नाजूक वयाच्या निसरड्या टप्प्यावर मुलांना संभाळून घेणं... त्यांच्यावर विश्वास टाकणं, हे महत्त्वाचं ठरतं. मुलांच्या प्रत्येक वागण्याचा वेगळा अर्थ काढून त्यांना टोकत राहिलं, तर मुलं तुमच्याशी कधीही खरं बोलणार नाहीत. त्यासाठी मुलांना त्यांची पुरेशी स्पेस आणि स्वातंत्र्य हवं असतं. ते द्यावं लागतं. प्रत्येक वेळी संशय घेऊन त्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवण्यापेक्षा त्या काळातील धोक्याच्या कंदिलाची त्यांना जाणीव करून द्यायला हवी.
मुलांची समस्या सोडवताना घाई नको
-स्मिता जोशी (समुपदेशक)
"अस्मिता, अगं आज अचानक कशी आलीस? तुझा चेहरा का उतरलाय? काही घडलंय का? अमित भेटला का पुन्हा तुला?''
"नाही मॅडम... अमित मला वर्षभरात भेटलेलाच नाही, मुलींच्या संदर्भात काही बोलायचं असेल तर आम्ही फोनवरच बोलतो.''
"ठीक आहे... म्हणजे तुमच्या दोघांत वाद नाहीत. घटस्फोट होऊन पती-पत्नींमधले वाद मिटले, तरी मुलांच्या भेटी आणि त्यांचे प्रश्न यावरून वाद चालूच राहतात.''
"ठीक आहे... म्हणजे तुमच्या दोघांत वाद नाहीत. घटस्फोट होऊन पती-पत्नींमधले वाद मिटले, तरी मुलांच्या भेटी आणि त्यांचे प्रश्न यावरून वाद चालूच राहतात.''
"मॅडम... तसे कोणतेच वाद आता आमच्यात राहिले नाहीत. अमितशी घटस्फोट झाल्यानंतर एकटं राहणं आणि मुलींना एकट्यानं वाढवणं मी आता स्वीकारलं आहे. मुलींना काहीही कमी पडू द्यायचं नाही... मग त्यासाठी कितीही कष्ट करायला लागले तरी चालेल, हे मी ठरवलेलंच आहे. आज मी वेगळ्याच कारणासाठी तुमच्याकडे आलेली आहे.''
"काही गंभीर नाही ना?''
"माझी समस्या गंभीर आहे की नाही हे मलाच समजत नाही. मॅडम... माझी मोठी मुलगी अर्पिता १६ वर्षांची आणि छोटी आनंदिता १२ वर्षांची आहे. अर्पिताला १५ पूर्ण होऊन सोळावं सुरू झालं आहे. ती सध्या दहावीत आहे. अर्पिताला मी खासगी शिकवणीही लावली आहे. दहावीला तिनं चांगले मार्क मिळवावेत आणि पुढच्या करिअरच्या दृष्टीनं आत्तापासून प्रयत्न करावेत, असं मला वाटतं.''
"अस्मिता, अगं चांगला विचार करते आहेस तू. मग काळजी कसली करतीयस?''
""मॅडम... माझी समस्या पुढेच आहे. अर्पिता जिथं शिकवणीला जाते, तिथं एक मुलगा आहे. तो तिच्या शाळेतला नाही; पण शिकवणीच्या वर्गात ते एकत्र आहेत. तो मुलगा तिच्याकडे नेहमी पाहत राहतो आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत असतो. मला दोन-तीन वेळा तिनं ही गोष्ट सांगितली; परंतु तू दुर्लक्ष कर... तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे, असं मी तिला सांगितलं होतं. त्यानंतर पुन्हा मागील तीन-चार महिने हा विषय निघाला नाही; पण काल मी ऑफीसमधून आले तेव्हा तिच्या सायकलच्या कॅरिअरला एक पाकीट लावलेलं दिसलं. ती अभ्यासाचं काहीतरी विसरली असेल असं समजून मी ते काढून घेतलं आणि सहज पाहिलं तर त्यामध्ये एक पत्र मला सापडलं. ते पत्र वाचून मला खूपच टेन्शन आलं आहे. आता मी कोणती भूमिका घ्यावी, तेच मला समजत नाही. ते पत्र मी तुम्हाला दाखवण्यासाठी आणलं आहे.''
"प्रिय... प्रिय... प्रिय... अर्पिता...
तुझ्याशी बोलण्याचा किती प्रयत्न करतोय; पण तू माझ्याशी बोलत नाहीस म्हणून माझ्या भावना तुझ्यापर्यंत पोचवण्यासाठी मी तुला हे पत्र लिहीत आहे. जानू... नववीपासून आपण दोघं एका क्लासमध्ये आहोत. तेव्हापासून मी तुला पाहतो आहे. तुला पाहताक्षणीच तू मला खूप आवडलीस. तुझ्या जवळच्या बेंचवर बसायला मिळावं म्हणून मी खूप धडपड करायचो. तू नववीला आपल्या क्लासमध्ये टॉपर होतीस म्हणून तुझा सत्कार केला, त्या दिवशी तर तू इतकी छान दिसत होतीस, की मी तुझ्या प्रेमात पडलो. तू तो पर्पल कलरचा अनारकली ड्रेस घातलास की तुझ्याकडे बघतच राहावंसं वाटतं. तुझ्या डोळ्यांवर येणारी केसांची बट तू हलकेच बाजूला करतेस, तेव्हा तर तू खूपच छान दिसतेस. मी सारखा तुला न्याहाळत राहतो. त्या दिवशी टिचर काय शिकवतात याकडे माझं लक्षच नसतं. एखाद दिवशी क्लासमध्ये तू आली नाहीस तर मलाही क्लासमध्ये बसावं असं वाटत नाही. मला तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही. मी घरी गेलो तरी तू माझ्या नजरेसमोरून जात नाहीस. तुला काय सांगू, प्रत्येक क्षणी तू माझ्यासोबत आहेस असं सध्या मला वाटतं. "तुझे कैसे समझावू, तू मेरी धडकन में रहती हो' आणि मला माहिती आहे... तूही माझ्यावर तेवढंच प्रेम करतेस; पण तब बोलत नाहीस. तुझी अबोल नजर मला सारं काही सांगत असते. वर्गातून बाहेर पडताना तू माझ्याकडे बघत असतेस. तुझे काही संकेत मला कळतात. मग माझ्याशी बोलत का नाहीस? जानू... मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. तुझ्याशिवाय मला काही सुचतच नाही. मी माझ्या मनाला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो; पण काय करू, "बतमीज दील माने ना' असं मला म्हणावं लागतं. प्लीज मला भेट. मला तुझ्याशी खूप खूप बोलायचं आहे. क्लास संपल्यानंतर सगळी मुलं निघून गेली की सायकल स्टॅन्डजवळ मी थांबेन. प्लीज, प्लीज, प्लीज... माझ्याशी बोलायला थांब. तू माझ्याशी आता बोलली नाहीस तर मी काय करेन ते मी सांगू शकत नाही. मी वाट पाहीन... तुझ्या येण्याची तुझाच... सागर!''
ते पत्र वाचून मी बंद करून ठेवलं आणि अस्मिताकडे बघितलं. ती खूपच तणावात आहे हे दिसत होतं. खूप मोठं ओझं डोक्यावर घेऊन चालली आहे, असं तिच्याकडे बघून वाटत होतं.
""मॅडम... वाचलं ना तुम्ही पत्र! मला खूप टेन्शन आलंय... काय करावं तेच कळत नाही.''
""अस्मिता... तुला नक्की कशाचं टेन्शन आलंय? त्या मुलानं असं पत्र का लिहिलं? आपल्या मुलीचं कुठं चुकतं आहे का? तिच्या शिक्षणाचं काय होणार? तिला कसं समजवायचं? मुलीला वाढवण्यात आपण कुठं कमी पडतोय का? या समस्येला कसं सामोरं जायचं?.............. हेच, की यापेक्षा वेगळं काही?''
""खरं सांगू का? तुम्ही मनकवड्या आहात. समोर बसलेल्या माणसाच्या चेहऱ्याकडे बघूनच तुम्ही सारं काही ओळखता... मी वेगळं काय सांगू?''
"अगं, असं काही नाही माझ्याकडं येणाऱ्या मंडळींच्या आजपर्यंतच्या समस्या ऐकून त्या अनुभवातून मी हे बोलतेय. बरं ठीक आहे आपण त्या प्रत्येक प्रश्नाचाच विचार करू. आता मला एक सांग- हे पत्र तू तुझ्या मुलीला वाचायला दिलंस का?''
""नाही... मी अजून तरी तिला ते दिलेलं नाही. काल संध्याकाळी मला ते मिळालं आणि आज लगेचंच तुमच्याकडे ते घेऊन आले.''
""अस्मिता... तुझा तुझ्या मुलीवर विश्वास आहे?''
""अर्पितावर माझ्या विश्वास नाही असं नाही, पण तिच्या वागण्यातला बदल सध्या मला असह्य करतोय. तिच्या प्रत्येक निर्णयासाठी माझ्यावर अवलंबून असलेली अर्पिता स्वत:चे निर्णय आता स्वत: घेऊ लागली आहे. तिच्या मैत्रिणी वाढल्या आहेत. मोबाईल, नेट, व्हॉटस् अप या तिच्या जगात तिला माझ्याशी बोलायलाच वेळ नसतो. आमचे संवाद कमी झाले आहेत. मी ऑफिसमधून आले की मी स्वयंपाकाच्या कामात मग्न असते; ती तिचा अभ्यास आणि मोबाईल यामध्ये बिझी असते. कारणापुरतंच आमचं बोलणं होतं आणि बोलणं झालंच तर तिचा अभ्यास, तिचं मला न आवडणारं वागणं यावर माझी लेक्चरबाजी सुरू असते. तिला ते पटत नाही आणि मग आमचे वादच होतात. वाढत्या वयाबरोबर तिला तिच्या स्वतंत्र मतांची, हट्टी आणि आग्रही शिंगं फुटू लागली आहेत. आई म्हणजे जुन्या विचारांची... तिला नवीन जगाची काहीच माहिती नाही, असं तिला वाटायला लागतं. तिच्या काही गोष्टींमध्ये मी लक्ष घालायला लागले की तिला आजिबात आवडत नाही. या वयात मुलांना त्यांची स्पेस हवी असते, असं मलाच सुनावते म्हणूनच मला कधी कधी भीती वाटते. माझा जीव धास्तावतो. तिच्या इतर मैत्रिणींचे दोन्ही पालक (आई-बाबा) त्यांच्या घरी आहेत. एकानं रागावलं की एकानं जवळ घ्यायचं, या गोष्टी शिस्त लावण्यासाठी करता येतात; पण या मुलींची जबाबदारी माझ्या एकटीवरच आहे. त्यांनी काही चांगलं केलं तर आईचे कष्ट फळाला आले असं कोणीही म्हणणार नाही; पण जरा कुठं वाकडं पाऊल पडलं तर सगळे जण मलाच दोषी ठरवतील. आता या प्रकरणात तिला स्वत:ला त्या मुलाबद्दल खरंच काय वाटतंय, ते मला माहिती नाही; पण तिच्या मनात काहीही नसेल आणि तरीही तो मुलगा तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत असेल तर...? रिंकू पाटील सारखी अनेक प्रकरणं डोळ्यांसमोर येतात आणि भीती वाटायला लागते.''
"अस्मिता... एवढं घाबरण्याचं काहीच कारण नाही. हा एक असाच काळ असतो... इटस् जस्ट फेझ! मुलं मोठी होत राहतात. त्यांना त्यांचं स्वतंत्र विश्व असतं आणि त्यात कोणीही लुडबूड केलेली चालत नाही. परंतु अत्यंत नाजूक वयाच्या निसरड्या टप्प्यावर मुलांना सांभाळून घेणं... त्यांच्यावर विश्वास टाकणं... हे महत्त्वाचं ठरतं. मुलांच्या प्रत्येक वागण्याचा वेगळा अर्थ काढून त्यांना टोकत राहिलं, तर मुलं तुमच्याशी कधीही खरं बोलणार नाहीत. मुलं आणि पालक यांच्यातील संबंधात प्रामाणिकपणा येण्यासाठी पालकांनीच कसोशीनं प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी मुलांना त्यांची पुरेशी स्पेस आणि स्वातंत्र्य हवं असतं. ते द्यावं लागतं. प्रत्येक वेळी संशय घेऊन त्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवण्यापेक्षा त्या काळातील धोक्याची त्यांना जाणीव करून द्यायला हवी. मुलांना समजावून घेताना आपला तोल सुटायला नको, याची काळजी घ्यायला हवी.''
"मॅडम... तुम्ही सांगताय ते सगळं पटतंय मला; तरीही मुलीच्या बाबतीत जरा जास्तच सजग असणाऱ्या माझ्यामधल्या "आई'ची समजूत मलाच घालता येत नाही. मुलीच्या आयुष्याची घडी थोडीसुद्धा विस्कटू नये यासाठी मी सतत प्रयत्न करीत राहते. म्हणूनच या पत्र प्रकरणामुळे मी अस्वस्थ झाले आहे. त्या मुलाला भेटून जाब विचारावा की अर्पिताशी बोलून तिच्या मनात काय आहे ते विचारू; ट्यूशन टिचरशी बोलू की सरळ त्या मुलाच्या आई-वडिलांना गाठून त्यांच्या कानावर ही गोष्ट घालू; का हे सगळं करत बसण्यापेक्षा अर्पिताचा क्लास बदलून टाकू, असे असंख्य विचार माझ्या मनात फेर धरून उभे राहतात. अशा प्रसंगात आता आपण एकटेच आहोत, कोणीही जोडीदार नाही. आपल्याला कोणाचाच आधार नाही, या विचाराने अधिकच निराश व्हायला होतं.''
"अस्मिता, अगं निराश होऊन कसं चालेल? तुझ्यातली "आई' मी समजू शकते; पण अर्पिता आणि आनंदिताची तू केवळ आई नाहीस तर आई आणि बाबा या दोन्हीही भूमिका तू पार पाडते आहेस. त्यामुळेच केवळ भावनाशील होऊन चालणार नाही. ही परिस्थिती तू स्वीकारायला हवीस आणि हा प्रश्न कौशल्यानं हाताळायला हवास. हे पत्र तू अर्पिताला लगेच दाखवलं नाहीस, हे चांगलंच केलंस. कारण या वयात आपलं कोणीतरी कौतुक करावं, आपल्याला चागंलं म्हणावं... आपल्यावर कुणीतरी प्रेम करावं अशा भावना मुलींच्या मनात नैसर्गिकरीत्या निर्माण होत असतात. त्यामुळे कदाचित त्या मुलाबद्दल तिच्या मनात तशा काही भावना नसतील तरीही त्या निर्माण होऊ शकतात. हा विषय वेगळ्या पद्धतीनं काढून तू तिच्या मनातलं सगळं जाणून घे. यातून मार्ग काढण्यासाठी अर्पिताचा क्लास बदलून, तिच्या टिचरच्या कानावर घालून, त्या मुलाच्या आई-वडिलांना बोलावून घेऊन त्यांच्याही कानावर या गोष्टी घालून कोणतेही वादविवाद न करता शांतपणे मार्ग काढ. मुलांना समजावून सांगून त्यांचं आत्ताचं वय हे प्रेमात पडण्याचं नसून अभ्यासाचं, पुढील करिअरचा विचार करण्याचं आहे, हे दोघांनाही समजावून सांगायला हवं. आयुष्यात सर्व गोष्टी मिळत असतात; पण घाईघाईनं त्या ओरबाडून घेऊ नका, या बाबतीत त्यांना समजावून सांगायला हवं. त्यांच्या मनातील वादळं समजून घ्यायला हवीत. काही निर्णय नाईलाजानं घ्यायला लागतात; पण ते शहाणपणाचे असतात. रुसवे-फुगवे धरून, आदळआपट करून कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत; म्हणूनच आता ज्या गोष्टी बदलताच येणार नाहीत त्याचा शांत आणि समंजस स्वीकार करणं महत्त्वाचं आहे. या वयामध्ये न संपलेलं बालपण आणि येऊ घातलेलं तारुण्य यांचा मेळ घालणं आणि हा टप्पा सुरक्षितपणे पार पाडणं महत्त्वाचं आहे, एवढंच त्यांना समजावून सांगायलं हवंस. तुझी अर्पिता अतिशय सालस आणि गोड मुलगी आहे. तुमच्या दोघांच्या घटस्फोटामुळे ती प्रगल्भ आणि स्वतंत्र विचारांची झाली आहे. थोडंसं अकाली प्रौढपण तिला आलेलं आहे. तुझ्या आधाराला मुलींशिवाय कोणीही नाही याचीही तिला जाणीव आहे. ती चुकणार नाही. फक्त तिच्यावर विश्वास ठेव. जेव्हा तिला तुझ्या मदतीची, मार्गदर्शनाची गरज लागणार आहे तेव्हा आई आपल्यासोबत आहे, हा विश्वास तिलाही वाटायला हवा.''
"मॅडम... माझ्या अनेक प्रश्नांची आणि शंकांची उत्तरं मला मिळाली. मी ही परिस्थिती योग्य रीतीनं हाताळेनच; पण यापुढंही अर्पितावर उगाचच शंका न घेता तिला समजावून घेण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्यातली "आई' पुन्हा पुन्हा डोकावू लागली तरी तिला समजावेन.''
""जस्ट चिल' अस्मिता! ''आणि आम्ही दोघीही खळाळून हसलो... खरंच... जस्ट चिल!
""जस्ट चिल' अस्मिता! ''आणि आम्ही दोघीही खळाळून हसलो... खरंच... जस्ट चिल!
No comments:
Post a Comment