देवा तुझी सोन्याची जेजुरी
गडाला नवलाख पायरी
जिथे नांदतो मल्हारी !
जेजुरीचा खंडोबा
जेजुरीचा खंडोबा मंदिर हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये पुणे- बंगळूर या राष्ट्रीय महामार्गावर स्थित आहे. धनगर समाज बांधवामध्ये जेजुरीचा खंडोबा 'म्हाळसाकांत' किंवा 'मल्हारी मार्तंड' या नावानेही ओळखला जातो. खंडोबा हे प्रामुख्याने धनगर समाजाचे कुलदैवत आहे. इतर समाजातही खंडोबा कुलदेवता आहे. मराठी परंपरेनुसार विवाहित जोडपे आधी खंडोबाचे दर्शन घेतात व त्यानंतर संसाराला लागतात. जेजुरीला खंडोबाचे मंदिर एका उंच टेकडीवर असून जवळपास दोनशे पायर्या चढून मंदिरात जावे लागते. टेकडीवरून संपूर्ण जेजुरीचा विलोभनीय देखावा पाहून प्रवासातील शीण क्षणात नाहीसा होऊन जातो. मंदिराच्या पायथ्याशी प्राचीन दीपमाळ आहे. त्या प्रज्वलित झाल्यानंतर दिव्यांच्या लख्ख प्रकाशात खंडोबाचे मंदिर उजळून निघते. मंदिर हेमाडपंथी बांधणीचे असून विशाल, भव्यदिव्य आहे.
या ठिकाणी चंपाषष्ठी, दसरा व चैत्री पाडवा या दिवशी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात येतो. त्या दिवशी प्रामुख्याने छबीना निघून पालखीमधून देव हे गडाखाली असणाऱ्या तलावामध्ये नेऊन तेथे धार्मिक स्नान घालतात. येथे मार्गशीर्षमध्ये नवरात्रोत्सवही साजरा करण्यात येतो. त्याशिवाय सोमवती अमावस्येस ठिकठिकाणीहून लाखो भक्तगण येथे येऊन भंडारा उधळतात.
मंदिरासमोर १०x१२ फूट लांबीची पितळी कासवाची प्रतिकृती आहे. त्यावरती खंडोबाच्या नावाने खोबरे व भंडारा उधळतात व हा उधळलेला भंडारा लहान-थोर, गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता तो सर्वजण प्रसाद वेचून घेतात. खंडोबाचे मंदिर दोन भागात आहे. पहिल्या भागात मंडप तर दुसर्या भागात गर्भगृह आहे. मंडपात भाविक सामूहिक पूजाअर्चा करतात. गर्भगृहात खंडोबाची चित्ताकर्षक मूर्ती विराजमान आहे. खंडोबाचे मंदिर हेमाडपंथी असून मंदिर परिसरात ऐतिहासिक शस्त्रेही ठेवण्यात आली आहेत. विजयादशमीला येथील तलवार अधिक वेळ उचलण्याची स्पर्धा घेतली जाते. येथील ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.जेजुरी या गावाला ऐतिहासिक वारसाही आहे. शिवाजी महाराज व त्यांचे वडील शहाजी राजे येथे बर्याच वर्षांच्या अंतराने भेटले होते. त्या काळी जेजुरी हा दक्षिण प्रांतातील एक मुख्य किल्ला होता. येथील प्रदक्षिणेच्या मार्गावरूनच सर्वसाधारपणे १॥ किलोमीटर अंतरावर कडेपठार हे खंडोबाचे वास्तव्याचे मूळ ठिकाण आहे. भाविक लोक आवर्जून तेथे जातात.
देवास देणगीरूपाने पैसे मिळतात व पंच कमिटी या पैशातून वर्षभराचे धार्मिक खर्च करते. देवास वेगळे उत्पन्न नाही. मुख्य गुरवाकडून त्रिकाल देवतांची पूजा होते. मुख्य नैवेद्य हा पुरणपोळीचा असतो. खंडोबाचे मुख्य दैवत म्हणून वाघ्यामुरळी हे येथे प्रतिवर्षी हजेरी लावून जातात. इंदौरचे होळकर घराण्याचे खंडोबा हे कुलदैवत असून अहिल्याबाई होळकर यांनी सदर देवळाचा जीर्णोद्धार केला. गडाखाली भक्कम बांधकामाचे सरोवर (तलाव) आहे. धनगर समाजाचे लोक हे मुख्य दैवत म्हणून मानतात.
मराठी महिन्यानुसार चैत्र, मार्गशीर्ष, पौष व माघ महिन्यात येथे भव्य यात्रा भरते. यावेळी लाखो भाविक जेजुरीला येत असतात.
कसे पोहचाल?
महामार्ग: जेजुरी पुणे येथून अवघ्या 40 किलोमीटरवर असून पुण्याहून जेजुरीला जाण्यासाठी बस किंवा खाजगी वाहन सहज उपलब्ध होते.
रेल्वेमार्ग: पुणे-मिरज रेल्वे मार्गावर जेजुरी हे रेल्वे स्थानक आहे.
रेल्वेमार्ग: पुणे-मिरज रेल्वे मार्गावर जेजुरी हे रेल्वे स्थानक आहे.
No comments:
Post a Comment