नागपूरच्या ईशान्येस ५५ कि.मी. वर असलेले रामगिरी नावाच्या टेकड्यांच्या कुशीत रामटेक हे पर्यटनस्थळ आहे. अगत्स्य ऋषीं येथे वास्तव्यास असतांना भगवान श्रीरामांनी त्यांच्या आश्रमास भेट दिल्याचा पुराणात उल्लेख आहे तसेच राम वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते.
रामटेक
नागपूरच्या ईशान्येस ५५ कि.मी. वर असलेले रामगिरी नावाच्या टेकड्यांच्या कुशीत रामटेक हे पर्यटनस्थळ आहे. अगत्स्य ऋषीं येथे वास्तव्यास असतांना भगवान श्रीरामांनी त्यांच्या आश्रमास भेट दिल्याचा पुराणात उल्लेख आहे तसेच राम वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते. म्हणून या परिसरास रामगिरी व त्याचाच अपभ्रंश म्हणून रामटेक असे म्हटले जाते. रामगिरीवर ब्राम्हणिक शैलीतील सत्तावीस मंदिरे आहेत. चौदाव्या शतकातील लक्ष्मण मंदिर त्यातीलच एक.
शहराच्या पूर्वेला एक उंच डोंगर आहे त्यावर प्रभू श्रीरामांचे सुमारे ६०० वर्षे जुने मंदिर आहे. येथून आजूबाजूच्या परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. राम मंदिर परिसरातच एक विशाल नंदी आहे व श्रीगणेशाचे पुरातन मंदिर आहे. आत राजा दशरथ व वसिष्ठ मुनी यांची देवळे आहेत. लक्ष्मणाचे मंदिर समोरच आहे व त्यामागे राम व सीतेचे मोठे देऊळ उभे दिसते. मुख्य वास्तूच्या सभोवार इतर अनेक देवतांची मंदिरे आहेत. नागपूरची खास वास्तुशैली रामटेकलाही दिसून येते. उत्तर व पूर्वेकडील भिंती, शिखरे, उपशिखरे, कलश व खांबाच्या बांधणीचे बारकावे या वास्तूत द्रुग्गोचर होतात. छोट्या छत्र्या, उलट्या कमलकळीची नक्षी, जाळीदार खिडक्या, सज्जे व उथळ देवळ्या यांमुळे देवळावर उजेड व सावल्यांचा नयनमनोहर खेळ दिसतो. शिखरे भूमिज प्रकारची आहेत. येथे श्रीरामाचे सेनागण म्हणजे वानरांचा मुक्त संचार आहे. नागपूरकर भोसल्यांच्या खास शस्त्रांचा साठा या मंदिरात आहे.
या मंदिरात कार्तिक महिन्यात येणाऱ्या त्रिपुरी पौर्णिमेस यात्रा भरते. त्या रात्री १२ वाजता उंच कळसावर त्रिपुर प्रज्वलित केला जातो. प्राचीन काळी विदर्भातील वाकाटक साम्राज्यात रामटेकचा समावेश होता. कवी कालिदासास 'मेघदूत' हे महाकाव्य लिहिण्याची प्रेरणा येथील अद्वितीय सौदर्यानेच दिली. कालिदासाच्या या स्मृती जपाव्यात म्हणूनच येथे संस्कृत विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. रामगिरीच्या परिसरात सृष्टीसौदर्य ओसंडून वाहते. येथील हवामानही आल्हाददायक आहे. अनेक ऋषी, मुनींनी येथे तपश्चर्या करून ज्ञानप्राप्ती केली आहे. महानुभाव पंथाच्या चक्रधरस्वामींनी ज्ञानप्राप्तीसाठी येथेच तपस्या केली होती. सुमारे सहाशे वर्षापूर्वी ते येथे वास्तव्यास होते.
रामटेक अध्यात्मिक केंद्रासोबतच पर्यटनस्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे. श्रेयस तळपदेचं 'झुंज मराठमोळी' या मराठी 'रोडीज' रिअॅलिटी शोचं चित्रिकरण ऐतिहासिक रामटेक येथेच झाले. 'हम आपके है कौन' या चित्रपटाचे चित्रिकरण देखील याच परिसरात झाले आहे. विशेषतः त्यातील "वाह वाह रामजी जोडी क्या बनायी"...हे गाणे या पार्श्वभूमीवर चित्रित केले आहे. येथील तोतलाडोह धबधबा पावसाळ्यात पर्यटकांनी ओसंडून वाहत असतो. खिंडशी तळेही पर्यटकांना साद घालत असते.
जाण्याचा मार्ग : रामटेक विमान, रेल्वे व रस्त्यांनी जोडलेले आहे. नागपूर विमानतळावरून रामटेक ५८ किमी वर आहे. रेल्वेने जायचे झाल्यास नागपूरहून नियमित गाडया आहेत. नागपूर येथून बसही उपलब्ध आहेत.
No comments:
Post a Comment