सह्याद्रीच्या कुशीत वसलेले साहसी पर्यटक व ट्रेकर्सना साद घालणारे थंड हवेचे ठिकाण म्हणजे भंडारदरा. सह्याद्री पर्वत रांगेतील महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई येथेच आहे. प्रवरा नदी अडवून येथे भंडारदरा धरण बांधण्यात आले आहे.धरणांचे दुरपर्यत पसरलेले पाणी पाहण्याचा आनंद अवर्णनीयच.
पावसाळ्यातील हिरवेगार भंडारदरा आणि ठाईठाई कोसळणारे धबधबे म्हणजे तरुणाईला खास निमंत्रणच! |
भंडारदरा
सह्याद्रीच्या कुशीत वसलेले साहसी पर्यटक व ट्रेकर्सना साद घालणारे थंड हवेचे ठिकाण म्हणजे भंडारदरा. सह्याद्री पर्वत रांगेतील महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई येथेच आहे. प्रवरा नदी अडवून येथे भंडारदरा धरण बांधण्यात आले आहे.धरणांचे दुरपर्यत पसरलेले पाणी पाहण्याचा आनंद अवर्णनीयच. येथील विल्सन धरण पर्यटकांचेआकर्षण आहे. धरणाच्या पायथ्याशी छानशी बाग आहे. येथे एका मोठ्या खडकावरून धरणाचे पाणी सोडले जाते, कोसळताना त्याचे तुषार अंगावर घेण्याचा आनंदही काही औरच आहे. कळसूबाई पर्वताचे विशाल रूप आपल्याला कॅनव्हासवर रेखाटलेल्या चित्राप्रमाणे बघायचे असल्यास भंडारदरयाला यायलासं हवे. विल्सन धरणाच्या पाण्यात कळसूबाईचे प्रतिबिंब पाहून चित्तवृत्ती प्रफुल्लीत होतात. शिवकाळात शत्रूपासून स्वराज्याचे संरक्षण करून आगाऊ सूचना देण्यासाठी टेहळणी बुरूजाचे काम करायचे ते कळसूबाई शिखर.
सह्याद्रीच्या पर्वरांगात निसर्गाच्या सानिध्यात मुक्तपणे भटकायचे झाल्यास भंडारदरा आदर्श ठिकाण आहे. याच परिसरात असलेला रतनगड ट्रेकर्ससाठी आव्हान आहे. जवळच असलेला रंधा फॉल तब्बल 45 मीटर उंचीवरून खाली कोसळतो. तो पाहणे हाही एका आनंददायी अनुभव ठरावा. येथील पर्वत रांगामधून शांतपणे प्रवरा नदी शांतपणे वाहते.येथे अगस्ती ऋषींचा आश्रमही आहे. प्रभू रामचंद्रांना अगस्ती ऋषी येथेच भेटले असल्याचे संदर्भ आहेत.
काय पहाल?
● भंडारदरा धरण - म्हणजेच आर्थर लेक विल्सन डॅम, अशिया खंडातील एकमेव सर्वात जूने धरण सन १९२६ साली इंग्रजांनी बांधले. ते समुद्रसपाटीपासून ७५० मिटर उंचीवर आहे. धरणाची क्षमता ११ टी.एम.सी., धरणाचे परिक्षेत्र-१२१.७० चौरस किलो मिटर व धरण क्षेत्रात पाऊस ३००० मिली मिटर असतो.
● अंब्रेला फॉल - (छत्री धबधबा) भंडारदरा धरणाच्या भिंती लगत असून खूपच रमणीय व सुंदर दृश्य असते.
● रांधा फॉल - भंडारदरा धरणापासून अवघ्या ११ किलो मिटर अंतरावर आहे. तेथे ४५ मिटर वरून खाली पाणी पडते.
● अमृतेश्वराचे मंदीर व रतनगड - भंडारद-यापासून बोटीने ८ किलो मिटर लांब. अमृतेश्वर मंदीर हे हेमाडपंथी शंकराचे शिल्प कलाकृती मंदीर असून १२०० वर्ष पूर्वीचे जुने मंदीर आहे.
● घाटघर - भंडारद-यापासून अंतर २० कि. मी. तेथे कोकण कडा आहे.
● पेमगिरी - भंडारद-यापासून ५५ कि.मी. अंतरावर असून तेथे वडाचे झाड दिड एकर परिक्षेत्रात पसरलेले आहे.
● कळसूबाई शिखर - महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर सह्याद्री पर्वतावर असून उंची १६६४ मीटर आहे.
केव्हा जाल?
भंडारदर्यास भेट देण्यासाठी हिवाळा हा चांगला मोसम आहे परंतु या परिसरातील पाऊस अनुभवणे हाही एक आनंददायी भाग आहे. ठाई-ठाई कोसळणारे धबधबे, रिमझिमणारा पाऊस, परिसरातील आदिवासींची भातशेतीसाठी चाललेली लगबग... आणि हिरवाईने नटलेला हा परिसर पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.
जाण्याचा मार्ग:
मुंबईपासून भंडारदर्याचे अंतर आहे साधारणतः १८५ कि.मी. व घोटीहून भंडारदरा ३६ कि.मी. अंतरावर आहे. रेल्वेने जायचे झाल्यास मध्य रेल्वेवरील इगतपुरीला उतरायचे. इगतपूरीहून भंडारदरा ४० कि.मी.वर आहे. पुणेकरांना रस्त्याने जायचे झाल्यास अंतर आहे साधारणतः २०० कि.मी.
No comments:
Post a Comment