थोडं माझ्या विषयी

Monday 30 March 2015

इतिहासाचा अमुल्य ठेवा 'अजिंठा'

प्राचीन भारतीय कला-संस्कृतीच्या इतिहासाचा अमूल्य ठेवा अजिंठा येथील तीस गुहांमध्ये शेकडो वर्षांपासून जतन करण्यात आला आहे. एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला या लेण्यांचा शोध लागला आणि भारतीय कला-संस्कृतीचं वैभव पाहून सार्‍या जगाचे डोळे दिपले. आजही इथल्या कलाकृती पाहताना चकित व्हायला होतं.


इतिहासाचा अमुल्य ठेवा 'अजिंठा'

प्राचीन भारतीय कला-संस्कृतीच्या इतिहासाचा अमूल्य ठेवा अजिंठा येथील तीस गुहांमध्ये शेकडो वर्षांपासून जतन करण्यात आला आहे. एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला या लेण्यांचा शोध लागला आणि भारतीय कला-संस्कृतीचं वैभव पाहून सार्‍या जगाचे डोळे दिपले. आजही इथल्या कलाकृती पाहताना चकित व्हायला होतं. या ठेव्याविषयी...युनेस्कोच्या जागतिक वारसा वास्तूंच्या यादीत १९८२ मध्ये समाविष्ट झालेल्या अजिंठा लेण्या औरंगाबाद शहरापासून १०७ किलोमीटरवर स्थित आहेत. वाघोरा नदीच्या प्रवाहापासून सुमारे ७६ मीटर उंचावरील घोड्याच्या नालाच्या आकारातील डोंगरात अजिंठ्याच्या तीस गुहा कोरण्यात आल्या आहेत. औरंगाबादपासून ते अजिंठ्यापर्यंतच्या दोन-अडीच तासांचा कालावधी लागतो.१९ व्या शतकाच्या सुरुवातीला वाघाच्या शिकारीच्या निमित्तानं ब्रिटिश अधिकारी मेजर गिल स्मिथ जॉन या परिसरात आला असताना त्याला इथल्या १० व्या क्रमांकाच्या गुहेच्या कमानीचा थोडासा कोरीव भाग उघडा दिसला होता. त्याच्या माहितीवरूनच पुढे इथं उत्खनन करण्यात आलं आणि एक-दोन नव्हे तर तब्बल तीस बौद्ध लेण्यांच्या रुपात प्राचीन भारताच्या इतिहासाचा अनमोल ठेवा आपल्याला पाहता येऊ शकला. ख्रिस्तपूर्व २०० ते इसवी सन ५०० ते ६०० अशा सुमारे आठशे वर्षांच्या कालावधीत दोन ठळक टप्प्यात कोरण्यात आलेल्या या लेण्यांच्या निर्मात्यांचं खरंच कौतुक करावायास हवें.

बौद्ध भिक्षूंना चिंतन, मनन, तपश्चर्या आणि साधनेसाठी बाह्य जगापासून इतकी अलिप्त अन् निसर्गाच्या इतकी सन्निध्य शांत, एकांत व पवित्र जागा दुसरीकडे शोधूनही सापडणार नाही. इथल्या प्रत्येक गुहेपासून निघणारा एक गोल जिना थेट खाली नदीपात्राकडे जातो. त्याचे अवशेष आता कुठेकुठेच निरखून पाहिले तर दिसतात. अतिशय कठीण अशा बेसॉल्ट खडकामध्ये त्या काळातील कारागीरांनी इतक्या कलात्मक, देखण्या शिल्पाकृती कोरल्या कशा असतील, याचंच पदोपदी आश्चर्य वाटत राहतं. आधी गुहेचा खडबडीत पृष्ठभाग कोरून त्यावर चिखलाचे प्लास्टर, पुन्हा त्यावर चुन्याचा पातळ थर देऊन त्यावर कलाकारांनी आपली चित्रकला प्रदर्शित केली आहे. शिल्पावर चुन्याचं प्लास्टर केल्याचं दिसतं. चिखलाच्या प्लास्टरमध्ये स्थानिक चिकणमाती, कर्नाटक किंवा तमिळनाडूत मिळणारी ग्रॅनाइटची बारीक पूड, विविध झाडांच्या बिया व तंतूंचं मिश्रण आहें. अंधार्‍या गुहांत त्यांनी प्रकाशयोजनाही अत्यंत कल्पकतेनं केली. गुहेच्या जमिनीवर पाणी भरून त्यावर बाहेरुन कापड अथवा चकचकीत धातूच्या साह्यानं सूर्यप्रकाश टाकून त्या परावर्तित उजेडात या गुहांमध्ये काम करण्यात आलं.या तीस लेण्यांपैकी ९, १०, १९, २६ व २९ या पाच लेण्यांत चैत्यगृह आहेत. उरलेल्या सर्व लेण्या विहार आहेत. इथल्या सहा लेण्यांची निर्मिती ख्रिस्तपूर्व दुसर्‍या शतकात बौद्ध धर्माच्या हीनयान पंथाच्या काळात झाली. यामध्ये ९, १० या चैत्यगृहांसह १२, १३ व १५ व्या विहारांचा समावेश आहे. उरलेल्या लेण्या पुढे महायानपंथाच्या काळात निर्माण करण्यात आल्या. याठिकाणी हीनयान आणि महायान यांच्यातील ढोबळ फरक असा सांगता येईल की हीनयान हे मूर्तीपूजक नसून स्तूप किंवा जीवनचक्रासारख्या प्रतीकाची उपासना करतात तर महायानपंथी मूर्तीपूजक असतात. इथल्या काही गुहांमध्ये स्तुपावर बुद्धप्रतिमा कोरल्याचे दिसते, यावरुन त्या ठराविक काळात हीनयान व महायानपंथीयांच्या विचारसरणीचा संगम झाल्याचे दिसते. तर ११ क्रमांकाच्या गुहेमध्ये महायानांनी स्तुपालाच बुद्धप्रतिमेमध्ये प्रवर्तित केल्याचे दिसते. त्यामुळे बुद्धप्रतिमेच्या दोहो बाजूंना नेहमी दिसणारे पद्मपाणि व वज्रपाणी केवळ या प्रतिमेच्याच बाजूला दिसत नाहीत. कारण स्तुपासाठी आधीच दगड कोरल्याने त्यांच्यासाठी जागाच उरलेली नाही.

बुद्धाच्या जन्मकथेपासून महापरिनिर्वाणापर्यंतच्या कथांचा प्रवास दर गुहेगणिक इथं उलगडत जातो. त्याला जोड मिळते ती जातकातील सुरस कथांची. इथलं प्रत्येक चित्र-शिल्प आपल्याशी बोलतं, काही सांगू पाहतं. गरज असते ती आपण थोडा वेळ देण्याची. आपण जितकं पाहू तितकं त्यातलं नाविन्य प्रतित होत जातं. अप्रतिम शिल्पांबरोबरच शेकडो वर्षांपूर्वी नैसर्गिक रंगांत रंगविलेली चित्रं आजही तितकीच टवटवीत आहेत. आधुनिक तर इतकी की त्रिमितीय आणि चौमितीय आभास निर्माण करण्याची क्षमता या चित्रांत आहे. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर पहिल्या गुहेतील पद्मपाणि. या चित्राच्या समोर उभं राहिलं की त्याचे दोन्ही खांदे एका रेषेत दिसतात. तेच चित्र डावीकडून पाहिलं की पद्मपाणिचा डावा खांदा वर उचलल्यासारखा आणि उजवीकडून पाहिलं की उजवा खांदा वर उचलल्यासारखा दिसतो. त्याची मानही त्याच प्रमाणात अधो वा उर्ध्व झाल्यासारखी वाटते. हा त्रिमितीय आभास चित्रात नाही तर ज्याठिकाणी आपण उभे राहतो, त्या अंतरावर अवलंबून असल्याचं दिसतं. हाच आभास २६ व्या गुहेतील बालकाच्या बाबतीतही आढळतो. कोठूनही पाहिलं तरी ते आपल्याकडे पाहात असल्याचा आभास होतो.पहिल्या गुहेतील भगवान बुद्धाची मूर्तीही अशीच आश्चर्यजनक त्रिमितीय आभास देणारी. या मूर्तीवर उजवीकडून प्रकाश टाकला तर तिच्या चेहर्‍यावर कष्टी भाव दिसतात- जगातील दु:ख पाहून जणू भगवंत दु:खी झाले आहेत. डावीकडून प्रकाश टाकला तर याच चेहर्‍यावर समाधानाचे प्रसन्न भाव दिसतात- दु:खाचे मूळ आणि निर्वाणप्राप्तीचा मार्ग सापडल्याचा जणू हा आनंद आहे. समोरुन प्रकाश टाकला असता चेहर्‍यावर एकदम शांत, ध्यानस्थ भाव दिसतात. एकाच मूर्तीत त्रिमितीचं असं अन्य उदाहरण सापडणं दुर्मिळच. याच गुहेतील उधळलेला बैल हा चौमितीचं उत्कृष्ट उदाहरण. ही चौथी मिती असते आपल्या दृष्टीकोनाची. 

सुरवातीला चित्राकडे पाहिलं तर काही विशेष असं न वाटणारं. पण जेव्हा आपल्याला सांगण्यात येतं की तुम्ही कोठूनही पाहा, तो आपल्यामागे धावतोय, असं वाटेल. त्यानंतर त्या चित्राकडे पाहिलं असता तसंच वाटतं.पद्मपाणिखेरीज फ्लाइंग अप्सरा, फ्लाइंग इंद्रा, अवलोकितेश्वर, कुबेर अशा जागतिक दर्जाच्या श्रेष्ठ कलाकृती इथं जागोजागी आढळतात. तत्कालीन आधुनिक व फॅशनेबल राहणीमानाचं चित्रणही याठिकाणी आहेत. यामध्ये दोनमजली, तीनमजली घरं आहेत. त्यामध्ये सोफासेट आहे, गॅलरी आहे. वार्‍याच्या झुळुकीसरशी फडफडणार्‍या मांडवाप्रमाणं भासणारं इथल्या काही लेण्यांचं छत आहे. वस्त्रप्रावरणं आणि आभुषणांची तर या चित्रांतून पखरणच आहे. राजकुमारीच्या सौंदर्यप्रसाधनाचा प्रसंग याठिकाणी आहे. तिच्या मेकअप बॉक्समध्ये असलेल्या सामग्रीपुढे आजच्या तरुणींचा मेकअप किटही फिका पडेल. लिपस्टीकची 'फॅशन' व 'पॅशन' त्या काळातही असल्याचं दिसतंच, त्यातही केवळ खालच्या एका ओठालाच लिपस्टीक लावण्याची फॅशन या चित्रांतून दृगोच्चर होते. आभुषणांच्या बाबतीतही तो काळ अत्यंत समृद्ध व पुढारलेला असाच दिसतो आणि वस्त्रांच्या बाबतीतही मिनी-मिडीपासून मॅक्सी- साडीपर्यंत अशी व्हरायटी दिसते.

बौद्ध लेणी असल्यामुळे साहजिकच भगवान बुद्धांच्या हजारो मूर्ती येथे पाहावयास मिळतात. अगदी सव्वा इंची मूर्तीपासून ते महापरिनिर्वाणावस्थेतील २४ फुटी बुद्ध मूर्तीपर्यंत सर्वच मूर्ती अत्यंत देखण्या अन् बारकाईनं पाहिलं तर एकमेकांपेक्षा भिन्न अशा आहेत.अजिंठा हा आपला अमूल्य ठेवा आहे, तेव्हा तो पाह्यला जाताना मोठ्या आदरानं गेलं पाहिजे. पुन्हा तिथं काही कोरणं, कचरा करणं म्हणजे त्या कलाकारांचा व कलाकृतींचा अपमानच. जेव्हा वर चढून जाल तेव्हा दमलेल्या अवस्थेत कोणत्याही गुहेत जाऊ नका, कारण आपल्या जोराच्या श्वासोच्छवासातून निर्माण होणारी आर्द्रताही या चित्रांना घातक ठरू शकते.

No comments:

Post a Comment