थोडं माझ्या विषयी

Friday 20 February 2015

गणपतीपुळे

गणपतीपुळे हे गाव स्वयंभू गणपतीसाठी प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र रत्नागिरी तालुक्यातील पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जाते. रत्नागिरी हातखंबा मार्गे गेल्यास सुमारे पंचेचाळीस किलोमीटर आणि रत्नागिरी साखरतर-आरेवारेमार्गे गेल्यास सुमारे तीस किलोमीटर अंतरावर आहे. सांगली मिरजमार्गे येणार्‍या प्रवाशांना हातखांबा येथून गणपतीपुळे येथे जाता येते.


निसर्गरम्य तिर्थक्षेत्र, गणपतीपुळे, रत्नागिरी

रत्नागिरीतील एक संस्मरणीय ठिकाण म्हणजे गणपती पुळे. सुट्टीच्या काळात आणि जवळपास प्रत्येक शनिवार-रविवार गणपतीपुळे हे लाखो भाविकांनी गजबजलेले असते.अशा या रम्य निसर्गस्थळा विषयी..

गणपतीपुळे हे गाव स्वयंभू गणपतीसाठी प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र रत्नागिरी तालुक्यातील पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जाते. रत्नागिरी हातखंबा मार्गे गेल्यास सुमारे पंचेचाळीस किलोमीटर आणि रत्नागिरी साखरतर-आरेवारेमार्गे गेल्यास सुमारे तीस किलोमीटर अंतरावर आहे. सांगली मिरजमार्गे येणार्‍या प्रवाशांना हातखांबा येथून गणपतीपुळे येथे जाता येते.

मुंबई-महाडमार्गे प्रवास करणार्‍या पर्यटकांना निवळी फाटा येथून गणपतीपुळे येथे जाता येते. कोकण रेल्वेने आल्यास रत्नागिरी स्टेशनवर उतरून बस किंवा रिक्षाने यावे लागते.

निसर्गरम्य समुद्रकिनारा लाभलेले हे गाव असून किनार्‍याला लागूनच सुमारे तीनशे फूट उंचीची आणि एक किलोमीटर परिघाची टेकडी आहे. या टेकडीच्या पायथ्याशी समुद्राकडे तोंड करून पश्चिम दिशेला गणपतीचे मंदिर आहे. मंदिराचा गाभारा दगडांनी बांधलेला आहे.  गाभार्‍यात जाण्यासाठी पायर्‍या उतरून आत जावे लागते. समोर सभामंडप असून तो अलीकडेच नव्याने बांधलेला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मोठय़ा पितळेचा मूषक म्हणजे मोठा उंदीर असून त्याच्या कानात भाविक लोक आपली इच्छा प्रकट करतात. टेकडीला प्रदक्षिणा घालण्यासाठी गोलाकार प्रदक्षिणा मार्ग तयार करण्यात आला आहे. रत्नागिरीतील जांभ्या दगडाचे येथील सौंदर्य आपले मन वेधून घेते. दरवर्षी २ ते ८ फेब्रुवारी आणि २ ते ८ नोव्हेंबर या दिवसात सूर्यास्ताची किरणे गणेशमूर्तीवर पडतात.

महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे रिसॉर्ट, बंगले येथे आहेत.अनेक खाजगी आलीशान हॉटेल्स येथे असून तेथे राहणार्‍या मूळच्या ग्रामस्थांनी आपापल्या घरात भोजन आणि निवासस्थानाची सोय पर्यटकांसाठी केलेली आहे. सर्वसाधारण पर्यटकांना परवडतील असे दर तेथे आहेत. देवळाच्या विश्वस्त मंडळाने भक्त निवास कमी दरात उपलब्ध करून दिले आहेत. पर्यटकांसाठी रोज दुपारी खिचडीचा प्रसाद दिला जातो. मंदिरात प्रसाद अथवा एकादशणी करावयाची असल्यास विश्वस्त मंडळातर्फे केली जाते. खाजगीरीत्याही तेथे असलेले पुरोहित एकादशणी करतात.

मंदिराच्या परिसरात अनेक दुकानांचे गाळे असून तेथे पूजा साहित्य, मूर्ती मिळतात. हॉटेल्सही तेथे आहेत. येथील समुद्रकिनारा अतिशय स्वच्छ आहे. कधीच समुद्र न पाहिलेले किंवा समुद्र पाहून समुद्रस्नान करण्याची इच्छा झालेले पर्यटक समुद्रात जातात. पर्यटकांनी एकदोन फूट खोल असलेल्या पाण्यापर्यंतच जावे, लहान मुलांना समुद्रात फक्त काठावरील पाण्यातच खेळू द्यावे. कारण दरवर्षी या समुद्रात बरेच प्रवासी बुडून मरण पावलेले आहेत. येथील समुद्राच्या तळाशी उंचीचे प्रमाण समपातळीत नाही. काही ठिकाणी खोली जास्त आहे  आणि लाटांचा वेग जबरदस्त असल्याने पोहणार्‍यांची दमछाक होते, काहीवेळा तर पोहणे कठीण होते. म्हणूनच येथे पर्यटकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

छत्रपती शिवाजी राजे यांचे प्रधान अण्णाजी दत्तो यांनी गाभारा बांधून घेतला. माधवराव पेशवे, सांगली संस्थानचे हरभट पटवर्धन अशा अनेक थोर लोकांनी या गणेशाची उपासना केली आहे. टेकडीच्या पायथ्याशी किनार्‍यालगत गणपतीचे तोंड, पोट दिसेल अशा आकाराचा नैसर्गिकरीत्या तयार झालेला भाग होता. दोन गंडस्थळे, नाभी आणि एकदंत असलेली मूर्ती, चंदनाच्या गंधाने तोंड, डोळे, कान, यांचे रेखाटन केले जाते.

गणेश चतुर्थी, माघी चतुर्थी, अंगारकी अशा दिवशी लाखो भाविक येथे येतात. पर्यटन सुविधा आणि प्रवासी कंपन्यांमार्फत येणारे लोक भरपूर आहेत. शनिवार-रविवार जोडून सुट्टी घेऊन येणार्‍यांची संख्या रोज वाढते आहे. कोकणांतील या सर्व भागात नारळ सुपारीची आकाशाला गवसणी घालणारी उंच झाडे, पूर्वी ओसाड असलेल्या कातळावर तयार केलेल्या हापूस आंब्याच्या छान बागा पाहून मन हलके होते. शहरांतील सिमेंटचे जंगल आणि गर्दीतून बाहेर पडल्याचे समाधान मिळते.शिवाय श्रीगणेशाच्या दर्शनाने शांती लाभते. भगवान परशुरामांनी चिपळूणजवळ परशुरामक्षेत्र निर्माण केले. उपासनेसाठी गणपतीचे अस्तित्त्व असावे म्हणून प्रार्थना केली. त्यामुळे हा स्वयंभू गणपती प्रकट झाला. अशी आख्यायिका आहे. फार पूर्वी कोणी एक वाटसरू किनार्‍याने चालत असता त्याला ठेच लागली त्याने खाली पाहिले त्याला साधारण गणपतीसारखा आकार दिसला. त्याची श्रद्धा बसली ही गोष्ट कर्णोपकर्णी पसरली. त्यामुळे त्या जागेला देवत्त्व प्राप्त झाले. अशा स्वरूपाची याची कथा आहे. अंधश्रद्धा वगळता गणपतीपुळे हे तीर्थक्षेत्र झाले असून लाखो भाविक तेथे येतात, हे सत्य आहे. महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशात त्याला मानाचे स्थान आहे.

वीस पंचवीस वर्षापूर्वी गणपतीपुळे हे गाव कोकणातील एक साधे गाव होते. कच्चे रस्ते, हॉटेल नाहीत, गर्दी नाही, माघी चतुर्थीला जत्रा भरत असे मंदिरही लहान होते. पर्यटकही फारसे येत नव्हते. त्यावेळी धार्मिक, आध्यात्मिक भावना होती, आता व्यावसायिक रूप आले आहे. येथे प्राचीन कोकणसृष्टी निर्माण केलेली आहे. जुन्या काळातील बारा बलुतेदार पद्धतीची माहिती येथे मिळते.  जवळच असलेल्या मालगुंड या गावी कवी केशवसुत यांचे स्मारक आहे.

गणपती पुळेपासून वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर जयगड बंदर आहे तेथे जिंदाल कंपनीचा वीज निर्मिती प्रकल्प आहे. मोंगलकालीन किल्ला आहे. कर्णेश्वर मंदिर आहे. ब्रिटीशकालीन लाईट हाऊस असून पितळी भाग कायम पॉलिश करून छान ठेवलेला आहे.
जयगडपासून परतीच्या मार्गावर खंडाळा गारंबापासूनपुढे मुख्य रस्त्यापासून आत जाणारा रस्ता कोळिसरे फाटा लागतो. तेथे पुरातन लक्ष्मी केशव मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती सुंदर कोरीव काम केलेली असून आकर्षक आहे. येथे बाराही महिने वाहणारा थंडगार पाण्याचा झरा आहे हे पाणी अत्यंत शुद्ध आहे. येथेही भक्त निवासीची सोय आहे.  कोकणदर्शनच्या सहलीत अवश्य पहावीत अशी ही ठिकाणे आहेत

No comments:

Post a Comment