थोडं माझ्या विषयी

Thursday 26 March 2015

पाचगणी

पाचगणी हे नाव त्याच्या सभोवताली असलेल्या पाच डोंगरांवरून पडलं आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची महाबळेश्वरपेक्षा फक्त ३८ मीटर कमी म्हणजे १,३३४ मीटर आहे. परंतु हे ३८ मीटर खाली उतरण्याचा मार्ग वळणावळणाचा, एका बाजूला काळजाचा थरकाप करणारं कृष्णा नदीचं खोल पात्र, तर दुस-या बाजूला पठारी प्रदेश असा आहे.


पाचगणी

पाचगणी हे नाव त्याच्या सभोवताली असलेल्या पाच डोंगरांवरून पडलं आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची महाबळेश्वरपेक्षा फक्त ३८ मीटर कमी म्हणजे १,३३४ मीटर आहे. परंतु हे ३८ मीटर खाली उतरण्याचा मार्ग वळणावळणाचा, एका बाजूला काळजाचा थरकाप करणारं कृष्णा नदीचं खोल पात्र, तर दुस-या बाजूला पठारी प्रदेश असा आहे.

पाचगणी हे एक निवासी थंड हवेच्या ठिकाणाचं उत्कृष्ट उदाहरण आहे. ब्रिटिश राजवटीचा शिक्का जणू इथं वज्रलेपासारखा उमटलेला आहे. जुन्या ब्रिटिश इमारती, पारशी घरं, एक शतक किंवा त्याहूनही अधिक काळ चालत आलेली येथील निवासी विद्यालयं यांच्या इमारतींच्या स्थापत्यातून ही छाप आपणाला जाणवते. काळाच्या पडद्याआड गेलेल्या शतकाची ओझरती चुणूक बघायची असेल, तर म.प.वि.म. ला काही जुन्या ब्रिटिश वा पारशी घरांच्या भेटीची व्यवस्था करायला सांगा.

घनदाट हिरव्या वृक्षराजीचं छत्र लाभलेल्या छोटया रस्त्यांतून रमतगमत फिरलात, तर निसर्गसौंदर्याची मजा लुटायला मिळेल. छोटया छोटया वाड्या, दरीतून नागिणीप्रमाणे वळणं घेत जाणारी कृष्णा नदी शेकडो मीटर उंचीवरून जाताना दृष्टीस पडते. टेबल लॅण्ड म्हणून ओळखल्या जाणा-या डोंगर माथ्यावरील पठारावर उभं राहून पश्चिमेकडे नजर टाकलीत, तर समुद्रसपाटी प्रदेशाचं मनोहारी दर्शन घडतं. जणू जलरंगात काढलेली लघुचित्रंच ! येथे असलेल्या अनेक तबेल्यांमधून एखादा घोडा ठरवा आणि नं मळलेल्या पायवाटांनी, प्रेमिकांच्या गुप्त चोरवाटांनी गुंफाकडे किंवा कमल गडाकडे कूच करा किंवा बाजारात भटका. अति गर्दी नसणारे आणि मनाला आल्हाद देणारे पाचगणी प्रत्येक पर्यटकाला खोलवर भावणारं एक दुर्लभ ठिकाण आहे.

टॅक्सी अगदी सहज मिळत असल्या, तरी लांब पल्ल्याच्या अंतरासाठी भाड्याच्या सायकली वा घोडे घेऊन रपेट करण्यामध्ये एक वेगळीच मजा आहे.

तपमान थंडीत १६ अंश सें. ते उन्हाळ्यात ३५ अंश सें. पाऊस वार्षिक सरासरी २१६ सें.मी. सप्टेंबर ते मार्च हा येथे सहलीला येण्याचा उत्तम काळ.

कसं जायचं? : ९८ कि.मी. अंतरावरील पुणे हा सर्वांत जवळचा विमानतळ व सर्वांत सोयीचं रेल्वे स्टेशन. तेथून बसनं येता येतं. मुंबईपासून पाचगणी, महाड मार्गे २६६ कि.मी. आहे. पुण्या-मुंबईहून राज्य परिवहन मंडळाच्या बस सेवाबरोबर म.प.वि.म. च्या आराम बससेवाही उपलब्ध आहेत. महाबळेश्वर ते पाचगणी अंतर फ़क्त १९ कि.मी. असल्यामुळे पर्यटक ही दोन्ही स्थळांना भेट दिल्याशिवाय रहात नाही.

निवास : म.प.वि.म.चं ‘फाईव्ह हिल्स’ हे शहरातील उत्कृष्ट हॉटेलांपैकी एक गणलं जातं.  

No comments:

Post a Comment