थोडं माझ्या विषयी

Thursday 12 February 2015

सागरेश्वर अभयारण्य



भरपूर पडणारा पाऊस, दाट धुके, अंगाला झोंबणारा वारा, हिरवागार शालू परिधान केलेली धरतीमाता, पक्ष्यांचा किलबिलाट, वानरसेनेच्या या झाडावरून त्या झाडावरच्या उड्या, डोंगराच्या कपारीतून वाहणारे छोटे-छोटे झरे अशा निसर्गरम्य वातारवणाचा आस्वाद सागरेश्वर परिसरात आपल्याला अनुभवता येतो. हे महाराष्ट्रातील पहिलं वहीलं मानवनिर्मित अभयारण्य आहे.



सागरेश्वर अभयारण्य


सांगली जिल्ह्यातही सागरेश्वर हे ठिकाण वर्षा सहलीचा आनंद लुटण्यासाठी अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे. येथील सागरेश्वर मंदिरामुळे वर्षा सहलीबरोबरच श्रावणात येथे होणाऱ्या यात्रेमुळं पर्यटकांना भक्तीरसातही चिंब भिजण्याचा आनंद घेता येतो. 

भरपूर पडणारा पाऊस, दाट धुके, अंगाला झोंबणारा वारा, हिरवागार शालू परिधान केलेली धरतीमाता, पक्ष्यांचा किलबिलाट, वानरसेनेच्या या झाडावरून त्या झाडावरच्या उड्या, डोंगराच्या कपारीतून वाहणारे छोटे-छोटे झरे अशा निसर्गरम्य वातारवणाचा आस्वाद सागरेश्वर परिसरात आपल्याला अनुभवता येतो. विविध प्रकारच्या पक्षांबरोबरच हरिण,सांबरांचं दर्शनही आपल्याला या ठिकाणी होतं.

सागरेश्वर अभयारण्याच्या परिसरात विपुल अशी वनसंपदा आहे. वृक्षमित्र धो. म. मोहिते यांनी या अभयारण्याच्या विकासकामी अविश्रांत परिश्रम घेतले तेथे चंदन, हावडा, बाभूळ, याही वृक्षाबरोबरच जंगली वृक्षही पहावयास मिळतात. करवंद ,बोर, या रानमेव्यांच्या जाळयाही जागो-जागी आहेत. चिमणी पोपट, जंगली कोंबडया, मोर -लांडोर, कोकीळ, पोपट, आदी पक्षीही स्वच्छंदपणे विहार करताना पहावयास मिळतात. 

सागरेश्वरच्या माथ्यावर पोहचल्यावर आजूबाजूचा परिसर दिसतो. खालच्या बाजूला नागमोडी वाहणारी कृष्णा नदी पर्यटकांना मोहित करते. येथील किर्लोस्कर पॉईट वरून दिसणारा निसर्गरम्य परिसर शांतपणे डोळयात साठविता येतो. सुमारे 1हजार 87 हेक्टर क्षेत्रात या अभयारण्याचा विस्तार झाला आहे. महालगुंड, विहार, छत्री बंगला या सह अनेक निसर्गरम्य टिकाणे आहेत. 

या अभयारण्यातील सागरेश्वर मंदिराच्या इतिहास प्राचीन आहे. या बाबतची आख्यायिका अशी आहे की, इ.स.न. पूर्व 2350 मध्ये कुंडलचे राजे सत्यवान हे होते.त्यांना ऋषीमुनींनी शाप दिला .त्यामुळे त्यांच्या अंगावर जखमा झाला. सत्यवान राजे शिकारीसाठी सागरेश्वरच्या जंगलात गेले होते. त्यांनी येथील कुंडात आंघोळ केली. आश्चर्य म्हणजे सत्यवान राजांनी येथील कुंडात आंघोळ केल्याबरोबरच त्यांच्या अंगावरील जखमा बऱ्या झाल्या. त्यानंतर सत्यवान राजांनी येथे मंदिराची उभारणी केली. यावेळी 108 पिंडी येथे निर्माण झाल्या, त्या आजही आपल्याला पहावयास मिळतात.  

श्री क्षेत्र सागरेश्वर देवस्थानात बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते. येथे अंबाबाई, उजव्या व डाव्या सोंडेचे गणपती , कार्तिकस्वामी, करकटस्वामी, काशी विश्वेश्वर, रामेश्वर, सोमेश्वर, त्र्यंबकेश्वर, भीमेश्वर, सत्यनाथ, ओंकारेश्वर, वीरभद्रेश्वर, विठ्ठल रुक्मिणी, नंदिकेश्वर, केदारेश्वर, सत्येश्वर, रामेश्वर, सिध्देश्वर, धोपेश्वर आदी ज्योतिर्लिंगाच्या मंदिराबरोबरच इतर देवतांची मंदिरे ही आहेत. 
एकूण 47 मंदिरे व 13 ओवऱ्या आहेत. आंघोळीचे व पिण्याचे कुंड वेगवेगळे आहेत. या कुंडात वर्षभर पाणी ते केव्हाच कमी होत नाही. 

दसरा व महाशिवरात्रीच्या वेळेस येथे पालखी सोहळा असतो. या पालख्या लिंगेश्वरचे दर्शन घेऊन पुन्हा सागरेश्वर येथे येतात. श्रावण महिन्यातील सोमवारी येथे मोठी यात्रा भरते. मुंबई -पुणे याचबरोबर पंचक्रोशीतील लाखो भक्तगण सागरेश्वर दर्शनासाठी गर्दी करतात आणि हा परिसर भक्तीरसात चिंब भिजून जातो. 

येथील किर्लोस्कर पॉइंर्ट वरून आसमंतात नजर फिरवली तर वाळवा, पलूस , खानापूर, कडेगाव तालुक्यातील विहंगम परिसर पाहता येतो. शाळेतील मुलांसाठी प्रवेश शुल्कात सवलत दिली जाते. दर मंगळवारी हे अभयारण्य बंद असते. सागरेश्वर अभयारण्य मिरज स्टेशन पासून 60 कि.मी, कराड पासून 30 कि.मी तर ताकारी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 5 कि.मी अंतरावर आहे. 

तर अशा या निसर्गरम्य अभयारण्य आणि सागरेश्वरच्या भक्तीरसात चिंब होण्यासाठी सागरेश्वर अभयारण्याचा परिसर पावसाळयातच पालथा घालणे आनंददायी होईल यात शंका नाही. तर मग कधी येतायं सागरेश्वरला...!   

No comments:

Post a Comment