थोडं माझ्या विषयी

Thursday 12 March 2015

मेळघाट अभयारण्य

उन्हाळ्यामध्ये एखाद्या तपस्वी ऋषीप्रमाणे समाधिस्थ झालेल्या मेळघाटाच्या जंगलाचे रूप पावसाळ्यात खर्‍या अर्थाने बहरून येते. सूर्याच्या तप्त किरणांनी अन् काही ठिकाणी वणव्यांनी भाजून निघालेली मेळघाटची काया पावसाच्या सरींनी न्हाऊन तृप्त झाली, की कोवळ्या कोंबांनी मेळघाटाचं तारुण्य पुन्हा बहरू लागतं.



मेळघाट अभयारण्य

महाराष्ट्राच्या प्रमुख अभयारण्य व व्याघ्रप्रकल्पांपैकी एक म्हणजे मेळघाट अभयारण्य. गुगामल राष्ट्रीय उद्यान याच अभयारण्याचे पूर्वीचे गाभा क्षेत्र होते. येथील जंगल प्रकार हा पानगळी प्रकारात येतो. या अभयारण्यात सागाची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत. अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेकडे सातपुडा पर्वतरांगा असून या रांगांच्या उत्तरेकडे मध्य प्रदेश राज्य आहे. चिखलदरा व धारणी या तालुक्यांतील हा डोंगराळ भाग मेळघाट नावाने ओळखला जात असून याच ठिकाणी हे अभयारण्य आणि व्याघ्रप्रकल्प आहे. 

उन्हाळ्यामध्ये  काळात एखाद्या तपस्वी ऋषीप्रमाणे समाधिस्थ झालेल्या मेळघाटाच्या जंगलाचे रूप पावसाळ्यात खर्‍या अर्थाने बहरून येते. सूर्याच्या तप्त किरणांनी अन् काही ठिकाणी वणव्यांनी भाजून निघालेली मेळघाटची काया पावसाच्या सरींनी न्हाऊन तृप्त झाली, की कोवळ्या कोंबांनी मेळघाटाचं तारुण्य पुन्हा बहरू लागतं. रोडावलेल्या वृक्षांना कोवळी पालवी फुटू लागते. धरतीचं सर्वाग नवीन रोपं अन् कोवळ्या अंकुरांनी झाकून जातं अन् मग हिरवा साज ल्यालेल्या या जंगलाचं सौंदर्य दिवसेंदिवस बहरतच जातं. हे नयनरम्य सौंदर्य लांबच लांब पसरलेल्या मेळघाटात कुठंही गेलात तरी ते दिसणारच अन् तेही विविधरंगी, विविध रूपांत. 

या काळात मेळघाटात जाण्यासाठी घाटवळणाच्या वाटांनी वर चढण्यास सुरुवात केली, की प्रथम नजरेत भरतात ते हिरवा शालू नेसून नटलेले डोंगर.. अन् त्याच्याच जोडीला खोल-खोल दर्‍या. वाढत जाणार्‍या हवेतील गारव्याबरोबरच भोवतालची हिरवळीची चादर आणखीनच घट्ट अन् बहरलेली दिसू लागते. कधी-कधी सकाळी तर अचानक धुक्याच्या पडद्यातून जाण्याची संधी नकळत चालून येते. घाटातून चढत एक विशिष्ट उंची गाठली, की रस्त्याकडेचं सौंदर्य बदलत जातं. रस्त्याकडेने फुललेले ङिानियाचे रंगीबेरंगी ताटवे घाटवळणाच्या रस्त्याचं सौंदर्य आणखीनच वाढवतात. या रंगीबेरंगी सौंदर्याचा आस्वाद घेत आणखी वर चढून संपूर्ण उंची गाठून सपाटीला लागलो, की ङिानियाची जागा गुलमेंदी कधी घेऊन टाकते ते कळतही नाही. अतिशय कमी आयुष्य असलेलं हे छोटंसं झाड फार कमी काळ बहरलेलं पाहावयास मिळतं. गुलमेंदीचं हे बहरलेलं सौंदर्य म्हणजे हिरव्यागार गालिच्यावर पसरलेली जांभळ्या रंगाची तलम ङिारमिरीत चादरच जणू. रस्त्याच्या कडेची व छोटय़ा-मोठय़ा टेकडय़ांवरील, लाल-पिवळ्या फुलांनी फुललेली घाणोरीची झुडपंही या सौंदर्यात भर टाकतात. 

घाटरस्ता संपून जरा जंगलात प्रवेश केला, की अगदी जमिनीलगत वाढणार्‍या या खुरटय़ा गवतापासून ते डोक्यापेक्षाही जास्त उंच वाढणार्‍या अनेक प्रकारच्या गवतातून व कारवीच्या ताटव्यांमधून वाट काढणंही जड जातं. सागाच्या जंगलात अधूनमधून दिसणार्‍या वड, उंबर, महुआ, ऐन, पिंपळ, कदम्ब, हलदू, आंबा व नदीकाठाने अजरुन आदी लहान-मोठय़ा वृक्षांमुळे जंगलाचा भारदस्तपणा आणखीनच वाढतो. काही मोठाल्या वृक्षांच्या सावलीत तर भर दिवसा सायंकाळ झाल्याचा भास होतो. अनेक लहान-मोठे वृक्ष अन् झुडपे अनेक प्रकारच्या लतावेलींच्या बाहुपाशात अशा काही वेढल्या जातात, की जणू आता त्यांची आयुष्यभर सुटकाच नाही. 

पावसाचा भर कमी होऊन थंडीचा जोर वाढू लागला, की अनेक लहान रोपांवर व वेलींवर फुलं फुलू लागतात. यामध्ये काही रस्त्यांवर करडू किंवा कोंबडय़ांच्या फुलांचे ताटवे फुललेले दिसतात तर कुठे रंगीबेरंगी ङिानिया. गुलमेंदीचा फुलोरा गळून गेल्यावर त्या भोवतालची कंबरमोडीची फुलं उमलतात तर काही ठिकाणी बारीक-बारीक जांभळ्या फुलांची सहदेवीची रोपं रस्त्याच्या कडेच्या उतारांवर मध्येच निळ्या कोरांटीच्या ताटव्यावरची फुलं उमललेली दिसतात, मध्येच एखादं कर्दळीसारखं दिसणारं रानहळदीचं रोपटं सुंदर फुल अंगावर मिरवताना नजरेस पडतं. पिवळ्या फुलांचा तरोटा मध्ये-मध्ये रस्त्याच्या कडेने फुललेला दिसतो, टेकडय़ांच्या उतारांवरील कारवीच्या ताटव्यात मध्येच एखादं कारवीचं झुडूप निळं फुल लेवून उभं दिसतं. या गर्दीत एखादी कळलावीची वेलही दिसते. सपाट जमिनीवर मध्येच एखाद्या ठिकाणी एक कोंब बाहेर आलेला दिसतो, एकच पान अन् त्यातून वर आलेल्या दांडय़ावर मोठं पांढरं फुल क्रेनियम लिलीचं असतं. आंब्याच्या किंवा सागाच्या झाडांवर किंवा अनेक झुडपांवर अमरवेल व ऑर्किड्ससारख्या परजीवी वनस्पतीही दुस:याच्या भरवशावर का होईना आपलं अस्तित्व टिकवताना दिसतात. उंच फांद्यांवरील व्हँडा, ऑर्किड्सला आलेली पिवळी किंवा जांभळी फुलं सौंदर्य खुलवतात. 

रानभेंडी अन् जंगली तिळाच्या रंगीत फुलांसमवेत अनेक वेलींची लाल, जांभळी, पांढरी, पिवळी, विविध आकारांची आकर्षक फुलं जागोजागी दिसतात. मध्येच असणा:या एखाद्या मोठय़ा हलदूच्या झाडाला चेंडूसारखी फुलं लागतात. बोर, काकड अशा झाडांनाही फुलं येतात. ही फुललेली झाडं, अनेक लहान-मोठय़ा लतावेली मधमाशा-फुलपाखरे यांच्यासाठी पर्वणीच. अनेक छोटे-मोठे कीटक, मधमाशा, फुलपाखरं या फुलांवर पिंगा घालू लागतात. 

या दिवसात सारे जंगल जणू श्रीमंत-संपन्न झाल्यासारखे भासू लागते. पानोपानी बहरलेली हिरवंकच्च जंगल म्हणजे वन्यप्राण्यांसाठी पर्वणीच. जागोजागी पाणी अन् खाद्याच्या उपलब्धतेमुळे या काळात वन्यजीव दर्शन तसं कठीणच. अगदी जवळ जरी एखादं जनावर असलं तरी ते दिसणार नाही. हिरव्या पडद्याआड, गचपणात ते बेमालूमपणो दडून जातं. 

सरत्या हिवाळ्यात सागाच्या पानांवर बुरशीसदृश कीड लागून पानं पिवळी होतात व उन्हाळ्याची चाहूल लागली, की साग आपली पानं गाळायला लागतो. जंगलाचं रंग-रूप पालटू लागतं, याची सर्वप्रथम झळ पोहोचते ती हिरवं गवत अन् खुरटय़ा झुडपांना. त्याचा रंग पिवळा पडून जंगल निस्तेज भासू लागतं, तेव्हा उन्हाळा लागल्याची चाहूल साऱ्या सृष्टीला शहारून सोडते. 

मार्च महिन्याच्या दरम्यान उन्हाचा जोर वाढू लागतो तसा सागाचा पाचोळा जंगलभर पसरू लागतो. गवत अन् छोटी झाडं वाळून मरून गेल्याने त्या वाळक्या जंगलात काही मोठी झाडं आपला पर्णालंकार सांभाळत जंगलाचा हिरवेपणा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. दरम्यान, आंबा मोहरून त्याचा सुगंध आसमंतात भरू लागतो. काकडच्या झाळाला चेंडूसारखी फळं धरू लागतात. मोहाच्या फुलांनी पसरलेला सुगंध अनेक पक्ष्यांसोबत अस्वलांनाही आपल्याकडे आकर्षित करू लागतो. आवळ्याची झाडं फळांनी लडबडून जातात. 
पुढचं एप्रिल-मे मध्ये ऊन तापू लागलं, की वाळकं गवतही जनावरांनी खाल्ल्यामुळे जमीन उघडी पडू लागते; कुठे वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडत़े या सा:यातून वाचलेलं गवतही हळूहळू जागेवरच विरून गेल्यानं सारी जमीन उघडी पडते. पाणगळतीच्या झपाटय़ात साग आपली उरलीसुरली वाळकी पानं गाळून टाकतात. जंगलाचा भकासपणा आणखीनच वाढतो. 

गवत वाळून, पानं गळून गेल्यानं दूरवरचंही स्पष्टपणो दिसू लागतं. लहानसहान पाणवठे, नदीनाल्याचे प्रवाह आटून अगदी ठराविक ठिकाणीच पाणी शिल्लक राहतं अन् पाण्याच्या शोधात फिरणाऱ्या  गवे, सांबर, चितळ कधी रानकुत्रे यांचं दर्शन होण्याची शक्यता वाढते. चिखलद:यासारख्या उंच ठिकाणी मात्र याही काळात ब:यापैकी हिरवळ दिसते. येथे ब्रिटिश काळात लावलेला सिल्व्हर ओक येतो, त्याचा मोठा अन् अतिसुंदर पिवळा शेंदरी फुलगुच्छा पक्षी व किटकांना आकर्षित करतो. आंब्याच्या गर्द राया हिरव्या दिसतात. येथील कॉफीची फळं याच दरम्यान पिकून लालबुंद दिसू लागतात. तप्त उन्हाळ्यात थंड हवेचा गारवा अनुभवण्यासाठी चिखलदऱ्यात पर्यटकांची गर्दी फुलते. तापमान सर्वोच्च अंशावर पोहोचलेले असते. जंगल अधून-मधून वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडते अन् दाहकता अजून वाढते. जून सुरू होतो तसा वळवाचा पाऊस क्वचित हजेरी लावून ही दाहकता कमी करण्याचा प्रयत्न करतो; पण जंगलाचा दाह जराही शमत नाही, अन् सारा मेळघाट वाट पाहत राहतो, पावसाच्या सरींची पुन्हा चिंब भिजण्यासाठी, पुन्हा बहरून येण्यासाठी! 

No comments:

Post a Comment