थोडं माझ्या विषयी

Wednesday 3 February 2016

वास्तव्याशी तडजोड हवी

आपण लक्षात घेत नाही की आपण दोघे तेच असलो तरी आपल्या Perception आणि Priorities बदललेल्या आहेत.. दोघांच्याही.. तेव्हा वास्तवाचं स्वागत करायला हवं.. अवखळ मनाला समजावयास हवं .. ज्यांना हे जमत नाही त्यांच्या ओंजळीत जखमाळलेले काटे कायम खुपत रहाणार.. सगळी नाती ही आपल्यासाठी नि आपल्या सोबत्यासाठी वर्तमानाचा आनंद असायला हवीत.. भविष्यासाठी ठेवा.. चोरकप्प्यातला दोघांच्याही.





वास्तव्याशी तडजोड हवी

आपल्या सर्वांच्या तोंडी बऱ्याच वेळा हे वाक्य येते ..तू आता पूर्वीसारखा नाही राहिलास ..राहिलीस.. या वाक्यावर जरा गौर केलं की आढळून येते की या वाक्यातून व्यक्त झालेल्या विचारात दोन वेगळ्या काळातील दोन वेगळ्या व्यक्तीमधील व्यवहाराची तुलना करून आपला अभिप्राय दिला आहे. या “ तू ” शी आपले कधी काळी मित्रत्वाचे नाते जुडले असते.

आयुष्यातील गाण्यातील आठवणीने आठवाव्याश्या वाटणाऱ्या गोड गोड ओळीचे शब्द दोघानी हातात हात घालून लिहलेले असतात.. त्या शब्दांना दिलेली सुरावट केवळ  दोघांच्या हातूनच घडावी असं काहीसं विधात्याच्या मर्जीत असावं जणू.. हे सारं सारं त्या वेळच्या वर्तमानाला सुसंगत असतं.. त्या क्षणांना  चिरंजीवत्व मिळालंय अश्या बेहोशीत आपल वागणं असतं .. जगणं असतं .. अन यात अनैसर्गिक काहीच नाही बरं.. काळाचे काटे चालत राहिलेत .. चालत रहातात.. आणि  चालत राहणार ... हे त्रिवार सत्य आपल्याला हुलकावणी द्यायला लागते.. आपल्या भावना नि तिचे साद.. पडसाद नि त्यानंतरचा नाद.. रेंगाळणारा निनाद थांबायचं नावच घेत नाही..या संमोहित अवस्थेत आपण त्या सगळ्या दिशांना “Statue” करण्याची इच्छा बाळगतो.

त्या नात्याच्या हिंदोळ्यावर झोकावणारा वारा ..कातरवेळ साधून आपणाला हाका मारीत असतो ..आपण त्या हाकांना हात हलवून प्रतिसाद देण्यासाठी हात उचलू पाहतो ...परंतु त्या हातावर काळाच्या प्रवाहात वाहून गेलेल्या दिवसांचे ओझे पडलेले असते ..त्या मुळे हात उचलत नाही ..आपल्याला राग तर येतोच ..मी आहे  तोच आहे ...तो ही तोच आहे.. मग आज त्या नात्याला आजच्या वर्तमानात पहिल्या ..दुसऱ्या
..अगदी शेवटच्या तरी पानावर अंमळ विसावायला होकार का मिळत नाही ..आपल्याला दुर्लक्षित करून (The best way to kill the enemy is to neglect him..) थेट दोस्ताच्या यादीतून दुष्मनाच्या प्रांतात तडीपार का केले गेले असं वाटू लागणं साहजिक असलं तरी ते विवेकाच्या कसोटीवर गैरलागू आहे...कारण काळाच्या पडद्यावर कितीही सुंदर रंगाचं इंद्रधनुष्य रेखाटलं तरी मावळणारा प्रत्येक दिवस त्याचा रंग फिकट फिकट करून मावळत असतो.

प्रत्येक जण एक स्वतंत्र आयुष्य घेऊन जन्माला आलाय ..आणि प्रत्येकाचे जगण्याचे हेतू वेगळे असतात..इशारे आगळे असतात..प्रत्येकजण त्याच्या आयुष्याला सामोरं जाताना घडणाऱ्या घटनांचे ..नात्यातील व्यवहाराचे त्याच्या चष्म्यातून अवलोकन करून त्याच्या सोयीचे अर्थ निघण्याच्या दिशेने पृथ:करण करीत असतो ..नि घाईघाईने निष्कर्ष काढून मोकळा होतो ..आपण लक्षात घेत नाही की आपण दोघे तेच असलो तरी आपल्या Perception आणि Priorities बदललेल्या आहेत.. दोघांच्याही.. तेव्हा वास्तवाचं स्वागत करायला हवं.. अवखळ मनाला समजावयास हवं .. ज्यांना हे जमत नाही त्यांच्या ओंजळीत जखमाळलेले काटे कायम खुपत रहाणार.. सगळी नाती ही आपल्यासाठी नि आपल्या सोबत्यासाठी वर्तमानाचा आनंद असायला हवीत.. भविष्यासाठी ठेवा.. चोरकप्प्यातला दोघांच्याही.

No comments:

Post a Comment