थोडं माझ्या विषयी

Thursday 19 February 2015

मुलांशी वागताना

मुलांकडून घरचा अभ्यास करून घेणे, ही तर एक मोठीच डोकेदुखी असते. अनेक उच्चशिक्षित स्त्रियाही निव्वळ मुलांचा अभ्यास घेण्यासाठीच घरी राहतात. परंतु अभ्यास ही घेण्याची गोष्ट नसून, ज्याची त्याने करण्याची बाब आहे.  मानवी मेंदूला नित्यनवे अनुभव ताजेतवाने ठेवतात. नव्या गोष्टी शिकताना मुलांनाही आनंद वाटतो. परंतु हा आनंद आपण हिरावून घेतो. 


मुलांशी वागताना...
-डाॅ. अलका वाडकर 

क्षणोक्षणी विविध सूचना देऊन, लहान-लहान गोष्टींवर काटेकोरपणे लक्ष ठेऊन अभ्यास घेणारी आई बाळाच्या बोधात्मक विकासाला खिळ घालते.

उणापुरा पाच वर्षांचा आदित्य खाण्याचा खूप कंटाळा करतो. त्यामुळे त्याच्या आईचा तासन्तास वेळ त्याला भरवण्यात जातो. पण काय करावे हे तिला कळत नाही. घरोघरी स्त्रिया मुलांना भरवण्यात, त्यांना आंघोळ घालण्यात, त्यांचा अभ्यास करून घेण्यात बराच वेळ खर्च करतात. ही सारे कामे आईनेच करायची असतात, असे गृहीत धरले जाते. 

प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की, भूक लागणे आणि खाणे या नैसर्गिक क्रिया आहेत. घरच्या पाळीव प्राण्यांना जसे कुत्रा, मांजर, पोपट इतकेच नव्हे तर अगदी मुंगीसारख्या किटकांनी तहानभुकेची जाणीव असते. भूक भागविण्यासाठी आवश्यक ते कष्ट तेही करतात. जर असे असेल तर अगदी लहान म्हणजे वर्ष-दोन वर्षाची मुले देखिल स्वतःच्या हाताने  अगदी पोट भरेपर्यंत खाऊ शकतात. 

पोट भरल्यावर मात्र मुले खात नाहीत. मग आपण कितीही आग्रह केला तरी ती टाळाटाळ करतात. घास तोंडात ठेऊन अर्धा तास बसणारी मुले आपण अनेकदा बघतो. म्हणजेच मुलांनी इतके खाल्लेच पाहिजे, असा आग्रह धरणेही व्यर्थच आहे. शक्य तितक्या लवकर स्वतःच्या हाताने खाण्याची सवय मुलांना लावली पाहिजे. थोडफार सांडल तरी स्वतंत्रपणे खाण्याचा आनंद मुलांना मिळतो. शिवाय मुले स्वतःच्या आवडीने काय खातात हे ही कळते. आईचा वेळ वाचतो तो वेगळाच. डबा खायच्या सुट्टीत शाळेत जाऊन दहा वर्षाच्या मुलाला भरवणार्‍या स्त्रियाही आपण मुलाच्या भल्यासाठी हे करतो आहोत असे समजतात. मात्र त्याचा फेरविचार करणे गरजेचे आहे.


जी बाब खाण्याची तीच आंघोळीची असते. योग्य पद्धतीने शरीराची स्वच्छता कशी राखावी हे मुलांना समजावून सांगितले पाहिजे. जसे रोज मुलाचे तोंड धुऊन देऊन त्याला तोंड कसे धुवावे हे समजणार नाही. तर त्याला पुन्हा पुन्हा तोंड धुण्यासाठी योग्य त्या सूचना देणे व तशाच पद्धतीने तो करतो की नाही हे पाहणे आवश्यक ठरते.

मुलांकडून घरचा अभ्यास करून घेणे, ही तर एक मोठीच डोकेदुखी असते. अनेक उच्चशिक्षित स्त्रियाही निव्वळ मुलांचा अभ्यास घेण्यासाठीच घरी राहतात. परंतु अभ्यास ही घेण्याची गोष्ट नसून, ज्याची त्याने करण्याची बाब आहे.  मानवी मेंदूला नित्यनवे अनुभव ताजेतवाने ठेवतात. नव्या गोष्टी शिकताना मुलांनाही आनंद वाटतो. परंतु हा आनंद आपण हिरावून घेतो. 

अभ्यास करण्याचे वेळापत्रक, त्यासाठी घातलेल्या जाचक अटी, स्वतंत्रपणे लिहण्यावाचण्यावर आणि विचार करण्यावरही घातलेली बंधने यामुळे आनंददायी न रहाता एक ओझे वाटू लागते. कसे तरी करून उरकण्याचा, नाईलाजाने करण्याचा अभ्यास मुलांना आवडेनासा होतो. मुलांच्या प्रतिभेचा विकास होणे, अशा पद्धतीने दूरापस्त असते. साधे उदाहरण म्हणजे निबंध लेखनात स्वतंत्रपणे विचार करावा लागतो. पण निबंधही मोठ्या माणसांनी लिहून दिला तर तो पाठ केला जातो. अशाच पद्धतीने मुलांची नानाप्रकारे हानी होत जाते. अभ्यासाच्या चुकीच्या सवयी लागतात. विनाकारण ताण निर्माण होतो.

मुलांशी वागताना त्यांना शक्य तेवढे स्वतंत्र कामे करू द्यावी. फक्त अडेल तेथे मार्गदर्शन करावे. घरात अनुकूल परिस्थिती निर्माण करणे मात्र गरजेचे असते. वैयक्तीक स्वच्छता वा अभ्यास असो अतिशय कडक शिस्त लावण्याचा प्रयत्न व नाहक लक्ष घालणे टाळलेले उत्तम. 

No comments:

Post a Comment