थोडं माझ्या विषयी

Tuesday 24 February 2015

देवींची साडेतीन शक्‍तिपीठे

प्राचीन काळापासून शक्‍तीच्या उपासनेला खूप महत्त्व दिले गेले आहे. शक्‍तीची उपासना मानवाला प्रेरणादायी ठरते. आदिशक्‍तिपीठांचा महाराष्ट्रापुरता विचार केल्यास देवीची साडेतीन शक्‍तिपीठे आहेत. तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही तीन पूर्ण तर वणीची सप्तशृंगी हे अर्धे शक्‍तिपीठ मानले जाते.



देवींची साडेतीन शक्‍तिपीठे

प्राचीन काळापासून शक्‍तीच्या उपासनेला खूप महत्त्व दिले गेले आहे. शक्‍तीची उपासना मानवाला प्रेरणादायी ठरते. आदिशक्‍तिपीठांचा महाराष्ट्रापुरता विचार केल्यास देवीची साडेतीन शक्‍तिपीठे आहेत. तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही तीन पूर्ण तर वणीची सप्तशृंगी हे अर्धे शक्‍तिपीठ मानले जाते.


तुळजाभवानी माता :

तुळजापूरची तुळजाभवानी माता ही राज्याचे पहिले शक्तिपीठ असून, नवरात्रात नऊ दिवस प्रत्येक दिवशी वाढणाऱ्या माळेने भाविकांच्या श्रद्धेस आराधनेची भरती येते. नवरात्राच्या नऊ माळा असल्या तरीही तुळजाभवानीचा उत्सव तसा २१ दिवसांचा असतो.

तुळजाभवानी उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले हे देवालय सोलापूर
पासून प्रवासाच्या दृष्टीने जवळ आहे. देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्याखेरीज या मंदिराचा कळस दिसत नाही. मातेच्या मंदिरात घटस्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेस होत असली तरीही तत्पूर्वी देवीचे धार्मिक उत्सव भाद्रपद वद्य नवमीस सायंकाळपासून सुरू होतात. देवीची प्रत्यक्ष मूर्तीची शेजघरातील निद्रा वद्य नवमीस सायंकाळी सुरू होते व रात्रापूर्वी देवीची शेजघरातील निद्रा असते.

तुळजाभवानी मातेचे स्थान बालाघाट म्हणजेच यमुनाचलावर वसलेले आहे. संरक्षणासाठी दोन्हीकडे पारंपरिक वसाहत आहे. संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत चांगली व्यवस्था लावून मंदिराची उभारणी केली आहे. तुळजाभवानी मातेचे मंदिर तसेच पूर्णतः खोलगट भागात असून, सुरक्षेच्या भौगोलिकदृष्ट्या तुळजाभवानी मंदिरात जाण्यासाठी उताराच्या दृष्टीने जावे लागते.


मंदिरात जाताना डावीकडे तीर्थकुंडे आहेत. एकशेआठ झऱ्यांचे उगमस्थान असणारे कल्लोळतीर्थ, तसेच अमृतकुंड म्हणजेच पूर्वीचे अंधारकुंड असे नाव प्रचलित होते. उजवीकडे गोमुख तीर्थकुंड आहे. तुळजाभवानी मातेस पार्वतीचा अवतार समजण्यात येते. त्यामुळे गोमुख तीर्थकुंडातही महादेवाची मूर्ती आहे. त्यापाठीमागे दत्तपादुका आहेत. त्यानंतर पहिल्यांदा कोणत्याही कार्यास सुरवात करताना गणेशदर्शन करणे हे पुराणातून सांगितले आहे.

त्यामुळे गणेशदर्शन करून तुळजाभवानीच्या मुख्य रावरंभा निंबाळकर दरवाजामधून देवीच्या मंदिरात प्रवेश केला जातो. गणेशमूर्तीच्या पाठीमागे मार्कंडेय ऋषी आहेत. उजवीकडे तुळजाभवानीचा नगारखाना आहे. त्यानंतर अवघ्या पूर्वीच्या पाच पायऱ्या उतरल्यानंतर देवीचे होमकुंड आहे. होमकुंडाचे मंदिर पुरातन हेमांडपंती आहे. होमकुंडावर उजव्या बाजूस टेकून गणेशमूर्ती आहे. होमकुंडाच्या पायाशी रक्तभैरवाची मूर्ती आहे.

तुळजाभवानीचे होमकुंड सुमारे दहा फूट लांब - रुंद असून, साधारण सात फूट खोल आहे. वर्षाला आश्विन शुद्ध दुर्गाष्टमी ते अश्विनी पौर्णिमा या कालावधीत होमकुंड प्रज्वलित असते. त्यानंतर तुळजाभवानी मातेच्या मुख्य स्थानाशिवाय देवीचा सीमोल्लंघन पार आहे. सीमोल्लंघन पाराची रचना ही अत्यंत पुरातन असून, पूर्णतः दगडी बांधकाम केलेले आहे.

साधारण बारा फूट लांबी-रुंदीचा सीमोल्लंघन पार आहे. पारावर खोलगट सुपारीच्या आकाराचे छोटे छोटे खड्डे आहेत. देवीच्या सीमोल्लंघन पारावर जाण्यासाठी केवळ पश्‍चिम बाजूने वर जाण्यासाठी रस्ता आहे. सीमोल्लंघन पाराच्या मध्यभागी पिंपळाचे प्राचीन झाड आहे. सीमोल्लंघन पारावर सूर्योदयाचा प्रकाश येतो. त्यामुळे देवीच्या मुखावर सूर्यप्रकाश येतो.

तुळजाभवानीचा मुख्य दरवाजा पितळी असून, नेपाळचा राजा परमार हा देवीचा निस्सीम भक्त होता, असा इतिहास सांगण्यात येतो. त्यामुळे तुळजाभवानीचे स्थान केवळ राज्य आणि दक्षिण भारतातल्या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राच्या मर्यादित नव्हते, हे आजही स्पष्ट होते. पितळी दरवाजातून देवीच्या गाभाऱ्यासमोरील परिसर दिसतो. त्यानंतर देवीचे मुख्य सिंहासन आहे. देवीच्या सिंहासनाच्या उत्तर बाजूस देवीचे न्हाणीगृह आहे. देवीच्या मुख्य गाभाऱ्याबाहेर सभामंडपाच्या बाजूला देवीचे शेजघर आहे. शेजघराच्या स्थानात देवीचा पाळणा आणि चांदीचा पलंग आहे.

पलंगाची जागा तशी मर्यादित आहे. मात्र पलंगावर असणारी गादी भव्यदिव्य आहे. देवीसमोर भवानी शंकराची मूर्ती आहे. भवानी ही पार्वतीचे रूप आहे. भवानी शंकराच्या समोरील सभामंडपात दगडी खांबावरच मंदिराची उभारणी केली आहे.

तुळजाभवानीच्या तीर्थक्षेत्रात विष्णू स्थानास महत्त्व आहे. देवीच्या मंदिराकडे जाताना पुरातन ओवरीचे स्थान आहे. मंदिराप्रमाणेच खोल परिसर असून, तेथेही तीर्थकुंड आहे. या ठिकाणी आजही रहिवासी आहेत. पूर्वी तुळजाभवानीचे स्थान अनेक कडव्या धर्मविरोधकांचे लक्ष असणारे स्थान असल्याने, या ठिकाणी मंदिराप्रमाणे व तत्सम स्थान राहावे यासाठी हे स्थान निर्माण केले असून, अनेक आक्रमणांच्या वेळी देवी त्या ठिकाणी वास्तव्यास होती, असे सांगण्यात येते.

मंदिरात आश्विन शुद्ध प्रतिपदेस घटस्थापना देवीच्या सिंहाच्या सभामंडपामध्ये होते. त्या ठिकाणी ईशान्य दिशेला धान्याची पेरणी करण्यात येते. तेथे नंदादीप असतो. घटाचा मान घटे कुटुंबीयांचा आहे. घटे कुटुंबीय मूलतः मुरूम ता. उमरगा येथील आहे. त्यांचे वास्तव्य सोलापूर - पुणे भागात आहे. घटस्थापना ते महानवमी या कालावधीत घराची पूजा होते. देवीस दररोज दोन वेळा अभिषेक पूजा कायमस्वरूपी असतात.

नवरात्रातही त्याच पद्धतीने पूजा चालू असतात. नवरात्रात प्रतिपदा ते अष्टमी कालावधीत रात्री छबिना निघतो. त्यानंतर प्रशाळपूजा होते. त्यानंतर देवीस विड्याच्या पानाचे घर बांधण्यात येते. नवमीला घटोत्थापन आणि अजावळी आजही होमकुंडावर देण्यात येतो. दशमीला देवीचे पहाटे सीमोल्लंघन होते.

नगरचे भगत (तेली) कुटुंबीय पालखी घेऊन येतात. सुमारे 45 पिढ्यांपासून ही प्रथा चालू आहे, असे सांगण्यात येते. भिगारच्या पलंगावर देवीची पाच दिवस निद्रा असते. सार्वत्रिक सीमोल्लंघनाच्या वेळी तुळजाभवानी निद्रेत असते. त्यानंतर अश्विनी पौर्णिमेला मोठी यात्रा होते.

आजपर्यंतच्या ऐतिहासिक राज्यकर्त्यांनी तुळजापूरला अनेक दाने मातृत्वभावनेने दिली. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची पुतळ्याची माळ, अहल्याबाई होळकरांची पाण्यासाठीची विहीर, हैदराबादच्या रावबहादूर संस्थानचे कार्य कोल्हापूरच्या राजे छत्रपतीचे देवीसाठी दिलेली जमिनीची देणगी अशी अनेक नावे आहेत. आता शहरात नवीन विकास योजनेचे पर्व पुढे येऊ घातले आहे.

तीनशे १५ कोटी रुपयांचा दमदार आराखडा मंजूर केला आहे. आता ही विकासाची कामे कोणत्या प्रकारे गतीने होतात, त्याकडे लक्ष लागले आहे. आराखड्यापूर्वी सरकारने प्राधिकरण केले असून, त्यासाठी सध्या सरकारी पातळीवर नियोजन चालू आहे. राज्यात तुळजाभवानी माता हे पहिले पूर्णपीठ आहे. याशिवाय माहुरची रेणुकामाता, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि वणीची सप्तशृंगी हे अर्धे पीठ आहे. देवी ही सौदर्यवाहिनी आहे. भाळी गंध त्यावर सुवर्णअलंकाराने घातलेला चोप, गळ्यात वेगवेगळे दागदागिने यामुळे तुळजाभवानीचे रूप भाविकांना मोहून टाकते.



महिषासुरमर्दिनी, माता सप्तशृंगीदेवी :

महाराष्ट्रात देवीच्या साडेतीन पीठांपैकी अर्धे पीठ असलेली सप्तशृंगीदेवी नाशिकपासून ६५ किलोमीटरवरील ४८०० फूट उंचावरील सप्तशृंगगडावर वसली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेवरील सात शिखरांचा प्रदेश म्हणजे सप्तशृंगगड. एकीकडे खोल दरी, तर दुसरीकडे छाती दडपविणारे कडे आणि यात फुललेली नाजूक हिरवाई, असा निसर्ग घेऊन येथे उभी ठाकलेली देवी जणू या निसर्गाच्या रौद्र रूपाशीच नाते सांगणारी आहे, असे वाटते.

आदिमायेच्या या गडावर वस्ती करण्याची आख्यायिकाही तिच्या या रूपातूनच जन्माला आली आहे. मातलेल्या महिषासुर राक्षसाच्या निर्दालनासाठी देवादिकांनी देवीची याचना केली अन्‌ होमाद्वारे ती प्रकटही झाली. तिचे प्रकट रूप हेच सप्तशृंगीचे होते, असे सांगितले जाते. या देवीचे महात्म्य मोठे आहे. देवी भागवतात देवीची देशात १०८ शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे.

त्यांपैकी महाराष्ट्रात साडेतीन पीठे आहेत. त्यांपैकी सप्तशृंगीचे अर्धे पीठ आहे. याव्यतिरिक्त अर्धे पीठ असल्याचा कोणताही उल्लेख त्यात सापडत नाही. या देवीला श्री ब्रह्मस्वरूपिणी असेही म्हणतात.

ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी. महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे त्रिगुणात्मक स्वरूप म्हणजे सप्तशृंगीदेवी, असे मानले जाते. नाशिकच्या तपोवनात राम, सीता व लक्ष्मण वनवासासाठी आले असता, येथे येऊन गेल्याचीही आख्यायिका आहे
.
देवीच्या अवताराबरोबरच मूर्तीविषयी असलेली आख्यायिकाही भाविकांकडून मोठ्या भक्तिभावाने सांगितली जाते. एका धनगराला दिसलेले मधमाशांचे पोळे काढण्यासाठी त्याने त्यात काठी खुपसली तेव्हा काठीला शेंदूर लागला. त्याने पोळे काढल्यानंतर तेथे देवीची मूर्ती सापडली, अशीही एक दंतकथा आहे.


येथील निसर्गाचे रूप रम्य आहे. डोंगराची कपार खोदून तयार केलेल्या महिरपीत देवीची आठ फूटी मूर्ती आहे. तिला अठरा भुजा आहेत. मूर्ती शेंदूरअर्चित असून, रक्तवर्ण आहे. डोळे टपोरे व तेजस्वी आहेत. सर्व हात एकमेकांना लागून आहेत. सर्व देवांनी महिषासुराशी लढण्यासाठी देवीला शस्त्रे दिली होती.

शंकराचे त्रिशूल, विष्णूचे चक्र, वरुणाचा शंख, अग्नीचे दाहकत्व, वायूचा धनुष्यबाण, इंद्राचे वज्र व घंटा, यमाचा दंड, वरुणाचा पाश, दक्षप्रजापतीची स्फटिकमाला, ब्रह्मदेवाचे कमंडलू, सूर्याची किरणे, कालस्वरूपी देवीची तलवार, क्षीरसागराचा हार, कुंडले व कंकण, विश्‍वकर्माचा तीक्ष्ण परशू व चिलखत समुद्राचा कमलाहार, हिमालयाचे सिंहवाहन व रत्न आहे.

मूर्ती काहीशी झुकलेली आहे. त्याबाबतची कथाही गमतीदार आहे. गडाजवळच्या दरीजवळ मार्कंडेय ऋषी तपश्‍चर्या करीत होते. त्यांची प्रार्थना देवी ऐकत होती. तेव्हापासून प्रार्थना ऐकण्यासाठी झुकलेल्या अवस्थेतच देवीची मूर्ती असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
सुमारे ४७२ पायऱ्या चढून गेल्यावर देवीचे दर्शन होते. चैत्र व नवरात्र असे दोन उत्सव येथे होतात. चैत्रात देवीचे रूप हसरे, तर नवरात्रात ते गंभीर असल्याचे सांगितले जाते. चैत्रोत्सव देवीच्या माहेरच्यांचा, तर नवरात्रोत्सव सासरच्यांचा, असे गमतीदार कारणही त्यामागे सांगितले जाते. नवरात्रात विविध कार्यक्रम येथे होत असतात. देवीजवळ घट बसवून नवरात्रास प्रारंभ होतो. देवीला रोज वेगळ्या रंगाचे वस्त्र नेसविण्यात येते. तिला अकरा वार साडी लागते.

चोळीसाठी तीन खण लागतात. नऊ दिवस विविध रूपांत पूजा-अर्चा केली जाते. नवमीच्या दिवशी होमहवन होऊन दसऱ्याच्या दिवशी पूर्णाहुती दिली जाते.

त्यानंतर नेवैद्य दाखविला जातो. दसऱ्याच्या दिवशी मंदिराच्या शिखरावर ध्वज लावण्याची परंपरा आहे. हा मान दिंडोरी तालुक्‍यातील दरेगावच्या पाटील कुटुंबीयांस आहे; मात्र ते हा ध्वज कसा लावतात हे कोणालाही समजत नाही.

गडावर सप्तशृंगीच्या मंदिराशिवाय पाहण्यासारखी इतरही काही ठिकाणे आहेत. मार्कंडेय ऋषींनी तपश्‍चर्या केलेला डोंगर व कोटीतीर्थ तेथेच आहे. याशिवाय पाण्याची बरीच कुंडे आहेत. पूर्वी १०८ कुंडे होती; मात्र आता त्यांतील बरीच बुजली आहेत. याशिवाय तांबुलतीर्थ, काजळतीर्थ व अंबालतीर्थ ही तीन महत्त्वाची कुंडे आहेत. तांबुलतीर्थाचे पाणी तांबडे आहे. देवीने विडा खाऊन थुंकला म्हणून हे पाणी तांबडे झाल्याची दंतकथा सांगितली जाते.

गडाची व्यवस्था पाहण्यासाठी ग्रामपंचायत आहे. याशिवाय देवीचे विश्‍वस्त मंडळही आहे. त्यांच्यातर्फे येथे बऱ्याच सुविधा करण्यात आल्या आहेत. भाविकांच्या निवासाची उत्तम व्यवस्था गडावरच आहे. याशिवाय जेवणाच्या रूपातील प्रसादही भाविकांना दिला जातो. भाविकांच्या गर्दीमुळे गडावरच आता सर्व सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. अगदी हॉटेलसह सर्व वस्तूंची दुकाने येथे आहेत.

गडावर जाणे आता सर्वांना सहजशक्‍य झाले आहे. नाशिकसह जिल्ह्यातील परिवहन महामंडळाच्या आगारांनी नवरात्रोत्सवाची गर्दी लक्षात घेऊन थेट गडापर्यंत जादा बस सुरू केल्या आहेत. या काळात खासगी गाड्यांना गडाखालीच उभे करावे लागते. त्यापुढे फक्त एसटी बस जाऊ शकतात. त्यामुळे थेट गडापर्यंत जाता येते. याशिवाय, गड चढून जाण्यासाठी नांदुरीतून पायऱ्यांचा रस्ता आहे.



माहूरगडची माता रेणुकादेवी :

माहूरगडची रेणुकादेवी ही साडेतीन शक्तिपीठांपैकी तिसरे पूर्ण शक्तिपीठ आहे. श्री क्षेत्र माहूरगड एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ते ऐतिहासिक, पौराणिक आणि अतिशय सुंदर नयनरम्य पर्यटनस्थळ म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे. शके १६९७ मध्ये लिहिल्या गेलेल्या 'श्री रेणुका महात्म्यम्‌' या प्राचीन अप्रकाशित संस्कृत ग्रंथातील श्री रेणुकेचे महात्म्य आणि महत्त्व श्री रेणुकेचे महात्म्य जाणून घेताना सामाजिक जीवनातील त्याचे स्थान किती महत्त्वाचे आहे, हे लक्षात येते.

श्री क्षेत्र माहूरगड हे यज्ञकुंडातून प्रगटलेल्या एकविरा देवमाता अदिती साक्षात लज्जागौरी श्री रेणुकेचे पावन क्षेत्र आहे.

सह्याद्रीच्या शिखरावर वसलेले रेणुकामातेचे हे स्थान म्हणजे धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक स्थळांसोबतच निसर्गदेवतेने प्रगट होऊन आपल्या मुक्त हाताने शुचिर्भूत सौंदर्य आणि मांगल्याने निर्माण केलेला हा कोऱ्या भूमीचा प्रदेश आहे.

देव, सिद्ध, ऋषी यांचे निवास असलेल्या भागीरथीच्या तीरावार कान्यकुब्ज नावाची प्रसिद्ध नगरी होती. त्या नगरीत धार्मिक सत्यवादी व सर्व शास्त्रांत प्रवीण असलेला इश्‍वाकू नावाचा राजा होता व इश्‍वाकू राजाच्या सद्‌गुणी मुलाचे नाव होते रेणू. रेणू राजाने कन्या प्राप्तीसाठी शंकराची आराधना केली. शंकर-पार्वतीला प्रसन्न करून त्यांच्या आशीर्वादाने कन्याप्राप्तीसाठी यज्ञ केला. त्या यज्ञातून जी तेजस्विनी चंद्रबिंबाप्रमाणे कन्या प्रगटली. तीच एकविरा. अदिती म्हणजेच श्री रेणुका. दुष्टांचे निर्दालन करण्याकरिता आणि आपल्या भक्तांचे रक्षण करण्याकरिता रेणुका यज्ञकुंडातून प्रगटली असा ग्रंथात उल्लेख आहे. यथावकाश रेणुकेचे स्वयंवर झाले तितकाच तेजस्वी आणि तपस्वी जमदग्नीची रेणुका भार्या झाली. जमदग्नीची कथा अशी आहे, की ब्रह्मदेवाचा पुत्र भृगू व भृगू आणि पौलोमी यांच्यापासून च्यवन भार्गव झाला.

ब्रह्मदेवाच्या कृपेने च्यवन भार्गवाला ब्रह्मदेवाचा अवतार असलेला रुचिक नावाचा पुत्र झाला. रुचिक आणि सत्यवतीचा पुत्र म्हणजेच भृगुकुलोत्पन्न जमदग्नी होय. भागीरथीच्या तीरावर रेणुकेचे स्वयंवर झाले. जमदग्नी आणि रेणुका दोघेही पती- पत्नी म्हणून भागीरथी तीरावरील महोदय या नगरीत राहू लागले.

सोबत स्वयंवरात इंद्राने दिलेली कामधेनू, कल्पतरू; तसेच दिव्य चिंतामणी, परीस व सिद्धपादुका सोबत होत्या. जमदग्नीला रेणुकेपासून वसू, विश्‍वासू, बृहद्‌भानू, बृहत्कन्न आणि विष्णुस्वरूप महापराक्रमी परशुराम ही पुत्रे झाली. परशुरामाचा जन्म निशा उजळली असताना, अदिती नक्षत्रावर वैशाख महिन्याच्या तृतीयेला प्रथम प्रहरी सहा ग्रह उंचीचे असताना चंद्र, राहू, संगत मिथुनेचा असताना राम नाव धारण करणाऱ्या साक्षात भगवान विष्णूने रेणुकेच्या उदरातून जन्म घेतला. परशुधारी हा महापराक्रमी पुत्र पुढे परशुराम म्हणून प्रसिद्ध झाला.

रेणुकेचे आणखीन एक रूप प्रगट होते आणि ते म्हणजे "लज्जागौरी'चे. जेव्हा रेणुकामाता रजस्वाला झाली असताना, चौथ्या दिवशी स्नानाला नदीवर गेली असता स्त्रियांसह नदीवर स्नान करणाऱ्या गंधर्वाला पाहून रेणुकेच्या मनात कामविकारण निर्माण होतो व जेव्हा ही गोष्ट जमदग्नीला कळते तेव्हा ते क्रोधीत होतात व रेणुकेला मृत्युदंडाची शिक्षा देतात व ही शिक्षा आपल्या पुत्रांनी आपल्यासमोर द्यावी, असा आग्रह धरतात. एकामागून एक चारही पुत्रांनी रेणुकेचा वध करण्याची पित्याची आज्ञा नाकारताच जमदग्नी त्यांना शाप देऊन ठार करतात.

पाचवा पुत्र परशुरामास कैलासातून बोलावितात व त्यास आज्ञा करतात, तुझी आई रेणुका भागीरथी नदीवर स्नानास गेली असता तिने मदनाचे रूप धारण करणाऱ्या गंधर्वाला कामूक भावनेने पाहिले. तेव्हा हे परशुरामा तू या दुराचारिणी व दुष्ट रेणुकेला तत्काळ ठार कर. पितृ आज्ञा म्हणून परशुराम तत्काळ आपल्या परशुने रेणुकामातेचे शीर धडावेगळे करतो. जमदग्नी प्रसन्न होतात.
पितृवचनाचे पालन केल्यामुळे परशुरामास वर मागण्यास सांगतात. मातृभक्त परशुराम आपल्या मातेला व भावंडांना पुन्हा जिवंत करण्याची विनंती करतात. जमदग्नीलाही आपल्या क्रोधाचा पश्‍चाताप होतो व ते क्रोधाला कायमचे त्यागून रेणुका व पुत्रांस पुन्हा जिवंत करतात.

या ठिकाणी रेणुकेचे "लज्जागौरी' हे रूप प्रगट होते. दुर्गा सप्तशती या ग्रंथात अनुष्ठुप छंदामध्ये एक श्‍लोक आहे, तो असा- "या देवी सर्व भुतेषू लज्जारूपेन संस्थीतः नमस्तस्यै नमस्तसै नमस्तस्यै नमो नमः' या ठिकाणी तिची पती भक्तिपरायणता लक्षात येते. रेणुकेस पती असूनसुद्धा तिच्या मनात परपुरुषाला पाहून कामविकार निर्माण होतो. तिला लज्जेचे महत्त्व असल्याने रेणुका तितक्‍याच धीराने आपल्या पतीने दिलेली मृत्युदंडाची शिक्षा स्वीकारते.


आज समाजामध्ये झालेले नैतिक अधःपतन पाहता सामाजिक व्यभिचार व संस्कृतीच्या नावाखाली विकृती जोपासणाऱ्या स्त्रीत्वाच्या तेजाचा व शक्तीचा विसर पडलेल्या त्या निर्लज्ज स्त्री, पुरुषांच्या डोळ्यांत घालण्यासाठी लज्जागौरी रेणुकेचे हे उदाहरण म्हणजे झणझणीत अंजन नव्हे काय?

वरील घटनेने जमदग्नीच्या मनात क्रोधाबद्दल उद्वेग उत्पन्न होतो व ते क्रोधाला कायमचे त्यागतात. दुसऱ्या वेळेस जेव्हा महिस्मावतीनगरीचा राजा सहस्त्रार्जुन शिकार खेळत सैन्यासह जमदग्नी आश्रमासमीप येतो. पूर्वी त्याने नारदाकडून या आश्रमाची ख्याती ऐकलेली असते तेव्हा रेणुका व जमदग्नी सहस्त्रार्जुनास आश्रमात भोजनास बोलावितात.

आपल्या सैन्यासह सहस्त्रार्जुन ते निमंत्रण स्वीकारतो; पण आश्रमात जमदग्नी व रेणुका हे दोघेच असताना, आपले व सैन्याचे आदरातिथ्य कसे करतील याची माहिती जेव्हा तो आपल्या गुप्तचरामार्फत घेतो तेव्हा त्याला कामधेनू व तिच्या चमत्काराबद्दल कळते. तो जमदग्नीकडे कामधेनूची मागणी करतो; पण जेव्हा रेणुका व जमदग्नी कामधेनू देण्यास असमर्थता दर्शवितात तेव्हा जो जमदग्नीवर तलवारीने वार करतो.

रेणुका पतीच्या संरक्षणासाठी धावून जाते. क्रोधाचा त्याग केल्यामुळे जमदग्नी आपले, रेणुकेचे व कामधेनूचे रक्षण करण्यास असमर्थ ठरतात. यामध्ये जमदग्नी ठार होतात. वरील जमदग्नीचे क्रोधसहित व क्रोधविरहित रूप पाहता फार मोठा संदेश श्री रेणुकेच्या महात्म्यामुळे समाजजीवनाला मिळतो आणि तो म्हणजे पहिल्या वेळेस क्रोधावर नियंत्रण न ठेवल्यामुळे व दुसऱ्या वेळेस क्रोधाचा मुळीच उपयोग न केल्यामुळे जमदग्नीवर मोठी आपत्ती कोसळते.

जमदग्नी पत्नी रेणुका व पुत्रांना गमावून बसतात. क्रोधावर नियंत्रण करणे व योग्य वेळी क्रोधाचा उपयोग करणे या दोहोंचाही जीवनयात्रा सफल करणे व आत्म्याचा विकास करणे यांसाठी उपयोग होतो. त्यात ज्याला संतुलन राखता येईल, सुवर्ण मध्य साधता येईल त्याचे जीवन दोन्ही दृष्टींने यशस्वी होते. एवढे होऊनसुद्धा रेणुका आपल्या पतीबद्दल व पुत्रांबद्दल तक्रार करीत नाही. या ठिकाणी रेणुकेची क्षमाशीलता हेसुद्धा लक्षात येते.

जेव्हा कैलासात परशुरामास कळते, की आई रेणुकेवर सहस्त्रार्जुनाने गंभीर एकवीस वार केल्यामुळे ती जखमी झालेली आहे आणि पिता जमदग्नीचा त्याने वध केला आहे. तेव्हा आईची हाक ऐकून परशुराम आश्रमात येतो व तिथे प्रतिज्ञा करतो, की आई सहस्त्रार्जुनाचा वध करून त्याच्या रक्ताने तुला स्नान घालील व एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रीय करीन. तेव्हा रेणुका पुत्रांस यशस्वितेचा आशीर्वाद देते व म्हणते, प्रथम आम्हा उभयतांची व्यवस्था कर.

जमदग्नीच्या अग्निक्रियेसाठी जिथे कोरी भूमी आहे तिथे घेऊन चल. जमदग्नीची अग्रिक्रिया श्री दत्तात्रेयाच्या पौरोहित्याखाली रेणुकेच्या सांगण्यावरून परशुरामाने मातृतीर्थास केली तेव्हापासून जगन्माता रेणुकेचा जिथे वास आहे, तेच श्री क्षेत्र माहूरगड.

अखिल भारतात शक्तीची जी ५१ मूळ पिठे आहेत त्यापैकी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी रेणुकामातेचे हे मूळ पीठ अतिशय शुचिर्भूत भूमी श्री क्षेत्र माहूरगडची कोरी भूमी होय.

जगन्माता रेणुका हे असेच जन्मातेचे एकरूप आहे. वरील विश्‍लेषणावरून लिंगपूजा व देवीची उपासना आर्यांच्या आधीही सिंधू संस्कृतीत चालत आल्यामुळे देवीची शक्तिपीठे व रेणुका ही अनार्य देवता आहे, हे लक्षात येते.

रेणुकेलाच मातंगी हे सुद्धा नाव आहे. विष्णुरूप परशुरामाची माता व जगन्माता शिवपत्नी अनादी अनंत आहे व रेणुका हे तिचेच रूप आहे. म्हणून श्री रेणुकेच्या रूपात शाक्त आणि वैष्णव या दोन्ही पंथांचा समन्वय आहे. अशा तऱ्हेने समाजास आदर्श वाटणारे श्री रेणुकेचे महात्म्य आहे.



कोल्हापुरची आदिमाया श्री महालक्ष्मी :

साडेतीन पीठापैकी एक करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अथवा अंबाबाई म्हणजे लाखो भाविकांचे अढळ श्रद्धा स्थान होय.

श्री महालक्ष्मी मंदिर व मंदिरातील श्री महालक्ष्मीची मुर्तीविषयीचा उल्लेख १९ पुराणांपैकी काशीखंड, पद्मपुराण, देवी भागवत, हरिवंशपुराण व स्कंदपुराणातील सह्याद्री खंडाच्या उत्तरार्धात सापडतो.इ.स. पूर्व ४ ते ५ शतकातील, म्हणजेच इ.स. दिड ते दोन हजार वर्षांपूर्वीच्या परशुरामाच्या कारकीर्दीत श्री महालक्ष्मी मूर्तीची स्थापना झाली असावी.

मूर्ती साळुंकीच्या आकाराप्रमाणे असून ती दगडी चबुतऱ्यावर उभी आहे. मूर्तीच्या मागे सिंह उभा आहे. मूर्तीच्या भूमध्यावर पद्मरागिणी असून ती नैसर्गिक आहे. मूर्ती चतुर्भज असून उजव्या हातात म्हाळूंग आणि डाव्या हातात पानपात्र आहे. मस्तकावर मुकुट असून त्यावर शेषाने छाया धरली आहे. उत्तराभिमुख योनी व लिंग आहे.


उपलब्ध पुराव्यानुसार इ.स. १०९ मध्ये राजा कर्णदेव कोकणातून कोल्हापूरात आला. त्यावेळी ही मूर्ती एका छोट्या मंदिरात होती. मंदिराचा आसपासचा सर्व भाग अरण्याने व्यापलेला होता. कर्णदेवाने हे जंगल तोडून मंदिर परिसर स्वच्छ केला. 

सध्याच्या मंदिराचा मुख्य भाग इ. स. ६०० ते ७०० या शतकात असल्याचे दाखले मिळतात, परंतु ९८० या शिलाहाराने दिलेला ताम्रशासन आणि राष्ट्रकुल राजा पहिला अमोघवर्मा याने इ. स. ७९३ मध्ये ठाणे जिल्ह्यात संजान गावी मिळालेला ताम्रपट हे दोन प्राचीन पुरावे. राजा महामांडलिक रामसिंहदेव स्वतःला देवीचा उपासक म्हणवितो. रामसिंहाच्या पूर्वीच्या कोल्हापूरच्या शिलाहाराच्या पाच पिढ्या होऊन गेल्या. त्यातील पहिला पुरूष 'जतीग' हा होय. त्यामुळे ८६० ते ८८० या काळात शिलाहार लक्ष्मीचे उपासक बनले.

आठव्या शतकात भूकंपामुळे हे मंदिर खचले. नवव्या शतकाच्या कालावधीत राजा गंडवादिक्ष याने मंदिराचा विस्तार केला. त्याने महाकालीचे मंदिर बांधले असून ११७८ ते १२०९ या काळात शिलाहार राजा जयसिंग व राजा सिंघल यांच्या कारकीर्दीत दक्षिण दरवाजा व अतिबलेश्‍वर मंदिर बांधून गेले. १२१८ मध्ये यादव तौलम याने महाद्वार बांधले. या राजाने देवीला जडजवाहीर अर्पण करून द्रव्य दिल्याचा उल्लेख मंदिरातील गारेचा गणपती श्री सिद्धिविनायक मंदिरातील खांबावर आढळतो.

श्री महालक्ष्मी मंदिरात एकूण पाच शिखरे आहेत. मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे. मूळ मंदिराला जोडून गरूड मंडप उभा आहे.
बाराच्या शतकात शिलाहार राजाने महासरस्वती मंदिर, महालक्ष्मीचा प्रदक्षिणामार्ग बांधल्याचेही दाखले सांगतात.

चालुक्‍याच्या काळात मंदिरासमोरील गणपतीची स्थापना झाली. १३ व्या शतकात शंकराचार्य पीठातर्फे नगारखाना व कचेरीचे बांधकाम तसेच मंदिराच्या आवारात दिपमाळा बांधण्यात आल्या. मंदिराच्या आवारात सध्या सात दिपमाळा अस्तित्वात आहेत.

मोगल साम्राज्यात मंदिरावरील हल्ल्यातून श्री महालक्ष्मीची मूर्ती पूजक मंडळीनी लपवून जवळच असलेल्या कपिलतीर्थ मंडईतील एका पुजाऱ्याच्या घरी ठेवली होती. त्यानंतर इ.स. १७१९ मध्ये २६ सप्टेंबर (अश्‍विन महिन्यात सोमवारी विजयादशमी मन्मथ संवत्सर) या दिवशी पुन्हा महालक्ष्मी मंदिरात स्थापन करण्यात आली.

१७ व्या शतकानंतर विविध राजघराण्यातील थोर मंडळींनी या मंदिराला भेटी दिल्या. त्यानंतर दिवसेंदिवस महालक्ष्मीचे भक्त वाढतच गेले आणि ही देवी अवघ्या महाराष्ट्राची आद्यदेवता बनली.


🙏 इति समाप्त !

No comments:

Post a Comment