थोडं माझ्या विषयी

Tuesday 10 March 2015

लोणावळा - खंडाळा

मुंबईकरांना लोणावळा-खंडाळय़ाच्या कंच हिरवाईने नटलेल्या जुळय़ा डोंगररांगा नेहमीच खुणावत असतात. त्यामुळे मुंबईकरांची या सुंदर गिरीस्थानांकडे नेहमीच रिघ लागलेली असते. मुंबईपासून जेमतेम तीन तासांच्या अंतरावर आणि निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याने नटलेल्या लोणावळा-खंडाळय़ाची आणखी एक खासियत म्हणजे तेथे मिळणारी चटकदार चिक्की.


लोणावळा - खंडाळा

मुंबईकरांना लोणावळा-खंडाळय़ाच्या कंच हिरवाईने नटलेल्या जुळय़ा डोंगररांगा नेहमीच खुणावत असतात. त्यामुळे मुंबईकरांची या सुंदर गिरीस्थानांकडे नेहमीच रिघ लागलेली असते. मुंबईपासून जेमतेम तीन तासांच्या अंतरावर आणि निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याने नटलेल्या लोणावळा-खंडाळय़ाची आणखी एक खासियत म्हणजे तेथे मिळणारी चटकदार चिक्की. असंख्य प्रकारच्या आणि अवीट चवीच्या या चिक्कीची चव चाखत लोणावळ-खंडाळय़ाच्या हिरव्यागर्द डोंगररांगांमधील प्रेक्षणीय स्थळांची सफर करण्याची मजा काही औरच आहे. इथल्या डोंगरकड्यांवरच्या ट्रेंकिगचा अनुभव तर केवळ अविस्मरणीय असतो.

तुम्ही भर पावसात कधी पुण्याचा प्रवास केलाय? भर श्रावणात कोकण व घाटमाथ्यावरचा परिसर हिरवागार होऊन गेलेला असतो. अवघ्या धरणीवर हिरवा गालिचा पसरलेला असतो. लाल निळ्या फुलांनी या गालिच्यावर नक्षीकाम केलेले असते. घाटमाथ्यावरुन दिसणारे कोकणाचे सौंदर्य, कोकणाला घाटापासून अलिप्त ठेवणारे रौद्रभिषण सह्याद्रीचे कडे, त्यावरिल हजारो मीटर उंचीवरुन कोसळणारे असंख्य जलप्रपात, छोट्या छोट्या टेकड्यांवरुन मधुनच दिसुन येणारे टुमदार बंगले हे सर्व आपल्याला या सुंदर प्रवासात अनुभवायास मिळते. हा परिसर आत्तापर्यंत आपल्या लक्षात आलाच असेल. अर्थात हा परिसर म्हणजे लोणावळा खंडाळा. हे परिसर लहानपणीच अनेक गांण्यांतून आपल्या परिचयाचे झाले आहेत. समुद्रसपाटीपासून लोणावळ्याची उंची आहे ६२५ मीटर.

निसर्गसौंदर्याने नटलेल्या या प्रदेशात सर्व काही आहे. खरं तर हा प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणुन प्रसिद्ध आहे. कारण कुठेही नसतील एवढे तलाव (डॅम) या परिसरात सापडतील. आय्.एन्.एस. शिवाजी, लोणावळा डॅम, वळवण डॅम, भुशी डॅम, पवना डॅम, आंध्र डॅम, तुंगार्ली डॅम, शिरोटा डॅम, पळसदरी डॅम असे आणखी किती तरी छोटे मोठे तलाव येथे आहेत.

इथल्या भटकंतीत दुचाकीवरून अगदी सायकल असेल तरीही हिंडण्यातच खरी मजा अनुभवता येते. कारण प्रेक्षणीय स्थळे मुख्य शहरापासून दूरवरच्या डोंगरकड्यांमध्ये लपलेली आहेत. भुशी डॅम, वळवळ डॅम, कैवल्यधामचे योग इस्पितळ, ड्युक्स नोज, रायवूड पार्क आणि टायगर्स लीप ही या परिसरातील भुरळ घालणारी आणि आवर्जून भेट द्यावीत अशी खास ठिकाणे. ड्युक्स नोज हा सुळका न्याहाळताना ड्युक ऑफ वेलिंग्टनच्या नाकाची आठवण येते आणि नावातलं हे साधम्र्य आपले कुतूहल आणखीनच चाळवते. 

या सुळक्यावरून दिसणार्‍या पर्वतरांगा, घनदाट जंगल आणि हिरव्या कंच दर्‍या न्याहाळताना श्‍वास रोखून क्षणभरासाठी देहभान हरपून जाते. तसेच टायर्गस लीप या एका खास जागेवरून लोणावळा-खंडाळय़ाच्या दर्‍याखोर्‍यांचे सौंदर्य न्याहाळणे हा एक आगळाच अनुभव असतो. अवघ्या दर्‍याखोर्‍यांवर एक दिमाखदार वाघ सुस्तपणे पहुडला आहे. म्हणून या जागेला टायगर्स लीप असं नाव पडल्याचं सांगतात. इथल्या दरीत दगड टाकलात की घुमणारे प्रतिध्वनी ऐकताना वयाचं भान विसरायला होतं आणि लहानपणीचा अल्लड खोडकरपणा नकळत पुन्हा डोकावून जातो.

तसेच खडसांबळे, ठाणाळे, गंभिरनाथ, कार्ले, भाजे, तिकोणा इत्यादी लेणीसमुह व लोहगण, राजमाची, सुधागड, सिद्धगड, मच्छींद्रगड, भिवगड, तुंग, तिकोणा, विसापुर इत्यादी किल्ले येथे आहेत तसेच खंडाळा दरी, भिमाशंकर, माथेरान इत्यादी स्थळे येथून अगदी जवळ आहेत. जंगले, धबधबे, ओढे येथे खोर्‍याने सापडतील.

भारताची आर्थिक राजधानी मुंबईला व पुण्याला जोडणारा महामार्ग व रेल्वेमार्ग येथुणच गेल्याने येथे पर्यटकांची नेहमी वर्दळ असते. मात्र लोणावळ्यात महागड्या हॉटेलमध्ये राहून आजुबाजुचे पॉईटंस पहाणे म्हणजे पर्यटन नाही हे आपल्याला संपुर्ण लोणावळा परिसर फिरल्यावर कळते. पावसाळी सहलींसाठी लोणावळा नंबर वन आहे.

जायचे कसे – मुंबईहून १०२ कि.मी. व पुण्याहून ६५ कि.मी. वर असलेल्या लोणावळा खंडाळा येथे येण्यासाठी महाराष्ट्रातिल वरील दोन्ही शहरांतून थेट बसेस व ट्रेन्स आहेत.
Attachments area

No comments:

Post a Comment