महाराष्ट्रातील हिल स्टेशन्सच्या क्रमवारीत राज्यात दुसर्या क्रमांकावर तोरणमाळचा समावेश आहे. सातपुड्याच्या चौथ्या पर्वतरांगेत नंदुरबार जिल्ह्यात हा परिसर मोडतो. सातपुडा पर्वतात पंचमढी आणि अमरकंटकाच्या खालोखाल तोरणमाळचे पठार उंच आहे. कालपर्यंत इथे दळणवळणाच्या सुविधांचा अभाव होता. या सर्वांचा फायदा मात्र एक निश्चित झाला, तो म्हणजे तोरणमाळचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित राहिले.
सातपुड्याची लोभस "तोरणमाळ"
महाराष्ट्रातील हिल स्टेशन्सच्या क्रमवारीत राज्यात दुसर्या क्रमांकावर तोरणमाळचा समावेश आहे. सातपुड्याच्या चौथ्या पर्वतरांगेत नंदुरबार जिल्ह्यात हा परिसर मोडतो. सातपुडा पर्वतात पंचमढी आणि अमरकंटकाच्या खालोखाल तोरणमाळचे पठार उंच आहे. कालपर्यंत इथे दळणवळणाच्या सुविधांचा अभाव होता. या सर्वांचा फायदा मात्र एक निश्चित झाला, तो म्हणजे तोरणमाळचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित राहिले.
पुराणात तोरणमाळचा तूर्णमाळ असाही उल्लेख सापडतो. मुबलक प्रमाणात तोरणाची झाडे असल्याने त्याला तोरणमाळ हे नाव पडले असावे. पण माळवा साम्राज्याचा राजा मांडू याच्या राजधानीचे ठिकाण काही काळ तोरणमाळ होते. त्याच्या ताब्यात असलेल्या सातपुडा पर्वतावरील राज्याचे द्वार अथवा तोरण म्हणूनही या प्रदेशाला तोरणमाळ म्हटले जात असावे. तोरणमाळ या डोंगरी किल्ल्यापासून खान्देशचा इतिहास सुरू होतो. आज तेथे फक्तया किल्ल्याचे अवशेष आहेत, त्याचे बांधकाम भक्कम असल्याचे ते पुरावे आहेत.
तोरणमाळला पाहण्यासारखी अनेक सौंदर्यस्थळे आहेत. तोरणमाळला पोहोचल्यावर दृष्टीस पडतो तो दूरवर पसरलेला यशवंत तलाव. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी एकदा तोरणमाळला भेट दिली होती. तोरणमाळच्या सौंदर्याने यशवंतराव चव्हाणांनाही मोहिनी घातली. त्यांच्या भेटीनंतर २६ सप्टेंबर १९६९ ला या तलावाचे ‘यशवंत तलाव’ असे नामकरण करण्यात आले. कधीही न आटणार्या या तलावात विहार करण्यासाठी खास स्वयंचलित बोटींची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तोरणमाळमधील सीताखाई ही एक गर्द झाडींनी नटलेली अंगावर शहारे आणणारी दरी आहे. तिन्ही बाजूंनी फाटलेला पहाड आणि मध्येच एक उंच सुळका, निसर्गाच्या अचाट शक्तीने साकारलेले एक निसर्गनिर्मित शिल्पच म्हणावे लागेल. पावसाळ्यात त्यावरून खळखळणारा धबधबा म्हणजे सीताखाईचा वस्त्रालंकार भासावा. सीताखाईला लागूनच एक तलाव आहे. या तलावाला सर्वत्र कमळाच्या वेलींनी आपल्या कुशीत दडवून टाकलेय.
मावळत्या सूर्याचे लोभस दर्शन ही एक तोरणमाळची खासियत आहे. ‘मावळताना इथला सूर्य अक्षरश: हसरा असतो,’ असेही इथल्या सूर्यास्ताच्या बाबतीत म्हटले जाते. इथला पाऊस अनुभवणे हासुद्धा एक अविस्मरणीय अनुभव असतो. खडकी व आमदरी हीसुद्धा विशेष उल्लेखनीय सौंदर्यस्थळे आहेत. येथून आगपेटीच्या आकाराच्या झोपड्या व मुंग्यांप्रमाणे माणसांच्या हालचाली दृष्टीस पडतात. तोरणमाळला जाताना चार किलोमीटर अगोदर ‘सातपायरी’ घाट लागतो. जणू या हिरव्यागार झाडांची मलमली शाल पांघरलेल्या डोंगराने सात फेर्यांची माळ परिधान केली आहे, असा आभास होतो. निसर्गाच्या अंगभूत सौंदर्यात मानवी कौशल्यांची भर पडली तर घाटातही सुंदरतेचा आभास निर्माण करता येतो, हे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी येथे सिद्ध करून दाखवले आहे.
सातपायरी रस्त्याच्या कडेला डोंगराच्या कपारीत एक लेणी आहे. तिला मंदिराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तिचे प्रवेशद्वार कोरलेले असून त्यावर नक्षीकाम असलेली ललाटपट्टी आहे. समोरचे चौकोनी दालन आता गाभारा बनले आहे. भिंतीवर पुरुषभर उंचीची, पाठीमागे सदाफणा नागाचे छत्र असलेली पारसनाथाची उभी असलेली मूर्ती आहे. हे जैन लेणे पारसनाथ किंवा नागार्जुन या नावाने प्रचलित आहे.
इतर संरक्षित वनांप्रमाणे तोरणमाळला संरक्षित वनाचा दर्जा देण्यात आला आहे. येथे इतर वन्य प्राण्यांबरोबरच अस्वलांचे प्रमाण जास्त आहे. मध्यंतरी वाघानेही तेथे दर्शन दिल्याचे सांगितले जाते. तोरणमाळ हे ठिकाण दुर्गम आणि खडतर असल्यामुळे त्या ठिकाणी फारशी वर्दळ नसते. वर्दळीचा अभाव हेच तोरणमाळच्या सुंदरतेचे गुपित आहे.
इतर संरक्षित वनांप्रमाणे तोरणमाळला संरक्षित वनाचा दर्जा देण्यात आला आहे. येथे इतर वन्य प्राण्यांबरोबरच अस्वलांचे प्रमाण जास्त आहे. मध्यंतरी वाघानेही तेथे दर्शन दिल्याचे सांगितले जाते. तोरणमाळ हे ठिकाण दुर्गम आणि खडतर असल्यामुळे त्या ठिकाणी फारशी वर्दळ नसते. वर्दळीचा अभाव हेच तोरणमाळच्या सुंदरतेचे गुपित आहे.
नियोजनबद्ध रीतीने या पर्यटनस्थळाचा विकास केल्यास तेथे ऐतिहासिक, नैसर्गिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि साहसी पर्यटनाच्या अर्मयाद शक्यता एकवटलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने तेथे तोरणमाळ हिल रिसॉर्ट सुरू केले आहे १९९० पासून रावल उद्योग समूहाने ते चालवण्यास घेतले आहे. खान्देशातील एकमेव असलेल्या या अहिराणीच्या हिल स्टेशनला दोन-तीन दिवस मुक्काम करूनही समाधान होत नाही. अर्मयाद सुंदरतेच्या आभाळमर्यादा उदरात साठवून साद घालणार्या तोरणमाळला डोळ्यांत सामावून घेताना ओठांवर शब्द येतात..
‘तुझ्या संगतीत क्षितिज हळवं होतं,
मावळणार्या सूर्यालाही मायेनं जोजावतं’
‘तुझ्या संगतीत क्षितिज हळवं होतं,
मावळणार्या सूर्यालाही मायेनं जोजावतं’
कसे जाल?
शहाद्या पासुन ४७ कि.मी. (नाशिक - शहादा २०० कि.मी.) पश्चिम लोहमार्गा वरील नंदुरबार किंवा दोंडाइचा स्थानक ते शहादा - ३० कि.मी. मुंबई ते तोरणमाळ अंतर आहे ३६७ कि.मी.
No comments:
Post a Comment