थोडं माझ्या विषयी

Tuesday 10 March 2015

माळशेज घाट

सणावाराला हिरवा चुडा, हिरवा शालू ल्यायलेल्या सुवासिनीप्रमाणं पावसाळ्यात माळशेज घाट नटतो. काळेपांढरे ढग गिरीशिखरांच्या टोकांना स्पर्श करू लागतात. घाटातल्या डोंगरटेकाडांवरून असंख्य धबधबे उतरू लागतात. माळशेज घाट मग पर्यटकांनी फुलू लागतो. या घाटाचं नैसर्गिक सौंदर्य मात्र आपण जपायला पाहिजे।

पावसाळा सुरु झाला कि माळशेज घाट तरुण पर्यटकांनी फुलू लागतो
माळशेज घाट

सणावाराला हिरवा चुडा, हिरवा शालू ल्यायलेल्या सुवासिनीप्रमाणं पावसाळ्यात माळशेज घाट नटतो. काळेपांढरे ढग गिरीशिखरांच्या टोकांना स्पर्श करू लागतात. घाटातल्या डोंगरटेकाडांवरून असंख्य धबधबे उतरू लागतात. माळशेज घाट मग पर्यटकांनी फुलू लागतो. या घाटाचं नैसर्गिक सौंदर्य मात्र आपण जपायला पाहिजे…

पाऊस सुरू झाला की, पर्यटकांना लोणावळा, खंडाळा आणि महाबळेश्वर या पर्यटनस्थळांची आठवण होते. गेली काही वर्ष सृष्टीसौंदर्याने नटलेला, हिरवागार असलेला माळशेज घाट अनेक जणांना भुरळ पाडत आहे. आजही पाऊस सुरू झाला की, शेकडो गाडय़ा आणि इतर वाहनांतून माळशेजची मजा घेण्यासाठी पर्यटक माळशेज घाटात पर्यटनासाठी जातात.

कल्याण- मुरबाड रस्त्यावरून आळेफाटा, ओतूरमार्गे नगरकडे जाणार्या मार्गावर हा अप्रतिम असा माळशेज घाट आहे. सणवार असला किंवा लग्नसमारंभ असला की सुवासिनीला हिरवा चुडा भरला जातो त्याप्रमाणे हा घाट पावसाळ्यात पर्यटकांना येण्यासाठी खुणावतो. येथील थीथबी-सावर्णे या गावापासून हा घाटमार्ग खर्या अर्थाने सुरू होतो. नागमोडी वळणे आणि डोंगरदर्यांच्या कपारीतून उतरणारे धबधबे हे या घाटाचे मुख्य आकर्षण मानले जाते. मढजवळ असलेला बोगदा, तेथील निसर्गसौंदर्य हे मनाला मोहवून टाकणारे असते. बोगद्यातून गाडी जाताना त्यावर पडणारा पाण्याचा धोधो आवाज अंगाचा थरकापही उडवितो. तेथील रस्ता हा एवढा बिकट आहे की, गाडीतून प्रवास करताना जणू आपल्या अंगावर पूर्ण सह्याद्री पर्वतच येत आहे असे चित्र  काहीवेळा भासमान होताना दिसत राहते. रिमझिम पावसामध्ये येथील धबधब्याखाली हजारो स्त्री-पुरुष आपल्या मुलाबाळांसह पावसाळ्यातील हा अवर्णनीय आनंद लुटण्यासाठी येथे येत असल्याचे चित्र गेली काही वर्ष तरी पाहायला मिळत आहे.

 विशेष म्हणजे या माळशेज घाटाला एक ऐतिहासिक महत्त्वही आहे. छत्रपती शिवरायांचा जन्म ज्या शिवनेरी गडावर झाला तो गड या घाटामध्येच आहे. महाराजांच्या जन्माअगोदर जिजाऊमाता माहुलीगडावरून माळशेजमार्गे शिवनेरीला गेल्याची ऐतिहासिक नोंदही आहे. शहाजीराजे यांच्या पाठीमागे विजापूरकर लागले असताना त्यावेळी शहाजी राजांनी जिजाऊना खुष्कीच्या मार्गाने (माळशेज) शिवनेरीवर पोहचविले होते.

माळशेज घाट मार्गावर पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता पर्यटन विभागाने यावेळी खास काळजी घेतल्याचे दिसते. मढ येथे पर्यटन विभागाने यापूर्वीच एक छान इमारत बांधली होती. परंतु तिची अवस्था खूपच दयनीय झाली होती. ठिकठिकाणी भिंतीना  तडे पडले होते, स्लॅबही गळत होते. आता तेथे दुरूस्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय या मार्गावर पर्यटकांसाठी छोटी छोटी उपाहरगृहेही थाटण्यात आली आहेत. सावर्णेच्या पुढे मोदळवाडी ही एक कडेकपारीत वसलेली आदिवासी वाडी आहे.  या वाडीवरून  गिर्यारोहक  स्वतःट्रेकींगचा अनुभवही घेतात.

 संपूर्ण सह्याद्री पर्वत हा माळशेज घाटाचा आत्मा आहे. त्याला लागूनच नाणे, दार्या, हे दोन घाटही शेजारीच आहेत. परंतु तेथे जाण्यास खूप अडचणी असल्याने उन्हाळ्यात खेचर, बैल आणि रेडय़ावरून मालवाहतूक करीत तेथे पायपीट करावी लागते. हा संपूर्ण परिसर रिमझिम पावसामध्ये अत्यंत हिरवागार असा नटलेला दिसतो. येथे विजा ज्यावेळेला चमकतात त्यावेळी माळशेज घाट हा सोन्यासारखा तळपत असल्याचे दृष्टोत्पत्तीस पडते.

येथील  झाडी ही विविध प्रकारच्या  वनौषधी वृक्षांनी नटलेली आहे. रात्रीच्यावेळी या वृक्षांमधून काजव्यांसारखा लुकलुकणारा प्रकाश ठिकाठिकाणी पडत असलेला गाडीतून प्रवास करताना दिसतो. विशेष म्हणजे या धबधब्यांतील पाण्याने सतत दहा दिवस स्नान केल्यास मधुमेह, हृदयविकार बरा होतो, असा इतिहास आहे म्हणूनच आजही असंख्य कुटुंबे या पट्टय़ात येऊन दहा दहा दिवस वस्ती करतात. या घाटाचे महत्त्व आगळेवेगळेच आहे. ते प्रत्यक्षात जाऊन लोकांनी एकदा तरी अनुभवावे, असे मुद्दाम सांगावेसे वाटते.

या घाटांमध्ये जंगली श्वापदेही मोठय़ा संख्येने आहेत. माळशेज घाटामध्ये खूप मोठी कीर्र झाडी आहे. रिमझिम  पाऊस पडायला लागला की, वानरसेना मोठय़ा संख्येने रस्त्यावर येते. त्यावेळी पर्यटकांच्या हातामधील वस्तू पळविण्याचे कामही मोठय़ा प्रमाणात या वानरसेनेकडून होते. लहान मुलांना या वानरांची मजा वाटते. याशिवाय विषारी सर्प, कोल्हे, अधून मधून दिसणारे चित्तेही यांचे  पर्यटकांना दर्शन होते. परंतु हे प्राणी  पर्यटकांना कधीही त्रास देत नाहीत. एखादा विषारी साप चावल्यास तेथील आदिवासी सापाचे विष उतरविण्यासाठी एखाद्या झाडाची साल आणतात आणि त्यावर उपचार करतात. एखाद्याचे हाड मोडून पडले तर बाजूच्या  झाडावरील पळस्ची पाने तोडून त्याचा चिक लावून हे आदिवासी दुखापत झालेले हाड आपल्याकडील वनौषधींनी पूर्णपणे बरे करतात, याबाबतची अनेक उदाहरणे सांगता येतील.

माळशेज घाटामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र. कोकण आणि उत्तर महाराष्ट्र हा भाग परस्परांशी जोडला गेला  आहे. आज मराठवाडय़ांतील बीड नांदेड आदी जिल्ह्यात जायचे असल्यास साधारणपणे ५५ ते ६० किलोमीटरचे  अंतर या घाटामुळे निश्चितपणे कमी झाले आहे. अत्यंत दुर्गम असा भाग असलेला पाथर्डी, नगर जिल्ह्यांतील प्रवरा नगर, संगमनेर, शिर्डी आणि पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर, आंबेगाव, देवाची आळंदी, नारायणगाव मार्गे पुणे शहर आणि आसपास जाण्यासाठी या मार्गाचा चांगला उपयोग केला जातो. पूर्वी या घाटाकडे साफ दुर्लक्ष केले गेल्याने पावसाळ्यात हा घाट कायमचा बंद ठेवला जात होता.

त्यावेळी येथे दरडी कोसळणे ही नित्याचीच बाब झाली होती. या घाटांतील दगड हा मुरुमाचा असल्याने तो काळा-भोर नाही. मात्र नाणे घाटांतील दगड हा अत्यंत पक्क्या काळ्या रंगाचा आणि अत्यंत मजबूत असा दगड आहे. हा घाट पावसाळ्यात अतिशय विलोभनीय दिसतो.


No comments:

Post a Comment