तुम्ही इथं करू शकता. स्वतःच्या शरीराकडे आणि स्वतःच्या मनाकडे पाहणं म्हणजे काय, हे तुम्हाला इथं समजेल. इथं फक्त शरीराचंच नाही, तर मनाचंही आरोग्य चागलं राहील, असा प्रयत्न आम्ही करत असतो. गाडीला वेळोवेळी सर्व्हिसिंग केलं की गाडी जशी व्यवस्थित चालते... चांगलं ऍव्हरेज देते, तसंच शरीराचं आणि मनाचंही सर्व्हिसिंग या ठिकाणी केलं जातं. तुम्ही श्रद्धापूर्वक या गोष्टींकडं पाहा आणि या सर्व गोष्टींचा मनापासून आनंद घ्या.' त्यांच्या बोलण्यानं मी शांत झाले. 

"ठीक आहे.. मी प्रयत्न करेन,' असं मी त्यांना म्हणाले आणि विवेकला हायसं वाटलं.' 

"त्यानंतर आम्ही सिसॉर्टवरील आमच्या रूममध्ये गेलो. तेथील दिनचर्या समजावून घेतली. मीही मनानं ठरवलं.. सारं विसरून जायचं आणि हे आरोग्य पर्यटन मनापासून अनुभवायचं.' 

विवेकनं त्याच संध्याकाळी मला तेथील एका स्पॉटवर गेलं. डोगरावरील उंच भागावर आम्ही उभे होतो आणि समोर हिरवी शाल पांघरलेला टवटवीत निसर्ग.. दरीत लांबवर दिसणारं छोटंसं गाव... लांबूनच येणारा बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज... मधूनच येणारा मोरांचा आवाज... पक्ष्यांचा मधुर किलबिलाट... पावसाच्या पाण्यामुळं तयार झालेले छोटे धबधबे.. वाऱ्याच्या झुळकीनं होणारी पानांची सळसळ अहाहा....! निसर्गाचं ते रूप पाहून माझा वैताग, माझी चिडचिड पार पुसून गेली. वेळ मिळेल तेव्हा त्याच स्पॉटवर येऊन आम्ही निवांत बसत असू... तिथलं सर्व निरिक्षण करून मनात जेवढं साठवता येईल तेवढं साठवण्याचा मी प्रयत्न करू लागले.  

मला आणि विवेकला नुसत्या निखळ गप्पा मारायला कधी वेळच मिळाला नव्हता. सकाळी उठलं, की दिवसभरात काय करायचं, कोणती कामं पूर्ण करायची, कोणती बिलं भरायची, इएमआय किती राहिलेत, मुलांसाठी कोणती गुंतवणूक करायाची... यापलीकडं काहीही बोलणं नाही. दोघांनी घरातील गोष्टी सांभाळून आपापल्या दिशेनं कामाला जायचं. ऑफिसमधल्या मीटिंग्ज, कमिटमेन्टस, नवीन बदल आणि रोजचे नवीन ताण. संध्याकाळी घरी आल्यानंतर एकमेकांशी इतर काही बोलण्याइतका उत्साहही नसतो. केव्हा एकदा अंथरुणावर अंग टाकतो असं होऊन जातं. विवेकचं ऑफिस लांब असल्यामुळे प्रवासातच तो थकलेला असतो. अगदीच काही महत्त्वाचं काम असेल तर तेवढ्यापुरतं बोलायचं किंवा ऑफिसमध्ये काही आठवलं तर एसएमएस करायचा... मोजक्‍या शब्दांत. प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा आम्ही मोबाईलवरील एसएमएस आणि कॉम्प्युटरवर मेल चॅट यातच बोलतो, पण या ठिकाणी आल्यावर आम्ही मनसोक्त गप्पा मारल्या- अगदी कोणत्याही विषयावर. दोघांचं लहानपण... लग्नातील प्रसंग, हनिमूनच्या आठवणी, दोघांचं फ्रेंडसर्कल, मुलांना कसं वाढवलं... कसे दिवस काढले... इथपासून ऑफिसमधले कलीग्ज... त्यांचं राजकारण, पुढं काय करायचं आहे... मुलीचं लग्न... मुलांचं शिक्षण अगदी काहीही कधी कधी अगदी अर्थ नसलेल्या गप्पाही... निवांतपणा म्हणजे काय, निवांत गप्पा म्हणजे काय, हे आम्ही दोघांनीही अनुभवलं. एकमेकांच्या सुख-दुःखाचे क्षण, भावभावना समजून घ्यायला आम्हाला वेळ मिळाला. विवेकच्या लहानपणीचं वातावरण कसं होतं, लहानपणी स्वतःचं मत मांडण्याची संधी न मिळाल्यानं तो कसा अबोल झाला, या सर्व गोष्टी लग्नानंतर २३ वर्षांनी मला समजल्या.  
विवेकला खऱ्या अर्थानं मला समजून घेता आलं. त्याच्या भावभावना, त्याचे तणाव, त्याच्या आवडीनिवडी सारं काही समजलं. स्वतःच्या मनातलं कधी सांगायचं नाही आणि ऍडजस्ट करत राहायचं, हा त्याचा स्वभाव असल्यानं त्याच्या मनातील गोष्टी मला कधी कळल्याच नव्हत्या. कधीही मनमोकळं न बोलणारा विवेक किती गप्पा मारू शकतो, आवडती गाणीही म्हणू शकतो, हे मला तिथंच कळलं. केवळ विवेकलाच नाही, तर मी मलाही समजून घेऊ शकले. खूप गोष्टी आपल्याला करायच्या असतात; पण वेळ नाही, या कारणानं आपण त्या गोष्टी करत नाही. कधी कधी ज्या गोष्टी करायला आवडत नाही, त्याही करत असतो आणि स्वतःची ओळखच हरवून बसतो. तिथं खूप दिवसांनी मी चक्क कविताही केल्या. योगसाधना, प्राणायाम यामध्येही सहभागी झाले. मेडिटेशनमुळे मिळणारा मानसिक आनंद अनुभवला. स्वतःमध्येच डोकावून पाहिल्यामुळे स्वतःची नवीन ओळख झाली आणि अंतर्मनाची स्पंदनं ओळखण्याची कला आत्मसात केली. तेथील उपचारांमुळे शरीरशुद्धी झाली. शरीर हलकं झालं आणि मनही हलकं झालं. संपूर्ण दहा दिवस आम्ही एकमेकांशी गप्पा मारण्यात, मनसोक्त हसण्यात, परस्परांच्या सहवासात निसर्गाचा आनंद घेण्यात घालवले. रिसॉर्टमध्ये आमच्यासारखेच इतरही काही जण आले होते. तीही जोडपी होती. काही जण मित्रांबरोबर, भाऊ-बहिणींबरोबर, तर काही जण एकटेच आलेले होते. सर्वाच्या ओळखी झाल्या. त्यांची सुख-दुःखंही ऐकायला मिळाली. त्या सर्वांमध्ये आपण कुठं आहोत, हेही समजलं.' 

तिथला सकस आहार... गरमागरम आयतं जेवण... निवांतपणे घेतलेला सर्व गोष्टींचा आस्वाद आणि निसर्गाची स्वच्छ.. खोल श्‍वासात भरून घेतलेली मोकळी हवा... आणि मनमोकळ्या गप्पा मी कधीही विसरू शकणार नाही. मी येताना तेथील डॉक्‍टरांचे मनापासून आभार मानले. रोजच्या कामाच्या धबडग्यात अडकून मी माझे आनंदाचे क्षण हातचे घालवू पाहत होते, याबाबत मी त्यांच्याकडे दिलगिरीही व्यक्त केली. तुला सांगू, तिथून येतानाच आम्ही दोघांनीही काही गोष्टी ठरवल्या आहेत. आपली दिनचर्या थोडी बदलायची. कितीही धावपळीच्या, गडबडीचा, ताणाचा दिवस असला तरीही रोज थोडा वेळ तरी एकमेकांसाठी काढायचा. आणि एकमेकांशी मोकळं बोलायचंच.... एकमेकांशी संवाद साधायचा. खूप महत्त्वाचा असतो तो सहजीवनात. एकमेकांना खऱ्या अर्थानं समजून घेणं संवादामुळंच शक्‍य होतं. उशिरा का होईना, हे शहाणपण मला सुचलं. 

"वैशाली खरंय तुझं. एकमेकांशी संवाद साधणं, हे फार महत्त्वाचं आहे. पण तेच आता दुर्मिळ होत चाललंय. एकमेकांशी गप्पा मारणं हरवतच चाललंय. नात्यामध्ये खराखुरा संवाद घडतच नाही. आजकाल संवाद म्हणजे एकमेकांना माहिती सांगणं एवढंच होतं. तेही मोबाईलची बटणं दाबून, व्याकरण नसलेल्या तोकड्या शब्दांत. Thank you हा शब्दसुद्धा TY एवढाच टाइप करायचा. सुख-दुःख, भावभावना शेअर करण्यासाठी प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा इंटरनेट आणि व्हॉटस ऍपचाच आधार घेतला जातो. पती-पत्नीमधील संवादसुद्धा व्यावहारिक पातळीवरच होतो. म्हणूनच दोघांनी एकमेकांसाठी वेळ काढणं महत्त्वाचं असतं. दोघांचीही ती गरज असते. अनेक पती-पत्नीमध्ये खराखुरा संवाद घडतच नाही. पण याची जाणीव त्यांना नसते. परंतु त्याचे परिणाम मात्र दिसत असतात. शुल्लक गोष्टीवरून एकमेकांशी वाद होतात. "तुझी आई मला असंच का बोलली आणि तुझा भाऊ माझ्याशी तसंच का वागला' अशा वादालाही काही अर्थ नसतो. त्यासाठीच दोघांनीच घरातून कामातून वेळ काढून बाहेर जाणं.. रुटीनमधून बाहेर पडणं महत्त्वाचं असतं. पती-पत्नीच्या नात्यात दोघांनाही एकमेकांच्या सहवासाची- संवादाची ओढ असायला हवी. 

बऱ्याच वेळा एकमेकांशी वाद नको म्हणून नवरा-बायको एकमेकांशी बोलणंच टाळतात. पण एकमेकांबद्दलचा राग-उद्वेग मनात साठत राहिला, तर मनाचा कोंडमारा होतो. नकरात्मक भाव वाढत राहतात, आणि नाती कडवडट होतात. एकाच घरात राहूनही एकमेकांबद्दल अजिबात ओलावा नाही. ऑफिसमध्ये माझ्या काही मैत्रिणी मी अशा पाहिल्या आहेत. समाजाला दाखवण्यासाठी ते एकत्र राहतात. पण त्यांचा संसार होत नाही. त्यापेक्षा एकमेकांबद्दल जे वाटतंय ते मोकळेपणानं बोलणं झालं, तर त्या क्षणी थोडं वाईट वाटलं तरी मनात साठून राहणार नाही.' 

"वैशाली, खरंय तुझं म्हणणं; परंतु, बऱ्याच वेळेला स्त्रियांना कधी काय आणि किती बोलायचं याचं तारतम्य नसतं. ऑफिसमधून थकून भागून आलेल्या नवऱ्याला तो आल्याबरोबर त्याच्या आईच्या कागाळ्या करणं, नको त्या तक्रारी करणं सुरू होतं. पुरुषांच्या बाबतीतही जेवायला बसल्यावर स्वयंपाकावरून उणंदुणं बोलणं, कामाच्या वेळेतच काही तरी चिडचिड करणं चालू होतं. त्यातून वाद होतात. खरं तर आपले ताणतणाव आपल्याच माणसांवर आपण काढतो. पण थोडं तारतम्य ठेवलं, न आवडलेली गोष्ट केव्हा कधी बोलायची याचं भान ठेवलं, तर वादाची वेळ येणार नाही. दोघांमध्ये खऱ्या अर्थानं संवाद घडतील. त्यासाठीच अधूनमधून असं पर्यटनही काम करून जातं. खरंय की नाही?' 

"हो बाई, पटलं मला. सहजीवनासाठी संवाद हवाच आणि तो घडवून आणण्यासाठी प्रयत्नही करायला हवा...'

No comments:

Post a Comment