व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करा. बदलत्या परिस्थितीशी समायोजन करायला आपण शिकायला हवं. आपल्यामध्ये आपण बदल घडवून आणले नाहीत, तर या नवीन पिढीसोबत आपण जुळवून घेऊ शकणार नाही. कॉम्प्युटर शिकून घ्या. नेटवरून कशी माहिती मिळवायची हे शिकून घ्या. मुलांकडूनही काही गोष्टी शिकून घ्या. त्यामुळे मुलांचे आणि तुमचेही संवाद चांगले होतील आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे वाटतंय ते बोलून मोकळे व्हा. आतल्या आत घुसमटत राहून नका. पती-पत्नीच्या नात्यात भक्कमपणा आणण्यासाठी एकमेकांशी शेअरिंग करणं, संवाद साधणं खूप महत्त्वाचं असतं.
फिरुनी नवी जन्मेन मी
-स्मिता प्रकाश जोशी (समुपदेशक)
""संसारासाठी मी एकटीनं किती राबायचं? बरं एवढं करून माझी काही किंमत आहे का कोणाला? मोलकरणीला तरी दर महिन्याचा पगार मिळतो; मला तर एवढं काम करून पैशाचं राहू दे बाजूला, पण कौतुकाचा साधा एक शब्दही मला कधी ऐकायला मिळत नाही. काही म्हणायला गेलं तर माझा नवरा म्हणतो, "प्रत्येक बाईचं जे कर्तव्य असतं तेच तू करतीयस; त्यात वेगळं ते काय? मॅडम..... खरं सांगू का, माझी जगण्याची उमेदच नाहीशी झाली आहे.''
""अलकाताई, असं काय म्हणता? आत्ताशी तुम्ही चाळीशी ओलांडलीय; अजून आयुष्यात खूप काही करणं बाकी आहे. तुम्ही आत्ताच असं निराशाजनक बोलायला लागलात, तर पुढं कसं होणार? थोडासा स्वत:चाही विचार करा.''
""मी स्वत:चा विचार केला असता तर मला जगणं अवघड झालं असतं. आत्तापर्यंत उमेदीच्या काळात मन मारून मी सर्वांचा विचार करत आले आणि आता या वयात मी काय स्वत:चा विचार करणार? आमच्या घरात माझी अजिबात सत्ता नाही. सर्व लहान-मोठे निर्णय माझा नवराच घेत असतो. मुलांना कोणत्या माध्यमात शिकवायचं, कोणत्या ज्ञानशाखेत घालायचं, गुंतवणूक कुठं करायची, कोणती वस्तू केव्हा खरेदी करायची, मुलांच्या मोठ्या सुट्टीत फिरायला कुठं जायचं, इथपर्यंत ठीक आहे; पण एखाद्या वेळेस बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जायचं ठरलं तरी तिथंही कधी माझ्या मनासारखं होत नाही. घरात एक पैसा माझ्या हातात नसतो. मी कधी पैसे मागितलेच, तर "तुला काय हवंय सांग; मी आणून देतो, नाहीतर मी तुझ्या सोबत येतो, तुला हव्या असणाऱ्या गोष्टी घे,'' असं म्हटलं जातं. लग्नानंतर सुरवातीच्या काळात माझ्या मैत्रिणी मला म्हणायच्या, "तुझं बरंय बाई.... तुझा नवरा सगळं काही आणून देतो. सगळे निर्णय घेतो, तुला कशाची काळजी नाही.' मलाही परस्पर निर्णय घेतले जातात, हे सुरवातीला छान वाटायचं. नवऱ्याचं माझ्यावर किती प्रेम आहे आणि म्हणूनच तो मला काहीही त्रास देत नाही, असं वाटायचं. मी नोकरी करायची नाही. घरात लक्ष द्यायचं. माझ्या आवडी-निवडी, छंद बाजूला ठेवायचे, हेही मी सगळं ऐकलं; कारण कुटुंबासाठीचा त्याग, संस्कार, रूढी आदीचा पगडा माझ्यावर अधिक होता; पण सततची तडजोड आता मला सहन होत नाही. सतत मला गृहित धरलं जातं, याचं मला वाईट वाटतं. माझा नवराच असं वागत असल्यामुळे घरात मला काहीच किंमत नाही. सासू-सासरे दीर-नणंदा यांनी तर माझा कचराच केला आहे; पण माझी मुलंही मला विचारत नाहीत. मुलांचं कधी काही चुकलं आणि मी त्यांना काही जाब विचारायला लागले, तर ती माझं कधीही ऐकून घेत नाहीत. मला उत्तरंच देत नाहीत. उलट माझ्यावरच जास्त चिडचिड होते आणि "आईचं हे असंच असतं' असा सूर निघतो. इतके दिवस फक्त नवऱ्याच्याच तालावर नाचत होते; पण आता मुलांच्या तालावरही मला नाचावं लागतं. घरात माझ्या म्हणण्याप्रमाणे काहीच होत नाही. लग्न होऊन 22 वर्षं झाली; पण अजूनही माझ्या घरी मी पाहुणी आहे, याचाच मला त्रास होतो. घर सोडून निघून जावं असं वाटतं.''
""अलकाताई, अहो घर सोडून जाण्यानं किंवा जगण्याची उमेदच संपली असा विचार करून काही होणार नाही. तुम्ही सुरवातीपासूनच तुम्हाला नक्की काय हवंय, याचा विचारच केलेला नाही. बऱ्याच स्त्रियांच्या बाबतीत असंच घडतं, त्याचं कारण मुलीच्या जातीनं समजूतदारपणा दाखवायला हवा, असं बाळकडू मुलींना लहानपणापासूनच कळत-नकळत मिळतं आणि त्यामुळेच हळूहळू आपले निर्णय दुसऱ्यांनी घ्यायची एक सवयच होऊन जाते. सामाजिक परिस्थिती एवढी बदलली आहे, तरी अजूनही सर्व ठिकाणी मुलींना जे करिअर हवं आहे, ते निवडण्याचं स्वातंत्र्य आहेच असं नाही आणि तुमच्या तरुण वयात तर ते आजिबात नव्हतं. मुलीनं पुढे काय करायचं हे आई-वडील आणि लग्न झाल्यानंतर नवरा ठरवणार, अशीच पद्धत होती. घरचे नाही म्हणतायत तर राहू दे; वाद कशाला, असं म्हणून घरच्यांनी निवडलेला पर्याय स्वीकारावा लागायचा. घरातील मुलगी किंवा लग्न झाल्यानंतर नवीन सून स्वत:चं म्हणणं मांडू लागली, तर ती संस्कार नसलेली आहे, असं म्हटलं जायचं. अशा वातावरणात तुम्ही वाढलेल्या आहात त्यामुळे आपलं म्हणणं ठामपणे तुम्ही कधी मांडलच नाहीत. तडजोड करणं, परिस्थितीशी जुळवून घेणं म्हणजे प्रत्येक वेळी पडतं घेणं, असं होत नाही. दुसऱ्यानं घेतलेले निर्णय तडजोडीच्या नावाखाली स्वीकारले जातात; पण त्याचा असंतोष मनात कुठंतरी खोल दडून राहतो आणि तो नंतर असा उफाळून बाहेर येतो. मानसिक दौर्बल्य वाढतं आणि नकारात्मक विचार मनात येत राहतात.''
""मॅडम... तुम्ही म्हणताय ते खरं आहे. लहानपणापासूनच मन मारत तडजोडी करतच मी जगले. भावंडांमध्ये मी मोठी असल्यामुळे मला नेहमीच पडतं घ्यायला लागायचं. लग्न करून सासरी आले तर तिथं जावा-भावांत मी सर्वांत लहान म्हणून मला सर्वांचं ऐकावं लागायचं. मला काय हवंय हे मी कधी मनमोकळेपणानं सांगितलंच नाही. आपलं मत मांडलं तर भांडणं होतील, आपला उर्मटपणा दिसेल, या विचारानं मी गप्प बसायचे. पण हे मनात साठत राहिलं आणि आता गत आयुष्यात घडलेल्या अपमानास्पद घटनांचं स्मरण सतत होत राहतं आणि त्या घटनांमध्ये मी अडकून राहते. त्यामुळेच औदासीन्य आणि नैराश्येच्या भावनेत नाही ते विचार मनात येऊ लागतात. पण यातून बाहेर पडण्यासाठी आता मी काय करायला हवं, ते मला सांगा.''
""अलकाताई... नक्की तुम्हाला काय होतंय, आणि असे विचार का मनात येतात हे तुम्हाला समजलं. त्यामुळे यापुढे तुमच्यात बदल घडवून आणणं तुम्हालाच सोपं जाणार आहे. तडजोड, समजूतदारपणा, जुळवून घेणं हे सारं बोलायला सोपं असतं; पण त्याचा अतिरेक अगदी जवळच्या माणसांसाठी झाला तरी मनात नकारात्मक भावना तयार होतात. वाद नको म्हणून मन मारलं तरी त्याचा उद्रेक कधी ना कधी होणारच, हे लक्षात ठेवायला हवं. तडजोड ही सहज व्हायला हवी, त्याचं ओझं होता कामा नये. तसंच आपलं मत मांडणं म्हणजे उर्मटपणा होत नाही. आपल्या इच्छा-आकांक्षा, मत, विचार मांडता यायला हवेत. ते ग्राह्य धरले जावो वा न जावो, पण स्वत:च्या मनात ते साठून राहू नयेत, दबून राहू नयेत म्हणून मोकळं होणं आवश्यक असतं. तुम्ही आता चाळीशी ओलांडली म्हणजे तुमच्या मेनॉपॉजच्या काळाकडे तुम्ही चालल्या आहात आणि याच वयात ही नैराश्याच्या भावना, कमीपणाची भावना प्रखरतेनं जाणवायला लागते. म्हणूनच आता आपल्याला नक्की काय हवंय, याचा विचार करून आपलं मत मांडता यायला हवं. आता तुमच्यावर पूर्वीएवढी जबाबदारी राहिलेली नाही. मुलं मोठी झाली आहेत. म्हणून तुम्ही आता स्वत:साठी वेळ काढायला हवा. रांधा, वाढा, उष्टी काढा यापेक्षा वेगळं काहीतरी करायला हवं. समवयस्क मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये सामील होऊन नवीन मैत्रिणी करा.. ज्यांच्याशी तुम्हाला मनमोकळं बोलता येईल. भूतकाळातील घटनांवर पडदा टाकून वर्तमान काळात जगणं, आनंद मिळवणं आणि सुखा-समाधानाचे क्षण जपणं, अशी वृत्ती आत्मसात करायला हवी.''
""मॅडम, तुम्ही सांगताय ते कळतंय हो मला; पण मनातले विचार जात नाहीत. जे कळतंय ते वळवता येत नाही.''
अहो... आत्तापर्यंत मी या गोष्टींचा कधीच विचार केला नाही; पण मला हे जमेल का? घरातून एकटी मी कधीच बाहेर पडले नाही.''
""ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याच आता करायच्या आणि मला जमेल का, असा विचार करा... दुसरं असं, आपल्याला जमणारच, असा सकारात्मक विचार करा. दुसरं असं, तुम्हाला बोलले तर वाईट वाटून घेऊ नका; परंतु तुम्ही तुमच्या वयापेक्षा १० वर्षं अधिक प्रौढ दिसता. तुमच्या तब्येतीकडे तुमचं लक्ष नाही. वजन वाढतंय म्हणूनच तुमच्या कामकाजातून वेळ काढून थोडा व्यायाम सुरू करा. जिम सुरू करा आणि ते जमलं नाही तर किमान रोज चालण्याचा तरी व्यायाम करा. पार्लरमध्ये जा... मधून अधून फेशियल करणं, केस सेट करून घेणं या गोष्टीही करा. तुमचं व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करा. बदलत्या परिस्थितीशी समायोजन करायला आपण शिकायला हवं. आपल्यामध्ये आपण बदल घडवून आणले नाहीत, तर या नवीन पिढीसोबत आपण जुळवून घेऊ शकणार नाही. कॉम्प्युटर शिकून घ्या. नेटवरून कशी माहिती मिळवायची, हे शिकून घ्या. मुलांकडूनही काही गोष्टी शिकून घ्या. त्यामुळे मुलांचा आणि तुमचाही संवाद चांगला होईल आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे वाटतंय ते बोलून मोकळे व्हा. आतल्या आत घुसमटत राहू नका. पती-पत्नीच्या नात्यात भक्कमपणा आणण्यासाठी एकमेकांशी शेअरिंग करणं... संवाद साधणं खूप महत्त्वाचं असतं. इतके दिवस तुम्ही स्वत:चं मत मांडत नव्हतात त्यामुळे सुरवातीला घरातील सर्वांनाच अवघड वाटेल, वेगळेपणा वाटेल. कदाचित तुमचा अपमान होईल. तुम्ही मांडलेलं मत विचारात घेतलं जाणार नाही; पण तुम्ही लगेच निराश व्हायचं नाही. तुम्ही ठरवलेल्या गोष्टी करत राहायच्या. तुमचं आत्मभान जागृत करा आणि स्वत:मध्ये डोकावून पाहायला शिका, बास... मग तुम्हाला सगळाच बदल जाणवेल.''
""धन्यवाद मॅडम... तुमच्याशी नुसतं बोलूनही बरं वाटलं आणि तुम्ही मला भानावरही आणलंत... आता मी नव्यानं आयुष्याला सुरवात करेन. जुन्या विचारांची जळमटं झटकून टाकून नवीन बदल आत्मसात करण्याचा नक्की प्रयत्न करेन. काही अडचण आली तर तुम्ही आहातच.''
""हो नक्कीच. चला... तुमच्या नवीन आयुष्याला माझ्या शुभेच्छा!''
No comments:
Post a Comment