मुलांना समजून घेण्यासाठी त्यांना वेळ देणे, प्रसंगी त्यांच्या विश्वात आपणही रममाण होणे आवश्यक आहे. केवळ चुका दाखविणे, उपदेश करणे, स्वतःच्याच मतांचा आग्रह धरणे, असे न करता थोड्या वेगळ्या स्वरूपात (उदा. "हेच काम किंवा अभ्यास तू जर थोड्या वेगळ्या सोप्या पद्धतीने केलास तर तू ते अधिक चांगले करशील, असा मला विश्वास आहे) सांगायला हवे.
नाते मैत्रीचे, पालकांचे व मुलांचे...
संवाद तेथेच शक्य असतो, जेथे निखळ, पारदर्शी, विश्वासपूर्ण मैत्रीचे नाते असते. मुलांबरोबर खऱ्या अर्थाने संवाद साधायचा असेल; तर पालकांनी व शिक्षकांनी प्रथम मुलांबरोबर मैत्रीचे नाते जोपासायला हवे. यासाठी कुटुंबाचा आपसातील सुसंवाद आवश्यक आहे; तसेच मुलांचे वय व त्या वयातील मानसिक व शारीरिक वाढीच्या आवश्यकतेनुसार तो अधिक निकोप व सुदृढ व्हायला हवा.
आज बऱ्याच घरांमध्ये जेथे उत्साही आजी-आजोबा असतात, तेथे घरात व घराच्या बाहेरसुद्धा मुलांची वृत्ती, वागणूक अधिक मनमोकळी व आनंददायी असते. यातील वेगळेपण बघितले, तर आईबाबांसारखेच आजी-आजोबासुद्धा प्रेमाने हवे-नको बघत असतात, इतरही काळजी घेत असतात. त्याहीपेक्षा स्वतःचे वय विसरून मुलांबरोबर लहान मूल होऊन निखळ मैत्रीच्या नात्याने संवाद साधतात. मुलांनी उत्साहाने, उत्सुकतेने सांगितलेल्या शाळा, अभ्यास, खेळ, मित्रमैत्रिणी, यश-अपयश याविषयीच्या गप्पा ऐकतात. त्याचबरोबर मुलांचे भावविश्व, असंख्य प्रश्न, कुतूहल, त्यांचे भन्नाट स्वप्नविश्व, आकलनशक्ती, अफाट कल्पनाशक्ती, निर्णयक्षमता, छोट्या-मोठ्या सर्व गोष्टींबद्दलचे मुलांचे निकष, भावभावना, स्वतःविषयी व घरातील सदस्यांविषयीचे विचार, अपेक्षा या सर्व गोष्टींमध्ये त्यांना रस असतो. आपली सर्व कामे बाजूला ठेवून केवळ मुलांसाठी ते हवा तेवढा वेळ देतात. त्यामुळेच मुलांनासुद्धा ते अधिक सुरक्षित, हक्काचे, प्रेमाचे, विश्वासाचे ठिकाण वाटते.
मुलांना समजून घेण्यासाठी त्यांना वेळ देणे, प्रसंगी त्यांच्या विश्वात आपणही रममाण होणे आवश्यक आहे. केवळ चुका दाखविणे, उपदेश करणे, स्वतःच्याच मतांचा आग्रह धरणे, असे न करता थोड्या वेगळ्या स्वरूपात (उदा. "हेच काम किंवा अभ्यास तू जर थोड्या वेगळ्या सोप्या पद्धतीने केलास तर तू ते अधिक चांगले करशील, असा मला विश्वास आहे) सांगायला हवे. यामुळे एका कार्यसिद्धीसाठी अनेक सोप्या वाटा, उपाय सहजतेने उलगडत गेल्याने चौफेर, व्यापक विचार करण्याची व त्यानुसार प्रत्येक काम अधिकाधिक नेटके व यशस्वी करण्याची अभ्यासूवृत्ती जोपासली जाते व पुढील आयुष्याच्या वाटचालीत कुठल्याही प्रसंगात आत्मविश्वास वाढवणारी ठरते.
आजी-आजोबांकडून मुलांची कधीही कोणाबरोबर तुलना होत नाही. "तुझे-माझे' "आपले-परके' हा भेदभाव नसतो. तेथे फक्त प्रकर्षाने सहकार्याची, बरोबरीची व आपुलकीची भावना असते. आईबाबांनीसुद्धा आपल्या कार्यबाहुल्यातून रोज थोडा वेळ तरी मुलांसाठी जरूर द्यायला हवा. त्यासाठी त्यांनी आपले करिअर, पैसा, संधी व आव्हाने यामध्ये थोडी तडजोड करून मुलांचे उमलते भावविश्व, स्वप्न, अपेक्षा जाणून घेऊन मदतीच्या भावनेने नियमित व गुणात्मक संवाद साधायला हवा.
घरातूनच ही सवय असेल तर घराबाहेरही मुले इतरांबरोबर मैत्री करू शकतील. वाहतुकीचे नियम पाळणे, खोटे न बोलणे, दिलेली वेळ व दिलेले काम यासाठी अधिक काटेकोर राहणे, स्वच्छता, वैयक्तिक कामांची जबाबदारी व त्याची सवय स्वतःला असणे, हे कुटुंबातील प्रत्येकाने लक्षात ठेवले तर साहजिकच असे योग्य संदेश घरातूनच मिळाल्याने मुले अधिक सक्षम होत जातात. आपल्या आनंदात; तसेच अडचणींमध्ये, यश-अपयश, संकटातही आपले पालक, कुटुंब सदैव आपल्याबरोबर आहे, ही आधाराची-स्थैर्याची भावना त्यांचे आयुष्य अधिक निकोप, सकारात्मक व प्रगल्भ बनविते.
No comments:
Post a Comment