पुणे जिल्ह्याच्या सर्वात उत्तरेकडचा तालुका जुन्नर, म्हणजे निसर्गसौंदर्याची खाणच आहे. छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान शिवनेरी हा तर मानिबदू. पण त्याचबरोबर माणिकडोह, वडज, येडगाव, पिपळगाव जोगा अशी धरणं, लेण्याद्री-ओझरसारखी तीर्थक्षेत्रे, ट्रेकर्ससाठी हडसर, चावंड, जीवधन, निमगिरी, सिंदोळा, दुर्ग, ढाकोबा, हटकेश्वर असे किल्लेआणि गिरिस्थाने.
पर्यटनसंपन्न जुन्नर तालुका
पुणे जिल्ह्याच्या सर्वात उत्तरेकडचा तालुका जुन्नर, म्हणजे निसर्गसौंदर्याची खाणच आहे. छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान शिवनेरी हा तर मानिबदू. पण त्याचबरोबर माणिकडोह, वडज, येडगाव, पिपळगाव जोगा अशी धरणं, लेण्याद्री-ओझरसारखी तीर्थक्षेत्रे, ट्रेकर्ससाठी हडसर, चावंड, जीवधन, निमगिरी, सिंदोळा, दुर्ग, ढाकोबा, हटकेश्वर असे किल्ले आणि गिरिस्थाने. कुकडी, मीना नद्यांचा उगम आणि ऐतिहासिक नाणेघाटसारखी अद्वितीय कलाकृती या आणि अशा अनेक गोष्टी या परिसरात खूप मोठय़ा संख्येने आहेत. जुन्नर म्हणजे किल्ले शिवनेरी, लेण्याद्री, ओझर हे समीकरण मराठी माणसाच्या मनात अगदी पक्के आहे. परंतु याशिवायही अनेक गोष्टींनी हा परिसर संपन्न आहे, वैविध्यपूर्ण आहे. म्हणूनच तो ट्रेकर्स, पर्यटक, पक्षी निरीक्षक आणि पुरातत्त्वविद्येच्या अभ्यासकांना कायमच खुणावत असतो.
जुन्नरचा उल्लेख थेट इ.स. पूर्व दुसर्या शतकापासून मिळतो. जीर्ण नगर या नावाने ज्ञात असलेल्या या ठिकाणाचा संबंध सातवाहन कुलापर्यंत जातो. पश्चिम भारतातील या संपन्न राजकुलाने ‘त्रिसमुद्रतोयपीतवाहन’ अशी बिरुदावली मिरवली होती. याच कुळातील राणी नागनिका हिने नालासोपारा ते पैठण या प्रसिद्ध व्यापारी मार्गावरची वाहतूक होणार्या याच नाणेघाटात एक लेणे खोदून काढले व त्यात एक ऐतिहासिक लेख कोरला आहे. अशी अद्वितीय कलाकृती अन्यत्र क्वचितच आढळेल. नाणेघाटाच्या संरक्षणासाठीच जणू इथे शिवनेरी, हडसर, जीवधन, चावंड अशा दुर्गाची निर्मिती झाली असावी. या किल्ल्यांची भ्रमंती आणि त्यावरून न्याहाळता येणारा आसमंत नितांत रमणीय आहे. नुसते किल्लेच नव्हे तर कुकडेश्वरसारखे समृद्ध मंदिर पण याच परिसरातले. शिलाहारकालिन मंदिर स्थापत्याचा एक अजोड नमुना म्हणजे हे मंदिर होय. कुकडी नदीच्या उगमस्थानी पूर या गावी अंदाजे इ.स.च्या १०-११व्या शतकामध्ये बांधलेले हे शिल्पसमृद्ध मंदिर आवर्जून पाहण्याजोगे आहे. याचबरोबर जुन्नर परिसरातील डोंगरांमध्ये पूर्वजांनी कोरून ठेवलेली विविध लेणी हे तर अभ्यासकांचे कायमच आकर्षण राहिले आहे.
जुन्नरच्या अलीकडे अंदाजे ३ कि.मी.वर डाव्या हाताला मानमोडी डोंगरामध्ये कोरलेली लेणी आपले लक्ष वेधून घेतात. मानमोडी, भीमाशंकर, भूतलेणे, तुळजा, अंबाअंबिका असा हा लेण्यांचा समूह इथे आहे. सध्या या लेण्यांमध्ये मधमाशा मोठय़ा प्रमाणावर असल्याने तेथे जाणे धोकादायक आहे. सुमारे १४ लाख वर्षांपूर्वी इंडोनेशियातील टोबो नावाच्या ज्वालामुखीच्या स्फोटातून बाहेर पडलेली राख (टेफ्रा), नारायणगाव नजीकच्या बोरी गावात येऊन पडलीये. नदीपात्राच्या कडेला या राखेचे थर पाहायला मिळतात. बोरी गावाला जातानाच वाटेत खोडद येथील महाकाय रेडिओ दुर्बणिी लक्ष वेधून घेतात.
प्राचीन काळ ते आधुनिक वैज्ञानिक युग यांचा सुरेल संगम आपल्याला जुन्नर परिसरात पाहता येतो. आळे गावातील ज्ञानेश्वरांच्या रेडय़ाची समाधी, नारायणगावचा किल्ला आणि शँपेननिर्मितीचा प्रकल्प, पावसाळ्यातील रमणीय माळशेज घाट, खिरेश्वर आणि हरिश्चंद्रगड, या आणि अशा अनेक गोष्टींनी समृद्ध परिसर आपली वाट पाहतो आहे. चार दिवस बाजूला काढून आणि नारायणगाव व जुन्नर ही ठिकाणे केंद्रस्थानी ठेवून आपण या परिसराची मनसोक्त भटकंती करू शकतो. एक दिवस नारायणगाव, आळेफाटा, माळशेज हा परिसर पाहायचा. दुसर्या दिवशी जुन्नर शहर, शिवनेरी, लेण्याद्री आणि पुढचे दोन दिवस कुकडेश्वर, जीवधन, नाणेघाट आणि हडसर, चावंड, हटकेश्वरसाठी ठेवायचे, असा कार्यक्रम ठरवता येईल.
नुसते जुन्नर शहर पहायचे झाले तरीसुद्धा एक दिवस कमी पडेल इतक्या वैशिष्टय़पूर्ण गोष्टी या नगरात आहेत. पकी एक शिल्प महत्वाचे आहे. शिवपूर्वकालीन राजवटीमधील ऐतिहासिक खुणांमध्ये महत्वाचे असलेले हे शिल्प, सदर बाजारातील वेशीनजिकच्या दक्षिणेकडील बुरुजावर आहे. ते एका छोटय़ा दगडावरील द्वारशिल्प आहे. एक हत्ती, त्यामागे एक शुक (पोपट) आणि त्यामागे तोंडात तारा धरलेला वाघ आहे. फारच अर्थपूर्ण शिल्प आहे हे. याचा अर्थ असा- ‘या प्राचीन नगरातील सत्ताधीशांकडे गजांतलक्ष्मी आहे, शुकासारखी विद्वत्ता आणि वैराग्य आहे, वाघासारखे पराक्रमी शूर सनिक आहेत अन अवघ्या जगाला प्रकाश देण्याचं सामथ्र्य आहे.’ शिवनेरीवर जन्मलेल्या शिवराजांच्या राज्यात हे सगळंच होतं, फक्त हे जुन्नर शहर आणि राजाचे जन्मस्थान शिवनेरी मात्र दुर्दैवाने नव्हता हीच एक खंत. आजही वापरत असलेला मलिकंबर नहर या गोष्टीही पाहण्याजोग्या. जुन्नर्भोवती पद्मावती, भातखळा, कुंभार, आणि बादशहा असे चार तलाव बांधले गेले होते.
तांदूळ, कांदा व फूलशेती यांनी समृद्ध असा हा प्रदेश आहे. संपूर्णपणे शाकाहारी, पण नाव मात्र मासवडी असलेला अतिशय चविष्ट पदार्थ आवर्जून खावा असा आहे. कोणत्याही ऋतूमध्ये हा परिसर रमणीयच आहे.
ऐन पावसाळ्यामध्ये हा सगळाच परिसर पाण्याने सचल न्हाऊन निघतो. नजर जाईल तिकडे हिरवाई पसरलेली असते अनेक रानफुले फुललेली दिसतात. काळेकभिन्न कातळ कडे आणि त्यांच्या अंगाखांद्यावर पसरलेली ही हिरवीगार नक्षी अक्षरश डोळ्याचे पारणे फेडते. निसर्गाची मुक्तहस्ते उधळण या ठिकाणी पाहायला मिळते. नद्या ओसंडून वाहत असतात, काळे मेघ जमिनीला टेकायला आलेले असतात, खाचरांमध्ये भात रोपांची लागवड चालू असते, आणि या सगळ्याला पाश्र्वभूमी असते ती भारदस्त किल्ल्यांची किंवा जबरदस्त कातळकडय़ांची. निसर्गाचे एवढे मनमोहक रूप पाहण्यासाठी फार लांब जाण्याची गरज नाही. एक दिवसाची किंवा तीन चार दिवसांची, जसा वेळ उपलब्ध आहे तशी भटकंती करायला जुन्नर परिसरासारखे दुसरे ठिकाण नाही. गरज आहे ती बाहेर पडायची आणि इथे मनसोक्त भटकायची. पुण्या-मुंबईला एवढा जवळ असूनही काहीसा दुर्लक्षित राहिलेला जुन्नर परिसर आपल्याला खुणावतो आहे.
No comments:
Post a Comment