दैनंदिन जीवन जगत असतांना या सर्वसामान्य माणसाच्या जीवनात असे काही शब्द आहेत की जे बोलताना त्याची घनता, त्याचा खोल गेलेला अर्थ पटकन लक्षात येत नाही पण ते शब्द असे काही कटू अनूभव शिकवून जातात की काहींचा अर्थ जेवढा लावु तेवढा लागतो, जेवढा ताणू तेवढा ताणतो, जेवढा मनावर घेऊ तेवढा घेता येतो आणि एकदा का त्या शब्दाने किंवा त्या शब्दाच्या अर्थाने आपल्या मनाचा ताबा घेतला ना की मग आपण त्या शब्दाप्रमाणे किंवा त्या शब्दाच्या अर्थाप्रमाणे समोरच्या व्यक्तीसोबत वावरतो.
माणुसकी
माणसाने मनाने जगावे, चांगल्या मनाने. ते प्रत्येकाचे वेगळे असते मन. पण, त्यामध्ये असावा माणुसकीच्या प्रेमाचा प्रेमळ व्रण, छानशा काळजात प्रेम ठेवावे, सदैव घरटे करून माणसाच्या हृदयात स्थान मिळवावे.
दैनंदिन जीवन जगत असतांना या सर्वसामान्य माणसाच्या जीवनात असे काही शब्द आहेत की जे बोलताना त्याची घनता, त्याचा खोल गेलेला अर्थ पटकन लक्षात येत नाही पण ते शब्द असे काही कटू अनूभव शिकवून जातात की काहींचा अर्थ जेवढा लावु तेवढा लागतो, जेवढा ताणू तेवढा ताणतो, जेवढा मनावर घेऊ तेवढा घेता येतो आणि एकदा का त्या शब्दाने किंवा त्या शब्दाच्या अर्थाने आपल्या मनाचा ताबा घेतला ना की मग आपण त्या शब्दाप्रमाणे किंवा त्या शब्दाच्या अर्थाप्रमाणे समोरच्या व्यक्तीसोबत वावरतो. प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. कधी ती लगेच पहायला मिळते तर कधी कधी ती शोधावी लागते. कधी समोरच्या व्यक्तीच्या वागण्यातून तर कधी बोलण्यातून त्याची ओळख होत असते.
प्रत्येक शब्द कितीही छोटा वा मोठा असो त्या शब्दाच्या गर्भितार्थावरून त्या शब्दाची जाडी-रूंदी आणि त्याची विस्तृतता कळते. त्यापैकी असाच एक जो आपल्या सर्वांना परिचित असलेला पण त्याची फारशी खोल ओळख नसणारा शब्द म्हणजे ‘माणुसकी’. ओळख नसणारा शब्द यासाठी की आजचा माणूस माणसाची ओळख विसरत चालला आहे, ‘माणुसकी’ हा केवळ शब्दच नव्हे तर पर्यायाने आपल्या रोजच्या जगण्यातून खुद्द माणूसकीच गहाळ होत चालली आहे असे चित्र आहे. ऎकायला आणि बोलायला अगदीच सहज आणि सोपा वाटणारा हा शब्द, पण त्याचा नेमका अर्थ काय..
माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर, माणूसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणुस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात. खरच पाहायला मिळते का या सध्याच्या धावपळीच्या जगात ही माणुसकी.
पण या माणुसकीला जर ओळखायचे असेल तर असे अनेक प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात आले असतील आणि जरी अद्याप आले नसतील तरी कधी ना कधी ते नक्कीच येतील. जीवनात आलेल्या त्या प्रसंगाना अगदी एकांतात बसून बारकाईने त्यावर नजर टाका म्हणजे माणुसकीतला माणूस किंवा माणसातली माणुसकी शिल्लक राहिली आहे का हे कळेल. या जगात कोणीही तुमचा मित्र किंवा शत्रु म्हणून जन्माला येत नाही. आपली वागणूक, आपला दृष्टीकोण, आपली नाती आणि त्यापेक्षा त्या नात्यांमधील प्रेम यावर ठरते कोण आपला मित्र कोण आपला शत्रू आहे ते. मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नाही तर त्याच्या विचार आणि कर्तुत्वावर अवलंबुन असते. तुमच्या विचारातूनच तुमचं व्यक्तिमत्व झळकत असतं, त्याकडे तुमचे लक्ष नसले तरी इतरांचे लक्ष असते, तुमचे विचार समजले की तुम्ही समजलात, म्हणून सुंदर विचार करा आणि सुंदर व्यक्तिमत्व घडवा.
No comments:
Post a Comment