थोडं माझ्या विषयी

Showing posts with label तिर्थक्षेत्र. Show all posts
Showing posts with label तिर्थक्षेत्र. Show all posts

Tuesday, 17 March 2015

पौराणिक वारसा लाभलेलं नाशिक

सहयाद्री पर्वताच्या कुशीतील गोदावरी नदीच्या तीरावर नाशिक हे शहर वसलेले आहे. नाशिक हे शहर पुराणकाळापासून प्रसिध्द व पवित्र क्षेत्र म्हणून ओळखले जाते. पौराणिक काळातील चौदा वर्षाच्या राम लक्ष्मण यांचे वनवास काळात नाशिक जवळील जंगलात लक्ष्मणाने शूर्पनखा नावाच्या राक्षसणीचे नाक कापले होते. संस्कृ त भाषेत नाकाला नासिका म्हणतात, म्हणून या भागाचे / जिल्हयाचे नाव नाशिक असे पडले.


पौराणिक वारसा लाभलेलं "नाशिक"

सहयाद्री पर्वताच्या कुशीतील गोदावरी नदीच्या तीरावर नाशिक हे शहर वसलेले आहे. नाशिक हे शहर पुराणकाळापासून प्रसिध्द व पवित्र क्षेत्र म्हणून ओळखले जाते. पौराणिक काळातील चौदा वर्षाच्या राम लक्ष्मण यांचे वनवास काळात नाशिक जवळील जंगलात लक्ष्मणाने शूर्पनखा नावाच्या राक्षसणीचे नाक कापले होते. संस्कृ त भाषेत नाकाला नासिका म्हणतात, म्हणून या भागाचे / जिल्हयाचे नाव नाशिक असे पडले. 

नाशिक शहरात गोदावरी जेथे दक्षिणवाहिनी झाली तेथे अनेक पवित्र कुंडे असून प्रत्येक कुंडाचे वेगळे महत्व आहे. अरूणा संगमाच्या ठिकाणी असलेल्या रामकुंडात प्रभू रामचंद्र व सीतामाई स्नान करीत. संगमाच्या ठिकाणी असलेल्या रामकुंडातच अस्थीविलय कुंड असून तेथे प्रभू रामचंद्राने श्राध्दविधी केले. या कुंडातच अस्थीविलय कुंड असून तेथे अस्थी विसर्जन केले जाते. साडेतीन तासात अस्थीचे विलय होते. १६९६ मध्ये सातारचे चित्राव यांनी रामकुंड बांधले तर १७२८ मध्ये या रामकुंडाला गोपीकाबाईंनी लक्ष्मण कुंडाची जोड दिली. तसेच सीताकुंड, धनुष्यकुंड, अहिल्याकुंड, दुतोंडया मारूती कुंड, सूर्य कुंड, गोरेराम कुंड, रामगया कुंड, पेशव्यांचे कुंड, खंडोबाचे कुंड, मुक्तेश्वराचे कुंड इ. कुंडे आहेत.

रामकुंडाच्या येथे गोदावरी दक्षिणवाहिनी होते. म्हणून नाशिकला तिचे वेगळे महत्व आहे. रामकुंडाच्या ठिकाणी वंशवृध्दीसाठी एकवस्त्र विधी करतात. तसेच श्राध्द व पिडाला काकस्पर्शाने मुक्ती मिळविणे याचे ही इथे महत्व आहे.

त्रंबकेश्वर मंदिर

निसर्गरम्य परिसर - त्रंबकेश्वर डोंगराच्या कुशीत वसलेले नयनरम्य स्थान आहे. श्रावण महिन्यात हिरव्या पाचूच्या बेटासारखे हे चिमुकले गाव दिसते. मध्यभागी गंगासागर कुंड आहे. गावाचा पाणीपुरवठा येथून होतो. कुशावर्त कुंड तर तीर्थांचे तीर्थ म्हणून समजले जाते. ब्रम्हगिरी पर्वत समुद्रसपाटीपासून १२९४ मीटर्स (४२४६ फुट ) उंच आहे. अनेक धार्मिक विधी केले जातात. नारायण नागबली विधीसाठी देशाच्या कानाकोप-यातून मान्यवर येत असतात. येथे क्षेत्रस्थ ब्राहमणांनी आपल्या यजमान घराण्याच्या पुरातन वंशावली जपल्या आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अनेक ऐतिहासिक मान्यवरांचे हस्ताक्षर आहे.

भगवान शंकराचे हे भव्य मंदिर हेमाडपंथी पध्दतीने बांधलेले आहे. या मंदिरास त्या काळी सुमारे ३० लाख रूपये खर्च आला. १७४५ ते १७७५ च्या दरम्यान पेशव्यांनी हे पवित्र कार्य केले. मंदिराचे काम संपूर्ण काळया दगडात आहे. कोरीव काम अतिशय सुबक असून मंदिर भव्य आणि पवित्र आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराशी नगारा घर आहे. मंदिराच्या चहुबाजूंनी मोठी तटवजा भिंत आहे, तर परिसर दगडांनी बांधलेला आहे, आत भक्तांना स्नान करायला व पाय धुवायला कुंड आहे. मंदिराचा गाभारा अतिशय शांत व पावित्राने आणि मांगल्याने भरलेला आहे. शिवलिग हे स्वयंभू आहे. पिडीत ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे दर्शन होते. दर सोमवारी पालखी निघते. मंदिराचा कळस सोन्याचा आहे.

श्रीसिहस्थ गोदावरी मंदिर

रामकुंडाच्या उत्तरेस हे मंदिर असून फक्त १२ वर्षांनी, म्हणजेच सिहस्थ कुंभमेळयाचे वेळीच १ वर्षभर हे मंदिर उघडते. वर्षातून दोनदा ज्येष्ठ शु !! १० (दशहरा) व कार्तिक शु !! १५ त्रिपुरी पौर्णिमा दीपोत्सवासाठी हे मंदिर उघडले जाते. या मंदिरात भगिरथीची मूर्ती आहे. सिहस्थ गोदावरीचे मंदिर फक्त नाशिकक्षेत्रीच आहे.

श्रीगंगा गोदावरी मंदिर

हे मंदि रामकुं डाच्या पूर्वेला अरूणा संगमाजवळ असून येथे मकर वाहिनी गोदावरी व भागिरथी अशा दोन मूर्ती आहेत. तीर्थयात्रेची गंगाभेट या मंदिरात करतात. या मंदिराची व्यवस्था श्रीगंगा गोदावरी पंचकोटी ( पुरोहीत संघ ) या संस्थेकडे आहे. हया मंदिरात नित्य अभिषेक, पूजा, सप्तशती पाठ, आरती इ. कार्यक्रम होतात.

श्रीकाळाराम मंदिर

नाशिक क्षेत्रातील हे प्रमुख मंदिर मानले जाते. प्रभू रामचंद्र वनवासात असताना पंचवटीत आल्यानंतर जेथे त्यांनी वास केला होता, त्या ठिकाणी पुरातन मंदिर होते. हया पुरातन मंदिराचा जीर्णोध्दार पेशव्यांचे सरदार श्री. ओढेकर यांनी केला. इ.स.१७७८ ते १७९० म्हणजेच १२ वर्षे मंदिराचे बांधकाम चालले हाते. भव्य मंदिर व सभामंडप यासाठी २३ लाख रूपये खर्च झाल्याची नोंद आहे. हे मंदिर रामसेज येथील काळया दगडांचे बांधले असून अतिशय सुंदर व कलात्मक असे आहे. मंदिराच्या चारही दिशांना भव्य द्वार आहेत. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिरातील मूर्ती वालूकामय आहेत. तसेच मंदिराचा कळस सोन्याचा आहे. चैत्र शुध्द प्रतिपद (गुडीपाडवा) ते शुध्द नवमी (रामनवमीपर्यंत) ‘‘श्रीराम जन्मोत्सव‘‘ मोठया प्रमाणात साजरा केला जातो. चैत्र शुध्द एकादशीला रामरथ व हनुमानरथाची यात्रा निघते. हया रथयात्रेचे दृश्य पाहण्यासाठी असंख्य भाविक नाशिकला येतात.

सीतागुंफा

श्रीकाळाराम मंदिराच्या उत्तरेस हे स्थान आहे. सीतचे वास्तव्य या ठिकाणी होते म्हणून हे स्थान सीतागुंफा नावाने ओळखले जाते. सीतागुंफेत भुयारा सारख्या अरूंद मार्गातून जावून येण्यास लहान मुलांना गंमत वाटते. या ठिकाणी पाच वटवृक्ष आहेत. म्हणून ते ‘पंचवटी‘ नावाने प्रसिध्द आहे.

श्रीकपालेश्वर मंदिर

ज्या मंदिरात भगवान शंकराच्या पुढे नंदी नाही असे एकमेव मंदिर म्हणजे नाशिकचे कपालेश्वर मंदिर, त्याची आख्यायिका अशी आहे की, ब्रह्मदेवाच्या एका मुखाने केलेली भगवान विष्णूची निदा ऐकून भगवान शंकराने त्या मुखाचा छेद केला. परंतू त्यामुळे ब्रह्महत्येचे पातक लागले म्हणून ते पळू लागले. पळताना विश्रांतीसाठी थांबले असताना गाय - वासराचा (बैलाचा) संवाद ऐकला. बैल म्हणत होता की, ‘‘उद्या मी माझ्या मालकाला ठार करीन ‘‘ तेव्हा गाय म्हणाली की, ‘‘तू असे करू नको. कारण ब्रह्महत्येचे पातक लागेल‘‘. तेंव्हा बैल गाईला म्हणाला की, मला ब्रह्महत्या विनाशाचे तीर्थ कोठे आहे याची माहीती आहे‘‘ त्याप्रमाणे दुस-या दिवशी त्या बैलाने आपल्या मालकाला ठार केल्यावर तो तेथून पळत निघाला हे पाहून शंकरही त्याच्या मागे निघाले. त्या बैलाने (नंदिने) नाशिकला रामतीर्थावर अरूणा संगमाच्या ठिकाणी उडी मारताच तो शुध्द झाला. हे पाहून भगवान शंकरही या अरूणा संगमावर स्नानादी कर्मे करून शुध्द झाले व समोरच कपारीत बसले. त्यांच्या मागचे ब्रह्महत्येचे पातक नाहिसे झाले. नंदीमुळे ब्रह्महत्या विनाशाच्या स्थानाचे ज्ञान झाले म्हणून त्यास गुरूसमान मानून शंकराने नंदिला आपल्यासमोर बसविले नाही. त्यामूळेच संपूर्ण भारतात भगवान शंकरापुढे नंदी असला तरी कपालेश्वरसमोर मात्र नंदि नाही. असे हे एकमेव आहे.

सुंदर नारायण मंदिर

भगवान विष्णूंना जालंदर पत्नी वृंदा हिच्या शापाने कृष्णवर्णरूप प्राप्त झाले. (त्याला आपण शालिग्राम म्हणतो) तेव्हा महाविष्णूंनी गोदावरी तीर्थावर स्नान करून आपले रूप पूर्ववत प्राप्त करून घेतले व तेथेच वास्तव्य केले तेंव्हापासून सुंदरनारायण मंदिर प्रसिध्द झाले. गोदावरीच्या तीरावर व्हिक्टोरिया पुलाजवळ म्हणजे आताच्या होळकर पुलाजवळील हे मंदिर १७५६ मध्ये गंगाधर यशवंत चंद्रचुड यांनी पुन्हा बांधले. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराचे वैशिष्टय म्हणजे २० व २१ मार्च रोजी सूर्याचे किरण विष्णूच्या मूर्तीवर पडतात. म्हणून याला ‘हरिहर भेट‘ असेही म्हणतात. हेच मंदिर औरंगजेबाने उध्वस्त करून तेथे थडगे बांधले होते. पेशवे काळात हे थडगे काढून तेथे भव्य मंदिर साकार झाले व आक्रमणाचे पाप धुतले गेले.

श्री सप्तश्रृंगी देवी मंदिर व श्री नारोशंकर (रामेश्वर) मंदिर

ही दोन्ही मंदिरे रामगया तीर्थावर पंचवटीमध्ये वसलेली आहेत. ही दोन्ही स्थाने जागृत असून सरदार राजेबहादूर या घराण्याची आहेत. हया ठिकाणी इतिहासप्रसिध्द नारोशंकराची घंटा आहे. वसईच्या लढयातून पेशव्यांनी ही घंटा जिकून आणलेली आहे.

बालाजी मंदिर

रामसेतू पुलाअलिकडे सरकारवाडयाजवळ हे मंदिर उभे आहे. ते १७७१ मध्ये बांधले गेले. मंदिरातील देखण्या मूर्ती तामिळनाडू राज्यातील पण्णवेल्ली गावात गणपतीबुवा गोसावी यांना सापडल्या. बालाजीचा मुकूट सोनेरी असून त्यावर रत्ने व माणके जडविलेली आहेत. या मंदिराचा ट्रस्ट असून संस्थानचा कारभार व गरजूंना आर्थिक मदत या ट्रस्ट तर्फे होते.

मुरलीधर मंदिर

गोरेराम गल्ली-कापड पेठेतील हे मंदिर १८२८ मध्ये कै. दादाबुवा यांनी बांधले. मुरली वाजविणा-या कृष्णाची मूर्ती आणि दोन्ही बाजूला सवंत्स धेनू आहेत. कृष्णजन्माच्या उत्सावात दररोज वेगळे रूप सजविले जाते. ते अत्यंत मनोहरी असते.

यशवंतरावमहाराज मंदिर / समाधी

साधूपुरूष यशवंतरावमहाराज देव-मामलेदार यांचे मंदिर गोदावरीच्या काठी आहे. हे देवालय १८८७ मध्ये देव मामलेदारांनी समाधी घेतल्यानंतर बांधले गेले. यशवंतरावमहाराज सटाणा येथे मामलेदार असतांना मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी सरकारी नियम धाब्यावर बसवून त्यांनी गोरगरीबांना मदत केली होती. अत्यंत साधुवृत्तीचे संत पुरूष म्हणून त्यांचा लौकिक होता. एखाद्या सरकारी अधिका-याचे असे जगातले हे एकमेव मंदिर असावे. याच पटांगणात दरवर्षी वसंत व्याख्यानमाला होते.

मोदकेश्वर गणपती

संत गाडगेबाबा महाराजांच्या धर्मशाळेच्या अलिकडे श्रीमोदकेश्वराचे मंदिर लागते. हे एक जागृत स्थान असून हा गणपती नावाला पावतो अशी भक्तांची नितांत श्रध्दा आहे. आजूबाजूच्या उत्खननात मोदकाच्या आकाराचे दगड सापडले म्हणून त्या मंदिराला मोदकेश्वर मंदिर असे नाव पडले.

कपूरथळा छत्री

गाडगेमहाराज पुल वरामसेतू पूल यांच्या मधोमध ३० फु ट उंचीची संपूर्ण संगवरवरी कपूरथळा छत्री आहे. कपूर-थळा (पंजाब) संस्थानच्या माजी नशेशांचे १८७० मध्ये एडन येथे निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ही छत्री बांधण्यात आली. समोरच कपूरथळा धर्मशाळा आहे.

काटया मारूती

हे स्थान पंचवटीत वरूणा नदीच्या पुलाजवळ आहे. येथील मारूतीची मूर्ती १० फू ट उंचीची आहे. म्हणून या मारूतीला ‘लंबे हनुमान‘ असेही म्हणतात.

तपोवन

हे स्थान पंचवटीपासून ३ कि.मी.वर आहे. येथे कपिला व गोदावरीचा संगम आहे. सांख्य शास्त्राचे प्रणेते श्री. कपिल मुनींची ही तपोभूमि आहे. या संगमावर १. ब्रह्मयोनी, २. विष्णुयोनी, ३.रूद्रयोनी, ४. मुक्तीतीर्थ, ५. अग्रीतीर्थ, ६. सौभाग्य तीर्थ, ७. कपील तीर्थ, ८. कपिला संगम हया अष्टतीर्थांचा उल्लेख स्कंद पुराणात आहे. तपोवनात श्री कपिल महामुनी दर्शन, कपिला गाय आणि प्रभु रामचंद्र व लक्ष्मणाने शूर्पनखाचे नाक कापले ते दर्शविणा-या मूर्ती आहेत. तपोवनातील नैसर्गिक सौदर्य रमणीय आहे. या ठिकाणी श्री. संत जनार्दन भेट झाल्याचा उल्लेख आढळतो. कपिला गोदावरीचा संगम, कपिमुनींची तपोभूमि अष्टतीर्थ, रामायणातील महत्वाचे स्थान इत्यादी स्थानमहात्म्य असलेली पंचवटीतील तपोवन ही भूमी पौराणिक महात्म्य सांगून जाते. पर्यटकांच्या दृष्टीने महत्वाच्या या जागेवर महानगरपालिकेच्यावतीने दर्शनी भागात आकर्षक बांधकाम करून तेथील परिसर सुशोभित करण्यात येत आहे.

भद्रकाली मंदिर

नाशिक शहरात श्रीभद्रकाली नवदुर्गाचे पुराणप्रसिध्द मंदिर आहे. येथे दररोज कथा, किर्तन व प्रवचने होतात. नवरात्र उत्सव मोठया प्रमाणावर साजरा केला जातो.

समर्थ रामदासांची टाकळी

नाशिक च्या पूर्वेस हे स्थान आहे. नासर्डी व गोदावरीच्या संगमावर हे वसले आहे. येथे राष्ट्रसंत श्रीसमर्थ रामदासस्वामी यांनी १३ वर्षे तपश्चर्या करून गोमय मारूतीची स्थापना केली. दासनवमी व श्रीरामनवमी तसेच श्रीहनुमान जयंती या दिवशी या ठिकाणी मोठी यात्रा भरते. टाकळी येथील वास्तव्यातच गुरूनानक यांचा नातू व गोसावी सांप्रदायाचे प्रवर्तक चंद्राचार्य यांची व समर्थ्यांची भेट झाल्याचा उल्लेख आढळतो. भक्ती आणि शक्ती, ज्ञान आणि युक्ति याची सांगड घालून आक्रमकांचा संहार करण्याची व महाराष्ट्र धर्माची प्रेरणा देणारे हे शक्तीस्थान आहे.

भक्तीधाम (कैलासमठ)

भक्तीधाम (कैलासमठ) हे स्थान पंचवटीमध्ये पेठरोडवर आहे. येथे विद्वान वेद-वेदांग शास्त्राचे पठण करण्यासाठी येतात. तसेच येथे विद्यार्थ्यांसाठी निवासी वेदपाठशाळा चालविली जाते. यात्रेकरूंना राहण्यासाठी या ठिकाणी चांगली व्यवस्था आहे.

मुक्तीधाम

नाशिकरोड मधील सर्वात भव्य मंदिर कै.जयरामभाई बिटको यांनी २३ लाख रूपये खर्च करून एक आधुनिक संगमरवरी देवस्थान उभे केले आहे. राजस्थान मधील मक्रान (जयपूर) येथून आणलेला दगड व राजस्थानी कारागीर यांनी हे शिल्प घडविले . गीतेचे श्लोक या मंदिराच्या भितीवर कोरलेले आहेत. सर्व म्हणजे १२ ज्योर्तिलिगांचे देखावे प्रेक्षणीय आहेत. बहुतेक सर्व मोठया देवदेवतांचे दर्शन येथे एकत्र होते. जवळच एक उद्यान आहे. भक्तांसाठी राहण्याची सोय मुक्तीधामच्या परिसरात आहे.

कोदंडधारी राम

धर्मवीर डॉ.मुंजे यांनी स्थापन केलेल्या भोसला मिलीटरी स्कूलच्या परिसरात कोदंडधारी रामाचे हे सुंदर मंदिर आहे. नेमबाजी शिकवितांना बंदूकिच्या ज्या गोळया उडविल्या जातात. त्या गोळयांच्या (काडतूस) उरलेल्या धातूतून ही अप्रतिम मूर्ती घडविलेली आहे.

सोमेश्वर मंदिर

नाशिकच्या उत्तरेस म्हणजे नाशिक गंगापूर रस्त्यानजिक सुमारे ४ कि.मी. अंतरावर हे मंदिर असून गोदावरी नदीच्या काठी आहे. तेथे स्वयंभू सोमेश्वर प्रकट झाले आहेत. त्या स्थळावर सोमेश्वराचे आद्य मंदिर असून मंदिराखालून गुप्त गंगा वहात असून ती जवळच असलेल्या एका झाडाखालून प्रकट झाली आहे. तिचा प्रवाह अव्याहत चालू असतो. मंदिराचा परिसर अतिशय रमणीय आणि नयनमनोहर आहे. पुढे गंगापूरचा धबधबा असून त्याच्या पुढे शंकराचार्य डॉ.कुर्तकोटींचा आश्रम व समाधी आहे.

गंगेश्वर वेदमंदिर

वेदग्रंथाचे संगमरवरी शिल्प असलेले हे मंदिर वैशिष्टयपूर्व आहे. इटालीयन मार्बलमध्ये मंदिराचे बांधकाम आहे. प्रवेशद्वार भव्य असून सुबक काचेची दालने आहेत. मंदिरात श्रीराम, लक्ष्मण, सीतामाई यांच्या मूर्ती आहेत. गुरू गंगेश्वरांचा पुतळा मनोहरी आहे, हे मंदिर नाशिक-त्रंबक रस्त्यावर आहे.

प्रेक्षणीय स्थळे:

पांडव लेणी

नाशिकच्या अलिकडे दक्षिणेस सुमारे ८ किलोमीटर्सवर डोंगरात कोरलेली लेणी आहेत. शहराच्या नैऋत्येस शंखाच्या आकाराचे तीन डोंगर आहेत. त्यांना ‘‘त्रिराशी‘‘ असे संबोधतात. मध्याला डोंगरावर ही लेणी आहेत. ती सुमारे इ.स.पूर्व १०० ते ११० या वर्षी खोदलेली असावीत. एकूण २९ गुंफा आहेत. शालिवाहन हया हिदू राजाने बौध्द भिक्कूसाठी प्रवासात विश्रांती घेण्यासाठी ही लेणी बांधली . आतील भगवान गौतम बुध्दाच्या तसेच बोधीसत्वाच्या मूर्ती प्रेक्षणीय आहेत.

चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारक

चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचे अत्यंत आकर्षक स्मारक पांडवलेण्याच्या पायथ्याशी नाशिक महानगरपालिकेने साकारले आहे. या जागेचे क्षेत्रफळ ११.७५ एकर असून डोंगराच्या पूर्व आणि उत्तरेच्या उतरणीवरून वाहणा-या पाण्याचा नैसर्गिक उपयोग करून हे नयनरम्य स्थान निर्माण झाले. मध्यवर्ती जलसंचय हे केंद्रस्थान मानून भोवताली टेरेसेसची आखणी करून खुला रंगमंच उभारला आहे. तसेच २५० प्रेक्षक बसतील असे छोटे चित्रपटगृह, कॅन्टीन व रंगबेरंगी तरंगती कारंजी व येथे विहरण्यासाठी हिरवेगार लॉन असे चित्ताकर्षक नवे पर्यटन स्थळ निर्माण झाले आहे.

बुध्दस्मारक

कै.दादासाहेब फाळके स्मारक उद्यानाचा एक अविभाज्य भाग दिसावा अशी रचना येथील बुध्दस्मारकाची करण्यात आली आहे. स्मारक उद्यानापैकी पांडवलेण्याच्या प्रवेशद्वाराजवळील पाच एकर जमिनीत बुध्दस्मारकाची उभारणी करण्यात आली आहे. बुध्दस्मारकांच्या तळमजल्याला प्रदर्शनासाठी कलादालन व अभ्यासिक ा असून सांचीस्तुपांचा प्रतिकृतीच्या गोलाकाराचे चैत्य सभागृह आहे. चैत्य सभागृहाकडे जाण्यासाठी प्रदर्शन मार्गाला चार प्रवेशद्वारे आहेत. या प्रवेशद्वारावर चार समप्रमाणात आसांची चार तोरणे उभारण्यात आली आहेत.

(पांडवलेणी,फाळके स्माकर, व बौध्द स्मारक हे तीनही एकाच ठिकाणी असून येथे सिटी बस व रिक्षाने जाता येते) 

चांभार लेणी

नाशिकच्या उत्तरेस (पंचवटीच्या पुढे) पाच मैलावर म्हसरूळजवळ जैनांची गजपंथी लेणी आहेत. त्याला ‘चांभार लेणी ‘ असेही म्हणतात. गजपंथी टेकडीच्या पायथ्याजवळील म्हसरूळ या गावी १९४२ साली पारसनाथ मंदिर बांधण्यात आले. ही लेणी ११ व्या शतकात बांधली गेली असून ती जैनांच्या पवित्र तीर्थापैकी मानली जातात. खाली सीताकुंड आहे. पौष महिन्यात दर रविवारी येथे यात्रा भरते.

श्रीसप्तश्रृंगी देवी

महाराष्ट्रत शक्तीची साडेतीन पीठे मानली जातात. त्यापैकी वणीच्या देवीचा सप्तश्र्रृंगी गड हे आदिशक्ती स्थान मानले जाते. ओंकारातील आकार पूर्ण रूप होवून सप्तश्र्रृंगी गडावर स्थिरावला. म्हणून आदिमायेचे हे पूर्णरूप मानले जाते. नाशिकपासून ६५ कि.मी. दूर सहयाद्री पर्वतांच्या पूर्व-पश्चिम पर्वतरांगेत हे स्थान आहे. समुद्रसपाटीपासून ४६०० फुट उंचीवरचे हे ठिकाण निसर्गाने नटलेले व भाविकांना आकर्षित करणारे आहे. गडावर चढून आल्यावर ५०० पाय-या चढून मंदिराकडे जाता येते. डोंगराच्या कपारीत ८ फुट उंचीची व १८ बाहू असलेली स्वयंभू पाषाणमूर्ती आहे. विशेष म्हणजे, या मुर्तिच्या चेह-यावरील भाव महाकाय व महिषासुरमर्दिनीरूप असूनही अत्यंत प्रसन्न आहे. दर पौर्णिमेला व नवरात्रात भाविकांची गर्दी असते. चैत्र पौर्णिमेला तर लक्षावधी भाविक येतात. गडावर पूर्वी १०८ कुंडे होती. परंतु, सध्या त्यापैकी १० ते १५ कुंडे दिसतात. जलगुंफा, शिवतिर्थ, तांबुल तीर्थ व काजळ तीर्थ इ.१०-१२ तीर्थ दिसतात. शिवालयतीर्थापासून जवळच शितकडा नावाची १२०० फुट खोल दरी आहे. यालाच ‘सतीचा कडा‘ असेही म्हणतात.
(वणीतील नाशिक दिडोरी रस्त्याने बसने जाता येते. तसेच पंचवटीत दिडोरी रस्त्यावरून टॅक्सीही मिळते. गडावर रहाण्याची अल्प दरात सोय आहे. भोजन प्रसाधानाची ही व्यवस्था आहे.)

टाकेद तीर्थ

नाशिक पासून ७१.१ कि.मी. व इगतपूरी पासून ६२.३ कि.मी. अंतरावर असलेले टाकेद हे गाव आहे. या ठिकाणी रावण सीतेला नेत असता जटायूशी युध्द झाले ते ठिकाण होय. टाकेद या ठिकाणी महाशिवरात्रीस मोठी यात्रा भरते.

रामसेज डोंगर

पंचवटीच्या उत्तरेस १० मैलावर हा डोंगर आहे. या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्र शय्येसाठी जात. या रामसेज पर्वताच्या दगडांचेच श्री काळाराम मंदिर बांधलेले आहे.

चांदवडची रेणुकादेवी व रंगमहाल

नाशिकपासून ६५ कि.मी. अंतरावर आग्रारोडवर चांदवड येथे रेणुकामाता देवीचे डोंगरातील मंदिर प्रसिध्द आहे. अहिल्याबाई होळकर यांनी १७५० ते १७६५ या काळात चांदवड येथे अनेक सुधारणा केल्या तसेच भव्य रंगमहाल बांधला. हया रंगमहालातील नक्षीकामात असलेले रंग आजही रसिकांना आकर्र्षत करतात. याशिवाय डोंगरावर चंद्रेश्वराचे मंदिर आहे.

पर्यटनासाठी नाशिक जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागतो. येथे सर्वच नमूद करायचं म्हटलं तर मथळे कमी पडतील.

श्री क्षेत्र पंढरपूर

“युगे अठ्ठावीस उभा विठेवरी…” असं ज्याचं वर्णन केलं जातं तो पंढरपूरचा विठोबा अख्या महाराष्ट्राचं दैवत आहेत.दक्षिण भारतातलं एक मोठं तिर्थक्षेत्र म्हणूनही त्याचा उल्लेख केला जातो. हजारो वर्षांपासून या विठोबाच्या दर्शनासाठी पायी चालत येण्याची परंपरा आहे. विशेषतः आषाढी-कार्तिकी वारीला लाखोंच्या संख्येनं पायी चालत येण्याची परंपरा असलेला विठोबा हा एकमेव देव असावा.
"विठू माझा लेकुरवाळा। संगे भक्तांचा मेळा।"
श्री क्षेत्र पंढरपूर

“युगे अठ्ठावीस उभा विठेवरी…” असं ज्याचं वर्णन केलं जातं तो पंढरपूरचा विठोबा अख्या महाराष्ट्राचं दैवत आहेत.दक्षिण भारतातलं एक मोठं तिर्थक्षेत्र म्हणूनही त्याचा उल्लेख केला जातो. हजारो वर्षांपासून या विठोबाच्या दर्शनासाठी पायी चालत येण्याची परंपरा आहे. विशेषतः आषाढी-कार्तिकी वारीला लाखोंच्या संख्येनं पायी चालत येण्याची परंपरा असलेला विठोबा हा एकमेव देव असावा. ज्याच्या दर्शनासाठी तहान भूक आणि सगळं कामं विसरुन पायी वारी करणारे लाखो भाविक आहेत…अशा पंढरपूरचं महात्म्यही तेवढचं मोठं आहे. जात-धर्म-पंथाच्या पलिकडे असलेला हा विठोबा सर्वांचा लाडका आहे. महाराष्ट्राला असलेल्या थोर संत परंपरेतही या विठुरायाला अनन्यसाधारण महत्व आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, संत चोखामेळा, किती नावं सांगू, सगळ्यांचा आवडता देव म्हणजे विठोबा..या सर्वांच्या अभंगात विठोबाचं वर्णन केलेलं आहे..ही परंपरा फार मोठी आहे….त्यावर खूप लिखाण झालेलं आहे. वारकरी संप्रदायाची महिमा अगाध आहे. अशा या माझ्या सावळ्या विठुरायावर मी काय लिहणार..त्याचं महात्म्य थोर संतांच्या अभंगातून आणि किर्तनातून तुम्ही समजून घेऊ शकता…अशा या सावळ्या विठ्ठलाच्या भेटीची ओढ तुम्हाला लागली असेल किंवा अजून तुम्ही या महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताचं दर्शन घेतलेलं नसेल तर त्या संदर्भातली काही माहिती या ब्लॉगमध्ये देत आहे.

विठ्ठल, विठोबा, पांडुरंग, विठुराया, विठुमाऊली अशा अनेक नावांनी संबोधलं गेलेल्या या सावळ्याहरीच्या वास्तव्यानं पावण झालेलं ठिकाण म्हणजे पंढरपूर…पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यात येतं. सोलापूरपासून जेमतेम ७५ किलोमिटरवर हे पंढरपूर आहे. पुणे, कोल्हापूर, सातारासह महाराष्ट्रातल्या मुख्य शहरातून पंढरपूरला एसटीची थेट सेवा आहे. तसच मिरज-कुर्डुवाडी या रेल्वेमार्गानंही तुम्ही पंढरपूरला भेट देऊ शकता..स्वतःच्या वाहनानं पंढरपूरला जायचं असेल तर पुणे-सोलापूर ह्या राष्ट्रीय महामार्गावरुनही तुम्ही पंढरपूरला जाऊ शकता..तसच पुण्याहून सासवडमार्गेही स्वतःत्र रस्ता आहे… कोल्हापूरवरुनही सांगोलामार्गे तुम्ही रस्त्यानं पंढरपर गाठू शकता..मराठवाड्यातून जाणार असाल तर तुळजापूरमार्गे सोलापूरहून किंवा बार्शी, कुर्डुवाडीमार्गानंही तुम्हाला पंढरपूरला जाता येईलं…पंढरपूरला जोडणारे हे सर्व रस्ते चांगले आहेत. त्यामुळे वाहन चालवताना त्रास होणार नाही आणि वेळेतही पोचता येईलं.
पंढरपूरात राहण्यासाठी सर्व प्रकारची सोय आहे. शहराचा वाढता पसारा आणि वारीकाळात लाखोंच्या संख्येनं येणा-या वारक-यांची राहण्याची सोय या शहरात होते. दोन लाख लोकसंख्येचे हे शहर वारीकाळात सात-आठ लाख वारक-यांना सामावून घेतं. चंद्रभागेचा वाळवंट या यात्राकाळात वारक-यांच्या वास्तव्यानं फुलुन जातो..हा भक्तांचा मेळा डोळ्यात साठवून ठेवावा असा असतो..संतांच्या नावानं मठ या शहरात आहेत. त्यातूनही राहण्याची सोय होऊ शकते. तुम्ही जर हॉटेलमध्ये राहू इच्छित असाल तर त्याचीही चांगली सोय पंढरपूरात आहे. वारीकाळात तुम्हाला यायचं असेल तर मात्र हॉटेलचं बुकिंग महिनाभर अगोदरच करुन ठेवणं सोयीचं ठरेलं. पंढरपूरच्या एसटी स्टँडजवळ अनेक हॉटेल्स आहेत. ज्यांकडे तुम्हाला राहण्याची सोय करता येऊ शकते.

पंढरपूरचे ऐतिहासिक महत्व

पंढरपूर हे भीमा नदीच्या काठावर वसलेलं शहर आहे. शहराला अर्धचंद्राच्या आकारानं भीमा नदीनं वळसा घेतलेला आहे म्हणून या नदीला चंद्रभागा असंही म्हटलं जातं. त्याच्यामागंही मोठी अख्यायिका आहे..शापीत चंद्रानं या पाण्यात स्नान केलं आणि तो शापमुक्त झाला आणि नदीनं चंद्राकृती वळण घेतलं म्हणूनही तिला चंद्रभागा असं म्हटलं जातं अशी एक अख्यायिका सांगितली जाते..पण वारकरी संप्रदायात या नदीला चंद्रभागा या नावानंच ओळखलं जातं..तसचं या नदीला भीवरादेखील म्हटलं जातं. संतांच्या अभंगातूनही या नदीचं वर्णन चंद्रभागा किंवा भीवरा असंच केल्याचं दिसून येतय. अशा ह्या पंढरपूरचा उल्लेख प्राचीन ग्रंथातही सापडतो..शालिवाहन राजांच्या काळात इ.स. ८३ मध्ये या शहराचं संवर्धन केल्याचे दाखले सापडतात. तर इ.स ५१६ मध्ये राष्ट्रकुटांच्या काळातही पंढरपूरचा उल्लेख आढळून येतो..पंढरपूर अत्यंत प्राचिनकाळापासून असल्याचे अनेक दाखले सापडतात. तो इतिहासाचा विषय आहे. त्यावर जास्त लिहित नाही..इतिहासातल्या थोर व्यक्तीमत्वांनीही या पंढरपूरला भेट दिल्याचे दाखले आहेत. ग्वाल्हेरचे शिंदे, बाजीराव पेशवे, अहिल्याबाई होळकर, यांच्यासह अनेक राजे महाराजे आणि सरदारांनी या विठ्ठलाला मौल्यवान दागिने अर्पण केलेले आहेत. हिरे, माणिक, मोती, सोनं या दागिण्यांचा खजाना आजही मंदिराच्या विश्वस्तांकडे आहे…यावरुनच हे दैवत किती प्राचिन आहे याची प्रचिती येते.

भीमानदीच्या काठावरच विठ्ठल रुखमाईचं भव्य मंदिर आहे..सोलापूरातून तुम्ही गोपाळपूरच्या जुन्या दगडी पुलाच्या मार्गानं जर पंढरपूरात प्रवेश केला तर तुम्हाला लांबूनच कळसाचं दर्शन होतं..मंदिराच्या समोरच नामदेव पायरी आहे. विठोबाचं दर्शन घेण्याअगोदर नामदेव पायरीचं दर्शन घेतलं जातं. तर मंदिराच्या अगदी समोर नदीपात्रात पुंडलिकाचं मंदिर आहे. या दोन्हीबद्दल वारकरी साहित्यात मोठी माहिती देण्यात आलेली आहे… पंढरपूरला येणा-या भक्तांना वारकरी म्हणतात. या वारकरी संप्रदायात तुळसीची माळ घालण्याची परंपरा आहे. त्यांना माळकरीही म्हणतात..काळा बुक्का हा विठ्ठलाच्या नावानं कपाळी लावला जातो..पंढपूरात आलेला वारकरी चंद्रभागेत स्नान करुन विठ्ठलाचं दर्शन घेतो..सध्या सगळ्याचं तिर्थक्षेत्राच्या ठिकाणच्या नद्यांची जी अवस्था आहे तीच या भीमानदीचीही झालेली आहे..प्रदुषणानं नदीचं पाणी गढूळ झालय..पण वारकरी या नदीत डुबकी मारूनच विठोबाचं दर्शन घेतात..

पंढरपूरची वारी परंपरा

चैत्र, आषाढ, कार्तिक आणि माघ या चार महिन्यात पंढरपूरला यात्रा भरते. त्यातल्या आषाढ महिन्यात सर्वात मोठी यात्रा पंढरपूरात भरते. या यात्राकाळात पंढरपूरला येणा-यांची संख्या आठ लाखापासून दहा लाखापर्यंत जाते..आषाढी आणि कार्तिक एकादशीला शासकीय महापूजा केली जाते…पंढरपूर, वारकरी संप्रदाय, पंढरपूरची वारी, वारी परंपरा, संत साहित्य यावर प्रचंड लिखाण आहे. त्यातलं काही वाचनात आलं तर जरुर वाचा..संत एकनाथ, नामदेव, तुकाराम, यांच्यासह सर्व संतांच्या अभंगातून या सावळ्या विठुरायाचं वर्णन केलंल आहे. ते वाचनात आलं तर विठोबाचं महात्म्य लक्षात येईल.

विठ्ठलाला अनेक नावानं संबोधलं जातं..तसच तो विष्णुचा अवतार आहे असंही म्हटलं जातं…मूर्तीच्या पायाला स्पर्श करुन माथा टेकवण्याची परंपरा जर कोठे असेल तर ती फक्त या विठ्ठल मंदिरातच आहे..विठ्ठलाच्या चरणी लीन होण्याचं भाग्य वारीकाळात ज्यांना मिळतं ते धन्य धन्य झाल्याचे भाव व्यक्त करत वारी सार्थकी झाल्याचं मानतात.


वारीकाळात पंढरपूरला घोडे बाजारही भरतो. अस्सल जातीचे घोडे या बाजारात तुम्हाला मिळू शकतात.


पंढरपूरात विठ्ठलाच्या सेवेक-यांना म्हणजेच पुजा-यांना बडवे म्हणतात तर रुक्मिणीची सेवा करणा-या पुजा-यांना उत्पात म्हणतात…
तुम्ही जर वारीकाळ सोडून इतर दिवशी पंढरपूरला भेट दिली तर शांतपणे दर्शन घेता येईलं. विविध प्रकारच्या पूजा करता येतील. त्यासाठी तुम्हाला काही पैसे मोजावे लागतील ते मात्र वेगळे..कारण अनेक तिर्थक्षेत्रांचं सध्या जसं बाजारीकरण झालय तसच या पंढरपूरातही झालय. त्यामुळे तुम्हाला काही पैसे मोजून पूजा वगैरे करता येईलं..बाकीचं सर्व विसरुन फक्त एका विठ्ठलाच्या दर्शनासाठी कधीतरी वेळ काढा आणि यात्राकाळ सोडून पंढरपूरला एकदा अवश्य भेट द्या.

Saturday, 14 March 2015

श्री दत्तात्रेयांची पवित्र तिर्थक्षेत्रे

श्री दत्तात्रेय प्रभूनी मनुष्य रूपामध्ये घेतलेल्या अवतारांची मूळ दत्त तिर्थक्षेत्रांची सविस्तर माहिती.


श्री दत्तात्रेयांची पवित्र तिर्थक्षेत्रे

१)  माहूर (नांदेड) महाराष्ट्र :

हे क्षेत्र सद्गुरु दत्तात्रेयांचे अवतार स्थान आहे.महासती अनुसयेच्या सत्व परिक्षेसाठी आलेल्या ब्रह्मा,विष्णू आणि महेश यांनी संतुष्ट होऊन महासती अनुसया आणि अत्री ऋषी यांच्या विनंतीस मान देऊन याच ठिकाणी त्यांच्या पुत्राच्या रूपाने दत्त अवतार धारण केला.हे क्षेत्र फार प्राचीन आहे.ह्या क्षेत्रास दत्तात्रेयांचे विश्रांतीस्थान सुध्दा म्हणतात.ह्या ठिकाणी रेणुका मातेचे मूळ शक्ती पीठ सुध्दा आहे.हे स्थान नांदेड जिल्ह्यात येते.नांदेड पासून ११० किमी अंतरावर माहूर हे क्षेत्र आहे.पुण्या,मुंबई कडील भक्तांसाठी औरंगाबाद, जालना, मेहकर, वाशीम, पुसद, माहूर अशी सरळ बससेवा आहे.नांदेड हे मनमाड-हैदराबाद मार्गावरचे महत्त्वाचे रेल्वे-स्टेशन आहे.या ठिकाणी निवासासाठी भक्तनिवास आहे.

२) गिरनार (जुनागड) सौराष्ट्र गुजरात :

हे क्षेत्र गुजरात राज्यात सौराष्ट्र प्रांतात जुनागड जिल्ह्यात येते.जुनागड या शहरापासून हे स्थान २ किमी अंतरावर आहे.याच ठिकाणी श्री सद्गुरु दत्तात्रेयांनी गोरक्षनाथास अनुग्रह दिला.हे स्थान उंच पर्वतावर असून या ठिकाणी जाण्यासाठी ९९९९ पायरया चढून जाव्या लागतात. ह्या ठिकाणी सद्गुरु दत्तात्रेयांच्या पादुका स्थापित आहेत.इथे नेहमी दत्तात्रेयांचा निवास असतो याचा प्रत्यय भक्तांना नेहमी येतो.या ठिकाणी जाण्यासाठी सुरत,बडोदा,अहमदाबाद या शहरातून जुनागड(गिरनार)साठी नियमीत बससेवा आहे.रेल्वे-मार्गाने जाणारया भक्तांसाठी सुरत,अहमदाबाद,राजकोट,जुनागड अशी रेल्वे सेवा आहे. या ठिकाणी राहण्यासाठी अनेक धर्मशाळा आहेत.

३) पिठापूर (पूर्व गोदावरी जिल्हा) आंध्रप्रदेश :

हे क्षेत्र श्री दत्तात्रेयांचा मनुष्यरूपी पहिला अवतार असलेले श्री श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मगाव आहे.या क्षेत्रास पादगया सुध्दा म्हणतात. आंध्रप्रदेशमधे पूर्व गोदावरी जिल्ह्यात काकिनाड्याजवळ हे क्षेत्र आहे.आपस्तंब शाखेतील आपलराज, आणि सुमती माता या ब्राह्मण दांपत्यांच्या उदरी श्रीपादांचा जन्म झाला.सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी श्राध्दकर्मासाठी आलेल्या ब्राह्मणांच्या भोजनाच्या अगोदर सुमती मातेने दत्तात्रेयांना भिक्षा वाढली.त्यामुळे संतुष्ट होऊन श्री दत्तात्रेयांनी मी तुझ्या उदरी जन्म घेईल असा आशिर्वाद सुमती मातेस दिला.जीवनात एक वेळेस या क्षेत्रास जाऊन श्रीपाद वल्लभांचे दर्शन जरूर घ्यावे.हैद्राबाद,विशाखापट्टनम या मार्गावर सामलकोट हे रेल्वे स्टेशन लागते तिथे उतरून रिक्षा अथवा बसने (१०किमी) अंतरावर असलेल्या पिठापूर या क्षेत्राला जाता येते.या ठिकाणी जाण्यासाठी सिकंदराबाद रेल्वे स्थानकांवरून नियमीत रेल्वे आहेत.शिर्डी,विशाखापट्टनम,काकिनाडा एक्सप्रेस या रेल्वे गाडया मराठवाडयातून पिठापूरला जाण्यासाठी सोईस्कर आहेत.पुण्या-मुंबईच्या लोकांसाठी मुंबई-भुवनेश्वर (कोणार्क एक्सप्रेस), तर विदर्भातील लोकांसाठी दक्षिण किंवा ओखा-पुरी एक्सप्रेस ही ह्या रेल्वेगाडया सोयीच्या आहेत.या ठिकाणी राहण्यासाठी भक्त-निवास असून दुपारी १२ वाजता आणि रात्री ८ वाजता महाप्रसादाची व्यवस्था आहे.पिठापूरला जाणारया भक्तांनी १५ दिवस अगोदर आपली पिठापूरला जाण्याची तारिख संस्थानला फोनने कळ्वावी. जेणेकरून तिथे गेल्यावर रूम मिळ्ण्यास अडचण निर्माण होणार नाही.
श्री श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानम पिठापूरम- फोन नं.-(०८८६९) २५०३००,२५२३००.

४) कुरवपूर (जि. रायचूर) कर्नाटक :

हे क्षेत्र कृष्णा नदीमध्ये असलेल्या एका बेटावर आहे.या क्षेत्राच्या चोहोबाजूनी पाणी आहे.या क्षेत्री श्रीपाद वल्लभांनी १४ वर्षे वास्तव्य केले. श्री दत्त अवतारी योगीराज श्री वासुदेवानंद सरस्वती(टेंबेस्वामी) यांना याच ठिकाणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या अठरा अक्षरी मंत्राचा साक्षात्कार झाला.याच ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेली गुहा आहे.याच ठिकाणी पाचलेगावकर महाराजांना श्रीपाद वल्लभांचा साक्षात्कार झाला. मुंबई, बंगलोर (व्हाया गुलबर्गा) या रेल्वे मार्गावर रायचूर हे रेल्वे स्टेशन लागते.तिथे उतरून रायचूर बसस्थानकावरून बस मार्गाने ३०किमी अंतरावर अतकूर हे गाव लागते.तिथे जवळ्च कृष्णा नदीचा तीर लागतो.होडिने १ किमी प्रवास करून मंदिरापर्यंत जाता येते.दुसरा मार्ग रायचुर-हैद्राबाद या बसमार्गावर मतकल नावाचे गाव लागते तिथे उतरून रिक्षाने किंवा बसने १६ किमी अंतरावर असलेल्या पंचदेव पहाड या कृष्णा नदीच्या तिरावर असलेल्या गावास जावे लागते.नंतर होडिने प्रवास करून १ किमी अंतरावर मंदिरापर्यंत पोहोचता येते.हा मार्ग अधिक सोयीचा आहे.पंचदेव पहाड या गावाजवळ दत्त उपासक विठ्ठल बाबांनी वल्ल्भपूरम नावाचा आश्रम स्थापन केला आहे.या आश्रमात निवासाची व भोजनाची व्यवस्था आहे.स्वत:च्या गाडीने कुरवपूरला जाणा~यांसाठी या आश्रमात गाडी पार्किंगची व्यवस्था आहे.वल्लभपूरम या आश्रमात श्री श्रीपाद वल्लभ स्वामींचा दरबार आहे.याच ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी सूर्यनमस्कार घालण्यासाठी येत असत.याच्या खुणा आजही पाहावयास मिळतात .कुरवपूरला राहण्यासाठी ३-४ खोल्या आहेत व पुजा~यांना भोजनासाठी आधी सांगावे लागते.
वासुदेव भट्ट पुजारी,श्री क्षेत्र कुरवपूर,जि.रायचूर.फोन नं.-(०८५३२-२८०५७०)
मोबाईल नं.-०९७३१८२७५४६,०९७४०३१३८२८

५) कारंजा (वाशिम) महाराष्ट्र :

हे क्षेत्र दत्तात्रेयांचा मनुष्यरूपी दुसरा अवतार असलेले श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांचे जन्मगाव आहे.आजही स्वामींचा ज्या वाड्यात जन्म झाला तो वाडा चांगल्या स्थितीत असून याच वाड्यात श्री योगिराज वासुदेवानंद सरस्वती(टेंबे स्वामी)यांना श्री नृसिंह सरस्वती स्वामींचा साक्षात्कार झाला होता.त्या वाड्यामधे आजही स्वामींचे अस्तित्व जाणवते.हे एकमेव असे दत्तक्षेत्र आहे की ज्या ठिकाणी बाल स्वरूप श्री नृसिंह सरस्वती स्वामींची मूर्ती आहे.इतर क्षेत्री स्वामींच्या पादुका आहेत.श्री वासुदेवानंद सरस्वती यांच्या आज्ञेनुसार (लिलादत्त) श्रीपत ब्रह्मानंद सरस्वती स्वामी महाराजांनी या मंदिराची १९३४ साली स्थापना केली.वाशीम,अमरावती,अकोला,यवतमाळ या जिल्ह्याच्या ठिकाणापासून कारंजा हे ६० किमी अंतरावर असून या शहरातून कारंजा साठी नियमीत बससेवा आहे.मुंबई-हावडा या रेल्वे लाईनवर असलेल्या मूर्तिजापूर या रेल्वे स्टेशन वर उतरून बसमार्गाने ३० किमी अंतरावर कारंजा या क्षेत्रास जाता येते.इथे निवासासाठी भक्त निवास असुन दुपारी १ वाजता महाप्रसादाची सोय आहे.
गुरुमंदिर कारंजा- फोन-(०७२२६) २२४७५५, २२२४५५

६) नृसिंहवाडी (कोल्हापूर) महाराष्ट्र :

हे क्षेत्र कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांच्या संगमावर अंदाजे ७०० वर्षांपूर्वी वसले असून सद्गुरु दत्तत्रेयांचा द्वितीय अवतार असलेले श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची राजधानी म्हणून हे क्षेत्र ओळ्खले जाते.श्री नृसिंह सरस्वती स्वामी या क्षेत्री १२ वर्षे राहिले.आपल्या अवतार कार्यामध्ये स्वामींनी अनेक अवतार लीला केल्या आहेत. त्यापैकी गुरुचरित्रातील प्रसंगांपैकी अमरापूर गावी घेवड्याचा वेल उपटल्याची कथा आहे.(नृसिंह वाडी पैलतीरी) बिदरच्या मुस्लिम राजाच्या मुलीची गेलेली दृष्टी स्वामींनी आशिर्वाद देऊन परत आणली त्याची उतराई म्हणून विजापूर बिदर बादशहाने सध्याचे मंदिर बांधले आहे.कृष्णानदीच्या पलीकडच्या तीरावर योगीराज वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांचे परमप्रिय शिष्य श्री नृसिंह सरस्वती (दिक्षीत स्वामी) यांनी स्थापन केलेले श्री दत्त अमरेश्वर मंदिर, वासुदेवानंद सरस्वती पीठ आणि यक्षिणीमंदिर आहे.त्याचा जिर्णोध्दार विद्या वाचस्पती दत्त स्वरूप श्री दत्त महाराज कवीश्वर यांनी करून कृष्णानदीवर सुंदर घाट बांधला आहे. नृसिंह वाडीला गेल्यास दत्त अमरेश्वर मंदिरात अवश्य जावे.हे क्षेत्र कोल्हापूर पासून पूर्वेस ५० किमी. अंतरावर आहे.सांगली या जिल्ह्याच्या ठिकाणापासून २२ किमी. अंतरावर दक्षिणेस हे क्षेत्र आहे.सांगली बस स्थानकावरून या क्षेत्री जाण्यासाठी नियमित बस सेवा आहे. सांगली-कुरूंदवाड बसने सुध्दा इथे जाता येते.सांगली हे कोल्हापूर-मुंबई मार्गावरचे महत्त्वाचे रेल्वे-स्टेशन आहे.इथे निवासासाठी देवस्थानचे भक्त-निवास आहे.दुपारी १२ वाजता महाप्रसादाची सोय आहे.काही वर्षांपूर्वीच दत्तभक्त शरद उपाध्ये यांनी या ठिकाणी "वेदभवन"या वास्तुचे निर्माण केले आहे. ही वास्तु सुध्दा अवश्य पाहावी.
श्री नृसिंह सरस्वती दत्त संस्थान, श्रीनृसिंहवाडी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर फोन-(०२३२२),२७००६४,२७०००६,२७०५०१

७) औदुंबर (सांगली) महाराष्ट्र :

सांगली जिल्ह्यात कृष्णा नदी काठी वसलेले औदुंबर हे दत्त क्षेत्र भारतातील अनेक दत्त स्थानापैकी प्रमुख दत्तक्षेत्र आहे.श्री दत्त संप्रदायात या क्षेत्राचे विशेष महत्त्व आहे.या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे वास्तव्य अल्प म्हणजे एक चातुर्मास पुरते होते. कोल्हापूरच्या मूढ पुत्राला येथे स्वामींच्या आशिर्वादाने ज्ञान प्राप्ती झाली ही कथा गुरुचरित्राच्या १७ व्या अध्यायात आलेली आहे.याच ठिकाणी संत जनार्दन स्वामी,श्री संत एकनाथ महाराज यांना दत्त दर्शन झाले..याच ठिकाणी स्वामींनी औदुंबर वृक्षाचा महिमा सांगितला व माझा नित्य त्या वृक्षामध्ये निवास राहील व त्या वृक्षाची नियमीत पूजा किंवा त्या वृक्षाखाली गुरुचरित्र पारायण करणारया भक्तास त्याने केलेल्या पुउजेचे अगर पारायणाचे फळ हजार पटीने मिळेल.त्या भक्ताला माझा आशिर्वाद राहील,असे वचन दिले.औदुंबर या ठिकाणी जाण्यासाठी सांगली बस स्थानकावरून नियमीत बस सेवा आहे. सांगली-अंकलखोप या बसने इथे जाता येते.तासगाव-कोल्हापूर या बसमार्गावर हे क्षेत्र आहे.रेल्वे मार्गांनी प्रवास करणारया भक्तांसाठी पुणे,कोल्हापूर मार्गावर भिलवडी स्टेशन लागते.त्या स्टेशनवरून उतरून बस मार्गाने (७ किमी) अंतरावर असलेल्या औदुंबर या क्षेत्रास जाता येते.या ठिकाणी राहण्यासाठी जोशी अगर पुजारी यांचे घरी सोय होऊ शकते.
श्री दत्त संस्थान, औदुंबर, तालुका पुलुस, जिल्हा सांगली
फोन रामभाऊ पुजारी (०२३४६) २३००५८,९९७०१२९७१३

८) गाणगापूर (गुलबर्गा) कर्नाटक :

गाणगापूर हे क्षेत्र मनुष्य रूपी दत्तात्रेयाचा द्वितीय अवतार असलेले श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांनी आपल्या तेवीस वर्षाच्या प्रदिर्घ वास्त्वयासाठी का निवडले या घटनेमागे मोठा अर्थ आहे.भीमा आणि अमरजा या नद्यांच्या संगमाच्या आसपासचा २ ते ३ मैलाचा परिसर विविध कारणांनी पवित्र झाला आहे.या ठिकाणी पौराणिक काळातील विभूतींनी तपश्चर्या करून,यज्ञ करून आणि काही काळ वास्तव्य करून हा प्रदेश परमपवित्र आणि मंगलकारक केला आहे.या क्षेत्री माधुकरी मागण्याचे फार महत्त्व आहे.दत्त भक्तांची अशी भावना आहे की,आज ही दुपारी १२ वाजता श्री नृसिंह सरस्वती भिक्षा मागण्यास गाणगापूरला येतात.येथील मंदिरात स्वामींच्या निर्गुण पादुकांची स्थापना केलेली आहे.हे क्षेत्र दत्त संप्रदायामधे  फार महत्त्वपूर्ण आहे.मुंबई-हैद्राबाद(व्हाया सोलापूर)किंवा मुंबई-बंगलोर या रेल्वे मार्गावर गाणगापूर रोड स्टेशन लागते.तिथे उतरून बस किंवा ऑटोने २० किमी. अंतरावर गाणगापूर या क्षेत्रास जाता येते.बसमार्गाने सोलापूर-गाणगापूर अशी थेट बससेवा आहे.या ठिकाणी राहण्यासाठी अनेक धर्मशाळा आहेत व भोजनासाठी अन्नछ्त्र मंडळात सोय होऊ शकते.
श्री दत्त संस्थान गाणगापूर फोन नं-(०८४७२) २७४३३५,२७४७६८

९) माणिकनगर (बिदर) कर्नाटक :

सोलापूर-हैद्राबाद बसमार्गावर हुमनाबाद या तालुक्याच्या ठिकाणापासून १ किमी अंतरावर माणिक नगर हे क्षेत्र आहे. कर्नाटक राज्यात हे क्षेत्र येते.सकलमत संप्रदाय संस्थापक दत्तावतारी सिध्दपुरुष श्री माणिक प्रभूजी यांची ही कर्मभुमी आहे.रामनवमीच्या दिवशी सव्यं सद्गुरु दत्तप्रभुंनी बयाबाईंना (माणिकप्रभूंची आई) दृष्टांत देऊन मी तुझ्या उदरी पुत्र रुपाने जन्म घेइल असा आशिर्वाद दिला.२२ डिसेंबर १८१७ साली (मार्गशीर्ष शुध्द चतुर्दशी) दत्त जयंतीच्या दिवशी बसव कल्य़ाण जवळील लाडवंती या गावी श्री माणिकप्रभूंचा जन्म झाला.माणिक नगर,बसवकल्य़ाण ,बिदर या परिसरामध्ये प्रभुनीं अनेक अवतार लीला केल्या आहेत.त्यापैकी एक म्हणजे ज्याप्रमाणे श्री नृसिंह सरस्वती स्वामी गाणगापूरला वास्तव्यास असतांना दिवाळीच्या दिवशी आपल्या अनेक शिष्यांच्या आग्रहास्तव एकाच समयी अनेक रूपे घेऊन प्रत्येक शिष्याच्या घरी भोजनासाठी गेले आणि त्याच वेळी ते देह रूपाने गाणगापूरला सुध्दा होते.त्याचप्रमाणे श्री माणिक प्रभूजी बिदर जवळील झरणी नृसिंह येथे मुक्कामास असतांना त्यांच्या अनेक हिंदू-मुस्लिम भक्तांच्या आग्रहास्तव एकाच समयी अनेक रूपे घेऊन प्रत्येक भक्ताच्या घरी भोजनास गेले आणि त्याच वेळी ते देहरूपाने झरणी येथे देह रूपाने गाढ निद्रा घेत होते.त्यांचे एक वैशिष्टय होते की,त्यांच्या दरवाज्यातून कधीही कुणीही विमुख गेले नाही. शिर्डीचे साईबाबा सुध्दा त्यांच्याकडे भिक्षेसाठी आले होते.श्री माणिकप्रभूजी हे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या समकालीन होते.त्यांचा एकमेकांचा आपसात परिचय होता.त्यांच्या नेहमी भेटी होत असत.श्री माणिक प्रभूंनी सकलसंत संप्रदायाची स्थापना करुन १९व्या शतकाच्या मध्यकाळामध्ये या महान देशाच्या मध्यकाळामध्ये एका मुसलमान अधिराज्यामधे (तत्कालीन,निजाम इलाका) हिंदी समाजाच्या एकात्मतेचा प्रयोग यशस्वी करुन आम्हापुढे एक आदर्श ठेवला. पुढे श्री रामकृष्ण परमहंसांनी याच तत्वाचा उद्घोष केला व महात्मा गांधीनीही हेच तत्व अंगीकारून आपली राष्ट्रीय ऎक्याची इमारत रचली.हे एकमेव असे दत्तक्षेत्र आहे की,ज्याठिकाणी आजही गादी परंपरा सुरु आहे. माणिक प्रभू संस्थान आध्यात्मिक कार्याबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात सुध्दा अग्रेसर आहे.अंधशाळा,वेदपाठ शाळा,पब्लिक स्कूल,संगीत विद्यालय,संस्कृत पाठशाळा असे अनेक प्रकल्प यशस्वीपणे माणिक प्रभू संस्थान राबवित असून त्याद्वारे समाजातील तळागाळातील गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांचा सर्वांगिण विकास केला जातो.असे दत्त अवतारी पुरुष मार्गशीर्ष शुध्द एकादशी सन १८६५ मध्ये माणिकनगर येथे संजीवन समाधीमध्ये लीन झाले.हे क्षेत्र सोलापूर पासून १४० किमी अंतरावर आहे.गुलबर्गा-बीदर या जिल्ह्याच्या ठिकाणापासून हुमानाबादसाठी (माणिकनगरसाठी) नियमित बससेवा आहे. बीदर पासून ४० किमी आणि गुलबर्गापासून ६५ किमी अंतरावर हुमनाबाद (माणिकनगर) आहे.या ठिकाणी राहण्यासाठी भक्तनिवास असून दुपारी १ वाजता महाप्रसादाची सोय आहे.
श्री माणिक प्रभू संस्थान,माणिकनगर ता.हुमनाबाद जि.बिदर फोन (०८४८३-२०३२४२) ०९४४८४६९९१३

१०) अक्कलकोट (सोलापूर) महाराष्ट्र :

अक्कलकोटचे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी सिध्दपुरुष होते. पंजाब राज्यात पानिपत जवळ छेली या खेडेगावी गणेश मंदिराजवळ जमीन दुभंगून अष्ट वर्षाची मूर्ती प्रकट झाली. त्या मूर्तीने लगेच स्वामी समर्थ हा मनुष्यरूपी देह धारण केला. त्यानंतर त्यांनी कर्दळीवनात जाऊन ३०० वर्षे तपश्चर्या केली. ३००वर्षे तप करतांना त्यांच्या अंगावर वारुळ निर्माण झाले. एका लाकूड तोड्याने झाड तोडतांना त्याच्या कुरहाडीचा घाव स्वामींच्या मांडीला लागला. त्यामूळे त्यांची तपश्चर्या भंग होऊन स्वामी लोक कल्याणासाठी कर्दळीवनातून बाहेर पडले. फिरत फिरत स्वामी १८४४ साली मंगळ्वेढ्यास आले. तेथे बारा वर्षे राहून चैत्र शुध्द द्वितीया १८५६ साली अक्कलकोटला आले. अक्कलकोटला त्यांचे वास्तव्य २२ वर्षे म्हणजे त्यांचे समाधी काळपर्यंत होते.त्यांचे चरित्र चमत्काराच्या कृतीने भरलेले आहे.त्यांचे वास्तव्य नेहमी वटवृक्षाच्या खालीच असे. त्यावेळचे इंग्रज पत्रकार व इतिहासकार जनरल अल्कार्ट हे अक्कलकोटला आले असता त्यांनी स्वामींचे दर्शन घेऊन ब्रिटन मध्ये गेल्यावर असे जाहीर केले की,आजच्या काळात प्रभू येशू पहावयाचे असेल तर ते अक्कलकोटला आहे.स्वामींनी चैत्र शुध्द त्रयोदशी सन १८७८ मध्ये अक्कलकोट इथे दुपारी १२ वाजता समाधी घेतली. अक्कलकोट हे सोलापूरपासून ३५ किमी.अंतरावर आहे.सोलापूरहून अक्कलकोटसाठी नियमीत बससेवा आहे.इथे राहण्यासाठी भक्त-निवास आहे व अन्नक्षत्र मंडळातर्फे दुपारी १२ व रात्री ८ वाजता महाप्रसादाची सोय आहे.वटवृक्ष स्वामी महाराज ट्रस्ट, अक्कलकोट, जि.सोलापूर फोन नंबर (०२१८१) २२०३२१, भक्त निवास-२२१९०९.

११) माणगाव (सिंधुदुर्ग, कोकण) महाराष्ट्र :

योगीराज प.पु.वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांचे हे जन्मगाव. दत्तभक्त श्री गणेश शास्त्री आणि सौ. रमाबाई या ब्राह्मण दांपत्यांच्या पोटी श्रावण कृष्ण पंचमी शके १७७६ (दि.१३/०८/१८५४) रोजी माणगावी स्वामीचा जन्म झाला. ते दत्त अवतारी सिध्द पुरुष होते. कारण गणेश शास्त्रींना गाणगापूरी सद्गुरू दत्तात्रेयांनी दृष्टांन्त देऊन मी तुझ्या कुळात जन्म घेईल असा आशिर्वाद दिला होता.श्री टेंबे स्वामींचे आयुष्य म्हणजे केवळ दत्तात्रेयांच्या कृपेने विकसीत झालेले आणि सर्वांच्या आयुष्यात सुगंध पसरविणारे ब्रह्मकमळ. स्वामींनी पायी भारत भ्रमण करून दत्त संप्रदायाचा प्रसार केला .त्यांच्या कार्याला दत्त संप्रदायात तोड नाही.त्यांना सर्व विद्या अवगत होत्या.श्री टेंबे स्वामी हे उत्तम वैद्य, मंत्रसिध्द ,यंत्र-तंत्रज्ञ, उत्कृष्ट ज्योतिषी, मराठी व संस्कृत आध्यात्मिक वाड:मयातील प्रतिभावान व परतत्वस्पर्शी सिध्दकवी, वक्ते, हठयोगी, उत्कट दत्तभक्त व साक्षात दत्तात्रयस्वरूप होते.एकच खंत वाट्ते की, त्यांना संसार सुख लाभले नाही.जन्मताच मुलाचा मृत्यु आणि त्यानंतर पत्नीचे देहावसान या गोष्टी ते टाळू शकत होते. पण प्रारब्ध भोग म्हणून त्यांनी त्यांचा स्वीकार केला. स्वामीजींना अनेक विद्या अवगत होत्या. अशा महान योगीराजाने गरुडेश्वर येथे १९१४मधे समाधी घेतली. माणगाव हे क्षेत्र कोकणांत सिंधुदूर्ग जिल्हयात सावंतवाडी जवळ आहे. सावंतवाडी ते कुडाळ या बस मार्गावर माणगाव फाटा लागतो. तिथे उतरून बस मार्गाने ७ किमी. अंतरावर असलेल्या माणगावला जाता येते. सावंतवाडीसाठी कोल्हापूरवरून नियमीत बससेवा आहे. या ठिकाणी निवासासाठी भक्तनिवास असून दुपारी १२ वाजता महाप्रसादाची व्यवस्था आहे. (दत्त मंदिर, माणगाव, ता.कुडाळ, जिल्हा, सिंधुदूर्ग, कोकण फोन नंबर ०२३६२-२३६२४५,२३६४२५)

१२) श्री क्षेत्र कडगंची (गुलबर्गा), कर्नाटक :

वेदतुल्य अशा गुरुचरित्र ग्रंथाचे लेखन कडगंची येथे झाले.हे स्थान प्रसिध्दीस नव्हते.परंतु आता श्री सायंदेव दत्त देवस्थान म्हणून प्रसिध्दीस आले आहे.गाणगापूरपासून ३४ किमी.अंतरावर हे पुण्य स्थान आहे.सायंदेव साखरे हा श्री नृसिंह सरस्वतींचा प्रिय व श्रेष्ठ भक्त होता.त्याच्याच ५ व्या पिढीत सरस्वती गंगाधर यांचा जन्म झाला. श्री सिध्द मुनींनी सांगीतले आणि सरस्वती गंगाधर यांनी लिहीले तोच गुरुचरित्र ग्रंथ होय. गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी श्री सिध्दनामधारक संवादे असा उल्लेख आहे. त्यातील नामधारक म्हणजेच सरस्वती गंगाधर होय. सायंदेवाचे घराचे जागेवरच श्री सायंदेव दत्त देवस्थानचे मोठे बांधकाम चालू आहे. येथील श्री दत्तात्रेयांची मूर्ती पाहून मन थक्क होते. श्री सायंदेव दत्त देवस्थान ट्रस्ट समिती कडगंची, ता.आळंद, जि.गुलबर्गा, कर्नाटक, फोन नंबर -०८४७७-२२६१०३, ९७४०६२५६७६

१३) मंथनगड (मंथनगुडी, महेबुब नगर) आंध्रप्रदेश :

श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी यांचा प्रिय शिष्य वल्लभेश हा कुरव्पूरला नवस फेडण्यासाठी जात असता याच ठिकाणी चोरांनी त्त्यास अडवून त्याची हत्या केली.त्यामूळे श्रीपाद वल्लभ स्वामींनी अवतार संपल्यानंतर सुध्दा आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी येथे प्रकट होऊन आपल्या प्रिय शिष्यास परत जिवंत केले,तेच हे ठिकाण हैद्राबाद रायचूर बस मार्गावर मतकल पासून हे क्षेत्र १० किमी. अंतरावर आहे.मतकल या गावापासून येथे जाण्यासाठी रिक्षा अगर बस मिळतात.मतकल-नरवा आणि मतकल-उजेकोट या बसेस मंथन गड येथून जातात. श्री क्षेत्र कुरवपुरला मतकल मार्गे जातांना अगर येतांना दत्त उपासकाने या क्षेत्री जाऊन श्रीपाद वल्लभांचे दर्शन घ्यावे.

१४) गरुडेश्वर (नर्मदा), गुजरात :

हे क्षेत्र गुजरात राज्यात नर्मदा जिल्ह्यात येते. सुरत-अहमदाबाद या बस मार्गावर अंकलेश्वर हे गाव लागते. तिथे उतरून बस मार्गाने राजपिपला मार्गे गरुडेश्वर ६८ किमी अंतरावर आहे. राजपिपला हे तहसीलचे गाव आहे. शिरपूर-बडोदा, धुळे-बडोदा या बसेस राजपिपला मार्गे बडोद्याला जातात. त्यामुळे महाराष्ट्रातून गरुडेश्चरला जाणारया भक्तांसाठी शिरपूर किंवा धूळे येथून जाणे सोयीचे पडते. या ठिकाणी योगीराज वासुदेवानंद सरस्वती यांची समाधी आहे.हे स्थान नर्मदा नदीच्या तीरावर आहे. सर्व प्रमुख दत्त स्थानात या स्थानाचा उल्लेख आहे. नर्मदा पुराणात या स्थानाचा स्पष्ट उल्लेख आहे. एक अपत्य झाल्यावर पत्नीसह बालकाचे निधन झाले. समष्टी कल्याणासाठी स्वामींचा दत्त अवतार असल्याने देवाने त्यांचा गृहस्थाश्रम अल्प समयात अव्यक्त केला. असे महान योगी सन १९१४ मध्ये गरुडेश्वर येथे चिरकाल निद्रेत विलीन झाले. दत्त संप्रदायामधे स्वामींचे नाव आदरने घेतले जाते. याठिकाणी निवासासाठी भक्तनिवास व दुपारी १२ वाजता महाप्रसादाची सोय आहे.
फोन नंबर -(दत्त संस्थान, गरुडेश्वर. जि.नर्मदा, गुजरात फोन-०२६४०-२३७००५, २३७०६५)

१५) कर्दळीवन (नंदीकोटकूर) आंध्रप्रदेश :

कर्दळीवन हे आंध्र प्रदेशातील कर्नुळ जिल्ह्यात नंदीकोटकूर तालुक्‍यात नलुमलाई पर्वतात आहे. श्रीशैल्यम इथं मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन "रोप वे‘नं पाताळगंगाकाठी येऊ शकतो. पाताळगंगा ते अक्कमहादेवी मंदिर हा २५ किलोमीटरचा प्रवास बोटीतून करावा  लागतो. नंतर पर्वताच्या पायवाटेनं मंदिराकडं जावं लागतं. एका बाजूला खोल पाताळगंगा, दुसऱ्या बाजूला खडा डोंगर असे कसरत करत जावं लागतं. सुमारे किलोमीटरभर चालल्यावर मंदिर लागतं. मंदिर कसलं ते पर्वताला नैसर्गिक विवर पडून तयार झालेलं तपस्थान! तिथं बाहेर श्री अक्कमहादेवीची दगडी शिळेवर कोरलेली अप्रतिम मूर्ती आहे. पुढे ३०० मीटर लांबीची गुहा. मेणबत्त्या व बॅटरीच्या उजेडात रांगतच आत जावं लागतं. एका वेळी एकच माणूस रांगत रांगत जातो. तिथं शिवलिंग आहे. त्यानंतर पुन्हा बोटीने प्रवास करावा लागतो. सभोवार नल्लमलाईच्या शिवगिरी, विष्णूगिरी आणि ब्रह्मगिरी पर्वतराजीच्या घनदाट जंगलात कर्दळीवन आहे. त्याचा प्रवास व्यंकटेश किनाऱ्यापासून सुरू होतो. बोट किनाऱ्याला लागते, तेथून तलावाकाठी केलेल्या दगडाच्या उभ्या पिचिंगवरून जावं लागतं. या किनाऱ्यावर १०-२० घरे आहेत. कर्दळीवनाचा प्रवास येथून सुरू होतो. शिवगिरीच्या जंगलात उंच उंच झाडे आहेत. दगडधोंड्यातून, खाचखळग्यांतून मार्ग काढायचा असतो. मधूनमधून वेगवेगळ्या प्रकारचे साप दिसतात पण भाविकांना स्वामी सामर्थ्याच्या तपोभूमीला माथा टेकविण्याची अनावर ओढ असते. व्यंकटेश किनारा ते अक्कमहादेवीची गुहा हा पायी प्रवास सुमारे नऊ किलोमीटरचा आहे. दगडधोंड्याचे खडे चढण कसरत करत चढावं लागतं. खरी दमछाक वा परीक्षा याच टप्प्यात होते. रात्रीचा मुक्काम मोठ्या गुहेत करावा लागतो. पाचशे माणसं झोपतील अशी मोठी गुहा आहे. रात्री आत बाहेर अंधार असतो. मेणबत्त्या व बॅटरीच्या उजेडात रात्र घालवावी लागते. स्वामी समर्थांचं प्रगटस्थान या गुहेपासून पाच किलोमीटरवर आहे. हा मार्ग तुलनेनं सपाटीचा आहे. मात्र, अतिशय घनदाट आहे. दुतर्फा उंच उंच वारूळं आहेत. पायवाटेवरील वृक्ष वेली बाजूला सारत पुढं जावं लागतं. पायवाट नागमोडी आणि खाचखळग्यांची आहे. भाविक अखेरीस स्वामी समर्थांच्या पादुकांवर माथा टेकतात व कृतार्थतेचा निःश्‍वास टाकतात. इथं झाडाखाली पत्र्याची लहानशी शेड आहे. त्यात स्वामी समर्थांच्या पादुका आहेत. जवळच पाण्याचा धबधबा आहे. भाविक स्नान करून पूजा-अर्चा, पारायणं करतात. कर्दळीवन हे तपश्‍चर्येचे पवित्र ठिकाण आहे. ते कैलासाचं प्रतिबिंब मानतात. आपल्या अवतार समाप्ती नंतर श्री नृसिंह सरस्वती याच कर्दळीवनात गुप्त झाले व येथेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ प्रकट झाले.

Tuesday, 10 March 2015

श्री भराडी देवी यात्रा, आंगणेवाडी

कोकणात जत्रांची कमतरता नाही. वर्षाच्या ठरावीक तिथीला प्रत्येक गावात जत्रा भरते. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख कुठल्या पंचागात अथवा कॅलेंडरमध्ये सापडणार नाही. भक्ताच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी तिची ख्याती आहे.


श्री भराडी देवी यात्रा, आंगणेवाडी
  
कोकणात जत्रांची कमतरता नाही. वर्षाच्या ठरावीक तिथीला प्रत्येक गावात जत्रा भरते. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख कुठल्या पंचागात अथवा कॅलेंडरमध्ये सापडणार नाही. भक्ताच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी तिची ख्याती आहे. निवडणुकांच्या अल्याड-पल्याड आलेली ही जत्रा कधी मतदार मिळवून देणारी घाऊक व्होट बँक असते तर काहींना कार्यकर्त्यांचा नेता बनवणारी वाटते. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी काही हजारोंच्या संख्येत भरणार्या या जत्रेला लाखो भाविकांची गर्दी जमू लागली आहे.

कोकणात जत्रांची कमतरता नाही. प्रत्येक ग्रामदेवतांची, वाडीची, गावाची जत्रा भरत असते. या जत्रांमागे श्रद्धेची किनार आणि अंधश्रद्धांची जळमटंही चिकटलेली आहेत. कोकणात प्रामुख्याने मार्लेश्वर, कुणकेश्वर आणि आंगणेवाडी या तीन जत्रा अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यातही गेल्या काही वर्षांत मुंबईतून आंगणेवाडीच्या जत्रेला जाणार्या चाकरमान्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. पूर्वी जत्रेला येण्यासाठी एसटीच्या लाल डब्याशिवाय पर्याय नव्हता. आता कोकण रेल्वेबरोबरच खाजगी वाहनांचीही साथ मिळू लागल्याने दरवर्षी आंगणेवाडीची जत्रा गर्दीचे विक्रम मोडत आहे. आंगणेवाडी ही खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे या गावाची एक वाडी. म्हणजे एका अर्थाने ही एका वाडीची जत्रा म्हणायला हवी, मात्र गेल्या पाच-पंचवीस वर्षांत तिला स्वरूप आलं आहे ते महाराष्ट्रातील एखाद्या मोठ्या तीर्थक्षेत्रासारखं. अडलेले नडलेले गोरगरीब मोठ्या श्रद्धेने जसे या जत्रेला जातात, तसंच खिशात चार पैसे खुळखुळू लागलेले हवशे-नवशे आंगणेवाडीची जत्रा नेमकी आहे तरी काय या उत्सुकतेपोटीही जातात. श्रद्धा आणि नावीन्यतेच्या या जत्रेला गेल्या काही वर्षांत ‘ग्लॅमर’ मिळालं ते मात्र राजकारण्यांमुळे.

आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीचं मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. मालवणपासून अवघ्या १५ कि.मी. अंतरावर एका माळरानावर श्री भराडी देवीची यात्रा भरते. ही यात्रा दोन दिवस चालते.

मुंबई हा कोकणचा श्वास आहे. त्याला एकमेकांपासून वेगळं काढता येणार नाही. इतके घट्ट अनुबंध मालवणी माणसाचे मुंबईशी जुळले आहेत. गिरणीतली नोकरी होती तेव्हा आणि आता त्याच गिरणीबाबूंची मुलं कॉपोर्रेट क्षेत्रात नोकरी करत असतानाही कोकणच्या लाल मातीची ओढ त्या मुलांनाही स्वस्थ बसू देत नाही. हे कोकणप्रेम राजकारण्यांनी चांगलंच हेरून त्याचा वेळोवेळी राजकीय फायदा उठवला आहे.

आंगणेवाडीच्या जत्रेच्या निमित्ताने हे कनेक्शन जपण्याचा प्रयत्न आता सगळेच राजकीय पक्ष करतात. निवडणुकीच्या मोसमात नेते आपल्या उमेदवारांना घेऊन आंगणेवाडीला जातात. त्या निमित्ताने नवस वगैरे बोलले जातात. आणि त्याचबरोबर प्रचारही साधला जातो. कोकणातल्या गावागावात ‘अमको उमेदवार मुंबैसून भराडी देवीच्या दर्शनाक इलो,’ असे मेसेज पोचतात. तेच ‘मेसेज’ पुढे मुंबईत ‘फॉरवर्ड’ होतात. अशा फॉरवर्ड मेसेजमधून अनेक कार्यकर्त्यांचे नेते झालेले मुंबई, पुणे, ठाणे आणि अगदी विरारपर्यंत दिसून येतात. जत्रेतून धार्मिकतेबरोबरच राजकीय हेतू जपण्याचं आंगणेवाडी हे कदाचित महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण ठरावं.

आंगणेवाडी जत्रेची तारीख कुठल्या पंचांगात वा कॅलेंडरमध्ये सापडणार नाही. कारण ती निश्चित नसते. देवीचा कौल मिळाल्यावरच तारीख ठरते. ही तारीख ठरवण्याची प्रथाही उत्सुकतेची आहे. दिवाळीत शेतीची कामं झाली की आंगणेवाडीतील देवीचे मानकरी एका डाळीवर (बांबूपासून बनवलेली चटई) बसतात. यालाच डाळप स्वारी म्हणतात आणि डुकराच्या शिकारीचा (पारध) दिवस ठरवतात. देवीला कौल लावला जातो. गावकरी जंगलात घुसतात आणि डुकराची शिकार वाजतगाजत घेऊनच परततात. त्यानंतर काही दिवसांनी जत्रेचा दिवस ठरवण्यासाठी पुन्हा डाळप स्वारी होते आणि कौल लावून जत्रेचा दिवस निश्चित होतो.

महाराष्ट्रात आजघडीला असलेल्या जत्रेमध्ये या जत्रेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जत्रेची तारीख. जत्रेची तारीख इतरांना कळवणं हा आगळा अनुभव फक्त या यात्रेतच पहायला मिळतो. एसटीवर, रिक्षावर, सुमोवर, ग्रामपंचायतीच्या फळ्यावर जिथे जागा मिळेल तिथे तिथे… प्रत्येक ठिकाणी खडूचा रंग उठतो आणि उमटली जाते ती जत्रेची तारीख… जशी तारीख जवळ येते, तसा सुरू होतो तो खरा जल्लोष… आंगणेवाडीच्या यात्रेसाठी भव्य असा मंडप उभारण्यात येतो. केवळ ग्रामस्थांचीच नाही तर, प्रशासनाची, एसटी महामंडळाची, सार्वजनिक बांधकाम खात्याची सर्वांचीच प्रचंड घाईगर्दी सुरू असते. कामाला तास कमी पडत असतात. नियोजन आणि मनुष्यसाठा जबरदस्त असतो. पण जत्रेत कसलीच कमतरता राहू नये यासाठी अधिकार्यांच्या मनातला आईचा भक्त सारखा धडपडत असतो. कधी विचार केलाय की जत्रेसाठी तीन दिवस राबणार्या एसटी कर्मचार्यांना, बांधकाम खात्याच्या कर्मचार्यांना, पोलीस कर्मचार्यांना आणि यासारखे अनेकजण जे ड्युटीवर असतात त्यांना वाटत नसेल का, आपणही सुट्टी टाकून फॅमिलीसह जावं जत्रेला… पण नाही, इथेही जिंकतो त्या प्रत्येकाच्या मनातला भक्त. कारण जत्रेला येणार्या भक्ताची सेवा करणं हीच खरी आई भराडीची सेवा.

जमाना फेसबुक आणि व्हॉटस्अपचा आहे. म्हणजे एकाने टाकलेली पोस्ट दुसर्याने लाइक किंवा शेअर करून हजारो जणांना कनेक्ट करावं असा फास्ट पिढीचा सुपरफास्ट जमाना आहे. कोकणातील सोशल कनेक्टिव्हिटीचं शक्तिपीठ मानल्या जाणार्या आंगणेवाडीच्या भराडी देवीची वार्षिक जत्रा थाटात संपन्न होते. महाराष्ट्रभरातून लाखोंची गर्दी आणि करोडोंची उलाढाल असं वार्षिक गणित असणार्या या जत्रेला आता महायात्रेचं स्वरूप आलं आहे.

आंगणेवाडी ही मालवण तालुक्यातील मसूरे गावची एक छोटीशी वाडी. पण या वाडीतील भराडी देवीची वार्षिक जत्रा आता मुंबई-पुण्यातीलच नव्हे तर देश-विदेशातील मालवणी माणसासाठी न चुकवता येण्यासारखी स्थिती बनली आहे. आंगणेवाडी जत्रेच्या तारखेकडे मुंबईकर डोळे लावून बसलेले असतात. तारीख जाहीर झाली की सुट्टी टाकण्यापासून खाजगी गाडी ठरवण्यापर्यंत आणि रेल्वेच्या तिकीट रांगेत सकाळीच जाऊन उभं राहण्यापर्यंतची धावपळ केली जाते. इंडिकापासून लक्झरी बसपर्यंत संख्येनुसार भाविकांचा जथ्था मालवणच्या दिशेने रवाना होतो. भराडीच्या जत्रेत एकजीव होतात आणि पुन्हा आपल्या रहाटगाड्यात परततात. जत्रेची तारीख जाहीर झाली की सिंधुदुर्गातील बहुतांश रिक्षांवर मागे आंगणेवाडी जत्रा अमूक अमूक तारखेला असा फलक लावला जातो. एसटीमध्येही कुणीतरी खडूने जत्रेची तारीख लिहितो. भराडीची महती अशी गावा-गावात, वाडी-वाडीत सर्वदूर पसरते आणि मग चुकला माकला भाविकही शक्तिपीठाशी कनेक्ट होतो!

२०-२५ वर्षांपूर्वी ही जत्रा काही हजारांच्या घरात होती. आता मात्र ती लाखांची झाली आहे. गेल्यावर्षी १२ लाख भाविकांनी या जत्रेला हजेरी लावली अशी पोलिसांची आकडेवारी सांगते. पूर्वी मंदिरालगत परिसरातच दुकाने थाटली जायची, पण गेल्या काही वर्षात दुकानांची संख्या वाढली आणि परिसरही विस्तारत गेला. त्यामुळेच गर्दीही पांगली.

असं असलं तरी कोकणातील या शक्तिपीठाशी असलेल्या कनेक्टिव्हिटीमध्ये काही खंड पडला आहे, नेटवर्क तुटलं आहे, असं घडलं आहे का? बिलकूल नाही. कारण मुंबई-पुण्याच्या चक्रात पिचलेल्या प्रत्येक कोकणी माणसाला जगण्याचं बळ देणारं हे आनंदाचं झाड आहे. कोकणी माणसावर मायेची आणि कृपेची सावली करून फेसबुक आणि ऑनलाइन चॅटिंगच्या युगात वावरणारी ही माणसं आईच्या ओढीने जेव्हा आंगणेवाडीत धाव घेतात, गर्दीत स्वतःला हरवून बसतात ती एका अफाट श्रद्धेपोटीच. ही गर्दी म्हणजे निस्सीम श्रद्धा असणार्यांचा जागरच होय.

मुंबईत आंगणेवाडीची जत्रा ठाऊक नाही, असा माणूसच विरळा! कोकणी माणसाची जत्रा हे या जत्रेचं स्वरूप कालानुरूप पार बदलून गेलंय. निवडणुकांच्या अल्याड-पल्याड आलेली ही जत्रा कधी मतदार मिळवून देणारी घाऊक ‘व्होट बँक’ असते; तर साध्या सश्रद्ध भाविकासाठी अर्ध्यामुर्ध्या स्वप्नांना नवस करून पावणारं हक्काचं ठिकाण, कोकणी माणसाच्या उत्पादनांना ‘मार्केट’ मिळवून देणारी बाजारपेठ; तर कुणासाठी वर्षानुवर्षांचा रिवाज… आंगणेवाडीच्या या जत्रेसाठी मुंबईकर जथ्थ्याने येतात.

टिटवाळ्याचा सिद्धीविनायक महागणपती

ह्या गणेशाला विवाह गणपती असेही म्हणतात. विवाह न होणाऱ्यांसाठी आणि विवाह इच्छुक जोडप्यांनी ह्या गणेशाची आराधना केल्यावर त्यांच्या मनासारखा विवाह घडून येतो. तसेच घटस्फोटीत जोडपे हि आपले वाद मिटवण्यासाठी ह्या गणपतीचे दर्शन घेतात. 



टिटवाळ्याचा सिद्धीविनायक महागणपती
 
ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात टिटवाळा नावाचे एक छोटे शहर वजा एक खेडे आहे. एक प्राचीन आणि पुरातन असे सिद्धिविनायक महागणपतीचे मंदिर आहे. १२ ते १३ एकर वर पसरलेले हे मंदिर कालू नदीच्या तीरावरच वसलेले आहे. ह्या मंदिराचा उल्लेख हजारो वर्षापूर्वीच्या ग्रंथात आणि साहित्यातही सापडतो. मधल्या काळात ह्या स्थळाचे वर्णन कुठेच आढळत नाही थेट माधवराव पेशवांच्या काळात ह्या मंदिराचा उल्लेख येतो.

कण्व ऋषी ह्या परिसरात आश्रम बांधून राहत होते. कण्व ऋषीं ऋग्वेद आणि अंगिरस ह्या वेदांचे लेखक मानले जातात. ह्या ऋषींनी शकुंतला नामक मुलीला तिच्या आई वडिलांनी त्याग केल्यावर दत्तक घेतली होती. शकुंतला हि ज्येष्ट ऋषी विश्वामित्र आणि अप्सरा मेनका ह्यांच्या संबधातून जन्माला आलेली होती. तिच्या जन्मानंतर तिच्या आई वडिलांनी तिच्या त्याग केल्यावर कण्व ऋषींनी तिला दत्तक घेऊन तिचा सांभाळ केला. 

एकदा गांधार देशाचा राजा दुष्यंत लढाईच्या मार्गावर असताना ह्या परिसराच्या बाजूने जात होता. त्यावेळेला त्याने सुंदर शकुंतलेला पहिले आणि तो तिच्या प्रेमात पडला. तीच गोष्ट शकुंतलेच्या बाबतीत ही घडली. पुढे त्या दोघानी गंधर्व पद्धतीने विवाह केला. काही काळ एकत्र व्यतीत केल्यावर राजा दुष्यंताला आपल्या राज्यात परतावे लागले. जाताना त्याने आठवण म्हणून आपली राजेशाही खानदानी अंगठी तिला दिली आणि त्याने परत येऊन तिला घेऊन जाण्याचे वचन देऊन तो निघून गेला. काही काळाने एकदा आश्रमात दुर्वास ऋषी आले. दुर्वास ऋषी अत्यंत तापट स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध होते. शकुंतला दुष्यंताच्या विचारात मग्न असल्यामुळे तिने त्यांचे यथायोग्य स्वागत केले नाही म्हणून त्यांनी रागाने तिला शाप दिला कि तू ज्या आवडत्या व्यक्तीच्या विचारात राहून माझे स्वागत केले नाहीस तोच व्यक्ती तुला तुझ्या आठवणींसकट विसरून जाईल. शकुंतलेने माफी मागितल्यावर त्यांनी दया येऊन तिला उ:शाप हि दिला कि त्याने दिलेले प्रेमाचे प्रतिक त्याला दाखवल्यावर त्याला सर्व आठवेल.

दुर्वास ऋषींनी दिलेल्या शापानुसार सर्व घडत गेले. राजा दुष्यंताने शकुंतलेला ओळखले नाही व तिचा स्वीकार हि केला नाही. कण्व ऋषींनी शकुंतलेची दशा पाहून तिला विघ्नहर्त्या सिद्धिविनायक गणेशाची स्थापना करून पूजा करायला सांगितली. सिद्धिविनायकची भक्ती केल्यानंतर तिच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील आणि राजा दुष्यंत तिचा स्वीकार करेल. कण्व ऋषींनी सांगितल्याप्रमाणे तिने सिद्धिविनायकाचे मंदिर बांधले आणि गणेशाची भक्ती केली. नंतर काळानुसार दुष्यंताने तिचा स्वीकार केला. दुष्यान्तापासून तिला मुलगा हि झाला. त्याचे नाव भारत ठेवले गेले. महाभारतातील कौरव पांडव हे ह्या भारत राजाचेच वंशज होते. 

पुढे काळाच्या ओघात ते मंदिर पाण्याखाली गेले असावे. कारण मधल्या कुठल्याच काळात त्याचे अस्तित्व सापडत नाही. पेशवांच्या काळात एकदा दुष्काळ पडला असताना त्या दुष्काळावर मात करण्यासाठी पेशव्याचे सरदार रामचंद्र मेहेंदळे ह्यांनी तलावाचे उत्खनन करायला चालू केले असता त्यांना मंदिराचे अवशेष सापडले. पुढे स्वप्नातील दृष्टांतानुसार त्यांना पुढे गणेशाची मूर्ती सापडली. पेशव्यांनी लगेचच मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले. पुढे वसईची स्वारी जिंकून आल्यानंतर त्यांनी गणेशाच्या मूर्तीची प्रतिस्थापना केली.१९६५-६६ सालापर्यंत पेशव्यांनी बांधलेल्या मंदिराची पडझड झाली होती. लाकडाचे बांधकाम असलेल्या सभामंड हि छोटा पडू लागला होता. म्हणून १९६५-६६ साली मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.

पेशव्यांनी ३ एकर जागा देऊन हे मंदिर बांधले होते. नंतर मंदिराचे पारंपारिक पुजारी जोशी ह्यांनी आपल्याकडची १३ एकर जागा देऊन ह्या मंदिराचा विस्तार केला. नुकतेच महापालिकेने तलावाचे बांधकाम करून सारा परिसर सुशोभित केला. 

ह्या गणेशाला विवाह गणपती असेही म्हणतात. विवाह न होणाऱ्यांसाठी आणि विवाह इच्छुक जोडप्यांनी ह्या गणेशाची आराधना केल्यावर त्यांच्या मनासारखा विवाह घडून येतो. तसेच घटस्फोटीत जोडपे हि आपले वाद मिटवण्यासाठी ह्या गणपतीचे दर्शन घेतात. गणपतीची मूर्ती हि हि ३.५ ते ४ फुट उंचीचा ओटा बांधून त्यावर विराजमान झालेली आहे. त्यामुळे सभा मंडपात बसून हि देवाचे चांगले दर्शन होते. सभामंडपाच्या वर असलेल्या गॅलेरी मधून सभामंडपाचे आणि गणेशाच्या मूर्तीचे दर्शन होते. सुरक्षेच्या कारणास्तव आता ह्या मूर्तीचे फोटो काढता येत नाही.

मंदिरात जायला मध्य रेल्वेवरच्या टिटवाळा स्टेशन वर उतरावे लागते. तेथून टांग्याने किंवा ऑटो करून ५ मिनिटात मंदिरात जाता येते. सकाळी लवकर गेल्यास ऑटो न करता आजूबाजूचा निसर्ग पाहत रमत गमत चालत जायचे. चालत २५ ते ३० मिनिटात मंदिरात पोहोचता येते. मंदिरात दर्शन करून अर्धा तास बसायचे आणि मग आरामात परतीला लागायचे.

डहाणूची महालक्ष्मी

ठाणे जिल्ह्यातील आदिवासींची आदिमाता असलेली डहाणूची नवसाला पावणारी महालक्ष्मी महाराष्ट्र आणि गुजरातमधील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. इथल्या देवळातील पुजारी आदिवासी असून सोवळं न नेसताच देवीची पूजा करतात. बऱ्याच वर्षांपासूनच परंपरा आजही चालू आहे. 


डहाणूची महालक्ष्मी

ठाणे जिल्ह्यातील आदिवासींची आदिमाता असलेली डहाणूची नवसाला पावणारी महालक्ष्मी महाराष्ट्र आणि गुजरातमधील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. इथल्या देवळातील पुजारी आदिवासी असून सोवळं न नेसताच देवीची पूजा करतात. बऱ्याच वर्षांपासूनच परंपरा आजही चालू आहे. 

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचा पुजारी आदिवासी समाजातील आहे. या लोकात ही देवी कोळवणची महालक्ष्मी म्हणून प्रसिद्ध आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गुजरातमध्ये वास्तव करण्याची इच्छा झाली. गुजरातमधील सुपीकता धार्मिकता पाहण्यासाठी घनदाट जंगल, दऱ्या, डोंगर पार करत महालक्ष्मी देवी प्रवासाला निघाली. त्यामुळे त्या भागातील राक्षस दैत्यांची झोप उडाली. महालक्ष्मीला आपल्या परिसरात पाहून राक्षसांचे डोळे क्रोधाने लाल झाले. महालक्ष्मीने अवतार घेत राक्षसदैत्यांना त्रिशूळाने ठार केले. राक्षसाबरोबर झालेल्या युद्धात देवी दमली. तिला विश्रांतीची गरज भासू लागली. विश्रांतीसाठी तिची नजर जवळ असलेल्या मुसा डोंगरावर गेली. हेच डोंगराचे शिखर आपल्याला विश्रांतीसाठी योग्य आहे, असे तिने ठरविले. महालक्ष्मी देवीचे वास्तव रानशेतच्या डोंगरावर दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीचे आहे, अशी आख्यायिका आहे. 

वंशपरंपरेने डहाणूतील वाघाडी या गावातील सातवी कुटुंबाकडे मंदिर व्यवस्थापन व पूजेचा हक्क आहे. मातेचे एक मंदिर गडावर आहे. तर दुसरे मंदिर पायथ्याशी आहे. या गड पायथ्याशी महामार्गालगत असलेल्या मंदिराचा इतिहास शेकडो वर्षे जुना आहे. डोंगरावरील देवीचे मूळ वास्तव असलेले मंदिर मात्र आता सुंदररित्या बांधले गेले आहे. मंदिराचा गाभारा सजवला गेला आहे.

या मंदिराचा गाभारा पश्चिमाभिमुख आहे. मूर्ती गाभाऱ्यांत असून देवीचा मुखवटा दर्शनी आहे. तो दोन फूट उंचीचा लांबट चेहऱ्याचा आहे. मस्तकावर चांदीचा मुकुट आणि कुंडले आहेत. मागील बाजूस भव्य पाषाण असून याच पाषाणाचा दर्शनी मुखवटा कोरुन काढला आहे. मुखवट्याला सोने चांदी अलंकारांनी सजवले असून मुखवट्यासमोर सिंह आणि जय-विजय यांच्या चांदीच्या मूर्ती आहेत. बाजूला सभा मंडप, यज्ञकुंड, दीपमाळा त्यांच्या बाजूला हनुमान मंदिर आहे. समोर देवीचा ध्वज लावण्यासाठी उंच लाकडी खांब उभा आहे.

देवीचं मुख्य मंदिर डहाणूपासून अठरा किलोमीटर आणि मुंबई-अहमदाबाद हायवेवरील चारोटी नाक्यापासून आठ किलोमीटर असलेल्या वधवा गावाजवळील गडावर आहे. मंदिर पायथ्यापासून चारशे फूट उंचावर असून तिथे जाण्यासाठी नऊशे पायऱ्या आहेत. एक हजार फूट उंच शिखरामुळे देवीचा डोंगर सहज दिसतो. या उंच ठिकाणी पाण्याचा झरा व कुंड आहे. येथील पाणी कधीच कमी होत नाही. या मंदिरात जाण्यासाठी खूप परिश्रम पडत असल्याने डोंगराच्या पायथ्याशीही मंदिर बांधण्यात आलं आहे. हे मंदिर हायवेवर चारोटी नाक्यापासून अवघ्या तीन किलोमीटरवर आहे. इथे नेहमी गर्दी असते. मात्र यात्रेच्या वेळी भाविक वरच्या मंदिरात जातात. 

या देवीची यात्रा चैत्र शुद्ध पौर्णिमेपासून म्हणजेच हनुमान जयंतीपासून पुढे १५ दिवस चालते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या जत्रेसाठी भाविक येतात. पौणिर्मेच्या मध्यरात्री १२ वाजता सातवी कुटुंबातील प्रमुख पुजारी ध्वज, पूजेचं साहित्य, देवीची ओटी भरण्याचं साहित्य घेऊन पायथ्याशी असलेल्या मंदिरातून एकटाच निघतो. ध्वज लावण्याचं ठिकाण पायथ्यापासून १४०० फूट उंच शिखरावर आहे. तिथे पोहोचल्यावर तो तुपाचा दिवा लावून ध्वज फडकवतो. मग यात्रा सुरू होते.