“युगे अठ्ठावीस उभा विठेवरी…” असं ज्याचं वर्णन केलं जातं तो पंढरपूरचा विठोबा अख्या महाराष्ट्राचं दैवत आहेत.दक्षिण भारतातलं एक मोठं तिर्थक्षेत्र म्हणूनही त्याचा उल्लेख केला जातो. हजारो वर्षांपासून या विठोबाच्या दर्शनासाठी पायी चालत येण्याची परंपरा आहे. विशेषतः आषाढी-कार्तिकी वारीला लाखोंच्या संख्येनं पायी चालत येण्याची परंपरा असलेला विठोबा हा एकमेव देव असावा.
"विठू माझा लेकुरवाळा। संगे भक्तांचा मेळा।" |
श्री क्षेत्र पंढरपूर
“युगे अठ्ठावीस उभा विठेवरी…” असं ज्याचं वर्णन केलं जातं तो पंढरपूरचा विठोबा अख्या महाराष्ट्राचं दैवत आहेत.दक्षिण भारतातलं एक मोठं तिर्थक्षेत्र म्हणूनही त्याचा उल्लेख केला जातो. हजारो वर्षांपासून या विठोबाच्या दर्शनासाठी पायी चालत येण्याची परंपरा आहे. विशेषतः आषाढी-कार्तिकी वारीला लाखोंच्या संख्येनं पायी चालत येण्याची परंपरा असलेला विठोबा हा एकमेव देव असावा. ज्याच्या दर्शनासाठी तहान भूक आणि सगळं कामं विसरुन पायी वारी करणारे लाखो भाविक आहेत…अशा पंढरपूरचं महात्म्यही तेवढचं मोठं आहे. जात-धर्म-पंथाच्या पलिकडे असलेला हा विठोबा सर्वांचा लाडका आहे. महाराष्ट्राला असलेल्या थोर संत परंपरेतही या विठुरायाला अनन्यसाधारण महत्व आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, संत चोखामेळा, किती नावं सांगू, सगळ्यांचा आवडता देव म्हणजे विठोबा..या सर्वांच्या अभंगात विठोबाचं वर्णन केलेलं आहे..ही परंपरा फार मोठी आहे….त्यावर खूप लिखाण झालेलं आहे. वारकरी संप्रदायाची महिमा अगाध आहे. अशा या माझ्या सावळ्या विठुरायावर मी काय लिहणार..त्याचं महात्म्य थोर संतांच्या अभंगातून आणि किर्तनातून तुम्ही समजून घेऊ शकता…अशा या सावळ्या विठ्ठलाच्या भेटीची ओढ तुम्हाला लागली असेल किंवा अजून तुम्ही या महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताचं दर्शन घेतलेलं नसेल तर त्या संदर्भातली काही माहिती या ब्लॉगमध्ये देत आहे.
विठ्ठल, विठोबा, पांडुरंग, विठुराया, विठुमाऊली अशा अनेक नावांनी संबोधलं गेलेल्या या सावळ्याहरीच्या वास्तव्यानं पावण झालेलं ठिकाण म्हणजे पंढरपूर…पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यात येतं. सोलापूरपासून जेमतेम ७५ किलोमिटरवर हे पंढरपूर आहे. पुणे, कोल्हापूर, सातारासह महाराष्ट्रातल्या मुख्य शहरातून पंढरपूरला एसटीची थेट सेवा आहे. तसच मिरज-कुर्डुवाडी या रेल्वेमार्गानंही तुम्ही पंढरपूरला भेट देऊ शकता..स्वतःच्या वाहनानं पंढरपूरला जायचं असेल तर पुणे-सोलापूर ह्या राष्ट्रीय महामार्गावरुनही तुम्ही पंढरपूरला जाऊ शकता..तसच पुण्याहून सासवडमार्गेही स्वतःत्र रस्ता आहे… कोल्हापूरवरुनही सांगोलामार्गे तुम्ही रस्त्यानं पंढरपर गाठू शकता..मराठवाड्यातून जाणार असाल तर तुळजापूरमार्गे सोलापूरहून किंवा बार्शी, कुर्डुवाडीमार्गानंही तुम्हाला पंढरपूरला जाता येईलं…पंढरपूरला जोडणारे हे सर्व रस्ते चांगले आहेत. त्यामुळे वाहन चालवताना त्रास होणार नाही आणि वेळेतही पोचता येईलं.
पंढरपूरात राहण्यासाठी सर्व प्रकारची सोय आहे. शहराचा वाढता पसारा आणि वारीकाळात लाखोंच्या संख्येनं येणा-या वारक-यांची राहण्याची सोय या शहरात होते. दोन लाख लोकसंख्येचे हे शहर वारीकाळात सात-आठ लाख वारक-यांना सामावून घेतं. चंद्रभागेचा वाळवंट या यात्राकाळात वारक-यांच्या वास्तव्यानं फुलुन जातो..हा भक्तांचा मेळा डोळ्यात साठवून ठेवावा असा असतो..संतांच्या नावानं मठ या शहरात आहेत. त्यातूनही राहण्याची सोय होऊ शकते. तुम्ही जर हॉटेलमध्ये राहू इच्छित असाल तर त्याचीही चांगली सोय पंढरपूरात आहे. वारीकाळात तुम्हाला यायचं असेल तर मात्र हॉटेलचं बुकिंग महिनाभर अगोदरच करुन ठेवणं सोयीचं ठरेलं. पंढरपूरच्या एसटी स्टँडजवळ अनेक हॉटेल्स आहेत. ज्यांकडे तुम्हाला राहण्याची सोय करता येऊ शकते.
पंढरपूरचे ऐतिहासिक महत्व
पंढरपूर हे भीमा नदीच्या काठावर वसलेलं शहर आहे. शहराला अर्धचंद्राच्या आकारानं भीमा नदीनं वळसा घेतलेला आहे म्हणून या नदीला चंद्रभागा असंही म्हटलं जातं. त्याच्यामागंही मोठी अख्यायिका आहे..शापीत चंद्रानं या पाण्यात स्नान केलं आणि तो शापमुक्त झाला आणि नदीनं चंद्राकृती वळण घेतलं म्हणूनही तिला चंद्रभागा असं म्हटलं जातं अशी एक अख्यायिका सांगितली जाते..पण वारकरी संप्रदायात या नदीला चंद्रभागा या नावानंच ओळखलं जातं..तसचं या नदीला भीवरादेखील म्हटलं जातं. संतांच्या अभंगातूनही या नदीचं वर्णन चंद्रभागा किंवा भीवरा असंच केल्याचं दिसून येतय. अशा ह्या पंढरपूरचा उल्लेख प्राचीन ग्रंथातही सापडतो..शालिवाहन राजांच्या काळात इ.स. ८३ मध्ये या शहराचं संवर्धन केल्याचे दाखले सापडतात. तर इ.स ५१६ मध्ये राष्ट्रकुटांच्या काळातही पंढरपूरचा उल्लेख आढळून येतो..पंढरपूर अत्यंत प्राचिनकाळापासून असल्याचे अनेक दाखले सापडतात. तो इतिहासाचा विषय आहे. त्यावर जास्त लिहित नाही..इतिहासातल्या थोर व्यक्तीमत्वांनीही या पंढरपूरला भेट दिल्याचे दाखले आहेत. ग्वाल्हेरचे शिंदे, बाजीराव पेशवे, अहिल्याबाई होळकर, यांच्यासह अनेक राजे महाराजे आणि सरदारांनी या विठ्ठलाला मौल्यवान दागिने अर्पण केलेले आहेत. हिरे, माणिक, मोती, सोनं या दागिण्यांचा खजाना आजही मंदिराच्या विश्वस्तांकडे आहे…यावरुनच हे दैवत किती प्राचिन आहे याची प्रचिती येते.
भीमानदीच्या काठावरच विठ्ठल रुखमाईचं भव्य मंदिर आहे..सोलापूरातून तुम्ही गोपाळपूरच्या जुन्या दगडी पुलाच्या मार्गानं जर पंढरपूरात प्रवेश केला तर तुम्हाला लांबूनच कळसाचं दर्शन होतं..मंदिराच्या समोरच नामदेव पायरी आहे. विठोबाचं दर्शन घेण्याअगोदर नामदेव पायरीचं दर्शन घेतलं जातं. तर मंदिराच्या अगदी समोर नदीपात्रात पुंडलिकाचं मंदिर आहे. या दोन्हीबद्दल वारकरी साहित्यात मोठी माहिती देण्यात आलेली आहे… पंढरपूरला येणा-या भक्तांना वारकरी म्हणतात. या वारकरी संप्रदायात तुळसीची माळ घालण्याची परंपरा आहे. त्यांना माळकरीही म्हणतात..काळा बुक्का हा विठ्ठलाच्या नावानं कपाळी लावला जातो..पंढपूरात आलेला वारकरी चंद्रभागेत स्नान करुन विठ्ठलाचं दर्शन घेतो..सध्या सगळ्याचं तिर्थक्षेत्राच्या ठिकाणच्या नद्यांची जी अवस्था आहे तीच या भीमानदीचीही झालेली आहे..प्रदुषणानं नदीचं पाणी गढूळ झालय..पण वारकरी या नदीत डुबकी मारूनच विठोबाचं दर्शन घेतात..
पंढरपूरची वारी परंपरा
चैत्र, आषाढ, कार्तिक आणि माघ या चार महिन्यात पंढरपूरला यात्रा भरते. त्यातल्या आषाढ महिन्यात सर्वात मोठी यात्रा पंढरपूरात भरते. या यात्राकाळात पंढरपूरला येणा-यांची संख्या आठ लाखापासून दहा लाखापर्यंत जाते..आषाढी आणि कार्तिक एकादशीला शासकीय महापूजा केली जाते…पंढरपूर, वारकरी संप्रदाय, पंढरपूरची वारी, वारी परंपरा, संत साहित्य यावर प्रचंड लिखाण आहे. त्यातलं काही वाचनात आलं तर जरुर वाचा..संत एकनाथ, नामदेव, तुकाराम, यांच्यासह सर्व संतांच्या अभंगातून या सावळ्या विठुरायाचं वर्णन केलंल आहे. ते वाचनात आलं तर विठोबाचं महात्म्य लक्षात येईल.
विठ्ठलाला अनेक नावानं संबोधलं जातं..तसच तो विष्णुचा अवतार आहे असंही म्हटलं जातं…मूर्तीच्या पायाला स्पर्श करुन माथा टेकवण्याची परंपरा जर कोठे असेल तर ती फक्त या विठ्ठल मंदिरातच आहे..विठ्ठलाच्या चरणी लीन होण्याचं भाग्य वारीकाळात ज्यांना मिळतं ते धन्य धन्य झाल्याचे भाव व्यक्त करत वारी सार्थकी झाल्याचं मानतात.
वारीकाळात पंढरपूरला घोडे बाजारही भरतो. अस्सल जातीचे घोडे या बाजारात तुम्हाला मिळू शकतात.
पंढरपूरात विठ्ठलाच्या सेवेक-यांना म्हणजेच पुजा-यांना बडवे म्हणतात तर रुक्मिणीची सेवा करणा-या पुजा-यांना उत्पात म्हणतात…
तुम्ही जर वारीकाळ सोडून इतर दिवशी पंढरपूरला भेट दिली तर शांतपणे दर्शन घेता येईलं. विविध प्रकारच्या पूजा करता येतील. त्यासाठी तुम्हाला काही पैसे मोजावे लागतील ते मात्र वेगळे..कारण अनेक तिर्थक्षेत्रांचं सध्या जसं बाजारीकरण झालय तसच या पंढरपूरातही झालय. त्यामुळे तुम्हाला काही पैसे मोजून पूजा वगैरे करता येईलं..बाकीचं सर्व विसरुन फक्त एका विठ्ठलाच्या दर्शनासाठी कधीतरी वेळ काढा आणि यात्राकाळ सोडून पंढरपूरला एकदा अवश्य भेट द्या.
No comments:
Post a Comment